काळजी  हृदयाची

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 22 September 2017

हृदयरोगाचे निदान झाले की घाबरून जाता नये. त्यामागचे कारण शोधून ते टाळण्याचा आणि असलेला दोष फक्‍त नियंत्रणात न ठेवता तो पूर्ण दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असते. त्यासाठी पंचकर्माने शरीरशुद्धी करून घेणे, हृदयासाठी खास बनविलेली औषधे घेणे हे उपाययोजता येतात आणि त्यांचा उत्तम गुण येताना दिसतो.

दिवसरात्र अखंडपणे काम करणारा अवयव म्हणजे हृदय. दिवसभराचे काम झाले की आपण झोपतो, मेंदूसारखा महत्त्वाचा अवयवसुद्धा काही प्रमाणात विश्रांती घेतो, आपल्या सर्व इंद्रियांची कामेसुद्धा थांबतात, मंदावतात; मात्र हृदय क्षणभराचीसुद्धा विश्रांती घेऊ शकत नाही. म्हणून किमान हृदयावर अतिरिक्‍त ताण येणार नाही, यासाठी तरी आपल्याला प्रयत्न करणे भाग असते. वाढलेले वजन, अपचन, गॅसेस, मलावष्टंभ, मानसिक ताण अशा एक ना एक अनेक कारणांचा हृदयावर दुष्परिणाम होत असतो. हृदय हे सगळे ताण शक्‍य तितक्‍या काळापर्यंत सहन करण्याचा प्रयत्न करते; मात्र जेव्हा हृदयरोगाची काही तरी लक्षणे दिसू लागतात, तेव्हा तरी हृदयावरचा हा ताण हलका करण्यासाठी, हृदयाला ताकद मिळण्यासाठी प्रयत्न करणे, आहारात व जीवनशैलीत बदल करणे, योग्य औषधोपचार करणे हे अनिवार्य असते. यात नेमकेपणा येण्यासाठी हृदयरोग वातामुळे आहे, पित्ताशी संबंधित आहे की कफाच्या असंतुलनातून झालेला आहे हे समजून घ्यायचे असते. यासाठी आयुर्वेदात प्रत्येक दोषानुसार हृदयरोगाची वेगवेगळी लक्षणे समजावलेली आहेत.  

वातामुळे हृदयरोग
वातामुळे हृदयरोग होतो, त्याची लक्षणे अशी असतात,  हृदयात पोकळी असल्यासारखे वाटणे. छातीत धडधडणे. व्यायाम करताना किंवा काही उत्सुकता असली कीसुद्धा छातीत धडधडते; पण त्या धडधडण्यापेक्षा हे धडधडणे वेगळे असते. मुख्य म्हणजे हृद्रोगात काहीही कारण नसताना अचानक धडधड सुरू होते. छातीत, हृदयात शोष पडल्यासारखे वाटणे, कोरडेपणा वाटणे. हृदयाच्या ठिकाणी फुटल्याप्रमाणे तीव्र वेदना होणे. हृदयाचे कार्य एकाएकी थांबले आहे असे वाटणे. छातीत पिळवटल्याप्रमाणे वेदना होणे. छातीत टोचल्याप्रमाणे दुखत राहणे. एकाएकी, विशेष असे कारण नसतानाही दीन, खिन्न होणे, भीती वाटणे, शोकग्रस्त होणे. आवाज, गोंगाट, गडबड सहन न होणे. सर्वांगाला कापरे भरणे. श्वास घेण्यास व सोडण्यास त्रास होणे. झोप कमी येणे. वातकाळात म्हणजे जेवण पचल्यावर, अगदी पहाटे किंवा सूर्यास्तानंतर छातीत वेदना होणे. 

पित्तामुळे हृद्रोग
पित्तामुळे हृद्रोग होतो, त्याची लक्षणे अशी असतात,  छातीत जळजळणे. तोंडात कायम कडवट चव जाणवणे. आंबट ढेकर येणे. अकारण थकवा वाटणे. 

पाणी प्यायले तरी तहान न शमणे. घेरी-चक्कर येऊन खाली पडणे. गरगरणे. अकारण, एकाएकी घाम फुटणे. आंबट चवीची उलटी होणे. हृदयातून धूर येत असल्यासारखे वाटणे. डोळ्यासमोर अंधारी येणे. शरीर तापमान वाढणे. जेवणानंतर थोड्या वेळाने, भूक लागली असता वा मध्यरात्री त्रास होणे.

