संक्रांत

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Sunday, 13 January 2019

मकर संक्रांत येते त्या हेमंत-शिशिर ऋतूत वातावरणात वाढलेली थंडी व कोरडेपणा यांचे निवारण करण्यासाठी तीळ व गूळ यांच्यासारखे पदार्थ खाण्यास आयुर्वेदातही सुचविलेले आहे. उसापासून बनविलेले गुळासारखे पदार्थही या दिवसांत आवर्जून खावेत असे सांगितले आहे. स्निग्ध द्रव्यांपासून बनविलेली उटणी वापरणे, उन्हात बसणे हे सुद्धा आयुर्वेदाने सुचविलेल्या उपचारात मोडते. आणि नेमके हेच सर्व आपण आपल्या संस्कृतीनुसार वर्षानुवर्षे करत आलो आहोत. 

मकरसंक्रांत हा ‘तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला’ अशा गोड शब्दांनी साजरा केला जाणारा वर्षातील पहिला उत्सव होय. लग्नानंतरची पहिली संक्रांत, तसेच नवजात बालक असणाऱ्या घरात संक्रांत विशेषत्वाने साजरी केली जाते. हलव्याचे दागिने, काळ्या रंगाचे कपडे घालून साजरा केला जाणारा एकमेव सण म्हणजे संक्रांत. 

संक्रांतीला इतके महत्त्व येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे यानंतर सुगीचे दिवस येतात, शेतातील धान्य तयार झालेले असल्याने बळिराजा आनंदात असतो. म्हणूनच, भारतासारख्या कृषिप्रधान देशात मकर संक्रांतीला महत्त्वाचे स्थान आहे. 

महाभारतातही संक्रांत 
मकर संक्रांतीचा उल्लेख महाभारतातही सापडतो. कौरव-पांडवांच्या युद्धात पितामह भीष्म जखमी झाले, पण तो काळ प्राणत्यागासाठी उचित नसल्याने त्यांनी शरशय्येवरच प्राणत्यागाची प्रतीक्षा करण्याचे ठरविले. दक्षिणायन संपून उत्तरायणाची सुरवात झाली तेव्हा संक्रांतीच्या दिवशी त्यांनी देह ठेवला अशी कथा आहे. यावरून मकरसंक्रांतीची पाळे-मुळे भारतीय संस्कृतीत किती खोलवर रुजलेली आहेत हे लक्षात येते. संपूर्ण भारतात तसेच नेपाळ, थायलंड, कंबोडिया आदी देशांमध्ये मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. भारतात प्रदेशानुसार संक्रांतीला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. उदा. गुजरातमध्ये उतराण (उत्तरायण), हिमाचल प्रदेश, हरियाना व पंजाबात माघी, तमिळनाडूत पोंगल, आसाममध्ये माघ बिहू,  केरळात मकर विल्लकू वगैरे. काही प्रदेशात तर हा सण चार-चार दिवस साजरा करण्याची पद्धत दिसते. प्रत्येक ठिकाणी हा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला, तरी त्यात तीळ व गुळाचा संबंध असतोच.

मकर संक्रांत येते त्या हेमंत-शिशिर ऋतूत वातावरणात वाढलेली थंडी व कोरडेपणा यांचे निवारण करण्यासाठी तीळ व गूळ यांच्यासारखे पदार्थ खाण्यास आयुर्वेदातही सुचविलेले आहे. उसापासून बनविलेले गुळासारखे पदार्थही या दिवसांत आवर्जून खावेत असे सांगितले आहे. स्निग्ध द्रव्यांपासून बनविलेली उटणी वापरणे, उन्हात बसणे हे सुद्धा आयुर्वेदाने सुचविलेल्या उपचारात मोडते. आणि नेमके हेच सर्व आपण आपल्या संस्कृतीनुसार वर्षानुवर्षे करत आलो आहोत. संक्रांतीच्या दिवशी तिळाचा अधिकाधिक उपयोग करण्याची पद्धत आहे.

तीळ-गूळ खाण्याबरोबर तीळमिश्रित पाण्याने स्नान करणे, तीळ अग्नीवर टाकून धूप करणे, तीळ वाटणे वगैरे निरनिराळ्या मार्गांनी तीळ वापरायचे असतात. आयुर्वेदाने सांगितलेला अभ्यंगही औषधांनी सिद्ध तीळ तेलाचाच करायचा असतो. स्निग्ध द्रव्यांचे उटणे बनविताना त्यात त्वचेला हितकर तीळ अग्रणी असावेच लागतात. पतंग उडविण्याच्या निमित्ताने अंगावर ऊनही घेतले जाते.

इतर सणासुदीच्या दिवसांत तितकीशी मान्यता नसणारे काळ्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी मात्र आवर्जून घातले जातात, कारण काळ्या रंगामुळे सूर्यशक्‍ती अधिकाधिक आकर्षित करून घेतली जाते. यामागे थंडीचे निवारण हा हेतू असतोच, बरोबरीने सूर्यशक्‍ती, सूर्याचे तेज आरोग्यालाही उत्तम हातभार लावणारे असते.

