esakal | रक्षण पर्यावरणाचे
sakal

बोलून बातमी शोधा

Environment

पर्यावरणाला हानी पोचू नये, यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करण्याची सध्या अतोनात गरज आहे आणि त्यासाठी आयुर्वेदिक जीवनशैली आचरणात आणण्यासारखा दुसरा पर्याय सापडणार नाही. 

रक्षण पर्यावरणाचे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

आपले अस्तित्व टिकविण्यासाठी, जीवन जगण्यासाठी आपण पदोपदी, क्षणोक्षणी आपण पर्यावरणावर अवलंबून असतो. पर्यावरणही स्वतःची पर्वा न करता आपल्याला हवे ते भरभरून देण्यासाठी तयार असते. आपण फक्‍त आपल्यापुरता विचार करणे सोडून देण्याची वेळ आज आलेली आहे. पर्यावरणाला हानी पोचू नये, यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करण्याची सध्या अतोनात गरज आहे आणि त्यासाठी आयुर्वेदिक जीवनशैली आचरणात आणण्यासारखा दुसरा पर्याय सापडणार नाही. 

‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही उक्‍ती पर्यावरण व मनुष्य यांच्या बाबतीत पुरेपूर लागू पडते. समस्त सजीव, विशेषतः मनुष्य व इतर प्राणी हे जगण्यासाठी पर्यावरणावरच अवलंबून असतात. आपल्याला श्वास घेण्यासाठी हवा लागते, पोट भरण्यासाठी अन्न-पाणी लागते, संरक्षणासाठी वस्त्र लागते, हे सर्व वनस्पतींपासूनच तयार होत असते. आपल्याला राहण्यासाठी घर लागते ज्यासाठी दगड, विटा, वाळू, लाकूड या गोष्टी पर्यावरणातूनच घ्याव्या लागतात. आपल्याला लिहिण्या-वाचण्यासाठी कागद लागतो ज्याचा स्रोतही पर्यावरणातूनच आलेला असतो. गाडी चालविण्यासाठी इंधन लागते तेसुद्धा पर्यावरणातून घ्यावे लागते. एकूणच आपले अस्तित्व टिकविण्यासाठी, जीवन जगण्यासाठी आपण पदोपदी, क्षणोक्षणी आपण पर्यावरणावर अवलंबून असतो. पर्यावरणही स्वतःची पर्वा न करता आपल्याला हवे ते भरभरून देण्यासाठी तयार असते. आपण फक्‍त आपल्यापुरता विचार करणे सोडून देण्याची वेळ आज आलेली आहे. पर्यावरणाला हानी पोचू नये, यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करण्याची सध्या अतोनात गरज आहे आणि त्यासाठी आयुर्वेदिक जीवनशैली आचरणात आणण्यासारखा दुसरा पर्याय सापडणार नाही. 

आयुर्वेद शास्त्राचा नीट अभ्यास केला, त्यातली मूळ तत्त्वे समजून घेतली तर हे लक्षात येते की हे शास्त्र पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी पोचणार नाही यासाठी प्रत्येक ठिकाणी तत्पर असलेले दिसते. पर्यावरणाचे रक्षण आणि पर्यावरणाचा योग्य वापर हे संतुलन आयुर्वेदशास्त्राने ज्या पद्धतीने सांभाळले आहे, त्याला तोड नाही. आयुर्वेदाने अग्नी, वायू, काळ यांना ‘भगवान’ म्हटलेले आहे, तर वनस्पतींना देवता म्हणून संबोधलेले आहे. पर्यावरणातील प्रत्येक जीवमात्राचे रक्षण करावे, शांतिपूर्ण व्यवहार असावा, शुद्धतेचे भान ठेवावे अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आयुर्वेदाची औषधे नैसर्गिक द्रव्यांपासून बनवलेली असल्याने ती तयार करताना, तसेच शरीरातून उत्सर्जित झाल्यानंतरही पर्यावरणाला घातक ठरत नाहीत, उलट यातून वृक्ष वनस्पतींचे संवर्धन होते, मनुष्य आणि निसर्गातील संबंध अधिकाधिक दृढ होत जातो. 

