गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग 

Cervical Cancer
Cervical Cancer

गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग झाला असेल तर लगेच हालचाल करा, आणखी वाट बघू नका! गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) हा संपूर्णपणे प्रतिबंधित करता येऊ शकतो, तरीही भारतात दररोज त्रेपन्न भारतीय महिलांपैकी एका महिलेचा या आजाराने मृत्यू होतो. हेही थांबवणे तुमच्याच हाती आहे. 


भारतीय महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) सामाजिक-आर्थिक दृष्ट्या कनिष्ठ वर्गात अधिक आढळतो. साक्षरतेचा दर कमी असल्याने या कॅन्सरबद्दलच्या जागरूकतेचा अभाव आणि लैंगिक स्वच्छतेचा अभाव ही त्याची कारणे आहेत. पूर्वी सर्व्हायकल कॅन्सर प्राधान्याने वयस्कर महिलांमध्ये दिसत असे, पण आता तरुण महिलांमध्येही त्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. या बदलाचे अजून नेमके कारण समजले नसले, तरी कदाचित वाढता लैंगिक स्वैराचार हे त्याचे कारण असावे, असा कयास आहे. 

या रोगाचा प्रभाव 
कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचे हे एक मुख्य कारण आहे. ३० ते ६९ वयोगटातील महिलांमध्ये कॅन्सरमुळे होणाऱ्‍या एकूण मृत्युंपैकी सतरा टक्के मृत्यू याच्यामुळे होतात. जगात शंभर पैकी एका महिलेस सर्व्हायकल कॅन्सर होण्याचा धोका असतो, तर भारतात मात्र ५३ पैकी एक म्हणजे दुप्पट महिला या कॅन्सरच्या धोक्याखाली वावरत असतात. 

देशात दर वर्षी एक लाख बावीस हजार ८४४ महिलांना सर्व्हायकल कॅन्सर झाल्याचे निदान होते. त्यापैकी ५४ टक्के ( म्हणजे सुमारे ६४ हजार ४७७) महिला या आजाराने मृत्यूमुखी पडतात. जगभरात या रोगामुळे होणाऱ्‍या मृत्युंपैकी भारतात होणाऱ्‍या मृत्युंचे प्रमाण १५.२ टक्के आहे. अलीकडील वैद्यकीय प्रगती आणि प्रभावी स्क्रीनिंग प्रोग्राममधील संशोधन यामुळे सर्व्हायकल कॅन्सरमुळे होणाऱ्‍या मृत्युंचा दर लक्षणीयरित्या कमी झाला आहे. 

कारक घटक 
सर्व्हायकल कॅन्सर हा मुख्यतः ह्युमन पॅपीलोमा व्हायरस किंवा लैंगिकरित्या पसरणारा संसर्ग यामुळे होतो आणि एकदा संसर्ग झाल्यानंतर तो वाढण्यास दशके लागतात. परंतु लक्षणे दिसत नसल्यामुळे त्याचे निदान तो खूप वाढल्यानंतरच होते. ह्युमन पॅपीलोमाव्हायरस संसर्ग हा सर्व्हायकल डिस्प्लासिया आणि कर्करोगाच्या वाढीच्या मुळाशी असतो. याचे अनेक उपप्रकार असले तरी, काही विशिष्ट हाय-रिस्क ऑन्कोजेनिक प्रकार सर्व्हायकल कॅन्सरचे मुख्य कारक असतात. एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत लैंगिक संबंध, लहान वयापासून संभोग, कुटुंबनियोजन पद्धतींचा अस्वीकार, इम्युनोसप्रेशन (उदा. एचआयव्ही, अवयव प्रत्यारोपणानंतर वापरण्यात येणारी इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्ज) आणि तंबाखूचे सेवन यांसारख्या सवयींमुळे ह्युमन पॅपीलोमाव्हायरस संसर्ग आणि सर्व्हायकल कॅन्सर विकसित होण्याचा धोका वाढतो. 

