#FamilyDoctor वर्ल्ड अल्झायमर्स

#FamilyDoctor वर्ल्ड अल्झायमर्स

शरीरातील उत्तमांग म्हणजे मेंदू. उत्तम दोन अर्थांनी. एक तर शरीरात सर्वांत वरच्या ठिकाणी स्थित असलेला आणि दुसरा म्हणजे शरीराच्या व मनाच्या संपूर्ण कार्याचे व्यवस्थापन करण्यात अग्रणी असणारा. फक्‍त लहान वयात किंवा परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यापुरती मेंदूची काळजी घेणे पुरेसे नसते, तर रोजचा व्यवहार करतानाची वागणूक, निर्णयक्षमता, सृजनशक्‍ती, विवेकबुद्धी, हालचालींमधली सहजता व सुसूत्रता, कौशल्यपूर्ण क्रिया, इंद्रियांची सर्व कार्ये, भावभावना, संवेदनशीलता, भाषाप्रभुत्व, संवादकुशलता, तोल सांभाळण्याची क्रिया, स्वतःच्या शरीराचे भान यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी मेंदूच्या आधीन असतात. म्हणूनच मेंदू हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव समजला जातो.

ज्या आजारात स्मरणशक्‍ती लक्षणीयरीत्या कमी होत जाते तो आजार म्हणजे अल्झायमर. आज ‘वर्ल्ड अल्झायमर्स डे’ या निमित्ताने हा रोग म्हणजे काय, त्याची लक्षणे काय व तो होऊ नये यासाठी काय काळजी घेता येईल याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. 

वाढत्या वयानुसार स्मरणशक्‍ती थोडीफार कमी होणे स्वाभाविक असते, मात्र यामुळे सहसा दैनंदिन व्यवहारात व वागणुकीत अडथळा येत नाही. अल्झायमरमध्ये मात्र स्मृती इतकी कमी होते की जवळचे कुटुंबीय ओळखता येत नाही. स्वतःच्या घराचा पत्ता आठवणे, रस्ते लक्षात राहणे यासारख्या प्राथमिक गोष्टीही लक्षात राहत नाहीत. 

आयुर्वेदशास्त्राने या अवस्थेला स्मृतिभ्रंश, स्मृतिनाश असे म्हटले आहे. मुळात स्मृती म्हणजे काय?

अनुभवजन्यं ज्ञान स्मृतिः पूर्वानुभूतस्यार्थस्य स्मरणम्‌ । 
प्रज्ञाभेदः स्मृतिः ।

स्मृती हा प्रज्ञेचा एक प्रकार असून पूर्वी अनुभवलेल्या गोष्टी लक्षात राहण्याला ‘स्मृती’ म्हणतात. मिळालेली माहिती मेंदूत साठवून योग्य वेळेला व्यक्‍त करणे स्मृतीचे मुख्य काम असते. 

स्मृती हा प्रज्ञेचा एक प्रकार आहे. स्मृतिभ्रंश म्हणजे स्मृती विचलित होणे, याबद्दल चरकाचार्य म्हणतात, 

तत्त्वज्ञाने स्मृतिर्यस्य रजोमोहावृत्तात्मनः ।
भ्रश्‍यन्ते स स्मृतिभ्रंशः ।
...चरक शारीरस्थान

रज व तम या मानसिक दोषांनी मन व्यापले तर त्यामुळे स्मरणशक्‍ती विचलित होते, ज्यामुळे यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही, याला स्मृतिभ्रंश म्हणतात.
याच्याही पुढच्या अवस्थेला ‘स्मृतिनाश’ म्हणावे लागेल. 