रोग होऊ नये यासाठी रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम असणे अपेक्षित असते. मुळातील प्रकृती चांगली असली, आहार-आचरणाच्या मदतीने ती संतुलित ठेवली, कायाकल्प-रसायनांच्या साहाय्याने शक्‍ती, ताकद व्यवस्थित राखली असली तर खरे म्हणजे रोगांना प्रतिकार करता यायला हवा; पण या वैयक्‍तिक प्रयत्नांच्या वर असते ते पर्यावरण. हवा, पाणी, जमीन व काळ हे पर्यावरणाचे मुख्य घटक जर बिघडले तर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो. असे होण्यामागे मुख्य कारण असते निसर्गाविरुद्ध आचरण. या संबंधात चरकसंहितेत सांगितले आहे, 

वाय्वादीनां यद्वैगुण्यमुत्पद्यते तस्य मूलम्‌ अधर्मः, तन्मूलं वा असत्कर्म पूर्वकृतं, तयोर्योनिः प्रज्ञापराध एव ।
...चरक विमानस्थान

हवा, पाणी वगैरे पर्यावरणाचे आधारस्तंभ असणाऱ्या घटकांमध्ये बिघाड उत्पन्न होण्यामागे मूळ कारण असते अधर्म. म्हणजे प्रत्येकाने स्वतःचे कर्तव्य योग्य प्रकारे न करणे, निसर्गनियमांना डावलून स्वतःच्या स्वार्थासाठी अयोग्य प्रकारे वागणे, विवेकबुद्धीला न पटणारे दुर्वर्तन करत राहणे.

एकदा या बिघाडाला सुरवात झाली की त्याचे पडसाद पर्यावरणात पुढील रूपाने उठू लागतात. 

  तेन आपो यथा यथाकालं देवो वर्षति न वा वर्षति विकृतं वा वर्षति - पाऊस योग्य वेळेला पडत नाही, अजिबातच पडत नाही किंवा विकृत स्वरूपात पडतो.   

  वाता न सम्यक्‌ अभिवहन्ति - वारे योग्य प्रकारे वाहत नाहीत, ज्यामुळे वादळ, भूकंप वगैरे उत्पात होऊ शकतात. 

  क्षितिर्व्यापद्यते - जमिनीत दोष उत्पन्न होतात, ज्यामुळे अन्नधान्याची उत्पत्ती योग्य प्रकारे होऊ शकत नाही.

  सलिलान्युपशुष्यन्ति - पाणी आटून जाते
 ओषधयः स्वभावं परिहायापद्यन्ते विकृतिम्‌ - औषधी वनस्पती आपले स्वाभाविक गुण सोडून देऊन बिघडतात, हीनवीर्य बनतात.

पर्यावरणातील या बदलांचा एकट्या-दुकट्यावर नाही, तर समस्त समाजावर दूरगामी दुष्परिणाम होतो, हे अध्याहृत आहेच. हे सर्व बदल खरे तर होण्यापूर्वीच टाळायला हवेत. एकदा का पंचतत्त्वांमध्ये बिघाड उत्पन्न झाला, काळ बिघडला की त्यावर सहजासहजी उपचार करता येत नाहीत. कारण, एक तर ज्याच्या माध्यमातून उपचार करायचे त्या औषधी वनस्पती, अन्नधान्य हीनवीर्य झालेले असतात. शिवाय, सर्व समाजाने एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर तसेच वैयक्‍तिक पातळीवरही पर्यावरणाच्या संतुलनासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असते. 

पंचमहाभूते ही आयुर्वेदातील, खरे तर सर्वच प्राचीन भारतीय शास्त्रांमधील एक मूळ संकल्पना. संपूर्ण विश्व पाच महाभूतांपासून तयार झाले आणि यातील कोणत्याही गोष्टीचा नाश होतो, तेव्हा तिचे विलीनीकरण पंचमहाभूतांमध्येच होते. मृत्यूनंतर मनुष्यशरीरालाही हे लागू होते म्हणून मृत्यूला ‘पंचत्वात विलीन होणे’ असेही व्यवहारात म्हटले जाते. हा नैसर्गिक नियम जोवर पाळला जातो तोपर्यंत पर्यावरणही सुरक्षित राहते, 

मात्र अनैसर्गिक, रासायनिक द्रव्ये पंचत्वात सहजासहजी विलीन होत नाहीत किंवा त्यांच्या विलीनीकरणाला कल्पनेपेक्षा जास्ती वेळ लागतो. यातून पर्यावरणाच्या असंतुलनाला सुरवात होते. यात रासायनिक खते, रासायनिक औषधे, प्लॅस्टिक, औद्योगिक क्षेत्रातील तयार होणारे बायप्रॉडक्‍ट्‌स वगैरे अनेकानेक गोष्टींचा समावेश होतो. सध्याच्या काळात या प्रकारच्या गोष्टींची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली दिसते. याचा परिणाम म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास होणे स्वाभाविक होय. 

