#FamilyDoctor सावधान! पाठदुखी आहे?

डॉ. सुशांत शिंदे 
Sunday, 25 November 2018

व्यायामाचा अभाव आणि बदलती जीवनशैली यामुळे आपल्याला पाठदुखी, कंबरदुखी यांसारखे आजार मागे लागू शकतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे सांध्यांचे आखडलेपण. हा आजार तरुणांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो व तो अधिक त्रासदायकही असतो.

व्यायामाचा अभाव आणि बदलती जीवनशैली यामुळे आपल्याला पाठदुखी, कंबरदुखी यांसारखे आजार मागे लागू शकतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे सांध्यांचे आखडलेपण. हा आजार तरुणांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो व तो अधिक त्रासदायकही असतो.

कंबरदुखी आणि मणक्‍याच्या सांध्यांमध्ये, तसेच, मांड्या, नितंब यांच्या सांध्यांमधले आखडलेपण या समस्या असल्यास ‘ॲकिलोझिंग स्पॉण्डिलायटिस’ (एएस) बळावण्याची शक्‍यता असते. सकाळच्या वेळात उठल्यानंतरच्या पहिल्या पाच-दहा मिनिटांत या वेदना अधिक असल्यास किंवा नव्वद दिवसांपेक्षा अधिक काळ या वेदना तितक्‍याच तीव्र राहिल्यास वेदनाशामक गोळ्या घेण्याऐवजी ही धोक्‍याची घंटा समजून खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज असते.

‘एएस’ची लक्षणे 
 सकाळी उठल्यावर कंबरेत दहा मिनिटांपर्यंत वेदना किंवा कडकपणा 
 औषधे घेतल्यानंतरही नव्वद दिवसांहून अधिक काळ राहिलेली पाठदुखी किंवा सांधे आखडणे
 पाठ, सांधे, नितंब व मांड्यांमध्ये अचानक होणाऱ्या वेदना

गेल्या काही वर्षांत ‘एएस’ बळावल्याच्या घटना अधिकाधिक वाढत चालल्या आहेत. भारतीय तरुणांमध्ये हे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातही पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त असते. ॲकिलोझिंग स्पॉण्डिलायटिस (एएस) हा पूर्ववत न होणारा, अंगाला सूज आणणारा आणि ऑटोइम्यून म्हणजेच आपल्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारा आजार आहे. परिणामी, आपल्या मणक्‍यातील सांध्यांची लवचिकता कमी होते. हा आजार दीर्घकाळ दुर्लक्षिला गेल्याने किंवा वेळीच उपचार न घेतल्याने मणक्‍याची हाडे एकत्र जोडली जातात आणि आपल्या पाठीचा आकारच बदलून जातो. हालचालींवर परिणाम होतो. बऱ्याचदा ‘टीनएजर’ मुलांमध्ये एएस बळावण्याची लक्षणे अधिक दिसून येतात.

‘ॲकिलोझिंग स्पॉण्डिलायटिस’ हा व्यक्तीपरत्वे बदलत जातो. काही जणांच्या बाबतीत ही लक्षणे हलक्‍या प्रमाणात दिसून येतात व केवळ पाठदुखी असेल, असे म्हणून रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात.

ज्या वयात व्यक्ती सर्वाधिक सक्रिय आणि निर्मितीक्षम असायला हवी, त्याच वयात ‘एएस’ विपरित परिणाम साधतो आणि कोणत्याही शारीरिक हालचाली, दैनंदिन उपक्रमांवर त्याचा परिणाम होतो. शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात शिखरावर असलेल्या पुरुषांना ‘एएस’ हा आजार चक्क गिळून टाकतो.

दीर्घकाळ ॲकिलोझिंग स्पॉण्डिलायटिस असलेल्या लोकांमध्ये मणक्‍याची फ्रॅक्‍चर्स, ऑस्टिओपोरोसिस आदी आजार बळावण्याची शक्‍यता अधिक असते. सातत्याने होणाऱ्या वेदनांमुळे आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. असे झाल्याने त्याचा परिणाम मानसिकतेवर व्हायला वेळ लागत नाही.

परिणामी, रुग्णाच्या एकूणच जीवनमानाचे नुकसान होते. एएस होण्यामागचे खरे कारण माहीत नसले तरीही, या आजाराचा आनुवंशिकतेशी गाढ संबंध आहे. एचएलए - बी २७ जनुक असलेल्या व्यक्तींना हा आजार होण्याच्या शक्‍यता अधिक असतात. पण एचएलए - बी २७ जनुक नसूनही हा आजार झाल्याचेही निदर्शनास आले आहे.

ॲन्कीलुझिंग स्पॉण्डिलायटिस हा आजार बऱ्याचदा तरुण पुरुषांमध्ये तसेच, चाळीसहून कमी वयाच्या व्यक्तींमध्ये आढळून येतो. कंबरदुखी हे या आजाराचे सर्वांत सामान्य लक्षण असून रुग्ण आराम करीत असताना वा झोपल्यावर या वेदना अधिकाधिक वाढत जातात. काम केल्यावर वा शारीरिक हालचाली केल्यावर त्या कमी होतात. आजार वाढत गेल्यावर, पाठ तसेच, मानेमध्ये आखडलेपण यायला लागते. मणक्‍याच्या सांध्यांना दीर्घकाळ दुखापत झाल्यामुळे ‘बांबू स्पाईन’सारख्या आणखी गुंतागुंतीच्या आजारांना आमंत्रण मिळते. या आजारात बांबूप्रमाणे आपल्या मणक्‍याची व परिणामी पाठीचा लवचिकता निघून जाते. 

काय कराल?
रुग्णांमध्ये दिसून येणारी या आजाराची लक्षणे कमी करण्यासाठी त्यांनी पुढील व्यायाम रोज करण्याचा सल्ला डॉक्‍टर देतात -
 मान, खांदे आणि कंबर (नितंब) वर्तुळाकार फिरवणे, मणका ताणणे 
 लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी, चांगले पोस्चर राखण्यासाठी तसेच, आखडलेपण कमी करण्यासाठी हालचाली आणि स्ट्रेचिंग व्यायाम आवश्‍यक
 कण्ट्रोल्ड आर्टिक्‍युलर रोटेशन्स किंवा सीएआर -अत्यंत नियंत्रित अशा पद्धतीने एका सांध्याला जोडणाऱ्या अनेक सांध्यांच्या गोलाकार हालचाली
 घट्ट झालेले स्नायू रिलॅक्‍स करण्यासाठी, सांध्यांमधील ताठपणा जाण्यासाठी कोमट पाण्याच्या पिशव्यांचा वापर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be careful Back pain health care