हाडांसाठी कॅल्शियम व त्यासाठी तीळ 

Calcium for bones and Sesame for it
Calcium for bones and Sesame for it

स्वयंपाक करताना तिळाचे तेल वापरणे, तिळाच्या तेलाचा मसाज करणे वगैरे उपाय सुचवून आयुर्वेदाने तिळाच्या तेलाचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. 
संस्कारित तीळ तेलाचा बिंदू न्‌ बिंदू शरीरात उतरवता आला तर नुसती त्वचा तजेलदार होणे, शरीर लवचिक होणे, त्वचेवरील सुरकुत्या कमी होणे, वृद्धत्व न येता वयःस्थापन साधणे (तारुण्य टिकवणे) वगैरे लाभांबरोबर मांसधातू पुष्ट होणे, त्याला आकार देणे शक्‍य होणे, हाडे मजबूत होणे, शरीरातली अनावश्‍यक प्रमाणात असलेली चरबीचे पचन होऊन कमी होणे, शुक्रधातूपर्यंत सप्तधातूंचे वर्धन होणे वगैरे लाभ मिळतात. 


नुकतीच मकरसंक्रांत होऊन गेली, पण सूर्याचा हा महोत्सव रथसप्तमीपर्यंत चालू राहतो. मकरसंक्रांतीचे जे काही रीतीरिवाज किंवा संस्कार आहेत ते पुढेही चालू ठेवायचे असतात. आपण तिळगुळाचे उपयोग काय असतात हे पाहिले, आयुर्वेदात सांगितलेले तिळाचे महत्त्वही पाहिले. 

या बरोबरीने आयुर्वेदाने एक अजून सोपा उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे तिळाची चटणी, भाजी करताना त्यात तीळ घालणे आदी प्रकारांनी तिळाचे सेवन करणे. तिळाचे माहात्म्य एवढे की, तिळामुळे शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढते, कॅल्शियम वाढले की हाडे मजबूत होतात. हाडांची वाढ चांगली झाली की त्यानंतर तयार होणारे मज्जा व वीर्य हे धातू उत्तम प्रतीचे तयार होतात, साहजिकच मग ताकद, रक्‍त तयार होणे वगैरे प्रक्रिया व्यवस्थित होऊन शरीर सुदृढ, ताकदवान व निरोगी राहते. परंतु तीळ खाण्याला काही मर्यादा असते, कारण तीळ उष्ण गुणधर्माचे असतात आणि ते पचावे म्हणून तिळाबरोबर गूळ खायचा असतो, तोही उष्ण गुणधर्माचाच असतो. 

मात्र या उष्णतेपासून वाचण्यासाठी आपल्या त्वचेतून जर तिळाच्या तेलाला आत पाठवता आले तर त्याहून उत्तम असे काही नाही. म्हणून आयुर्वेदाने वेगवेगळ्या प्रकारची अभ्यंग तेले सुचविलेली आहेत. अभ्यंग म्हणजे त्वचेत तेल जिरवणे. याचा पेशींचे संचलन नीट होण्यासाठी, शरीराच्या मांसधातूला चालना मिळण्यासाठी म्हणजेच शरीराला व्यवस्थित घाट येण्यासाठी उपयोग होतो. परंतु कुठलेही संस्कार न केलेले कच्चे तेल त्वचेवर लावले तर त्याच्या चिकटपणामुळे त्वचेवरील छिद्रे उलट बंद होतात. म्हणून तेलावर विविध वनस्पतींचा संस्कार, तसेच अग्निसंस्कार करणे आवश्‍यक असते, जेणेकरून तेल शरीरामध्ये जिरण्यास, आत शोषले जाण्यास, शरीराच्या आतल्या व्यवस्थेमधे समाविष्ट होण्यास सक्षम होते. आयुर्वेदातील तेलांच्या पाठांत, उदा. महानारायण तेल, चंदनबवालाक्षादी तेल वगैरे तेलांमुळे शरीर दुखणे, शरीराची ताकद वाढणे वगैरे भौतिक स्तरावरील लाभांबरोबर मनुष्याला यश मिळते, श्री-समृद्धी-तेज वाढते अशा गोष्टींचाही उल्लेख केलेला आहे. तेव्हा तिळाच्या तेलाचा उपयोग का करून घेऊ नये? 