लक्षणे जाणावी
स्मरणशक्‍तीच्या ऱ्हासाखेरीज या विकारात पुढील लक्षणे दिसू शकतात, 
  व्यक्‍ती तीच ती माहिती पुन्हा पुन्हा विचारते किंवा सांगते. 
  जी गोष्ट क्रमवार करायची असते, ती करता येत नाही. उदा. स्वयंपाक करण्याचा विशिष्ट क्रम असतो तो लक्षात राहत नाही. 
  पूर्वी एखादे काम करायला जेवढा वेळ लागायचा तेच काम करण्यासाठी अल्झायमर झालेल्या व्यक्‍तीला कितीतरी जास्त वेळ द्यावा लागतो. 
  रहदारीचे नियम किंवा एखादा खेळ पाहताना खेळाचे नियम लक्षात राहत नाहीत, रस्ते समजत नाहीत. 
  तारीख, वार, महिना, चालू असलेल्या ऋतूचे भान राहत नाही. 
  रंगसंगती समजत नाही. कधी कधी आरशातील स्वतःचे प्रतिबिंब ओळखता येत नाही. 
  वस्तू जागेवर ठेवणे समजत नाही. स्वतः ठेवलेली वस्तू काही वेळाने दुसरीकडे शोधायचा प्रयत्न केला जातो. 
  अशी व्यक्‍ती मित्रमंडळींमध्ये फारशी रमत नाही, चारचौघांमध्ये किंवा समाजामध्ये मिसळणे टाळू लागते. 
  वैचारिक गोंधळ, उदासीनता, नैराश्‍य, संशय, भीती, अस्वस्थता अशा अनेक भावना मनात येतात. 

एकंदरच अल्झायमर या विकारात स्वतः व्यक्‍तीची मानसिकता पूर्णतः बदलते आणि याचा भार कुटुंबीय, मित्रमंडळींवर येणे स्वाभाविक असते. अल्झायमर आजारावर उपचार शोधण्यासाठी जगभर मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे, मात्र मेंदूच्या इतर कोणत्याही विकाराप्रमाणे यावरही शंभर टक्के बरे करणारे उपचार अजून तरी मिळणे शक्‍य झालेले नाही. 

मात्र रोग होऊ नये यासाठी आणि रोग झालाच तर मेंदूची झीज कमीत कमी व्हावी, लक्षणांची तीव्रता आटोक्‍यात राहावी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जे काही आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीने व आनंदाने जगता यावे यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग होताना दिसतो. या दृष्टीने पुढील उपाय सुचवता येतील.

उपाय काय?
आहारामध्ये मेंदूला पोषक अशा द्रव्यांचा अंतर्भाव अवश्‍य करणे. यादृष्टीने पंचामृत हा एक साधा, सोपा, प्रत्येकाला घरच्या घरी करता येईल असा, पण मेंदूसाठी प्रभावी योग होय. एक चमचा तूप, एक चमचा मध, एक चमचा दही, एक चमचा साखर आणि पाच-सहा चमचे दूध हे मिश्रण सकाळी नाश्‍त्याच्या आधी घेता येते. 

वय वाढणे ही गोष्ट अगदी स्वाभाविक व नैसर्गिक आहे. मात्र वाढत्या वयानुसार शरीराची शक्‍ती, मनाचा उत्साह कमी होऊ नये यासाठी आयुर्वेदाने रसायने सांगितली आहेत. यात पंचगव्यघृत, ब्राह्मी घृत, ब्रह्मलीन घृत, च्यवनप्राश यांसारख्या रसायनांचा समावेश होतो. योग्य रसायनांच्या नियमित सेवनाने शक्‍ती कायम ठेवली तर मेंदूसारख्या अति महत्त्वाच्या अवयवाची कार्यक्षमता कायम राहून अल्झायमरसारखे मेंदूचे विकार होण्याला निश्‍चित आळा बसू शकतो

मेंदूची कार्यक्षमता व्यवस्थित राहण्यासाठी त्याला प्राणशक्‍तीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा लागतो. त्यादृष्टीने दीर्घश्वसन, प्राणायाम, कपालभातीसारख्या श्वसनक्रिया नियमित करणेही हितावह होय. संगीताचा, विशेषतः स्वास्थ्यसंगीताचा मेंदूच्या कुठल्याही रोगावर खूप उपयोग होताना दिसतो. 

