अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 1 June 2018

शरीरात कुठेही अवरोध झालेला असला तर त्याचे छेदन करून मार्ग मोकळा करण्याचे काम हिंग करू शकतो. 

कुड्याची साल, काश्‍मीरची फळे, बला, पृश्निपर्णी, शालिपर्णी ही द्रव्ये कोणत्या कार्यात सर्वोत्तम असतात याची माहिती आपण मागच्या वेळी घेतली. आता या पुढचा अग्र्यसंग्रहातील भाग पाहूया.

गोक्षुरको मूत्रकृच्छ्रानिलहराणाम्‌ - गोक्षूर मूत्रकृच्छ्र म्हणजे लघवी अडखळत होणाऱ्या विकारावर आणि वातशमन करण्यासाठी सर्वश्रेष्ठ होय.

गोक्षुराचे मूळ व फळ औषधात वापरले जाते. गोक्षूर मुख्यत्वे मूत्रवहसंस्थेसाठी उपयोगी असतो, परंतु वातशमन करत असल्याने तसेच मधुर चव, मधुर विपाक व शीत वीर्याचा असल्याने शुक्रधातूला पोषकही असतो. यामुळे तो बहुतेक सर्व रसायनकल्पांमध्येही वापरला जातो. बस्ती या अवयवाची शुद्धी तसेच कार्यक्षमता वाढविणारा असल्याने प्रमेहातही उपयोगी पडतो. लघवीला कमी प्रमाणात होत असेल, जळजळ होत असेल, तर गोक्षुराच्या फळांचा व मुळांचा काढा करून तो साखरेसह पिण्याने लगेच गुण येतो. लघवीवाटे रक्‍त जात असेल तर गोक्षुराचा दुधात केलेला क्षीरपाक घेण्याने बरे वाटते. गुग्गुळ या वातशामक द्रव्याबरोबर गोक्षुराच्या इतर द्रव्यांसमवेत केलेल्या गोळ्या म्हणजे गोक्षुरादी गुग्गुळ लघवीशी संबंधित विकारांवर तसेच वातविकारांवर उत्तम असतात. 

हिंगुनिर्यास : छेदनीयदीपनीयानुलोमिकवातकफप्रशमनानाम्‌ - छेदन करण्यासाठी, अग्नीला प्रदीप्त करण्यासाठी, वाताचे अनुलोमन करण्यासाठी आणि वात-कफदोषाचे शमन करण्यासाठी हिंग उत्तम असतो.

शरीरात कुठेही अवरोध झालेला असला तर त्याचे छेदन करून मार्ग मोकळा करण्याचे काम हिंग करू शकतो. विशेषतः पोटात वायू अडकून राहिला तर जीव कासावीस होते, अशा वेळी हिंगाचा आतून बाहेरून वापर करता येतो. तसेच छातीत कफ साठून राहिल्याने श्वासाला, प्राणसंचरणाला अडथळा उत्पन्न होतो अशा वेळी हिंगाची योजना करता येते. हिंग अतिशय तीक्ष्ण व उष्ण असल्याने तो तुपात परतून शुद्ध करूनच वापरायचा असतो. शिवाय सहसा नुसता हिंग औषध म्हणून घेतला जात नाही. तर तो अन्नाबरोबर किंवा इतर द्रव्यांबरोबर मिसळून घेतला जातो. उदा. हिंग्वाष्टक नावाचे प्रसिद्ध चूर्ण भाताच्या पहिल्या घासाबरोबर व तुपाबरोबर घ्यायचे असते किंवा ताकाबरोबर घ्यायचे असते. 

वात धरल्यामुळे लहान मुलांचे पोट दुखते अशा वेळी हिंगाच्या खड्याचा हलकासा शेक करण्याचा उपयोग होतो. जंतावरही हिंग प्रभावी औषध असते, त्यामुळे स्वयंपाकात फोडणीमध्ये चिमूटभर हिंग टाकण्याची पद्धत असते. अधिक प्रमाणात किंवा कच्चा हिंग खाणे टाळणेच श्रेयस्कर. 

तक्राभ्यासो ग्रहणीदोषशोफअर्शोघृतव्यापत्‌ प्रशमनानाम्‌ - ताक नियमित पिणे हे ग्रहणीविकार, अंगावर सूज येणे, मूळव्याध यावर उत्तम असतेस तसेच घृतपान करताना काही अडचण उत्पन्न झाली तर त्यावर ताक हे एक उत्तम औषध असते. 

ताक वात-कफशामक आणि तरीही पित्त व वाढविणारे असते, फक्‍त ते ताजे, गोड व भारतीय परंपरेचे विरजण लावून तयार केलेले असायला हवे. दुधाचे दही लावून ते नीट लागले की घुसळून लोणी काढून टाकलेले ताक हे खरे ताक होय. 

हिंगुजीरयुतं घोलं सैन्धवेन च संयुतम्‌ ।
भवेत्‌ अतीव वातघ्नं अर्शोऽतिसार हृत्परम्‌ । 

रुचिदं पुष्टिदं बल्यं बस्तिशूलविनाशनम्‌ ।। ...भावप्रकाश
भाजलेला हिंग, जिरे व सैंधव मीठ मिसळलेले ताक अतिशय वातशामक असते. मूळव्याध, अतिसारसारख्या रोगात उत्तम असते, अतिशय रुचकर व पौष्टिक असते, ताकद वाढवते व मूत्राशयासंबंधित वेदना दूर करते, ताक पचनसंस्थेसाठी उत्तम असते. उलटी, अतिसार, उदरशूळ, जंत, संग्रहणी, मूळव्याध वगैरे त्रासात ताक औषधाप्रमाणे उपयोगी असते. विविध वातविकार, विषमज्वर, प्रमेह, त्वचारोग, सूज वगैरे विकारात पथ्यकर असते.  

अम्लवेतसो भेदनीयदीपनीयअनुलोमिकवातश्‍लेष्महराणाम्‌ - अम्लवेतस ही वनस्पती भेदन, दीपन, अनुलोमन आणि वात-कफशमनासाठी उत्तम समजली जाते. 

पित्त वाढविणारे परंतु पचनसंस्थेशी संबंधित सर्व कार्यांना ताकद देणारे असे हे द्रव्य होय. पोटात वायू धरणे, भूक न लागणे, पोट साफ न होणे वगैरे सर्व विकारांवर अम्लवेतस उपयोगी असतो. याचे भेदनाचे काम इतके तीव्र असते की अम्लवेतसाच्या फळात लोखंडाचा खिळा किंवा दाभण टोचून ठेवला तर तो हलके हलके विरघळून जातो. 

यावशूक : संस्रनीयपाचनीयअर्शोघ्नानाम्‌ - यवक्षार स्रंसन (मलशुद्धी) होण्यासाठी, पचनासाठी, व मूळव्याधीचा नाश करण्यासाठी सर्वश्रेष्ठ असतो. 

जवाचे पूर्ण रोप जाळून तयार केलेल्या राखेपासून यवक्षार तयार केला जातो. क्षार असल्याने तो जपून वापरावा लागतो. चिमूटभर यवक्षार ताकाबरोबर घेण्याने पचन सुधारते तसेच लघवीला साफ होण्यासही मदत मिळते. 

अग्र्यसंग्रहातील पुढील द्रव्यांची माहिती आपण पुढच्या वेळी घेऊया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balaji tambe article health