मुलांच्या सवयी आणि आरोग्य

संतोष शेणई
Friday, 27 April 2018

पालकांच्या मुलांविषयी भरपूर तक्रारी असतात. पण केवळ तक्रारी करीत राहता कामा नये. त्या तक्रारींमागे काही सवयी कार्यरत असतात. या सवयी बदलायला हव्यात.

आमची मुलगी सतत व्हॉट्‌सॲप, फेसबुकवरच असते. 
  आमचा मुलगा सतत लोळत पडलेला असतो. किंडलवर पुस्तके वाचतो, पण तीही लोळूनच.
  आमची मुलगी मैत्रिणींमध्ये मिसळत नाही. अगदीच घरकोंबडी झाली आहे.
  आमचा मुलगा नीट जेवत नाही, लवकर झोपत नाही, आमच्याशीही नीट बोलत नाही, अगदीच एकलकोंडा झाला आहे.

पालकांच्या मुलांविषयी भरपूर तक्रारी असतात. पण केवळ तक्रारी करीत राहता कामा नये. त्या तक्रारींमागे काही सवयी कार्यरत असतात. या सवयी बदलायला हव्यात.

आमची मुलगी सतत व्हॉट्‌सॲप, फेसबुकवरच असते. 
  आमचा मुलगा सतत लोळत पडलेला असतो. किंडलवर पुस्तके वाचतो, पण तीही लोळूनच.
  आमची मुलगी मैत्रिणींमध्ये मिसळत नाही. अगदीच घरकोंबडी झाली आहे.
  आमचा मुलगा नीट जेवत नाही, लवकर झोपत नाही, आमच्याशीही नीट बोलत नाही, अगदीच एकलकोंडा झाला आहे.

बहुतेक घरात आई-वडिलांकडून अशा तक्रारी वाढत चालल्या आहेत. या तक्रारी म्हणजे एका अर्थी आजारपणाची लक्षणेच आहेत. आपले मूल तंदुरुस्त आहे का, हे आधी पाहिले पाहिजे. ही तंदुरुस्ती पाहताना केवळ ‘तन-दुरुस्ती’ नव्हे, तर ‘मन-दुरुस्ती’ही पाहिली पाहिजे. मूल अशक्त असू नये, तसे ते स्थूलही असता नये. बहुतेकदा मूल गुटगुटीत असल्याचा आपण आनंद व्यक्त करतो. पण असे मूल शक्तिवान नसते, तर वेगळ्या अर्थाने अ-शक्तच असते. उंचीच्या प्रमाणापेक्षा ते जाड असेल, स्नायू व हाडे यांच्या वजनापेक्षा चरबीचे वजन जास्त असेल तर ते मूल शक्तिवान नसतेच. त्या मुलाचे कुपोषण सुरू असल्याची ती लक्षणे आहेत, असे समजावे. मूल नीट जेवत नाही, अशी तक्रार करण्याआधी मूल फास्टफूड किती फस्त करते हे तपासावे. मूल वयाप्रमाणे वाढायला हवे. त्याला भूक लागायला हवी व  भूक लागल्यावरच खाण्याची सवय असायला हवी. अभ्यासाबरोबरच मुले पळण्याचे खेळ भरपूर खेळायला हवीत. त्यांनी शांत व पुरेशी झोप घ्यायला हवी. तरच ती ‘तंदुरुस्त’ आहेत, असे म्हणता येईल. जर मूल अशक्त किंवा खुरटलेले दिसत असेल, ते वेळच्या वेळी खात नाही, ते फास्टफूड अधिक खात असेल, ते स्थूल असेल, ते खेळण्याऐवजी लोळणे पसंत करीत असेल, वारंवार आजारी पडत असेल, तर ते ‘ना-दुरुस्त’ समजायला हरकत नाही. या वयात मुलांच्या ओठी एकच गाणे असायला हवे ः ‘आता खेळा, नाचा.. पुस्तक नंतर वाचा.’

मुले आपसूक वाढतातच. पण त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे मुलांचे डोळसपणे संगोपन करावे लागते. मूल वाढवणे ही सोपी गोष्ट नाही, हे पालकांनी जाणून घ्यायला हवे. मुलांना घडवायचे असेल तर आधी पालकांनी स्वतःला घडवायला हवे. काही सवयी कुटुंब म्हणून लावून घ्यायला हव्यात. दर महिन्यात एकदा कुटुंबातील सर्वांनी आरशासमोर उभे राहायचे. आरशात ज्यांचे चेहरे लाल दिसतील ते चांगले समजायचे. ज्यांचे चेहरे पांढुरके, फिकट दिसतील, ते अशक्त होत आहेत, त्यांची पंडुरोग होण्याकडे वाटचाल सुरू आहे, असे समजावे. अशा सान-थोर व्यक्तींनी दर सहा महिन्यांनी जंतांचे औषध घ्यावे.

अधिकचा अशक्तपणा वाटू लागला तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काही जणांना वारंवार जीभ व तोंड येते किंवा ओठांच्या कडा  फाटतात, त्याचे कारण ‘ब‘ जीवनसत्त्वाच्या अभाव हे असते. बोटांच्या सांध्यांचा रंग मागच्या बाजूने काळपट गडद झाला असेल, तर फॉलिक ॲसिडचा अभाव असू शकतो. मूठभर पालेभाजी, वेगवेगळ्या कोशिंबिरी, हंगामी फळे रोज खाण्याने ही लक्षणे दूर होतील. आपण खातो त्या अन्नाचे काय होते? अन्न पचल्यानंतर त्याचे अन्नरसात रूपांतर होते. या अन्नरसापासून रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थी असे रूपांतर होत जाते. याचा सरळ अर्थ असा की, आपण खातो त्या अन्नाचे शरीर बनते. म्हणजेच जसा आहार असेल तसे शरीर बनेल. याचाच अर्थ असा की, ‘तन-दुरुस्ती’ आणि आहार यांचा जवळचा संबंध आहे.