सामान्य लक्षणे 
सर्व्हायकल कॅन्सरची सामान्य लक्षणे अशी आहेत - शरीरसंबंधाच्या वेळी वेदना होणे, योनीमधून दुर्गंधीयुक्त स्राव होणे, मासिक पाळीत खूप जास्त रक्तस्राव होणे, शरीरसंबंधानंतर असामान्य रक्तस्राव होणे ही रोग विकसित अवस्थेस पोहोचला असल्याची लक्षणे आहेत. ती अधिकही गंभीर असू शकतात. अशावेळी पोट सुजणे, अरुची, बद्धकोष्ठ, वजन उतरणे, भूक न लागणे, आजारी वाटणे. याशिवाय, लघवी करताना किंवा शौचास गेल्यावर दुखणे किंवा रक्त येणे, पाय सुजणे ही लक्षणे देखील दिसू शकतात. 
सर्व्हायकल कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाला प्रभावित करतो. जेव्हा गर्भाशय ग्रीवेच्या पेशी असामान्य रीतीने वाढतात आणि इतर ऊती व अवयवांमध्ये शिरकाव करतात, तेव्हा हा आजार उद्भवतो. तो जेव्हा वाढत असतो, तेव्हा तो ग्रीवेच्या अधिक खोलवरच्या पेशींना प्रभावित करतो व शरीराच्या इतर भागात, विशेषतः फुफ्फुसे, यकृत, मूत्राशय आणि मलाशय येथे पसरू शकतो. 

सर्व्हायकल कॅन्सरचे निदान 
सौम्य डिस्प्लासिया (प्रीकॅन्सरस पेशी) ते कार्सिनोमा सर्व्हिक्स (ग्रीवेचा कॅन्सर) होण्याची प्रक्रिया मंद, म्हणजे दहा ते वीस वर्षांची असते. हा अवधी प्रदीर्घ असल्यामुळे तपासण्या आणि निदान यासाठी वेळ मिळून हा रोग प्रतिबंधात्मक होऊ शकतो. 
तपासण्यांमध्ये, ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो असे सर्व्हिक्स पेशींमधील बदल शोधले जातात. पॅपनिकोलाऊ टेस्ट जी पॅप टेस्ट किंवा पॅप स्मीयर म्हणून ओळखली जाते, ती ग्रीवेमध्ये संभावित प्रीकॅन्सरस आणि कॅन्सरस प्रक्रिया शोधण्याची पद्धत आहे. या चाचणीसाठी फक्त वीस-पंचवीस मिनिटे लागतात. सर्व्हायकल कॅन्सर लसीने देखील प्रतिबंधित करता येऊ शकतो. 

जर कोणत्याही चाचण्या (पॅप टेस्ट, VIA, HPV टेस्ट) पॉझिटिव्ह आल्या तर ग्रीवेतील बदल कॅन्सरचे नाहीत ना, याची खात्री करण्यासाठी रुग्णाने आणखी पुढच्या निदानात्मक चाचण्या केल्या पाहिजेत. कॉल्पोस्कोपी केली जाऊ शकते किंवा रुग्णाच्या ग्रीवेतून उतींचा एक छोटा नमूना (बायोप्सी) घेतला जाऊ शकतो. 

 कॉल्पोस्कोपी: ही एक प्रक्रिया आहे, ज्यात योनी आणि ग्रीवेत काही असामान्य भाग दिसत नाही ना, ह्याचा तपास घेण्यासाठी कॉल्पोस्कोप (एक वजनात हलके भिंग-वजा साधन) चा उपयोग करण्यात येतो. 

बायोप्सी: जर पॅप टेस्टमध्ये असामान्य पेशी आढळल्या, तर डॉक्टर बायोप्सी करण्याचा सल्ला देतात. यात ग्रीवेतून ऊतींचा एक छोटा नमूना कापून घेतला जातो आणि पॅथॉलॉजिस्टद्वारा सूक्ष्मदर्शकाखाली त्याची तपासणी करण्यात येते व त्यात कॅन्सरची चिन्हे दिसतात का हे तपासले जाते. 

उपचार 
साध्या शस्त्रक्रियात्मक प्रक्रिया प्रीकॅन्सरस टप्प्यातून कॅन्सरची वाढ होण्यास प्रतिबंध करतात. सुरुवातीच्या टप्प्यांत शस्त्रक्रियेचा उपयोग करून ९० टक्क्यापेक्षा जास्त सर्व्हायकल कॅन्सर बरे होऊ करता येऊ शकतात. नंतरच्या टप्प्यांत रेडियोथेरपीचा उपयोग उपचारासाठी केला जातो.

