वटवृक्षाचा महिमा

Dr.-Balaji-Tambe
Dr.-Balaji-Tambe

वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करणे हे धार्मिक कर्मकांड झाल्यामुळे भिंतीवर वडाचे चित्र काढून किंवा एखादी छोटी फांदी तोडून आणून त्याची पूजा करण्यासारखी हास्यास्पद रूढी प्रचलित झालेली दिसते. त्यामुळे आरोग्यासाठी वटवृक्षाच्या सान्निध्यात राहण्याचा मूळ हेतू साध्य होत नाही.

धत्ते भारं कुसुमपत्रफलावलीना
घर्मव्यथां वहति शीतभवं रुजं च ।
यो देहमर्पयति चान्यसुखस्य हेतोः
तस्मै वदान्य गुरवे तरवे नमोऽस्तु।।
फुले, पाने, फळांचे ओझे आपल्या अंगावर वाहणाऱ्या, कडक उन्हाचा ताप व थंडीचा कडाका सहन करणाऱ्या, दुसऱ्यांच्या सुखासाठी आपला देह अर्पण करणाऱ्या गुरुरूपी वृक्षाला माझा नमस्कार असो. 

झाडात झाड वडाचे झाड! हा वंश वटवृक्ष. वंशवृद्धीसाठी या झाडाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, इतकेच नव्हे तर, या झाडापासून वातावरणात पसरणारी शक्‍ती व वायू यांचा शरीरावर परिणाम होतो म्हणूनही काही संस्कार-व्रते प्रचलित आहेत. सध्या हिरवळीचे खूप महत्त्व आहे. बागबगीचे, जंगले वाढवावीत असा खूप प्रचारही होतो आहे. परंतु लोकांच्या मनात झाडाच्या श्रेष्ठतेविषयी श्रद्धा वाढल्याशिवाय या उपक्रमाला खरी साथ मिळणे अवघड राहील. वटपौर्णिमेच्या पूजेसारखे उत्सव याचा प्रचार करून अवश्‍य वाढवावेत व पर्यावरणरक्षणाला मदत करावी. 

गवताची व दर्भाची पाती असोत, जंगलातील दोनदोनशे फूट वाढणारी झाडे असोत, झाडाच्या खोडातून अख्खी मोटर जाऊ शकेल एवढे मोठे खोड असलेली झाडे असोत किंवा वटवृक्षासारखे झाड असो, एकूण प्राणिमात्राची व जिवाची उत्क्रांती वनस्पतीपासून होते. वनस्पतीतील उत्क्रांती वडाच्या झाडाच्या ठिकाणी पूर्ण झाली. पुढे सजीव, हिंडणारे-फिरणारे प्राणी सुरू होतील असे हे पूर्णत्व सुचविणारे वडाचे झाड. 

वनस्पती सजीव असतात व त्यांच्यात प्राण असतो, पण त्या एकाच जागी राहतात. प्राण कार्यान्वित होऊन भूमीपासून अलग होणारे किंवा एका स्थानाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे प्राणी उत्क्रांत झाले याची गोष्ट समजावी म्हणून की काय, सावित्रीने वडाच्या झाडाखाली पूजा करून आपल्या पतीला प्राण देऊन जिवंत केले ही कथा प्रचलित असावी. 

वडाचे झाड आयुर्वेदात खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे. साल, मुळ्या, पारंब्या वगैरे वटवृक्षाच्या सर्व भागांचा उपयोग होतो. जीवनचक्र सुरू राहण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या पुनरुत्पत्तीसाठी वडाच्या झाडाचा खूप उपयोग होतो. नवांकुरांचा रस नाकात टाकायचा असो, एकूणच वीर्य वाढविण्यासाठी असो किंवा गर्भाशयाच्या शुद्धीसाठी असो, वडाच्या झाडाचा उपयोग होतोच. 

वडाच्या झाडाची एक गंमत अशी की ते लावावे लागत नाही. ते कुठे, कसे व केव्हा उगवेल हे सांगता येत नाही. वनस्पती लावा, हिरवळ लावा, वृक्षतोड थांबवा, सेंद्रिय शेती करा, अमुक खत वापरा, तमुक खत वापरू नका, जमिनीची मशागत अशी करा, अमुक प्रकारचे बियाणे वापरा असा खूप प्रचार झाला व त्याचे शिक्षण दिले तरी झाडे वाढवता येतीलच असे नाही. त्या उलट अचानक घराच्या भिंतीतून एक वडाचे झाड उगवलेले दिसते. वडाच्या झाडाची एक काडी नव्हे तर एक पान जरी जमिनीत खोवले तरी त्याचा वृक्ष होतो असे म्हणतात. 

