अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) शल्यशास्त्रामध्ये जळूचे महत्त्व

Jalu
Jalu

जळूच्या मदतीने केलेल्या रक्‍तमोक्षणाचा अतियोग होण्याची शक्‍यता नसते, म्हणजेच वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली जलौकाद्वारा केलेल्या रक्‍तमोक्षणाचे दुष्परिणाम नसतात.

मागच्या आठवड्यात आपण सतत लक्ष द्याव्या लागणाऱ्या विकारांत प्रमेह अग्रणी असतो हे पाहिले. आता या पुढचा विषय पाहू या. 

जलौकसोऽनुशस्त्राणाम्‌ - जलौका म्हणजे जळवा सर्व प्रकारच्या अनुशस्त्रांमध्ये सर्वश्रेष्ठ होत. 

आयुर्वेदाचीच एक शाखा म्हणजे शल्यतंत्र. यात अनेक प्रकारची शस्त्रे, यंत्रे, उपयंत्रे, उपशस्त्रे वर्णन केलेली आहेत. यापैकी सर्व उपकरणांमध्ये जलौका या सर्वश्रेष्ठ समजल्या जातात. 

वास्तविक चरकसंहितेमध्ये पंचकर्मात रक्‍तमोक्षणाच्या उल्लेख नाही, पण तरीही एक उपचार म्हणून जळूच्या साहाय्याने शरीरातील अशुद्ध रक्‍त काढून टाकणे हे चरकाचार्यांना संमत आहे.

रक्‍तधातू हा शरीरातील महत्त्वाचा धातू होय. हा बिघडला तर त्यामुळे अनेक रोग उत्पन्न होऊ शकतात. म्हणूनच रक्‍तमोक्षणाच्या साहाय्याने दूषित रक्‍त शरीराबाहेर काढण्याची योजना केलेली दिसते. पित्तदोषाचे राहण्याचे एक मुख्य ठिकाण म्हणजे रक्‍तधातू. त्यामुळे दूषित रक्‍त शरीराबाहेर काढले की दूषित पित्त कमी होणे स्वाभाविक असते. म्हणूनच रक्‍तज व्याधींच्या बरोबरीने पित्तज विकारांवरही रक्‍तमोक्षणाचा प्रयोग केला जातो. जळूच्या मदतीने रक्‍तमोक्षण करण्याची विशेषता अशी की ती सुरुवातीला फक्‍त अशुद्ध रक्‍त शोषून घेते. ज्याप्रमाणे हंस पाणी व दुधाच्या मिश्रणातील फक्‍त दूध सेवन करू शकतो, त्याप्रमाणे जळू सुद्धा सुरुवातीला फक्‍त अशुद्ध रक्‍त शोषून घेते. दंशस्थानी खाज येऊ लागली व वेदना होऊ लागली की जळू शुद्ध रक्‍त ओढू लागल्याचे समजता येते आणि लागलीच रक्‍तमोक्षण उपचार थांबवता येतो. 

जलामध्ये राहणारी, जलावरच पोसली जाणारी ती जलौका. ज्या प्रदेशात  पाण्याची उपलब्धी जास्ती आहे तेथे जलौका सापडू शकतात. सविष जलौका व निर्विष जलौका असे यांचे दोन प्रकार असतात. विषारी जळवा वाईट, अस्वच्छ पाण्यात सापडतात व यांच्या दंशामुळे दंशस्थानी सूज, भयंकर खाज, दाह, चक्कर येणे, ताप येणे, उलट्या होणे, अंग गळून जाणे, मद चढणे या प्रकारे लक्षणे उत्पन्न होतात. याविरुद्ध निर्विष जळवा स्वच्छ पाण्यात सापडतात, कमळ वगैरे फुले उगवू शकणाऱ्या, शेवाळे विपुल प्रमाणात असणाऱ्या पाण्यात सापडणाऱ्या या जळवा विषारी नसतात व रक्‍तमोक्षणासाठी वापरता येतात. जळूच्या लाळेमध्ये ‘हिरुडिन’ नावाचे द्रव्य सापडते. जो रक्‍त गोठण्यास प्रतिबंध करते. 

रक्‍तमोक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या जळवा सहसा तलावात, छोट्या डबक्‍यांमध्ये किंवा फार वेगाने न वाहणाऱ्या झऱ्यांमध्ये सापडतात. साधारणतः सहा-दहा सेंटीमीटर लांबीच्या जळूमध्ये प्रसरण पावण्याची क्षमता खूप जास्ती असते. जळूच्या दोन्ही टोकांपाशी एक प्रकारचा चूषक असतो, ज्याच्या साहाय्याने जळू त्वचेवर वा इतर कोणत्याही आधारावर चिकटू शकते. जळूच्या संपूर्ण अंगावर गांडूळाप्रमाणे वलये असतात.

शरीरावर अगदी पातळ आवरण असते. या आवरणाखाली त्वचा असते. जळूचे श्वसन त्वचेच्या माध्यमातून होत असते व त्यासाठी त्वचा कायम ओलसर राहणे आवश्‍यक असते. जळूच्या त्वचेवर असंख्य सूक्ष्म ग्रंथी असतात, ज्यातून सतत एक प्रकारचा चिकट स्राव स्रवत असतो. हेच कारण असते ज्यामुळे जळू स्पर्शाला मऊ व बुळबुळीत लागते. 

जळूची जोपासना करणे हे चिकाटीचे काम असते, मात्र जळूच्या मदतीने केलेल्या रक्‍तमोक्षणाचा अतियोग होण्याची शक्‍यता नसते, म्हणजेच वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली जलौकाद्वारा केलेल्या रक्‍तमोक्षणाचे दुष्परिणाम नसतात. म्हणून चरकाचार्य म्हणतात की सर्व उपशस्त्रांमध्ये जलौका सर्वश्रेष्ठ होत. 

अग्र्यसंग्रहातील यापुढच्या विषयाची माहिती आपण पुढच्या वेळी घेऊ या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com