अन्नपानविधी शमीवर्ग

अन्नपानविधी शमीवर्ग

चवळी चविष्ट असते, परंतु वात वाढविणारी असल्याने रोजच्या खाण्यात योग्य नसते. तरुण मंडळी, लहान मुले, प्रखर अग्नी असणाऱ्या व्यक्‍तींनी अधूनमधून चवळीची उसळ खाण्यास हरकत नसते. आम्लपित्ताची प्रकृती असणाऱ्यांनी थोड्या प्रमाणात चवळीचा आहारात समावेश करणे चांगले. मात्र वाताचा त्रास असणाऱ्यांसाठी चवळी तितकीशी चांगली नाही..

मागच्या आठवड्यात आपण मूग आणि उडीद या दोन कडधान्यांची माहिती घेतली. मूग पचायला सर्वांत हलके, तर उडीद पचायला जड असले तरी त्यांचे इतर गुणधर्म व उपयोगांच्या जोरावर ही दोन्ही कडधान्ये औषध म्हणून वापरली जातात. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) उडदाला ‘माष’ म्हटले जाते, तसेच ‘राजमाष’ नावाचे कडधान्य म्हणजे चवळी. 

चरकसंहितेत चवळीचे गुणधर्म असे दिले आहेत... 
राजमाषः सरो रुच्या कफशुक्राम्लपित्तनुत्‌ । 
तद्‌ स्वादुर्वातलो रुक्षः कषायो विशदो गुरुः ।।
....चरक सूत्रस्थान

चवळी पचायला जड, रुक्षता उत्पन्न करणारी व वात वाढविणारी असते, शुक्रधातूचा क्षय करते, आम्लपित्त, कफदोष कमी करते, चवीला गोड, तुरट असून रुचकर असते, तसेच सारक असते.

चवळी चविष्ट असते, परंतु वात वाढविणारी असल्याने रोजच्या खाण्यात योग्य नसते. तरुण मंडळी, लहान मुले, प्रखर अग्नी असणाऱ्या व्यक्‍तींनी अधूनमधून चवळीची उसळ खाण्यास हरकत नसते. आम्लपित्ताची प्रकृती असणाऱ्यांनी थोड्या प्रमाणात चवळीचा आहारात समावेश करणे चांगले. यासाठी तेलाऐवजी तुपात खोबऱ्याची चटणी लावून चवळीची उसळ बनवता येईल. वाताचा त्रास असणाऱ्यांसाठी मात्र चवळी तितकीशी चांगली नाही. बरेच लोक चवळी खाता येत नाही, तर चवळीच्या शेंगा खाल्ल्या तर चालेल का, असे विचारतात, मात्र चवळीच्या शेंगा ताज्या असल्या तरी पचण्यास जडच असतात, त्यामुळे भूक, अग्नी यांचा विचार करूनच खाणे चांगले. 

साधारणतः वात वाढविणाऱ्या, रुक्ष गुणाच्या गोष्टी मलावष्टंभ करणाऱ्या असतात. मात्र चवळी नियमाला अपवाद होय. पचण्यास जड असल्याने चवळी शक्‍यतो दुपारच्या जेवणात योजणे चांगले. पोटात आग होऊन शौचाला भसरट होत असेल, मलावष्टंभ नसूनही कुंथावे लागत असले तेव्हा चवळीचे सूप घेता येते. यामुळे शौचाला साफ होण्यास, तरीही बांधून होण्यास मदत मिळते. 

कुळीथ 
यालाच हुलगे असेही म्हणतात. कोकणात कुळथाचे पिठले आवडीने खाल्ले जाते. कुळथाचे सूपही रुचकर असते. कुळथाचे आयुर्वेदातील गुणधर्म पुढीलप्रमाणे होत, 

उष्णाः कषायाः पाकेऽम्लाः कफशुक्रानिलापहाः ।
कुलत्था ग्राहिणः कासहिक्काश्वासार्शसां हिताः ।।
....चरक सूत्रस्थान


कुळीथ चवीला तुरट, पचनानंतर आंबट व उष्ण वीर्याचे असतात. वात-कफदोष कमी करतात, शुक्रधातू कमी करतात, खोकला, उचकी, दमा, मूळव्याध (कफ-वातज) यात उपयुक्‍त असतात. 

