esakal | हृदयविकाराचे रिव्हर्सल होऊ शकते का?
sakal

बोलून बातमी शोधा

हृदयविकाराचे रिव्हर्सल होऊ शकते का?

हृदयविकाराचे रिव्हर्सल होऊ शकते का?

sakal_logo
By
डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ

कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात तेव्हा कोरोनरी हृदयरोग अथवा हृदयरोगामुळे होणारे रोग उद्‍भवतात. या अडथळ्यांना ॲथेरोस्क्लेरोटिक प्लॉक म्हणतात आणि अडथळे निर्माण होणाऱ्या प्रक्रियेला ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. प्लॉक विघटित होतो तेव्हा कोरोनरी धमनीमध्ये रक्ताची गुठळी बनते आणि हृदयविकाराचा झटका येतो.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की रिस्क फॅक्टर्स आक्रमकपणे कमी केल्यास, ॲथेरोस्क्लेरोटिक प्लॉक कमी करत येऊ शकतात. या प्रक्रियेला कोरोनरी हृदयरोगाचे रिव्हर्सल असे म्हणतात. कोरोनरी हृदयरोगाचे रिव्हर्सल म्हणजे कोरोनरी रक्तवाहिनी पूर्णपणे उघडत नाही, ८० टक्क्यांचा अडथळा ५० टक्के होत नाही. उदाहरणार्थ, ६५ टक्के अडथळा ६२ टक्के अडथळ्यामध्ये बदलू शकतो. प्लॉकच्या टक्केवारीत थोडासा कमी बदल झाल्यावरसुद्धा, हे काही कारणास्तव अत्यंत फायदेशीर ठरते :

 • जेव्हा रिव्हर्सल होते तेव्हा ते मऊ प्लॉकमधून कोलेस्टेरॉल कमी करून त्या प्लॉकला कडक बनवले जाते. यामुळे प्लॉक अस्थिर होऊन त्याचे विघटन होण्याची व रक्ताची गुठळी बनण्याची शक्यता कमी होते. याला प्लॉक स्टॅबिलायझेशन असे म्हणतात.

 • अगदी थोड्या प्रमाणात जरी प्लॉकची टक्केवारी कमी झाली तरीही त्याचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात फायदा हृदयाचा रक्तपुरवठा वाढवण्यात होतो. अॅथेरोसक्लेरोसिसचे रिव्हर्सल जरी टक्केवारीमध्ये नगण्य असले तरीही त्यामुळे ५० टक्क्यांपर्यंत हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

 • जीवनशैलीबदल उपचाराने कोरोनरी ॲथेरोस्कक्लेरोसिस हे रिव्हर्स होऊ शकते हे अमेरिकेतील डॉ. डीन ओर्निश आणि डॉ ॲस्सेलस्टाईन यांच्या संशोधनाने सिद्ध झाले आहे.

 • आरोग्याच्या तंबूचे चार स्तंभ म्हणजे आहार, विहार (व्यायाम), आचार विचार (मानसिक आरोग्य), ही शास्त्रोक्त औषधे आहेत.

 • या चारही स्तंभांना व्यवस्थित न्याय देऊन आपली जीवनशैली बदलली तर आपल्याला हृदयविकाराला पूर्णविराम नक्कीच देता येईल.

 • जीवनशैली बदलाचे घटक काय आहेत आणि ते किती अवघड आहे? हे खूप खर्चिक आहेत का? - जीवनशैली बदल हा खर्चिक नक्कीच नाही. परंतु त्यासाठी आपल्याला जिद्द आणि चिकाटीने खालील तत्त्वांचे पालन केले पाहिजे.

 • आहार - हृदयविकाराची जोखीम घटक कमी करण्यासाठी भाज्या, फळे, शेंगदाणे, सुकामेवा, संपूर्ण धान्य आणि माशांच्या आहारावर भर देणारे आहार घ्यावे. आहारातील सॅच्युरेटेड फॅटची जागा मोनोअनसॅचुरेटेड आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटने घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. तसेच कोलेस्टेरॉल आणि सोडियम कमी प्रमाणात असलेले आहार फायदेकारक ठरू शकतात. निरोगी आहाराचा एक भाग म्हणून, रेड मीट, शुद्ध कर्बोदके आणि गोड पेये यांचा आहारात समावेश कमी करावा. थोडक्यात वनस्पतिजन्य आणि मुबलक प्रमाणात फळांचा समावेश असलेला आहार हा हृदयविकार रिव्हर्स करण्यासाठी उपयुक्त आहे.

 • व्यायाम - हृदयविकाराची जोखीम कमी करण्यासाठी प्रौढांनी प्रत्येक आठवड्यात किमान १५० मिनिटांचा एकत्रित मध्यम तीव्रतेचे किंवा ७५ मिनिटे जास्त तीव्रतेचे ॲरोबिक व्यायाम (ट्रेडमिल, चालणे, पोहणे अथवा सायकल) दर आठवड्यात करावे. आठवड्यातून दोन वेळा स्ट्रेंग्थ ट्रेनिंग व योगासने करावीत. सौम्य योगासने आणि प्राणायाम हे हृदयविकारापासून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. वजन कमी करणे हे हृदयविकार आणि मधुमेह या रोगांपासून दूर जाण्यासाठी अत्यावश्यक आहे

 • मानसिक आरोग्य व तणावमुक्ती - स्ट्रेस अथवा तणाव हा हृदयविकारासाठी एक महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे. उदाहरणार्थ, तणावाखाली असलेले लोक जास्त प्रमाणात आहार करतात आणि धूम्रपान करू शकतात. याशिवाय तणावाखालील व्यक्तीचे रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाणही जास्त असते. उच्च रक्तदाब हा देखील स्ट्रेसमध्ये लवकर नियंत्रणाखाली येत नाही. अशा व्यक्तींनी आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी समुपदेशन आणि गरज पडल्यास औषधे यांचा वापर करावा.

 • तंबाखू आणि धूम्रपान : धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका असतो. धूम्रपान आणि तंबाखू सेवन हा कोरोनरी हृदयरोग असलेल्या रुग्णांमध्ये अचानक हृदयविकाराचा मृत्यू करणारा शक्तिशाली स्वतंत्र रिस्क फॅक्टर आहे. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे इतर लोकांच्या धुम्रपानातील एक्स्पोजर धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनादेखील देखील हृदयरोगाचा धोका वाढवते. कुठल्याही प्रकारचे तंबाखू सेवन म्हणजे सिगारेट, बिडी, गुटखा, जर्दा, मिश्री इत्यादी हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच आहेत व ते पूर्णपणे थांबवावे, यासाठी समुपदेशन आणि औषधे यांचा वापर केला पाहिजे.

 • नियमित औषधोपचार : डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे नियमितपणे न चुकता घ्यावीत. रक्तदाब कमी झाला, साखर नॉर्मल झाली म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करू नयेत. अशास्त्रीय उपचारांच्या मोहात न पडता आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. स्टॅटिन ही कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे हृदयविकार रेव्हर्सल करण्यासाठी अतिशय उपयुक्त सिद्ध झाली आहेत. तसेच अँटीप्लेट ॲस्पिरीन आणि क्लोपीडोग्रेल ही औषधे न चुकता घ्यावीत.

loading image
go to top