संस्कारित तीळ तेलाचा बिंदू न्‌ बिंदू शरीरात उतरवता आला तर नुसती त्वचा तजेलदार होणे, शरीर लवचिक होणे, त्वचेवरील सुरकुत्या कमी होणे, वृद्धत्व न येता वयःस्थापन साधणे (तारुण्य टिकवणे) वगैरे लाभांबरोबर मांसधातू पुष्ट होणे, त्याला आकार देणे शक्‍य होणे, हाडे मजबूत होणे, शरीरातली अनावश्‍यक प्रमाणात असलेल्या चरबीचे पचन होऊन कमी होणे, शुक्रधातूपर्यंत सप्तधातूंचे वर्धन होणे वगैरे लाभ मिळतात. 

स्वयंपाक करताना तिळाचे तेल वापरणे, तिळाच्या तेलाचा मसाज करणे वगैरे उपाय सुचवून आयुर्वेदाने तिळाच्या तेलाचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. मोती, प्रवाळ, मोत्याची शिंप, कवड्या, शंख, मृगशृंग, अंड्याची टरफले वगैरे गोष्टींची भस्मे नैसर्गिक कॅल्शियमच्या पूर्तीसाठी सांगितलेली आहेत. अंड्याची टरफले मांसाहारात मोडत नाहीत, कारण त्यात रक्‍ताचा अंश नसल्याने त्याचा दोष येत नाही. अंड्याच्या टरफलांपासून कुक्कुटांडत्वक भस्म बनविताना त्याला पुटे देऊन त्याची तशीही राख केली जाते. 
ही सर्व औषधे म्हणजे आयुर्वेदाचे मनुष्य जातीला मिळालेले वरदानच होय. शरीरातील हाडे मजबूत होऊन शरीराचा मूळ आधार म्हणजे हाडांचा सांगाडा मजबूत झाला की रोग शरीरात प्रवेश होणे सहज शक्‍य होत नाही. नुसती हाडे मजबूत होऊन चालत नाही तर हाडांना जोडलेले स्नायू घट्ट व ताकदवान असावा यासाठीही यांचा उपयोग होतो, एकूण स्टॅमिना टिकून राहण्यासाठी, ताकद वाढण्यासाठीही उपयोग होतो. या नैसर्गिक कॅल्शियम असणाऱ्या औषधांचे गर्भवतीने सेवन केल्यास तिचे स्वतःचे कॅल्शियम चांगले राहते, शिवाय बाळाचेही कॅल्शियम चांगले राहायला मदत होते, दात येताना बाळाला त्रास होत नाही, कारण दात हाडांचा उपधातू असतो. बाळाचे जावळ चांगले असते, त्याला केसांचे कोणतेही रोग होत नाहीत. एरवीसुद्धा केस गळणे, अकाली टक्कल पडणे, दात कमकुवत असणे वगैरे त्रास असले तरी या नैसर्गिक कॅल्शियम असणाऱ्या औषधांचा उपयोग होतो. 

सांगायचा हेतू असा की, आयुर्वेदाने या गोष्टी सांगितलेल्या आहेत. यांचा वापर केल्याने सध्या मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) वगैरे प्रकारांना आळा घालता येतो. याचा उपयोग केवळ गर्भवती स्त्रियांना होतो असे नाही तर, कोणत्याही स्त्रीला मासिक पाळीत प्रत्येक महिन्याला होणाऱ्या रक्‍तस्रावाबरोबर काही धातू, ताकद देणारी द्रव्ये शरीराबाहेर जात असतात. त्यामुळे आलेल्या अशक्‍तपणावर उपचार केला नाही तर पुढे त्याचे रूपांतर रोगात होते. याला आळा घालण्यासाठीही स्त्रीने नैसर्गिक कॅल्शियम असणारी औषधे घेणे, मसाज करणे फायद्याचे असते. कॅल्शियम शरीरात पचावे व सात्म्य व्हावे यासाठी काय करावे हा विषयही पाहावा लागेल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com