शुद्ध पाणी

Water
Water

पाणी फक्‍त जंतूंमुळे व घाणीमुळे प्रदूषित होत नाही, तर विचारांमुळेही पाण्याचे प्रदूषण होते. शुद्ध पाण्यावर वाईट विचारांचे प्रदूषण कमी होते, पण त्यावर चांगल्या विचारांचे प्रक्षेपण केल्यास पाणी अत्यंत शक्‍तिमान होते. असे पाणी केवळ शरीराचीच नव्हे, तर आत्म्याची तृषाही भागवू शकते. जेवढे पाणी वाईट, दूषित वा विषारी असेल तेवढा त्यावर वाईट शक्‍तींचा व वाईट विचारांचा प्रभाव जास्ती पडतो व ते अधिकच दूषित होऊन मनुष्यमात्राच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते.

पाणी म्हणजे ‘जीवन‘. पण पावसाचे पाणीच एक असे असते की ते जीवन देते व घेते. कमी पाऊस झाला तर दुष्काळ (कोरडा) व जास्त पाऊस झाला तरी दुष्काळच (ओला). ज्या देशात बाराही महिने पाऊस पडतो व जेथे पृथ्वीने हिरवागार शालू परिधान केलेला असतो ते खरे श्रीमंत व जेथे पाऊस पडतच नाही तेथे होतात वाळवंट. वरुणदेवता ही जलाची देवता आणि या देवतेचे स्थान असते पश्‍चिम दिशेला. कदाचित या पाश्‍चिमात्य संस्कृतीमुळे असेल, पण मनुष्य भौतिकतेच्या मागे लागून जिवंत पाण्याकडे दुर्लक्ष करत आहे व त्यामुळे होत आहे पाण्याचे प्रदूषण. पावसाळ्यात तर पाण्याची शुद्धतेबद्दल खूपच काळजी घ्यावी लागते. 

वातावरणातील सर्व अशुद्ध वायू व प्रदूषण वर जाऊन पावसाच्या पाण्यात विरघळल्यामुळे पावसाचे पाणीही शुद्ध स्वरूपात मिळत नाही. सांडपाणी शुद्ध न करता, आपल्या सोयीनुसार नद्या, नाले, सरोवरात सोडल्याने त्यांच्यातही प्रदूषण वाढत राहते. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या कारखान्यांमाधून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळेही पाणी दूषित होते. सध्या नको नको त्या औषधी गोष्टींचे सेवन करण्यात आलेले दिसते. हॉर्मोन्ससारखी स्त्रियांना दिलेली रसायने मलमूत्रावाटे शरीराबाहेर टाकली जातात व शेवटी पृथ्वीच्या पोटातील पाण्यात मिसळतात. अशा प्रकारे चारही बाजूंनी पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर चालू राहते, त्यामुळे साहजिकच साथीच्या रोगांनाही आमंत्रण मिळतेच. आपण पाहतो की कावीळ, कॉलरा असे रोग पावसाळ्यात लवकर व मोठ्या प्रमाणावर पसरत राहतात. प्रवासाला गेल्यानंतर दूषित पाणी पिण्यामुळे जुलाब होणे ही नित्याची गोष्ट झालेली दिसते. रेल्वे-बसमधून प्रवास करत असताना रस्त्याच्या बाजूच्या ढाब्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्‍या कधी धुतल्या होत्या याचा इतिहास शोधणे पार अवघड असते. त्यामुळे अशा ठिकाणी साधी चूळ भरली तरी प्रदूषित पाण्यामुळे त्रास झाल्याची उदाहरणे दिसून येतात. आपली पाचही बोटे पाण्यात बुचकळून पाणी आणणाऱ्या मुलाचे दृश्‍य हॉटेलात दिसणे हा विनोदाचा विषय असला, तरी पाण्याची साठवण करताना, ते ओतत असताना त्याच्यात प्रदूषण होण्याचा धोका असतोच. 

वाईट विचारानेही प्रदूषण
ऋतू कोणताही असो, जेवणापूर्वी स्वच्छ पाण्याने हात धुवावेत व शक्‍यतो कुठल्याही वस्त्राला न पुसता वाळू द्यावेत. पावसाळ्यात तर याची जास्तीच खबरदारी घेणे आवश्‍यक होय. ताट, वाट्या, धुतल्यानंतर ते कोरडे करायचे कापडसुद्धा स्वच्छ धुतलेले असायला हवे, दमट आणि बराच वेळ ओले राहिल्यामुळे कुबट वास येणारे कापड वापरून चालणार नाही. 