डोळ्यांत उतरो सूर्यतेज 
आयुर्वेदात सूर्याचा दृष्टीशी म्हणजे डोळ्यांशी संबंध जोडलेला दिसते. सुश्रुतसंहितेत याबद्दल एक कथा सांगितलेली आढळते. विदेह देशाच्या राजा जनकाने यज्ञात प्राण्यांचा बळी दिल्याने भगवान विष्णू कोपित झाले व त्यांनी जनकराजाच्या दृष्टीचा नाश केला. यानंतर राजा जनकाने कठोर तपस्या केली, तेव्हा संतुष्ट झालेल्या सूर्यदेवाने त्यांना पुन्हा दृष्टी प्रदान केली व बरोबरीने चक्षुर्वेदाचे ज्ञानही दिले. आयुर्वेदातही दृष्टी तेजस्वरूप असते असे सांगितलेले आढळते. ‘सूर्यश्‍चक्षुषः’ म्हणजे सूर्य हे डोळ्यांचे अधिदैवत आहे असाही उल्लेख आयुर्वेदात आहे. 

प्रश्नोपनिषदातही, आदित्यो ह वै बाह्यः प्राणः उदयति एष ह्येनं चाक्षुषं प्राणं अनुगृह्णानः । सूर्य हा विश्‍वातील बाह्य प्राण आहे आणि या सूर्यामुळेच डोळ्यांत प्राण असतो, असे सांगितलेले आहे. अथर्ववेदामध्ये उगवता सूर्य व मावळणारा सूर्य आपल्या किरणांनी कृमींचा नाश करो, विशेषतः जे कृमी गाईंच्या शरीरात राहतात, त्यांचा समूळ नाश होवो, या प्रकारचे वर्णने केलेले आहे. आजही जी गाय सूर्यप्रकाशात चरते, तिचे दूध अधिक आरोग्यदायक समजले जाते.

शरीराचा फिकटपणा, निस्तेजता कमी होण्यासाठी सूर्यकिरण उत्तम होत. लाल सूर्यकिरणांनी वाढलेल्या पित्ताचा पिवळेपणा आणि हिरवेपणा नाहीसा होतो व सौंदर्य तसेच बलाची प्राप्ती होते, निरोगी दीर्घायुष्याचा लाभ होतो, शिरोरोग दूर होतात असेही अथर्ववेदात सांगितलेले सापडते. सूर्याचा प्रकाश जास्तीत जास्त मिळावा, विशेषतः कृमींचा नाश करण्यास समर्थ असणाऱ्या उगवत्या सूर्याचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी आयुर्वेदात चिकित्सागार, सूतिकागार (बाळंतघर), कुमारागार पूर्वाभिमुख असावे असे सांगितलेले आहे.

सूर्याराधना हवीच!
आपल्या शरीरातील सूर्याचा प्रतिनिधी म्हणजे पित्त. त्वचा तेजस्वी असणे हे आरोग्याचे लक्षण समजले जाते. ही तेजस्विता त्वचेतल्या भ्राजकपित्ताद्वारे मिळत असते. आजही निस्तेज गोरा रंग आकर्षक होण्यासाठी थंड प्रदेशातल्या म्हणजे नैसर्गिक सूर्यप्रकाश कमी असणाऱ्या ठिकाणचे स्त्री-पुरुष प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा किंवा सूर्यकिरणांप्रमाणे असणाऱ्या विशिष्ट किरणांचा उपयोग करतात. तसेच तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळवंडू शकते हेही सर्वज्ञातच आहे.

पित्ताशी संबंधित असलेल्या रक्‍तधातूचा व या दोघांशी संबंधित यकृत, प्लीहा (स्प्लीन) यांचाही सूर्याशी संबंध असतो. कावीळ ही यकृतदोषामुळे होते. 

हे सर्वज्ञातच आहे. रक्‍तधातू बिघडल्याने, अशुद्ध झाल्याने त्वचारोग होतात त्यावर रक्‍तशुद्धीकर औषध-आहार उपचारांसमवेत सूर्याराधना करावी, असे वाग्भटाचार्य सांगतात. 

सूर्यशक्‍तीचा संबंध आपल्या शरीरातील चेतासंस्थेच्या व हाडांच्या आरोग्याशीही असतो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे अंधार नाहीसा झाला की निसर्ग जागा होतो व सर्वदूर उत्साह संचारतो, तसेच मेंदू व चेतातंतूंचे अभिसरण व्यवस्थित होण्यासाठी, चेतनत्व येण्यासाठीही सूर्यशक्‍तीची आवश्‍यकता असते. आधुनिक विज्ञानही हेच सांगते की सूर्याच्या किरणांतून मिळणाऱ्या ड जीवनसत्त्वाची शरीरात कमतरता उत्पन्न झाली, जी सूर्याचे दिवसेंदिवस दर्शन न होणाऱ्या अतिथंड व बर्फाळ प्रदेशातील व्यक्‍तींमध्ये उद्‌भवू शकते, तर तोल जाणे, चक्कर येणे, पाठीमागे पडायला होणे वगैरे त्रास उद्‌भवू शकतात. लहान मुलांमध्ये हाडे मृदू झाल्याने हात-पाय वाकू लागले, उदा. मुडदूस, तर आधुनिक वैद्यकातही ‘सौरचिकित्सा’ म्हणजे सूर्यप्रकाशात बसवणे याच उपायाचा अवलंब केला जातो. 

