#FamilyDoctor अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

डॉ. श्री बालाजी तांबे
Sunday, 25 November 2018

लहान मुलांच्या आहारात आपण काळजी घेतो, त्याप्रमाणे औषधांच्या बाबतीत अधिकच दक्ष राहणे गरजेचे होय. म्हणून लहान मुलांना एक तर कमी मात्रेत आणि दुसरे म्हणजे सौम्य प्रकारची औषधेच द्यायची असतात

मागच्या आठवड्यात आपण अजीर्णाकडे कधीही दुर्लक्ष करून नये कारण त्यामुळे अनेकानेक रोगांना आमंत्रण मिळते हे पाहिले. आता अग्र्यसंग्रहातील या पुढचा भाग पाहूया.

बालो मृदुभेषजीयानाम्‌ - मृदू औषध देण्यासाठी योग्य व्यक्‍तीमध्ये बालक सर्वश्रेष्ठ होत.

लहान मुलांच्या आहारात आपण काळजी घेतो, त्याप्रमाणे औषधांच्या बाबतीत अधिकच दक्ष राहणे गरजेचे होय. म्हणून लहान मुलांना एक तर कमी मात्रेत आणि दुसरे म्हणजे सौम्य प्रकारची औषधेच द्यायची असतात

मागच्या आठवड्यात आपण अजीर्णाकडे कधीही दुर्लक्ष करून नये कारण त्यामुळे अनेकानेक रोगांना आमंत्रण मिळते हे पाहिले. आता अग्र्यसंग्रहातील या पुढचा भाग पाहूया.

बालो मृदुभेषजीयानाम्‌ - मृदू औषध देण्यासाठी योग्य व्यक्‍तीमध्ये बालक सर्वश्रेष्ठ होत.

मृदू औषध म्हणजे सौम्य किंवा तीक्ष्ण नसणारे औषध. लहान मुलांना तसेच गरोदर स्त्रियांना औषध देताना ते सौम्य असणे महत्त्वाचे समजले जाते. लहान मुलांचे शरीर क्रमाक्रमाने बळकट होत असते, तसेच त्यांनी पचनशक्‍तीसुद्धा नाजूक असते. म्हणूनच जन्मानंतर पहिले सहा महिने फक्‍त आईचे दूध, त्यानंतर वर्ष-दीड वर्षापर्यंत आईचे दूध आणि वरचे हलके अन्न, गाईचे दूध आणि मग हळूहळू मोठ्यांसारखा सामान्य आहार द्यायला सुरवात करायची असते. आहारात सुद्धा जर इतकी काळजी घेतली जाते, तर औषधांच्या बाबतीत अधिकच दक्ष राहणे गरजेचे होय. म्हणून लहान मुलांना एक तर कमी मात्रेत आणि दुसरे म्हणजे सौम्य प्रकारची औषधेच द्यायची असतात. आयुर्वेदातील ‘कौमारभृत्य’तंत्र हे याच विषयाला वाहिलेले आहे. यात लहान मुलांची देखभाल कशी करावी हे तर सांगितलेच आहे, पण त्यांना एखादा रोग झाला तर त्यावर उपचार करताना कोणती द्रव्ये वापरावीत हे सुद्धा सांगितले. वनस्पतीपासून बनविलेले औषधे अशीही अपायकारक नसतात, तरी सुद्धा आयुर्वेदाच्या आचार्यांनी लहान मुलांच्या बाबतीत इतकी काळजी घेतलेली आहे, यावरून कृत्रिम, रासायनिक औषधांचा बालकांवर प्रयोग करण्याआधी खूपच सावधानता बाळगायला हवी हे सहज लक्षात येऊ शकते. 

उदाहरणादाखल, खोकल्यावर कंटकारी नावाची वनस्पती प्रभावी असते, मोठ्या व्यक्‍तींसाठी संपूर्ण कंटकारी वनस्पती वापरली जाते, मात्र लहान मुलांना कंटकारीचे फक्‍त फूल किंवा फुलातील कोवळे केशर चाटवण्याने खोकला बरा होतो, असे सांगितलेले आहे. ताप आला असल्यास गुळवेल सत्त्व देऊन बाहेरून अतसी, मुस्ता, दारूहळद, काडेचिराईत, हळद वगैरे ज्वरनाशक वनस्पतींचा शरीरावर लेप करण्यास सुचवला आहे, जेणेकरून कमी व सौम्य औषध देणे पुरेसे ठरते. बालकाला उलट्या, जुलाब होत असतील तर त्याला साळीच्या लाह्यांचा लाडू खायला देऊन कवठ, चांगेरी, बोर, काकमाची या वनस्पतींची पाने वाटून तयार केलेला लेप डोक्‍यावर करावा असे सांगितलेले आहे. लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या बऱ्याचशा रोगांवर संस्कारित घृतांची योजना केलेली आहे, जेणेकरून तुपाच्या योगाने औषध सौम्य व्हावे व कमी मात्रेत उपयोगी पडावे. 