आता तर हेही सिद्ध झाले आहे की पाणी फक्‍त जंतूंमुळे व घाणीमुळे प्रदूषित होत नाही, तर विचारांमुळेही पाण्याचे प्रदूषण होते. शुद्ध पाण्यावर वाईट विचारांचे प्रदूषण कमी होते पण त्यावर चांगल्या विचारांचे प्रक्षेपण केल्यास पाणी अत्यंत शक्‍तिमान होते व असे पाणी केवळ शरीराचीच नव्हे, तर आत्म्याची तृषाही भागवू शकते. जेवढे पाणी वाईट, दूषित वा विषारी असेल तेवढा त्यावर वाईट शक्‍तींचा व वाईट विचारांचा प्रभाव जास्ती पडतो व ते अधिकच दूषित होऊन मनुष्यमात्राच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते, हे आता सप्रयोग सिद्ध झालेले आहे. म्हणून कुठल्याही प्रकारे पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्‍यक असते. जेथे जेथे पाणी असेल, मग ते पाणी ठेवायचे छोटे भांडे असो, घरासमोरची विहीर असो वा गावातील तळे असो, या सर्व ठिकाणी अत्यंत शुद्धता पाळण्याची गरज आहे. नदी म्हणजे संपूर्ण शहरातील सांडपाणी वाहून नेण्याची एक व्यवस्था नसून, मनुष्य वस्तीसाठी नदीपासून बऱ्याच अंतरावर परवानगी मिळावी जेणेकरून घरातून येणारे सांडपाणी शुद्ध केल्याशिवाय थेट नदीत जाऊ नये. 

पाणी नेहमी गाळून व उकळून प्यावे. मला आठवते आहे की लहानपणी नर्मदेवर ध्यानधारणेसाठी जात असू व परत येताना पिण्यासाठी पाणी भरून आणत असू. आमचे वडील पावसाळ्यातील गढूळ पाणी गाळून घेऊन त्यात तुरटीचा खडा फिरवीत असत. त्यानंतर बराच वेळ ठेवल्यावर गाळ म्हणजे माती खाली बसून वरचे नितळ पाणी पुन्हा एकदा गाळून घेऊन, शक्‍यतो उकळून प्यायला देत असत. यामुळे आरोग्यही चांगले राहत असे. 

तीर्थाच्या स्वरूपात स्वीकार
आधुनिक संशोधनातून सिद्ध झालेले आहे की स्पर्शाचा व मानसिक विचारांचा पाण्यावर परिणाम होतो. पाणी उकळवून घेतल्यावर ते अधिक जिवंत होते, त्यावर असलेले वाईट संस्कार निघून जातात. चांगले विचार करत असताना वा चांगल्या विचारांच्या सान्निध्यात असलेले पाणी पिण्याने समाधान मिळते व आरोग्यही मिळते. म्हणूनच जगभर सर्व धर्मांनी चर्च, मंदिरे वगैरे शक्‍तिस्रोत असलेल्या स्थानांच्या ठिकाणी पाणी ‘तीर्थ’ वा ‘होली वॉटर’च्या स्वरूपात स्वीकार केल्याचे दिसते. 

पावसाळ्यात पाण्याच्या शुद्धतेसाठी अधिक जागरूक राहणे आवश्‍यक असते. पिण्यासाठी पाणी उकळवत असताना त्यात सोने टाकले तर पाण्यावर सुवर्णाचा संस्कार होतो व तयार झालेले सुवर्णसिद्ध जल मनुष्याला जीवन प्रदान करते, निरामय आयुष्य प्राप्त करून देते, रोग दूर करते कारण विशिष्ट प्रकारचे जंतू सोन्याच्या संस्काराने मरतात वा दूर राहतात. म्हणून पाण्याचा काढा, म्हणजे पाणी एक अष्टमांश होईपर्यंत उकळवणे, पिण्यासाठी वापरला तर रोगपरिहार होतो, शरीर सुंदर व कांतिमान होते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. 

साधारण दहा लिटर पाण्यात साधारण दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचा पत्रा टाकून पाणी साधारण वीस मिनिटे उकळले, तर सुवर्णसिद्ध जल तयार होते. एक अष्टमांश होईपर्यंत उकळवून पाण्याचा काढा करण्याची योजना असली तर मात्र पाणी बराच वेळ अग्नीवर उकळावे लागते. पाणी कुठलेही असो, कुठल्याही फिल्टरमधून काढलेले असले, अगदी बाटलीबंद असले, डोंगरातून आलेल्या झऱ्याचे असले वा गंगेचे असले तरी ते पिण्याअगोदर उकळवून घेणेच योग्य असते. उकळलेले पाणी नेहमी प्राशन केल्याने, त्यातल्या त्यात वर्षा व शिशिर ऋतूत गरम उकळलेले पाणी प्राशन केल्याने, रोगाला प्रतिबंध होऊन मनुष्याला आरोग्याचा व सुंदर कांतीचा लाभ व्हायला मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com