esakal | अन्नपानविधी धान्यवर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

अन्नपानविधी धान्यवर्ग

अन्नपानविधी धान्यवर्ग

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

धान्य म्हणजे केवळ गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी नव्हे; नाचणी, जव-यव या धान्यांचेही सेवन करायला हवे. ही धान्येही शरीरासाठी उपयुक्त आहेत. 

धान्य म्हटले, की सहसा आपल्या डोळ्यांसमोर गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी ही धान्ये येतात. मात्र याखेरीज अजून बरीच धान्ये आयुर्वेदात सांगितलेली आहेत. सध्याच्या काळातही उपलब्ध आहेत. असेच एक धान्य म्हणजे नाचणी.

नर्तक - नाचणी
नर्तकस्तुवरस्तिक्‍तो मधुरस्तर्पणो लघुः ।
बल्यः शीतः पित्तहरस्त्रिदोषशमनो मतः ।
रक्‍तदोषहरश्‍चैव मुनिभिः पूर्वमीरितः ।। 

नाचणी तुरट, कडवट, मधुर चवीची, पचायला हलकी, वीर्याने थंड, ताकद वाढविणारी, तृप्ती करणारी; तिन्ही दोषांचे शमन करणारी आणि रक्‍तदोष दूर करणारी असते. 

नाचणीची भाकरी पचायला सोपी, ताकद वाढविणारी असते, त्यामुळे पथ्यकर आहारात अग्रणी असते. नाचणीचे सत्त्व काढता येते. नाचणीचे सत्त्व अशक्‍तपणा कमी होण्यासही फारच चांगले असते. नाचणी सत्त्व, गूळ  व पाण्यासह शिजवून केलेली लापशी घेण्याने शक्‍ती सुधारते. नाचणी रक्‍तातील दोष कमी करतेच, बरोबरीने रक्‍त वाढवण्यासही मदत करते. दक्षिण भारतात नाचणीची पेज किंवा खीर लहान मुलांना देण्याची पद्धत आहे. यामुळे लहान वयात हाडे सशक्‍त होण्यास, रक्‍त शुद्ध व संपन्न होण्यास, एकंदर विकासास हातभार लागतो. बाळंतिणीने आहारात नाचणीचा अंतर्भाव केल्यास स्तन्यपानास मदत मिळते, शिवाय नवजात बालकाला कॅल्शियम, लोहतत्त्वाचाही पुरवठा होतो. 

आधुनिक संशोधनानुसार नाचणीमुळे कॅल्शियमचे प्रमाण योग्य राहण्यास, ओस्टिओपोरोसिससारखे त्रास टळण्यास मदत मिळते. वजन कमी होण्यासाठी, रक्‍तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाचणीचा रोजच्या आहारात समावेश करता येतो. 

यव-जव
निकस जमिनीतही जव हे धान्य सहज येते. बैल, घोडे, हत्ती वगैरे जनावरांना खाद्य म्हणून दिले जाते. जवाच्या पिठाची भाकरी खाण्याची साधारणतः पद्धत असते. चरकसंहितेत जवाचे गुणधर्म पुढीलप्रमाणे दिलेले आहेत. 
रुक्षः शीतोऽगुरुः स्वादुर्बहुवातशकृत्‌ यवः ।
स्थैर्यकृत्‌ सकषायश्‍च बल्यः श्‍लेष्मविकारनुत्‌ ।।
....चरक सूत्रस्थान

जव चवीने मधुर, तुरट, गुणाने रुक्ष, वीर्याने थंड, पचण्यास जड नसणारे असे असतात. शरीरात वात व मल (पुरीष) यांचे प्रमाण वाढविणारे असतात. शरीराला स्थिरता देतात, ताकद वाढवितात, कफजन्य विकारांना दूर करणारे असतात. 
या सर्व गुणांमुळे यव प्रमेहामध्ये पथ्यकर समजले जातात. 
यवप्रधानस्तु भवेत्‌ प्रमेही ।
....चरक चिकित्सास्थान
जवाचा मुख्यत्वे समावेश असलेले पदार्थ प्रमेही व्यक्‍तीने सेवन करावेत. 
भृष्टान्‌ यवान्‌ भक्षयतः प्रयोगात्‌ शुष्कांश सन्तु न भवन्ति मेहाः ।।

भाजलेल्या जवाच्या पिठापासून बनविलेली भाकरी नित्य सेवन करणाऱ्या व्यक्‍तीला प्रमेह होत नाही.

जव थंड असतात, त्यामुळे शरीरात कुठेही दाह होत असला, घोळणा फुटून नाकातून रक्‍त येण्याची प्रवृत्ती असेल, किंबहुना शरीरातून कुठूनही रक्‍तस्राव होत असेल तर पुढील प्रकारे जवाची योजना करता येते. जव भाजून घ्यावेत, त्यांचे पीठ करावे. थंड पाण्यात थोडे जवाचे पीठ मिसळून फार घट्ट नाही, फार पातळ नाही अशा प्रकारे मिश्रण तयार करावे, मग त्यात थोडी खडीसाखर आणि थोडे साजूक तूप मिसळून घोट घोट प्यावे. 

जव गर्भ स्थिर करणारे असतात, त्यामुळे अगोदर गर्भपात झालेला असल्यास गर्भवतीने जव, तीळ व साखर हे समभाग एकत्र करून त्याचे चूर्ण करून सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा या प्रमाणात मधात मिसळून घेणे हितावह असते.  
या पुढच्या धान्यांची माहिती आफण पुढच्या वेळी घेऊ या.