कुळीथ मूतखड्यावर औषधाप्रमाणे काम करतात. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात. मात्र पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी अपथ्यकर असतात. 

कुळीथ लालसर रंगाचे असतात. कुळथाचे झाड हातभर उंचीचे होते व दिसायला उडदाच्या झाडासारखे असते. उडदाप्रमाणे कुळथाचे झाडही गुरांना खायला देण्याची पद्धत असते. कुळथाचे सूप अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असते. 

    कुळीथ मुख्यत्वे मूत्रसंस्थेवर काम करतात. लघवीला कमी होत असेल, लघवी करताना किंवा झाल्यावर वेदना होत असतील तर कुळथाचे सूप उत्तम परिणाम देते. 

    मूतखडा हा सध्या अनेकांमध्ये दिसणारा आजार. खडा लहान असल्यास तो पडून जाण्यासाठी तसेच मूतखडा पुन्हा पुन्हा न व्हावा यासाठी आहारात कुळथाचा समावेश करणे चांगले असते. कुळथाचे पाण्यासारखे पातळ सूप रोज घेतले व गरम पाण्याचे कटिस्नान घेतले तर हमखास गुण येतो. मूत्रसंस्थेवर काम करताना कुळथाच्या सुपात थोडी धण्याची पूड टाकणे अजून गुणकारी ठरते. 

    छातीत किंवा घशात कफ चिकटून राहिला असेल, खूप खोकूनही कफ म्हणावा तितका पडत नसेल तर अशा वेळी कुळथाचे सूप एक-एक घोट घेतल्यास कफ मोकळा होऊन बरे वाटू लागते. यामुळे छाती-डोक्‍यातील जडपणा कमी होण्यासही मदत मिळते. 

    पोटात वायू धरत असल्यास, त्यामुळे बरगड्यांमध्ये, कुशीत वेदना होत असल्यास कुळथाचे सूप व ज्वारीची भाकरी घेण्याचा फायदा होतो. 

    कुळीथ जंत कमी करणारे असतात, त्यामुळे गुदभागी कंड येत असेल, त्या ठिकाणी कायम ओलसरपणा राहत असेल तर आहारात कुळथाचा समावेश करणे चांगले. 

    चिकट मलप्रवृत्ती होत असली तरी कुळथाचे सूप घेण्याचा फायदा होतो. 

    ज्यांना वजन कमी करायचे असेल, घाम अति प्रमाणात येत असेल त्यांच्यासाठी कुळीथ उत्तम होत. अशा व्यक्‍तींना कुळथाचे पीठ उटण्याप्रमाणे अंगाला चोळून लावण्याचाही फायदा होतो. 

    कुळीथ हे उत्तम वातशामक असतात, त्यामुळे कुठेही वेदना होत असेल, विशेषतः मुरगळल्यामुळे, मुका मार लागल्यामुळे दुखत असले, पाठ-कंबर किंवा एखादा सांधा फार दुखत असेल तर कुळीथ उकडून त्याचा लगदा करून लेपाप्रमाणे लावून ठेवण्याचा उपयोग होतो. यातच थोडे उडीद मिसळले तर अजून चांगला गुण येतो.

असे बनवा कुळथाचे सूप 
छोटी वाटीभर अख्खे कुळीथ घेऊन त्यात सोळा पट पाणी घालावे व शिजवायला ठेवावे. कुळीथ नीट शिजले व पाणी अर्धे आटले की गाळून घ्यावे. याला तूप, जिरे, हिंग व मिरे वगैरे टाकून फोडणी द्यावी. चवीनुसार सैंधव मिसळावे. मूत्रवहन संस्थेवर काम करायचे असेल तेव्हा धन्याची पूड व कोथिंबीर टाकावी. पचनसंस्थेवर काम करायचे असेल, तर डाळिंबाच्या दाण्यांचा रस, लिंबाचा रस चवीनुसार मिसळावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com