आयुर्वेदातही विविध शिरोरोगांसाठी ‘महानील तेल’ नावाचे तेल नस्य, अभ्यंग तसेच खाण्यासाठी सांगितले आहे. त्यात तेल सिद्ध करण्यासाठी पहिले द्रव्य सांगितले आहे आदित्यवल्लीचे मूळ. या तेलाचे वैशिष्ट्य असे, की हे तेल सिद्ध करण्यासाठी अग्नीचा उपयोग केलेला नाही तर ‘आदित्यपाक’ करायला सांगितला आहे.
कुर्यात्‌ आदित्यपाकं वा यावत्‌ शुष्को भवेत्‌ रसः ।
...अष्टांगसंग्रह उत्तरतंत्र

आदित्यपाक करण्यासाठी सर्व गोष्टी लोखंडाच्या भांड्यात एकत्र करून भांडे उन्हात ठेवले जाते व सूर्याच्या उष्णतेने हलके हलके त्यातला जलांश उडून गेला की उरलेले तेल गाळून घेऊन वापरले जाते. आयुर्वेदाने शिरोरोगावर उपचार करताना सूर्यशक्‍तीचा असाही वापर करून घेतलेला आहे.

प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा उपचार म्हणून उपयोग करण्याला ‘आतपस्वेद’ असे नाव दिले आहे. आतपस्वेद हा मुख्यत्वे त्वचारोगात घ्यायला सांगितला आहे. सध्या ‘ड’ जीवनसत्त्वाची (डी व्हिटॅमिनची) कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसते आहे, यासाठीही सकाळ- संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ राहणे उपयुक्‍त असते. 

सुश्रुतसंहितेमध्ये सूर्यप्रकाशाचा उपयोग जलशुद्धीसाठीसुद्धा सांगितला आहे. 
व्यापन्नस्य चाग्निक्वथनं सूर्यातपप्रतापनं....।
 सुश्रुत सूत्रस्थान

दूषित पाणी निर्दोष करण्यासाठी अग्नीच्या उष्णतेने कढवावे किंवा सूर्यप्रकाशात (उन्हात) सडकून तापवावे.

‘सूर्यनमस्कार’ हा व्यायामप्रकारही सहज करता येण्यासारखा व अनेक आसनांचा एकत्रित फायदा करून देणारा आहे. सूर्यनमस्कार करताना श्‍वासाच्या लयबद्धतेकडे लक्ष दिले, तर आसन व श्‍वसनक्रिया असा दुहेरी फायदा होऊ शकतो. नियमित व योग्य प्रकारच्या सूर्यनमस्कारामुळे हृदय, फुप्फुसाची कार्यक्षमता वाढण्यास, एकंदर शरीरशक्‍ती-स्टॅमिना वाढण्यास, स्नायूंना बळकटी आणण्यास अतिशय चांगला उपयोग होतो. सूर्यनमस्कार करताना श्‍वसनाकडे व शरीरस्थितीकडे लक्ष देण्याबरोबर सूर्याच्या नावाचे बारा मंत्र म्हटले तर अधिकच चांगला उपयोग होतो.

भारतासारख्या देशात सुदैवाने सूर्यप्रकाशाची कमतरता नाही. उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्याची पूर्वीपासूनच प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये होती. आज शब्दशः अर्घ्य देता आले नाही तरी सकाळच्या, शक्‍यतो सूर्योदयाच्या कोवळ्या उन्हात १५-२० मिनिटे बसणे अशक्‍य ठरणार नाही. बरोबरीने ध्यान, प्राणायामादी क्रिया केल्या तर दुग्धशर्करायोगच म्हणावा लागेल.

सूर्याराधनेचे, सूर्यप्रकाशाचे याप्रकारे अनेक फायदे असले, तरी तीव्र सूर्यप्रकाश पित्तदोष वाढवून आरोग्यास हानिकारक ठरू शकतो, तेव्हा दुपारच्या प्रखर उन्हापासून संरक्षणच करावे. प्रखर सूर्याकडे सरळ बघितल्याने किंवा सूर्यग्रहण बघितल्याने अंधत्व येऊ शकते असेही आयुर्वेदात सांगितले आहे.

तेव्हा सूर्यशक्‍तीचा युक्‍तिपूर्वक वापर करून घेण्यासाठी संक्रांत साजरी केली जाते. संक्रांतीच्या निमित्ताने सुरवात केलेली सूर्योपासना जर वर्षभर सुरू ठेवली, तर निश्‍चितच संपूर्ण वर्ष आरोग्याने परिपूर्ण असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balaji tambe article write on sankrant