कफदोषामुळे हृदयरोग
कफदोष वाढल्यामुळे हृदयरोग होतो, त्याची लक्षणे अशी असतात, छातीत जडपणा जाणवणे. हृदयात जखडल्यासारखे वाटणे. आळस, तंद्रीत असल्यासारखे वाटणे. तोंडाला चव नसणे. भूक न लागणे, अग्नीचे काम मंदावणे. अतिप्रमाणात झोप येणे. तोंडात गोडसर चव राहणे. जेवणानंतर लगेच वा सकाळच्या वेळेस अस्वस्थ वाटणे.

हृदयरोग झालेल्या व्यक्‍तींना प्रत्यक्ष तपासताना सहसा वात-पित्ताची, पित्त-कफाची वा वात-कफाची अशी एकत्रित लक्षणे दिसतात. हृदयातून धूर येत असल्यासारखे वाटणे, अकारण दीन-खिन्न वाटणे, छातीवर दगड ठेवल्यासारखे वाटणे वगैरे काही लक्षणे वाचायला वा ऐकायला विचित्र वाटली तरी काही रुग्ण अगदी याच शब्दात वर्णन करताना दिसतात. 

हृदयरोगाचे निदान करताना लक्षणे विचारात घ्यावी लागतातच; पण लक्षणे कशामुळे वाढतात, कधी कमी होतात हेही बघावे लागते. उदा. छातीत धडधडणे हे हृदयरोगातले बहुधा सगळ्यांमध्ये आढळणारे लक्षण असते; पण ते मलविसर्जनानंतर वाढत असल्यास वातामुळे असते, ताण आल्याने वाढत असले, तर त्याचा संबंध रसधातूशी आणि मनाशी अधिक असतो, पाळीच्या आधी जाणवत असल्यास तर बरोबरीने स्त्रीसंतुलनासाठी प्रयत्न करावे लागतात, धूम्रपानाने वाढत असले, तर हृदयाच्या बरोबरीने फुप्फुसांवरही काम करावे लागते. 

अर्थातच निदान जितके अचूक तितका उपचार यशस्वी ठरत असल्याने या सर्व गोष्टी लक्षात घेण्याचा खूप फायदा होत असतो. सध्या बहुतेक वेळेला आधुनिक पद्धतीने नेमके निदान करून हृदयरोगी आयुर्वेदिक तज्ज्ञांकडे येत असतो. हृदयातले शारीरिक बदल वा हृदयाची एकंदर कार्यक्षमता आधुनिक निदानपद्धतीमुळे नेमकी समजू शकत असली तरी त्याचे आयुर्वेदिकदृष्ट्या वात-पित्त-कफदोषांच्या आधारे नेमके वर्गीकरण करून घ्यावे लागते किंवा प्राणवहस्रोतस, महास्रोतस, रसवहस्रोतसांपैकी कुठे दोष आहे, कोणत्या कारणामुळे दोष उत्पन्न झालेला आहे, पुन्हा असा त्रास होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यायला हवी याकडे लक्ष द्यावे लागते आणि त्यानुसार त्या त्या व्यक्‍तीमध्ये प्रकृतीविशिष्ट, दोषस्रोतस-धातू-विशिष्ट उपचार करावे लागतात.

असे आहेत उपचार 
उदाहरणार्थ, वातज हृदयरोग असेल तर हृद्य (हृदयाला हितकर) द्रव्यांनी संस्कारित स्नेह म्हणजे तूप सेवन करण्याचा उपयोग होतो. गोमूत्र, पाच प्रकारची लवणे यांच्यासह तिळाचे तेल घेतल्यास पोटातील वाताचा अवरोध दूर होतो, पर्यायाने वातज हृदयरोगावर उपयोग होतो. पुनर्नवादि तेल, हरितक्‍यादि घृत, त्र्युषणादि घृत यासारखे स्नेह वातज हृदयरोगावर अभ्यंगासाठी, पोटातून घेण्यासाठी वापरले जातात. पंचकर्मातील बस्ती, हलके विरेचन, वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेलाची हृद्‌बस्ती हे उपचारसुद्धा वातज हृदयरोगावर उपयुक्‍त असतात. 