रेडियोथेरपीत चार ते सहा आठवड्यांपर्यंत रेडिएशनच्या बाह्य स्रोतांचा उपयोग केला जातो. त्यानंतर रेडिएशनचा आंतरिक स्रोत वापरला जातो. रेडिएशनसाठी जो स्रोत वापरला असेल, त्याच्या तीव्रतेनुसार या प्रक्रियेला काही मिनिटांपासून ते एक दिवसापर्यंतचा वेळ लागू शकतो. केमोथेरपीचा उपयोग कॅन्सरला खालच्या टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी केला जातो, जेणे करून काही वेळा तो कॅन्सर शस्त्रक्रिया करण्यास योग्य होतो. तसेच काही वेळा या रोगाच्या खूप वरच्या टप्प्यात देखील केमोथेरपीचा उपयोग करतात. 

ह्युमन पॅपीलोमा व्हायरस लस 

भारतात कार्सिमोना सर्व्हिक्सच्या नियंत्रणाबाबत ह्युमन पॅपीलोमा व्हायरस लसीकरण एक मोठा टप्पा ठरू शकते. सर्व्हायकल कॅन्सरच्या प्रतिबंधातील अलीकडची एक मोठी घडामोड म्हणजे, नऊ ते सव्वीस वयोगटातील महिलांमध्ये हाय-रिस्क ह्युमन पॅपीलोमा व्हायरस प्रकारांत लसीकरणासाठीची मंजुरी मिळाली आहे. एक क्वाड्रिव्हॅलन्ट (HPV 6/11/16/18) लस उपलब्ध आहे व ती या उप-प्रकारांमुळे होणार्‍या सर्व्हायकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी जवळजवळ संपूर्णपणे प्रभावी आहे. 

निर्मूलनासाठी उपाययोजना 
एक जमेची बाजू ही आहे की, २०१२ ते २०१८ दरम्यान भारतात सर्व्हायकल कॅन्सरच्या प्रकरणांत २१ टक्क्यापेक्षा जास्त घट झाली आहे. मे २०१८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या सरसंचालकांनी या अत्यंत बऱ्या होऊ शकणाऱ्या (क्युरेबल) अशा कॅन्सरच्या निर्मूलनासाठी जागतिक स्तरावर सहयोगात्मक कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे. भारतात सर्व्हायकल कॅन्सर विरुद्ध लढा चालू ठेवण्यासाठी तपासण्यांबद्दलची नकारात्मक भावना दूर करून नियमित तपासण्या कार्यक्रम राबवणे, किफायतशीर हेल्थकेअर आणि जागरूकता मोहिमा राबवणे गरजेचे आहे. 

केवळ ह्युमन पॅपीलोमा व्हायरस लसीकरण कार्यक्रम वाढवण्यासाठीच नाही तर, प्राथमिक प्रतिबंधासाठी तपासण्या आणि भारतात सर्व्हायकल कॅन्सरचे नियंत्रण यासाठी शैक्षणिक कार्यक्रम व जागरूकता कार्यक्रम होत राहण्याची गरज आहे. भारतात सामुहीक ह्युमन पॅपीलोमा व्हायरस लसीकरण कार्यक्रमाच्या संदर्भात किफायतशीरता आणि उपलब्धता या मुख्य समस्या आहेत. प्रांत-विशिष्ट समस्यांसाठी किफायतशीर दुसऱ्या पिढीचे लसीकरण ही काळाची गरज आहे. म्हणून, लसीकरणापूर्वी ज्यांना हा संसर्ग झालेला आहे किंवा इतर ह्युमन पॅपीलोमा व्हायरस प्रकारांचा संसर्ग झाला आहे अशा स्त्रिया शोधून त्यांचे उपचार करण्यासाठी सायटोलॉजिकल तपासण्या चालू राहिल्या पाहिजेत. प्रीमॅलिग्नंट किंवा अगदी प्रारंभिक टप्प्यात सर्व्हायकल कॅन्सर पकडला जाणे ही कॅन्सर बरा करण्यातील गुरुकिल्ली आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com