#FamilyDoctor लहान मुलांच्या दातांची निगा

डॉ. निकिता कुलकर्णी
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

अगं आई गं छोट्या नीलने भोकाड पसरले.
काय रे सोन्या काय झालं! आईनं विचारलं.
आई माझा दात खूप दुखतोय गं! नीलने रडत रडत सांगितलं.
थांब हं! ही गोळी घे पाण्याबरोबर. संध्याकाळी आपण आपल्या दातांच्या डॉक्‍टरकडे जाऊया!

काही नको डॉक्‍टर बिक्‍टर! दुधाचेच दात आहेत. पडतील आता लवकर! आण इकडे मी लवंगाचे तेल लावते. आजी वेलदोडे निवडता-निवडता म्हणाली.
नील सहा वर्षांचा. खात्या-पित्या घरातला व सुदृढ बांध्याचा; पण दात मात्र बऱ्यापैकी किडलेले. कारण एकुलता एक असल्यामुळे खूप लाडावलेला आणि भरपूर चॉकलेट्‌स खाणारा!

अगं आई गं छोट्या नीलने भोकाड पसरले.
काय रे सोन्या काय झालं! आईनं विचारलं.
आई माझा दात खूप दुखतोय गं! नीलने रडत रडत सांगितलं.
थांब हं! ही गोळी घे पाण्याबरोबर. संध्याकाळी आपण आपल्या दातांच्या डॉक्‍टरकडे जाऊया!

काही नको डॉक्‍टर बिक्‍टर! दुधाचेच दात आहेत. पडतील आता लवकर! आण इकडे मी लवंगाचे तेल लावते. आजी वेलदोडे निवडता-निवडता म्हणाली.
नील सहा वर्षांचा. खात्या-पित्या घरातला व सुदृढ बांध्याचा; पण दात मात्र बऱ्यापैकी किडलेले. कारण एकुलता एक असल्यामुळे खूप लाडावलेला आणि भरपूर चॉकलेट्‌स खाणारा!

वरील संवादाचा मथितार्थ म्हणजे अजूनही पालाकंची मानसिकता पूर्णपणे बदलेली नाही. मुलांच्या दातांच्या निगेबद्दल अजूनही पालकांचे दुर्लक्ष आहेच. आपल्या तोंडामध्ये एक दशलक्षापेक्षा जास्त जीवाणू आढळतात. जे खाल्लेल्या अन्नाच्या संपर्कात आल्यावर रारसायनिक प्रक्रिया होऊन दातांना कीड लागू शकते म्हणूनच खाल्ल्यावर तोंड व्यवस्थित धुणे अतिशय गरजेचे आहे.

आणि खरंतर लहान मुलांच्या दाताची तेवढीच किंबहुना मोठ्यांपेक्षा जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण पुढे येणाऱ्या दातांचा तो पाया असतो. पाया मजबूत असेल, तर येणारे नवे दातही मजबूत राहतील.

गेल्या काही वर्षांत दंतक क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. लहान मुलांच्या दातांचे डॉक्‍टर ही एक स्पेशॅलिटी ब्रॅंच आहे व ती आता बऱ्यापैकी प्रगत आणि कार्यरत आहे.

लहान मुलांच्या दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मुद्दे
१)     दोन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांसाठी तोंडाचे आरोग्य हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण या वयातच मुले सॉलीड फूड खाणे चालू करतात. मुख्यत्वे चॉकलेट, मिठाई व गोड पदार्थ (आवडीचे)

२)     दात घासणे अगदी लवकर म्हणजे अंदाजे बाळ सहा महिन्यांचे असताना चालू करावे. या वेळी पहिला दुधाचा दात येतो. त्यासाठी छोटासा फिंगा ब्रश वापरावा. टूथपेस्ट नाही वापरली तरी चालेल, पण दात घासणे महत्त्वाचे. लवकर दात घासणे चालू केले, की त्याचा दुसरा फायदा म्हणजे मुलांना त्याची सवय होते व त्यामुळे पुढे त्याचा कंटाळा येत नाही.

३)     दात आई किंवा वडिलांनी हलकेच घासावेत.
    किती वेळा? दिवसातून दोन वेळा
    केव्हा? दोन वर्षांपर्यंत. फिंगरब्रश व त्यानंतर लहान टूथब्रशने. लहान मुलांसाठी छोट्या तोंडाचे टूथब्रश उपलब्ध आहेत. तसेच प्रत्येक खाण्यावर पुढचे दात एखाद्या मऊ व ओल्या रुमालाने हलकेच पुसावेत. (दोन वर्षांच्या आत)

आता दाताविषयी काही माहिती 
१)     लहान मुलांचे सर्व मिळून वीस दुधाचे दात असतात. दहा खाली आणि दहा वर. सहा महिने ते अडीच वर्षांपर्यंत हे सर्व दात येतात आणि सहा ते दहा वर्षांपर्यंत सगळे दात पडतात.

२)     दुधाच्या दातांची रचना व त्याची ठेवण थोडी वेगळी असते. दात किडून ती कीड वाढण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते आणि रोगजंतू झपाट्याने पसरतात!

३)     लहान मुलांमध्ये गोळ्या, चॉकलेटस्‌ बिस्किटस, कॅंडीज वगैरे खाण्याचा कल जास्त असतो. त्यामुळे दात किडण्याचा प्रकार साठ ते ऐंशी टक्के असतो. तीन ते सहा महिन्यांपर्यंत मुलांमध्ये स्तनपान असते व सहा महिन्यानंतर हळूहळू ते कमी करून एक वर्षानंतर संपूर्ण थांबवावे. सात महिन्यांपासून बाहेरचे खाणे हळूहळू चालू करावे. जसे बाहेरचे खाणे आपण मुलांना चालू करतो. त्या वेळेपासून दातांकडे जास्तीत जास्त लक्ष देणे महत्त्वाचे.

४)     मी एक सोपी गोष्ट मुलांना सांगते. चॉकलेट, कॅंडीज वगैरे मुलांना आवडणारे पदार्थ फक्त रविवारी खाण्यास सांगते. त्यामुळे त्यांच्यावर निर्बंध येतो आणि मुलांची खाण्याची हौसही भागते.

५)     दुधाचे दात चांगले असल्यास मुलांची वाणी पण स्वच्छ राहते व उत्तर सुस्पष्ट येतात. मोठेपणी त्याचा नक्की फायदा होतो.

६)     दात व्यवस्थित असले, तरी दाताच्या डॉक्‍टरकडे जाणे महत्त्वाचे आहे. पहिली भेट सहा महिन्याने किंवा पहिला दुधाचा दात आल्यावर. त्यानंतर दर सहा महिन्याने डॉक्‍टरकडे जाणे गरजेचे आहे. आहारविषयक सल्ला व वेळच्या वेळी त्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

मुख्य करून मुलांचे दात खराब असतील, तर त्यामुळे त्यांच्या खाण्यावर व चावण्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्यांना आवश्‍यक चौरस आहार अंगी लागत नाही. त्यामुळे त्याच्या वाढीवर आणि सर्वांगीण (शारीरिक व मानसिक) विकासावर परिणाम होऊ शकतो.
तर आपल्या मुलांचे दात बळकट आणि निरोगी राहतील, याकडे आपण लक्ष देऊ!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Teeth Care