मेंदूची दुर्बिणीतून शस्त्रक्रिया

डॉ. जयदेव पंचवाघ
Friday, 26 January 2018

मेंदूत खोलवर असलेली गाठ काढणे हे पूर्वी धोकादायक होते, पण आता अत्याधुनिक साधनांनी ही शस्त्रक्रिया रुग्णांच्या दृष्टीने हितकारक ठरते आहे.

‘‘डॉक्‍टर, सुनिताला गेल्या दोन महिन्यांपासून रोज डोकेदुखीचा प्रचंड त्रास होतो आहे. हा त्रास गेल्या एका आठवड्यात खूपच वाढून आता तर चालताना तिचा तोल जाऊ लागला आहे. परवापासून तर काहीही खाल्ले तर तिला उलटी होते,’’ सुनिताची आई मला सांगत होती. 

सुनिता २२ वर्षांची, एम. कॉम्‌. ला शिकणारी एक तरतरीत मुलगी. हा असा अचानक व शरीरातील सारे त्राण हरण करणारा आजार होणे हे त्या कुटुंबाला धक्काच होता. सुनिताला तपासल्यानंतर आमच्या लक्षात आले की, तिच्या मेंदूतला दाब वाढलेला आहे. त्या दाबामुळेच ही सर्व लक्षणे सुरू झाली आहेत. याचें वेगाने निदान करणें अत्यावश्‍यक आहे. किरकोळ डोकेदुखीपेक्षा वेगळ्या प्रकारची ही केस होती.

या आजारांमध्ये वेगाने निदान करणे अत्यावश्‍यक असते. ते जर झाले तरच रुग्णाचा जीव वाचण्याची शक्‍यता असते आणि त्यासाठी तातडीने मेंदूचा ‘एमआरआय’ करणे आवश्‍यक होते. एमआरआय हा मेंदूतील अगदी आतल्या भागातील ‘फोटो’ काढतो. आतले सर्व महत्त्वाचे भाग त्यात सुस्पष्ट दिसतात. सुनिताच्या एमआरआयमध्ये तिच्या मेंदूच्या आतल्या पाण्याचा (मेंदूजलाचा) दाब प्रचंड वाढलेला होता. या पाण्याला ‘सीएसएफ’ (सेरेब्रोस्पायनल फ्लुईड) म्हणतात. हे पाणी मेंदूतील एका पाण्याच्या कप्प्यांमध्ये तयार होत असते. त्यानंतर एका कप्प्यातून (व्हेंट्रिकलमधून) दुसऱ्या व तेथून तिसऱ्या व चौथ्या कप्प्यात प्रवाहित होते. त्यानंतर मेंदूच्या पृष्ठभागाभोवती पसरते. तेथून ते रक्तवाहिन्यांमध्ये शोषलें जातें. 

दिवसाला साधारण अर्धा लिटर इतकें पाणी तयार होतें. जर या पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला, तर ते तुंबून राहतें आणि साहजिकच कवटीच्या आतला दाब (इंट्राक्रानिअल प्रेशर) वाढतो. कवटी ही हाडाने बनलेली बंदिस्त जागा असल्याने ती साहजिकच फुगू शकत नाही. त्यामुळे कवटीच्या आत मेंदूच्या महत्त्वाच्या केंद्रांवर हा दाब वाढत जातो. डोकेदुखी, उलट्या, डोळ्याला नीट न दिसणे, चालताना तोल जाणे अशी लक्षणे दिसू लागतात. या वेळेला जर उपाय योजना झाली नाही, तर मेंदूचे कार्य बंद पडून बेशुद्धी येणे व प्रसंगी जीव जाणे अशा गंभीर घटना घडू शकतात.

सुनिताच्या मेंदूतील पाण्याचा प्रवाह तुंबला होता आणि त्याचें कारण म्हणजे या पाण्याच्या प्रवाहात एक अडथळा आला होता. पाण्याच्या कप्प्यांपैकी (व्हेंट्रिकल) अगदी आतल्या भागात तिला एक गाठ झालेली होती व ती हळूहळू वाढत जाऊन एका चिंचोळ्या भागात अडकलेली होती. ती गाठ तातडीने काढणे गरजेचे होते. वेळ थोडा होता. मेंदूचे कार्य या दाबाने बंद होऊन मृत्यू येण्याअगोदरच ही शस्त्रक्रिया करणें गरजेचें होतें. 

हे सर्व सांगितल्यावर सुनिताच्या कुटुंबियांना धक्का न बसला असता तरच नवल. सुनिताचा एक भाऊ फार्मा कंपनीत आहे. त्याचें नाव राजेश. ‘‘डॉक्‍टर, मेंदूची खोलवरचीं शस्त्रक्रिया धोकादायक व मोठी असतें, हे खरें ना?’’ त्याने विचारले.

