esakal | आचार्य देवो भव:
sakal

बोलून बातमी शोधा

आचार्य देवो भव:

आचार्य देवो भव:

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बालवयात विद्यार्थी अधिक संस्कारक्षम असतात, शिक्षकांकडून ज्ञान मिळविण्यासाठी अधिक सक्षम असतात. ज्या ज्ञानाच्या जोरावर विद्यार्थ्याला पुढचे सर्व आयुष्य काढायचे असते, तो सुखी जीवन जगणार असतो, पैसे - नावलौकिक मिळविणार असतो, समाजासाठी, देशासाठी काही कार्य करणार असतो, ते ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचे महत्त्व समजून त्यांना किती आदर द्यायला हवा, याचे भान ठेवायलाच हवे.

शिक्षक, गुरू आणि सद्‌गुरू! सर्वांमध्ये गुरुतत्त्व एकच असले तरी शिक्षक भौतिक जीवन जगण्यासाठी विद्या देतात, गुरू व्यक्तीतील अंगभूत गुणांची पारख करून त्या क्षेत्रात संपन्न होण्यासाठी मार्गदर्शन करतात, तर सद्‌गुरू जिवा-शिवाचे द्वैत संपवून परमात्मतत्त्वापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवितात. भारतीय संस्कृतीत ‘आचार्यदेवो भव’ ही संकल्पना खूप श्रेष्ठ आहे. तैत्तरीय उपनिषदातील हे सूत्र, खरे तर प्रार्थना आहे ‘मी आचार्यांना देव मानणारा होवो’ असा याचा शब्दशः अर्थ. भारतात पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शिक्षकांबद्दल मनात आदरभाव बाळगणे आणि स्वतः शिक्षकांनी तसेच समाजाने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे याची जाणीव प्रत्येकाला होवो.

बोलताना खूप शक्ती खर्च होते. बागेत खणण्याचे काम करताना लागलेली शक्ती ही स्मृतीत असलेला एखादा विचार किंवा एखादे सूत्र उत्खनन करून मेंदूतून बाहेर काढायला लागलेल्या शक्तीपेक्षा खूपच कमी असते. सकाळी १० पासून संध्याकाळी ५ पर्यंत शाळेत शिक्षकांना सारखे बोलावे लागते व त्यासाठी अफाट शक्ती खर्च होत असल्याने शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करत असताना या शक्तिव्ययाचाही विचार करावा लागेल.

शिकवणे, समोरच्या विद्यार्थ्याला एखादी गोष्ट समजावून सांगणे हे काम सोपे नव्हे, त्यातही एकूण शिक्षणाची प्रवृत्ती कमी झाल्यामुळे म्हणा, मोबाईल, इंटरनेट वगैरे साधनांमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होण्यात वाढ झाल्यामुळे म्हणा, एकंदरच वडीलधाऱ्यांसाठी असणारा आदर कमी झाल्यामुळे म्हणा, सांप्रत काळात शिकविण्याच्या पद्धतीत झालेला अकल्पनीय बदल म्हणा, परंतु शिक्षकांना अधिकच मनस्ताप होतो आहे व मेंदूला अधिक ताण द्यावा लागतो आहे.

बालवयात विद्यार्थी अधिक संस्कारक्षम असतात, शिक्षकांकडून ज्ञान मिळविण्यासाठी अधिक सक्षम असतात. ज्या ज्ञानाच्या जोरावर विद्यार्थ्याला पुढचे सर्व आयुष्य काढायचे असते, तो सुखी जीवन जगणार असतो, पैसे, नावलौकिक मिळविणार असतो, समाजासाठी, देशासाठी काही कार्य करणार असतो, ते ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचे महत्त्व समजून त्यांना किती आदर द्यायला हवा याचे भान ठेवायलाच हवे. शिक्षकांना कोणत्याही प्रकारे मनस्ताप होणार नाही यासाठी विद्यार्थी, पालक, शाळेतील अधिकारी, सरकार वगैरे सर्वांनीच कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. हे न झाल्यास शिक्षकांचे आरोग्य, पर्यायाने समाजाचे सांस्कृतिक आरोग्य चांगले राहणे शक्य नाही.

या व्यतिरिक्त शिक्षकांच्या आरोग्याच्या विचार करताना त्यांनी सकस आहार घेणे, सतत बोलणे आवश्‍यक असल्यामुळे अधून मधून गरम पाणी, गरम चहा घेणे आवश्‍यक आहे. स्वतःच्या मेंदूची काळजी घेण्यासाठी ब्रह्मलीन घृतासारखे एखादे रसायन सेवन करणे, अधून मधून मध-तुपात मिसळलेले सितोपलादी चूर्ण घेणे हे सुद्धा गरजेचे असते. या सर्व उपायांमुळे घसा, फुफ्फुसे, मेंदू यांवर येणारा ताण कमी झाला की शिक्षकांचे आरोग्य नीट राहायला मदत होईल, त्यांना नवीन नवीन कल्पना सुचतील, शिकविण्याच्या पद्धतीत सुधारणा झाल्यामुळे शिक्षक व विद्यार्थी हे दोन्हीही खऱ्या अर्थाने उत्तम जीवन जगू शकतील.

अर्थातच शिक्षकांनी सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपले काम व्यवस्थित करणे, कुठल्याही तऱ्हेने नंतर मनस्ताप होईल अशा तऱ्हेने नियम न मोडणे, आहार-विहारावर बंधन ठेवणे आवश्‍यक आहे. आपण गुरुपदावर आहोत याचे भान ठेवून स्वतःचा व त्या व्यासपीठाचा मान राहील असे वागणेच त्यांना मनःशांती व आरोग्य देईल.

शिक्षकांच्या आरोग्यासाठी हितावह अशा काही आरोग्यसवयी याप्रमाणे :

  • रोज सकाळी सूर्योदयाच्या आसपास उठावे व थोडा वेळ तरी संतुलन क्रियायोग, प्राणायाम व व्यायाम करावा. यामुळे सर्व दिवसभर ताजेतवाने राहण्यास तसेच शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य नीट चालण्यास, प्राणिक ऊर्जेचे उन्नयन होण्यास, मेंदूला प्राणिक ऊर्जेचा पुरवठा अधिक प्रमाणात होते व पर्यायाने आरोग्य नीट राहण्यास मदत मिळते.

  • नाश्‍त्याच्या वेळी रात्री भिजवलेले ३-४ बदाम, कपभर दूध, च्यवनप्राशसारखे एखादे ‘रसायन‘ व एखादा गरम पदार्थ असावा.

  • ऑफ तासाला किंवा मधल्या सुट्टीत काही मिनिटे स्वस्थ बसून हातापायांना ताण देऊन एखादी भस्रिका किंवा संतुलन अमृत क्रिया करावी. हे सर्व पाच मिनिटात होते.

  • रोज कुटुंब व लहान मुले यांच्याबरोबर थोडा तरी वेळ घालवावा.

  • देवावरच्या श्रद्धेनेही मानसिक ताण कमी होण्यास व पर्यायाने आरोग्यप्राप्तीसाठी मदत होते. अधून मधून सत्संगाला जावे, श्रीमद्‌भगवद्‌गीता, रामरक्षा वगैरेंचे पठण करावे व रोज रात्री झोपण्यापूर्वी निदान १० मिनिटे शांत बसून ॐकार म्हणावा.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित.)

loading image
go to top