पित्तज हृदयरोगावर विरेचन करायला सांगितले आहे. थंड वीर्याच्या (म्हणजेच पित्तशामक) आणि तरी हृदयाला ताकद देणाऱ्या द्रव्यांचा छातीवर लेप करणे, या द्रव्यांची धारा करणे हे उपचार करायचे असतात. यामध्ये द्राक्षाद्य घृत, पित्तशामक औषधांनी संस्कारित दूध सेवन करणे चांगले असते. 

कफज हृदयरोगावर लंघन, स्वेदन, शरीरशुद्धी करण्याचा उपयोग होतो, गोमूत्र घेणे हितावह असते. कफशामक द्रव्यांनी बनविलेले काढे घेता येतात. वातपित्तकफानुसार या प्रकारचे उपचार करता येत असले, तरी हृदयरोगामध्ये पंचकर्म महत्त्वाचे असते. तसा प्रत्यक्ष अनुभव येतो. व्यक्‍तीच्या प्रकृतीनुसार, हृदयरोगाच्या प्रकारानुसार, वय, शक्‍ती, पचन वगैरे मुद्दे लक्षात घेऊन पंचकर्म केले, विशेषतः अगोदर हृद्य औषधांनी संस्कारित तूप पाजून, अभ्यंग, स्वेदन करून दोष सुटे करून घेतले, फक्‍त पोट किंवा आतडीच नाही तर संपूर्ण शरीर, शरीरातील पेशीन्‌पेशी शुद्ध होईल असे विरेचन दिले, नंतर विशेष द्रव्यांच्या बस्ती दिल्या आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हृद्‌बस्तीची योजना केली, तर हृदयरोगावर उत्तम परिणाम मिळतात. अगोदर ज्या व्यक्‍तीला दहा मिनिटे चालले तरी दम लागत असे, ती व्यक्‍ती पंचकर्माच्या शेवटी शेवटी तीस-चाळीस मिनिटेसुद्धा न दमता, न थांबता अगदी सहज चालू शकते, छातीत दुखणे, जडपणा जाणवणे, हाताला मुंग्या येणे वगैरे सर्वच त्रास कमी होतात, असा अनुभव आहे.    

शास्त्रशुद्ध पंचकर्मामुळे शरीरातील दोष, अनावश्‍यक गोष्टी, अतिरिक्‍त मेद, विषद्रव्ये शरीराबाहेर गेली की हृदयाची ताकद वाढते, हृदयवाहिन्यांमधील काठिण्य, अवरोध कमी होतात आणि हृद्‌बस्तीच्या वेळी वापरण्यात आलेल्या तेला-तुपातील वीर्य, सारभाग हृदयापर्यंत पोचून हृदयातील दोष दूर करण्यासाठी मदत करत असतो. पंचकर्माच्या बरोबरीने बृहत्वातचिंतामणी, प्रभाकर वटी, सुवर्ण भस्म, कार्डिसॅन प्लस, सुहृदप्राशसारखी हृद्य औषधे तसेच सुवर्णयुक्‍त विशेष रसायन वैद्यांच्या सल्ल्यानुसार नियमित घेण्याचा हृद्रोगावर उत्तम उपयोग होताना दिसतो. अर्जुनारिष्ट घेणे, नियमित अभ्यंग करणे, रोज चालायला जाणे, प्रकृतीला अनुरूप आहारयोजना करणे, मानसिक ताण येणार नाही किंवा आला तरी टिकणार नाही यासाठी नियोजन करणे हेसुद्धा हृदयरोगातील उपचारांमध्ये महत्त्वाचे असते. 

या सर्व उपायांचा उत्तम गुण येताना दिसतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा गुण दीर्घकाळपर्यंत टिकणारा असतो. शस्त्रकर्मासारखा तात्पुरता, एक-दोन वर्षे टिकणारा नसतो. त्यामुळे हृदयरोगाचे निदान झाले की घाबरून न जाता त्यामागचे कारण शोधून ते टाळणे आणि असलेला दोष फक्‍त नियंत्रणात न ठेवता बरा करण्यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी पंचकर्माने शरीरशुद्धी करून घेणे, हृदयासाठी खास बनविलेली औषधे घेणे हे उपाययोजता येतात आणि त्यांचा उत्तम गुण येताना दिसतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Care about heart