सद्यघडीला पर्यावरणाचा ऱ्हास भरून यावा आणि नवीन बिघाड होऊ नये, या दोन्ही पातळ्यांवर काम होणे गरजेचे आहे. 

यात पाण्याचा काळजीपूर्वक वापर, वृक्षसंवर्धन, जैविक साखळीतील प्रत्येक घटकाचे रक्षण, रासायनिक खते-औषधे यांच्या अवाजवी वापरावर निर्बंध, रोजच्या व्यवहारात निसर्गाला हानी पोचणार नाही यासाठी दक्ष राहणे. कचऱ्याची विल्हेवाट वेळेवर व योग्य प्रकारे लावणे, हवेतील व पाण्यातील प्रदूषण कमी होण्यासाठी योग्य प्रयत्न करणे, अशा अनेक गोष्टींचा समावेश करावा लागतो. 

पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, पंचतत्त्वामध्ये बिघाड होऊ नये, यासाठी आधुनिक काळातही आयुर्वेदिक तत्त्वांचा रोजच्या जीवनात वापर करायचा ठरविले तर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यायाने समस्त प्राणिमात्रांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करता येतील. 

  रासायनिक द्रव्ये वापरून तयार केलेल्या वस्तूंपेक्षा नैसर्गिक शुद्ध घटकांपासून तयार केलेल्या गोष्टींच्या वापरास प्राधान्य देणे, उदा. प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडाच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या डब्यांऐवजी काचेचे किंवा स्टीलचे डबे, बरण्या वापरणे, प्लॅस्टिकच्या कुंड्यांऐवजी पारंपरिक मातीच्या कुंड्या वापरणे वगैरे

  नैसर्गिक संसाधनांचा जपून वापर करणे. उदा. कागद वाचवणे, पाण्याची उधळपट्टी न करणे, विजेचा गैरवापर न करणे वगैरे.

  हवेतील अशुद्धी कमी करण्यासाठी वाहनांचा अनावश्‍यक वापर टाळणे, वाहने सुस्थितीत ठेवणे, प्लॅस्टिक, रबरासारख्या गोष्टी न जाळणे, नैसर्गिक द्रव्यांपासून बनविलेल्या उदबत्त्या, धूप जाळणे, नैसर्गिक सुगंधाचाच वापर करणे वगैरे.

  पाण्यातील अशुद्धी कमी करण्यासाठी रोजच्या दैनंदिन व्यवहारात रासायनिक द्रव्यांचा वापर कमीत कमी व्हावा, यासाठी तत्पर राहणे. उदा. स्नानासाठी उटणे वापरणे, केस धुण्यासाठी शिकेकाई-रिठा वगैरे वनस्पतींचे चूर्ण वापरणे, नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेली औषधे वापरणे, साफ-सफाईसाठीही तीव्र रसायनांचा वापर न करणे.

  जमिनीतील अशुद्धी कमी करण्यासाठी झाडांची लागवड करणे, सेंद्रिय खतांचा वापर करणे, कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे वगैरे.

  ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे, उलट, शास्त्रोक्‍त संगीत, मंत्र यांच्या साहाय्याने वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्याच बरोबरीने भारतीय परंपरा आणि वेद, आयुर्वेदासारख्या शास्त्रातील ज्ञान टेकून देण्याऐवजी त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे, हे पटले पाहिजे.  

या प्रकारे प्रत्येकाने आपापल्या परीने पर्यावरणशुद्धीचा खारीचा वाटा उचलला तरच पर्यावरणाचे पर्यायाने आपले आणि आपल्या पुढच्या पिढीचे रक्षण करता येईल व ‘सुजलाम्‌ सुफलाम्‌’ पृथ्वीचा अनुभव घेता येईल.