शेजारच्याच्या व आपल्या शेतजमिनीच्या सीमा नीट कळाव्यात म्हणून बांधावर वडाच्या फांद्या खोचल्या जातात. वडा-पांगाऱ्याच्या सरळ काड्या वापरून भाजीपाल्यासाठी लागणारा सुंदर मांडव उभारता येतो, शिवाय ह्या कामाला एक पैसाही खर्च होत नाही. मांडव उभारताना काड्या एकमेकाला बांधण्यासाठी वडाच्या पातळ पारंब्या उपयोगाला येतात. लावलेल्या वाळक्‍या काड्यांना पाने फुटून पुढे मोठी झाडे झालेलीही दिसतात. 

गावात वडाचे झाड नाही असे कधीच होत नाही. गावाबाहेर देवळापाशी वा टेकडीवरच्या महादेवाच्या मंदिरापाशी असलेले वडाचे झाड हा एक कुतूहलाचा विषय असतो व त्याच्या आख्यायिकाही अनेक असतात. 

वडासारखेच दुसरे झाड म्हणजे पिंपळ, पण पिंपळाच्या झाडावर मुंजा असतो अशा समजामुळे किंवा त्या झाडाच्या ढोलीत असलेले भूत कोणाला तरी, कधी तरी दिसल्याचा भास झाल्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा क्वचितच होते, वडाच्या झाडाची मात्र पूजा केली जाते. भारतीय लोक मुळातच संशोधनप्रिय असतात. ज्यात स्वतःचा फायदा होतो त्या कृती सगळ्यांनी कराव्यात म्हणून अशा कृतींशी देवाचा संबंध जोडून त्याला पूजेत वगैरे स्थान दिलेले दिसते. त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा वटपौर्णिमेच्या दिवशी होताना दिसते. ज्या ठिकाणी प्रदक्षिणा करण्याने प्राणशक्‍तीचे आवाहन करता येते, निर्जीव पेशींना सजीव करता येते, तेथे साहजिकच वर्षातून एकदा का होईना, पूजा केली जाते. जे झाड स्वतःहून उगवते, कुठलीही काळजी न घेता वाढते व मनुष्यमात्राच्या उपयोगी पडते त्याची पूजा करायची नाही तर मग येणाऱ्या जाणाऱ्याच्या पायात ज्या झाडाचे काटे मोडतात त्या झाडाची पूजा करायची आहे?

सध्या समाजकंटकांचीच पूजा आधी होताना दिसते. पण पूर्वीच्या काळी बाभळीच्या झाडाची पूजा न करता वडाच्या झाडाची पूजा करणे हेच नीतीला धरून आहे असे मानले जात होते. 

वडाचे झाड हा स्त्रियांच्या बाबतीत एक आशीर्वादच आहे. शेताच्या एका कडेला असलेल्या वडाच्या झाडाच्या सावलीत आपल्या शेतकरी नवऱ्याला दुपारचे जेवण वाढले जात असे. वडाच्या झाडाच्या खाली येणाऱ्या पारंब्या जणू तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचे आश्वासन देतात.

पारंब्यांचे तेल वापरल्यास केस लांबसडक व तेजस्वी होतात. स्त्रियांना केसांचे महत्त्व असल्याने त्यांना पारंब्यांचे महत्त्व वाटणे साहजिकच आहे. 
वटपौर्णिमेच्या दिवशी जवळपासच्या वडाच्या झाडापाशी जाऊन पूजेच्या निमित्ताने तास-दोन तास वडाच्या सान्निध्यात राहणे, आज्ञाचक्रातल्या ग्रंथीला उत्तेजना देण्यासाठी झाडाला सूत गुंडाळण्याच्या निमित्ताने झाडाला प्रदक्षिणा घालणे अशा गोष्टींमुळे शरीरातील अग्नीचे म्हणजे शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन व्हायला पण मदत होत असावी. हे सर्व देवासाठी व धर्मासाठी केलेले कर्मकांड आहे असे समजल्यामुळे वडाचे झाड नसले तर भिंतीवर त्याचे चित्र काढून पूजा करणे किंवा एखादी छोटी फांदी तोडून आणून पूजा करणे अशा हास्यास्पद रूढी प्रचलित झालेल्या दिसतात. ह्या रूढींमुळे वृक्षाचे महत्त्व लक्षात आले किंवा वृक्षपूजा करणे हे आपले कर्तव्य आहे हे लक्षात आले तरी आरोग्याच्या दृष्टीने किंवा आपल्याला वृक्षवल्लीकडून मिळणाऱ्या आशीर्वादाच्या दृष्टीने या रूढींचा उपयोग होत नाही. 

दंतधावनासाठी वापरण्यात येणाऱ्या मंजनात वडाच्या सालीचे चूर्ण हा एक महत्त्वाचा घटक आहे. नारळाला श्रीफळ म्हटले गेले असले व नारळाच्या झाडाचे महत्त्व खूप असले तरी पूजा मात्र या पूर्णत्वाला पोचलेल्या वडाच्या झाडाचीच होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com