वृद्धो याप्यानाम्‌ - यापन म्हणजे धारणपोषण करणारे उपचार घ्याव्या लागणाऱ्या व्यक्‍तीमध्ये वृद्ध व्यक्‍ती सर्वश्रेष्ठ होत. 

वृद्धावस्थेत शरीरातील वातदोष वाढलेला असतो, ज्यामुळे शरीराची झीज होणे स्वाभाविक असते. या अवस्थेत अन्न, औषध, उपचार, रसायन वगैरे उपचारांच्या योगे शरीराचे धारण-पोषण करणे हे सर्वांत महत्त्वाचे असते. 
वृद्धावस्थेत सामान्यतः होणारे त्रास टाळण्यासाठी किंवा त्यातून मुक्‍त होण्यासाठी करता येण्याजोगे सोपे उपचार हे पुढील प्रमाण सांगता येतील. 
स्मरणशक्‍ती कमी होणे- पंचामृत, बदाम, जर्दाळू वगैरे मेंदूला पोषक आहारपदार्थांचे सेवन करण्याचा उपयोग होतो. वयाच्या चाळिशीनंतर मेंदूला रसायनस्वरूप असणारे ब्राह्मी घृत, ब्रह्मलीन घृत वगैरेंचे सेवन करणेही उत्तम असते. 

झोप न लागणे- वयानुसार झोपेचे प्रमाण कमी होणे स्वाभाविक असले तरी झोप शांत लागावी यासाठी पादाभ्यंग करण्याचा, अंगाला तेल लावण्याचा, योगनिद्रासारखे मन शांत करणारे संगीत ऐकण्याचा फायदा करून घेतो येतो. 

सांधेदुखी, कंबरदुखी- वयानुरूप शरीरात वाढणारा वात बाहेरून अभ्यंग करण्याने व तूप, लोण्यासारखे स्निग्ध पदार्थ नियत प्रमाणात खाण्याने संतुलित ठेवला तर असे त्रास दूर ठेवता येतात. हाडे मजबूत राहण्यासाठी दूध नियमित घेण्याचा, डिंकाचे लाडू खाण्याचाही उपयोग करून घेता येतो.
श्रवणशक्‍ती कमी होणे, नजर कमकुवत होणे- कान, डोळे व एकंदरच इंद्रियांची शक्‍ती अधिकाधिक काळ टिकून राहण्यासाठी नस्य (नाकात तूप टाकणे) करणे उत्तम असते. डोळ्यात आयुर्वेदिक काजळ, अंजन घालणे, कानात अधूनमधून बिल्वादी तेल किंवा तयार ‘श्रुती’तेलासारखे तेल टाकणे या उपायांचा चांगला उपयोग होऊ शकतो. 

दात पडणे, हलणे - आयुर्वेदानुसार दात हाडांशी संबंधित असल्यामुळे मुळात हाडे मजबूत राहण्यासाठी काळजी घेतली, बकुळ, खदिर वगैरे दात-हिरड्यांना हितकर द्रव्यांनी बनविलेले दंतमंजन वापरले, इरिमेदादी तेल किंवा तयार सुमुख तेलासारख्या तेलमिश्रित पाण्याच्या गुळण्या केल्या तर दात अधिकाधिक काळ मजबूत राहण्यास मदत मिळू शकते. 

त्वचा सुरकुतणे, पायाला मुंग्या येणे - आतपर्यंत जिरण्याची क्षमता असणाऱ्या तेलाचा नियमित अभ्यंग करण्याने एकंदर शरीरशक्‍ती, संवेदनशक्‍ती उत्तम राहते व त्वचाही घट्ट, नितळ, तरुण राहण्यास मदत मिळते. 

याशिवाय वेळोवेळी आवश्‍यकतेनुसार शास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्म करून शरीरशुद्धी करणे; उत्तम द्रव्यांपासून बनविलेल्या रसायनयोगाचे सेवन करणे; चालणे, योगासन, दीर्घश्वसन, प्राणायाम वगैरे क्रिया नियमित करणे; मन शांत राहील याकडे लक्ष देणे.

हे उपाय योजले तर शरीराचे ‘यापन’ होऊन वयानुसार मागे लागणारे त्रास टाळता येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Food Health Care