‘‘हे पहा राजेश, मेंदूची शस्त्रक्रिया धोकादायक असते, हे सर्वांनाच माहीत आहे. पण शस्त्रक्रिया वेळेत केली नाही, तर मात्र जीव गमावण्याची वेळ येते. त्याचप्रमाणे, ‘ब्रेनट्युमर सेंटर’मध्ये आज अत्याधुनिक पद्धती उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाने बऱ्याच अंशी यावर उत्कृष्ट उत्तरे मिळवलेली आहेत. ही शस्त्रक्रिया आम्ही एका अगदी लहान छिद्रातून करणार आहोत. याला फक्त दोन किंवा तीन टाके पडतात. सर्वसाधारणपणे व सर्व व्यवस्थित पार पडल्यास सुनिता तिसऱ्याच दिवशी घरी जाऊ शकेल. या शस्त्रक्रियेत कवटीचा मोठा भाग आम्ही काढणार नाही. जे ‘एक सेंटीमीटर’चे छिद्र करायला लागेल, ते शस्त्रक्रियेनंतर टायटॅलियन धातूच्या साहायाने बुजवून टाकण्यात येते.’’

आता राजेशच्या आश्‍चर्याला पारावार राहिला नाही. ‘‘डॉक्‍टर, तुम्ही मणक्‍याच्या शस्त्रक्रिया बिना टाक्‍याच्या किंवा एका टाक्‍याच्या करता हे मला माहीत आहे... पण मेंदूच्यासुद्धा?’’

‘‘हो, प्रोफेसर गाब या शास्त्रज्ञाने गेल्या काही वर्षांत हे तंत्रज्ञान विकसित केलें व त्यांचें मार्गदर्शन मिळाल्याने आपण हे भारतीय रुग्णांसाठी उपलब्ध केलें. ‘ब्रेन ट्युमर सेंटर’मध्ये या प्रकारची अनेक अत्याधुनिक उपकरणें व सोयी आज आहेत.’’

यात एक अतिशय बारीक आकाराची दुर्बिण (एंडोस्कोप) आम्ही अलगदपणे त्या गाठीपर्यंत नेतो. या दुर्बिणीचा आकार एका पेन्सिलएवढा असतो. याला ‘व्हेंट्रिक्‍युलोस्कोप’ म्हणतात. या ‘स्कोप‘मध्ये अगदी लहान उपकरणे घालण्याची व्यवस्था असते. दुर्बिणीमुळे मेंदूच्या अगदी आतला भाग व गाठ सुस्पष्ट दिसते. विशिष्ट प्रकारच्या अगदी बारीक उपकरणांचा वापर करून ही गाठ काढता येते. सुनिता आमच्याकडे आली, त्याच संध्याकाळी ही दुर्बिणीतून मेंदूची शस्त्रक्रिया पार पडली. तिच्या मेंदूतील पाण्याच्या प्रवाहात आलेला अडथळा आम्ही ती गाठ पूर्णपणे काढून दूर केला.

सर्वांत आनंदाची गोष्ट म्हणजे ही गाठ अगदी साध्याच प्रकारची होती. (म्हणजे कॅन्सरची नव्हती.) कुठल्याही प्रकारची मोठी चिरफाड न करता फक्त तीन टाक्‍यांच्या शस्त्रक्रियेने सुनिता व्याधीमुक्त झाली. 

गेल्या काही वर्षांत मेंदूच्या शस्त्रक्रियेच्या तंत्रात व तंत्रज्ञानात विलक्षण प्रगती झालेली आहे. एंडोस्कोप, क्‍युसा, नॅव्हिगेशन, अत्याधुनिक मायक्रोस्कोप अशा अनेकविध तंत्रज्ञानाने या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. जेथे या अवघड प्रकारच्या शस्त्रक्रिया वारंवार होतात. त्या ठिकाणी ही उपकरणे उपलब्ध असतात व म्हणून ‘ब्रेन ट्युमर’ (मेंदूतील गाठी) सुलभतेने काढता येतात. हा आजार गंभीर असतो हे खरें, पण योग्य रितीने उपचार झाल्यास आज आपण त्यावर विजय मिळवू शकतो.

ब्रेन ट्युमरची लक्षणे
कवटीतील दाब वाढल्यामुळे डोकेदुखी, उलट्या, दोन-दोन दिसणे, डोळ्यासमोर अंधारी, ग्लानी/ बेशुद्धी येणे. 
मेंदूतील भागांवर गाठीचा दाब आल्याने - अर्धांगवायू (पॅरॅलिसिस), हात-पायातील शक्ती कमी होणे, बोलायला त्रास होणे, चक्कर येणे.
फिट (आकडी) येणे. ही लक्षणें तातडीने लक्षात येऊन योग्य निदान झाल्यास अनर्थ टळतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brain telescope surgery