मेंदूला प्राणशक्‍तीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी शरीरात विषद्रव्य साठणार नाहीत किंवा वेळच्या वेळी त्यांचा निचरा करून मेंदू, चेतासंस्था शुद्ध राहील यासाठीही प्रयत्न करावे लागतात. यासाठी आहार शुद्ध, सात्त्विक व नैसर्गिक असणे महत्त्वाचे. चाळिशीच्या आसपास एकदा शास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्म करून घेणेही उत्तम. 

डोक्‍याला नियमित तेल लावणे, अधिक फायद्यासाठी डोक्‍यावर औषधी सिद्ध तेलाचा किंवा तुपाचा शिरोपिचू ठेवणे, मेंदूच्या आरोग्यासाठी तसेच बुद्धी व स्मृती कार्यक्षम राहण्यासाठी उपयोगी असते. ब्राह्मी, जटामांसी, कमळ, वेखंड वगैरे मेंदूसाठी पोषक द्रव्यांनी संस्कारित तेल किंवा तूप यासाठी वापरता येते. रोज रात्री झोपण्यापूर्वी नस्य करणे म्हणजे दोन्ही नाकपुड्यांमध्ये सिद्ध तेल वा तूप किंवा घरी बनविलेले साजूक तूप टाकणे हे सुद्धा मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम असते. पंचेंद्रियवर्धन तेल, नस्यसॅन घृत यासाठी वापरता येते. 

‘सुवर्ण’ हे तर मेंदूसाठी अमृतोपम रसायन असते. 
प्रज्ञावीर्यबलस्मृतिस्वरकरं 
कान्तिं विधते तनोः ।
...आरोग्यप्रकाश

सुवर्णामुळे प्रज्ञा वाढते, वीर्यशक्‍ती वाढते, बलप्राप्ती होते, स्मृतिवर्धन होते, स्वर सुधारतो, कांती तेजस्वी होते.
सुवर्णसंस्कारित सारस्वतारिष्ट घेणे किंवा रोजच्या आहारात सुवर्ण-केशरयुक्‍त अमृतशर्करा कल्प समाविष्ट करणे या दृष्टीने उत्तम होय.

अल्झायमर होऊ नये यासाठी अशा प्रकारे अगोदरपासून काळजी घेतलेली चांगली; पण तरीही स्मरणशक्‍ती झपाट्याने कमी होत असल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णयुक्‍त ब्राह्मी स्वरसाचे नस्य; ब्राह्मी, शतावरी वगैरे स्मृतिवर्धक वनस्पतींनी सिद्ध घृत वा तेलाची शिरोबस्ती वगैरे उपचार करता येतात. सुवर्ण भस्म तसेच अभ्रक भस्मही मेंदूला पोषक, बुद्धी-स्मृतिवर्धक सांगितले आहेत, तेव्हा यांचीही योजना करता येते. 

सुवर्णसिद्ध जल
मेंदूसाठी सुवर्णसिद्ध जल हितावह असते. घरच्या घरी सुवर्णसिद्ध जल बनवून पिणे हे सुद्धा शक्‍य असते. सुवर्णसिद्ध जल तयार करण्याची पद्धत - शुद्ध सोने (सध्याच्या प्रचलित भाषेत २४ कॅरटचे) टाकून पाणी साधारणपणे वीस मिनिटे उकळणे व नंतर गाळून घेणे. वेढणे, साखळी यांसारख्या स्वरूपात सोने वापरू नये, शुद्ध सोन्याचा पत्रा वापरणे सर्वोत्तम होय. यामुळे पाणी आणि सुवर्णाचा अधिकाधिक संपर्क होऊ शकतो, पर्यायाने अधिक चांगल्या प्रतीचे सुवर्णसिद्ध जल तयार होऊ शकते. तान्ह्या बाळापासून ते घरातल्या ज्येष्ठ व्यक्‍तीपर्यंत सगळ्यांनी बाराही महिने असे सुवर्णसिद्ध जल पिणे उत्तम असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com