‘उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म’ असे आपण म्हणतो. अन्न हे शरीराच्या पोषणाकरता आहे. शरीराच्या गरजेपेक्षा कमी खाण्याने किंवा अतिखाण्यानेही शरीराचे कुपोषण होते. वाढत्या वयात शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रथिने, उष्मांक, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्व अशा सर्व घटकांची गरज असते. ज्यांना या गोष्टी पुरेशा मिळत नाहीत, त्यांची रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती कमी होते. सर्दी-खोकल्याचे, जुलाबाचे आजार त्यांना वारंवार सतावतात आणि आजारात शक्ती आणखीनच कमी होते.
मुले वाढत असतात. मुलांनी खूप खेळणे, नाचणे, उड्या मारणे आणि ऊर्जेचा पुरेपूर वापर करणे अपेक्षित असते. मुले अभ्यास करीत असतात तेव्हाही ही ऊर्जा उपयोगात येत असते. या ऊर्जेसाठी मुलांना प्रथिने आणि उष्मांकाचा अनिर्बंध पुरवठा व्हायला पाहिजे. शाळेत दर दोन-अडीच तासांच्या अंतराने असलेल्या मधल्या सुटीचे प्रयोजन हेच आहे. मधल्या सुटीत खाल्लेला डबा मुलांना पुढचे अडीच तास सतर्क ठेवतो. पण मोठी शहरे सोडली तर या मधल्या सुटीचे प्रयोजन लक्षात घेतले जात नाही. सरकारने ग्रामीण शाळेतून आहार योजना सुरू केलेल्या असल्या तरी त्या आहाराच्या चौरसपणाबाबत शंका आहेच.

मुलांना चौरस आहार मिळावा यासाठी शाळेत जाताना त्याचा डबा विचारपूर्वक तयार केला पाहिजे. सगळ्या गोष्टी एकाच वेळी देता येणार नाहीत, पण आठवड्याच्या डब्याचे नियोजन नक्कीच करता येईल. सुटीच्या दिवशीचे नियोजन वेगळे हवे. मुलांना खेळता खेळता खाण्याची हुक्की आली किंवा कंटाळा आला म्हणून खावेसे वाटले, तर त्यांना सहज काही खायला मिळेल, त्यात वेगळेपणा असेल याची काळजी घ्यायला हवी. सुटीच्या दिवशी मुलांचा खिसा शे-दीडशे ग्रॅम शेंगदाण्यांनी दिवसभर भरून ठेवायला हवा. हे खिसे म्हणजे सतत ऊर्जा देणारे यूपीएस (Uninterrupted Power Supply) असतात.

पालकांचे मुलांकडे लक्ष असले पाहिजे. केवळ कौतुक करू नये, तर शाबासकीबरोबरच त्यांच्या सवयी सुधाराव्यात, यासाठीही प्रयत्न करावेत. 

‘लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्यसंपदा लाभे’ हे सूत्र कायमच खरे आहे. आपल्या मुलाला झोप पूर्ण झाल्यानंतर ताजेतवाने वाटते का? अलीकडे फार लवकर झोपणे शक्‍य होत नाही. पण मुले टी.व्ही. पाहत, व्हॉट्‌सॲप किंवा फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांवर वेळ घालवत असतील आणि त्यामुळे झोपायला उशीर होत असेल, तर उठायलाही उशीर होतो. त्यामुळे ‘उत्साही’ ठेवणारी झोप मिळत नाही. सकाळी सूर्योदयानंतरची झोप ही खरी झोप नसते. साहजिकच उशिरापर्यंत झोपूनही झोप पूर्ण झाली नाही असे वाटत राहते. सकाळी उठल्यावर झोप पुरी होऊन ताजेतवाने वाटायला हवे. 

मुलांना खाण्याच्या वेळी नैसर्गिक भूक असते, की केवळ जेवणाची वेळ झाली म्हणून जेवत आहेत? जर पुरेसा व्यायाम झाला नसेल, तर पुरेसे उष्मांक वापरले जात नाहीत. अशा वेळी नैसर्गिक भूक लागत नाही. भूक नसताना बळेबळे खाल्लेले पचत नाही. अपचनाचा त्रास होणे, अन्नाचे रक्तात रूपांतर होण्याऐवजी चरबीत रूपांतर होणे असे घडते. खाल्लेले अंगी लागण्यासाठी भूक लागली पाहिजे.

मुलांच्या आहाराच्या सवयी कशा आहेत? मुले पोळी-भाजी, वरण-भात खातात की चॉकलेट, केक अन्‌ नूडल्स, चिप्स मागतात? मुलांचे चांगले पोषण व्हायला हवे असेल तर त्यांनी पोळी-भाजी, वरण-भात हाच आहार घ्यायला हवा. जंकफूड, फास्टफूट, बेकरीतील पदार्थ हे नेहमीच्या आहाराचा भाग असता कामा नयेत. या पदार्थांनी भूक भागल्यासारखे वाटले तरी प्रत्यक्षात कुपोषण होत असते.

मुलांना शाळेत दिलेला डबा संपतो का? तो जर संपत नसेल तर मुलाला भूक कमी लागते आहे असा त्याचा अर्थ असू शकतो. त्यामागे कुपोषण, लोहाची कमतरता ही कारणे असू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child habit and health