संगणक वापर आणि डोळे 

Computer and eyestrain
Computer and eyestrain

संगणकाचा, स्क्रीनचा वापर वाढतच जाणार आहे. जीवनशैलीतील स्पर्धात्मक गतीमानता, कार्यालयातील ताण याचा परिणाम डोळ्यांवर नक्कीच होतो. वेळीच तज्ज्ञांची मदत घेणे इष्ट असते. 
 


मानवी जीवनात शिकार करण्यापासून ते कागदावर लिहिण्याचे परिवर्तन हळूहळू झाले. त्याच्या तुलनेत कागद ते कॉम्प्युटरचा प्रवास हा अधिक वेगवान व प्रभावशाली होता. मोबाईल, लॅपटॉप हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनले आहेत.
सर्वसाधारणपणे दिवसातील सरासरी सात तास इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर केला जातो. 

दूरदृष्टीदोष, अॅस्टिगमेंटिझम, डोळ्यांची लक्ष केंद्रित करण्याची अपुरी क्षमता, डोळ्यांच्या समन्वयाची क्षमता आणि चाळिशी यांसारख्या समस्या संगणक किंवा मोबाईल वापरताना दृष्टीशी निगडित लक्षणांच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतात, तसेच तणावपूर्ण वातावरण व कामाचे वाढलेले तास यामुळे डोळ्यावरील ताण वाढलेला असतो. या सर्वांमुळे विकसित झालेली समस्या म्हणजे ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’(सीव्हीएस). 

‘सीव्हीएस’ होण्याचे मुख्य कारण म्हणजे दृष्टीशी निगडित पुन्हा पुन्हा येणारा ताण. 
या ताणाला पुढील गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. 
- दृष्टिदोष 
- कॉम्प्युटरसाठी उपयुक्त चष्मा न वापरणे. 
- कामाच्या पद्धतीमुळे डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येणे. 
- डोळ्यांची उघडझाप कमी होणे अथवा डोळ्यातील पाण्याचा अंश कमी असणे. 
- भोवतालच्या वस्तूंचा कॉम्प्युटर स्क्रीनवर ग्लेअर येणे. 
- जवळच्या कामात दोन्ही डोळ्यांचा सहभाग नसणे. 
- कामाच्या जागेची अयोग्य व्यवस्था. 
- कामाचे स्वरूप व संबंधित ताण. 

‘सीव्हीएस’ कोणाला होऊ शकतो? 
कॉम्प्युटरवर तीन-चार तासांपेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या व्यक्तींपैकी ७५ टक्के व्यक्तींना ‘सीव्हीएस’ होण्याची शक्यता असते. यामध्ये कॉम्प्युटर वापरणाऱ्या सर्व व्यावसायिकांचा, विद्यार्थ्यांचा व लहान मुलांचा समावेश आहे. 
पुढील लक्षणे आढळल्यास डोळ्यावर ताण येतो आहे, हे ओळखावे. 
- डोळे ओढल्यासारखे वाटणे 
- डोकेदुखी 
- नजर धूसर होणे 
- डोळ्यांना कोरडेपणा जाणवणे 
- मान व खांदेदुखी 
कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या लोकांना त्यांचे प्रत्येकाचे कॉम्प्युटरपासून बसण्याचे अंतर, की बोर्ड, माऊस, मॉनिटर यांपासूनचे अंतर इत्यादी गोष्टींचा विचार करावा लागतो. 

कॉम्प्युटर वापरताना घालायच्या चष्म्याचा नंबर व इतर गोष्टींसाठी तज्ज्ञांचे मत घेणे आवश्यक असते. जेणेकरून दृष्टीवर येणारा ताण नाहीसा होईल.  
कॉम्प्युटरसाठी चष्मा तयार करताना पुढील गोष्टी विचारात घेणे गरजेचे असते. 
१. तुम्ही काम करत असताना कॉम्प्युटर व तुम्ही यातील अंतर. 
२. योग्य प्रकारच्या चष्म्याच्या काचांचा वापर. 
३. प्रखर प्रकाश रोखण्यासाठी चष्म्याच्या काचेचा रंग अथवा प्रखरता रोधकाचा वापर. 
४. प्रिझमचा आवश्यकता असल्यास वापर. 

डोळ्यांची तपासणी मी कधी करून घ्यावी? 
कॉम्प्युटरचा वापर जास्त करावा लागणार असेल अशा करिअरच्या सुरवातीलाच ‘सीव्हीएस’साठी तपासणी करावी. या तपासणीमध्ये कॉम्प्युटर वापराच्या चुकीच्या पद्धतीला आळा बसू शकतो व त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांना आपण लांब ठेवू शकतो. 
याशिवाय डोळ्यावरील ताण व इतर तक्रारींसाठी कधीही ही तपासणी करणे शक्य असते. 

‘सीव्हीएस’ कसा बरा करता येतो? 
‘सीव्हीएस’ बरा करण्याच्या तीन पायऱ्या आहेत. 
१. तपासणी 
२. उपचार 
३. उपचारांचा मागोवा 

‘सीव्हीएस’ बरा करण्यासाठी अत्युतम उपाय म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या त्रासदायक गोष्टींचा विचार करणे, त्या कोणत्या आहेत हे ठरविणे. 
हे जितक्या लवकर केले जाईल तितक्या लवकर तुमचे दृष्टिविषयक त्रास कमी होतील. 
‘सीव्हीएस’साठी लागणारी तपासणी - 
✓कॉम्प्युटर वापरताना घालायच्या चष्म्याच्या नंबरची तपासणी. 
✓कामाच्या ठिकाणी बसण्याच्या स्थितीचे मूल्यमापन करणे. 
✓काम करताना आजूबाजूला असणाऱ्या प्रकाशाचे व ग्लेअरचे मूल्यमापन करणे. 
✓डोळ्यांचे आरोग्य कसे आहे याचे मूल्यमापन करणे. 
✓जवळच्या दृष्टीसाठी लागणाऱ्या दृष्टीच्या इतर कार्याचे मूल्यमापन करणे. 
अशा प्रकारे सखोल मूल्यमापन करताना कामाशी निगडित बैठक, प्रकाश योजना, प्रखरता इ. गोष्टींचा विचार करणे व त्याविषयी नोंदी ठेवणे अत्यंत गरजेचे असते. 

उपचार 
होय, ‘सीव्हीएस’ होणे सहज टाळता येते. ‘सीव्हीएस’ होताना प्रथमतः साध्या, छोट्या तक्रारींकडे कॉम्प्युटरमुळे त्रास होतोय असे वाटून दुर्लक्ष केले जाते व त्याचे मोठ्या तक्रारींमध्ये परिवर्तन होते. 
‘सीव्हीएस’बद्दल योग्य माहिती असणे डोळ्यांचे आरोग्य व दृष्टिविषयक तक्रारींच्या दृष्टीने प्रथमतः गरजेचे आहे. इंटरनेटच्या महाजालावर ती याविषयी खूप माहिती उपलब्ध आहे. केवळ माहितीचा उपयोग होईलच असे नसून त्या माहितीचा कसा व किती उपयोग करायचा हे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ठरवावे. चुकीची माहिती अथवा दृष्टिदोषाचे आकलन न होणे यामुळे त्रास वाढण्याची खूप शक्यता असते. अशा वेळी तज्ज्ञांची योग्य मदत घेणे गरजेचे असते. 
तज्ज्ञांनी सांगितलेल्या उपायांचे पालन करणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. 

१. संगणक स्क्रीनचे स्थान 
संगणकाची स्क्रीन डोळ्यापासून २०-२८ इंच दूर व डोळ्यांच्या पातळीपेक्षा ४-५ इंच खाली असावी. 
२. संदर्भ सामग्रीचे स्थान  
संदर्भ सामग्री की-बोर्डच्या वर व मॉनिटरच्या खाली स्थित असावी. जर हे शक्य नसेल तर मॉनिटरच्या शेजारी पेपर स्टँड वापरणे योग्य ठरेल. याचा उद्देश डोक्याची हालचाल कमी व्हावी हा आहे, ज्यामुळे मान व डोकेदुखी उद्भवणार नाही. 
. प्रकाश योजना
 संगणक स्क्रीनचे ठिकाण असे असावे, ज्यामुळे ओव्हरहेड लाईट किंवा खिडकीतून येणारा प्रकाश स्क्रीनवर पडू नये, त्यासाठी खिडकीला ब्लाइंड लावावे अथवा कमी वॉटचे बल्ब वापरावेत. 
४. आसन स्थिती  
खुर्ची शरीराशी सुसंगत व आरामदायक असावी. पाय जमिनीवर सपाट राहतील अशा पद्धतीने खुर्चीची उंची समायोजित करावी. हातांना आधार देण्यासाठी खुर्चीच्या बाजूंचा वापर करावा. की-बोर्डवर टाईप करताना मनगट खाली टेकलेले असावे. 
५. विश्रांतीची पद्धत 
संगणकावर काम करताना दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी २० फूट लांब पाहावे, यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना पूर्ण विश्रांती मिळते. 
६. डोळ्यांचा कोरडेपणा टाळण्यासाठी 
वातानुकूलित ठिकाणी काम करताना हवेतील आर्द्रता टिकून राहण्यासाठी एअर हुमिडिफायरचा वापर करावा. संगणकावर काम करताना डोळ्यांची उघडझाप कमी प्रमाणात होते, हे टाळण्यासाठी दर मिनिटाला १२-१४ वेळा डोळ्यांची पूर्ण उघडझाप करावी. तसेच दिवसातून ३-५ लिटर पाणी पिणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. 

सामान्य वापरासाठी सूचित चष्मा संगणकाच्या कामासाठी पुरेसा नसल्यास संगणक पाहण्याच्या दृष्टीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विशेष नेमून दिलेल्या चष्म्याच्या काचेचा वापर करणे आवश्यक असते. काही संगणक वापरणाऱ्या व्यक्तींमध्ये डोळा केंद्रित करण्याची किंवा डोळ्यांच्या समन्वयाची समस्या येते जी चष्म्याद्वारे पुरेशी दुरुस्त करता येत नाही. अशा वेळी व्हिजन थेरपीने उपचार करून समस्यांचे निर्मूलन करता येते. व्हिजन थेरपीमध्ये दर्शविलेल्या डोळ्यांच्या ठरावीक व्यायाम पद्धतीमुळे डोळ्यांच्या हालचाली, डोळ्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, दोन्ही डोळे एकत्र काम करण्याची क्षमता आणि डोळे व मेंदूच्या संबंधात दृढता आणता येते. 

डोळ्यांच्या आरोग्याचा व दृष्टीताणाचा विचार करण्यास विलंब झाल्यास तपासणी व उपचार यांच्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. हा वेळ लवकर तपासणी करण्याच्या तुलनेत फारच जास्त असतो. 

अशा वेळेस वारंवार तपासणी व डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे व कामाशी निगडित बदलांचा दृष्टीवर काय परिणाम होत आहे याचा नीट मागोवा घेणे अत्यंत गरजेचे असते. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com