तन दुरुस्त!  मन दुरुस्त! 

डॉ के एच संचेती
Friday, 18 October 2019

स्वतःलाही वेळ द्या. हाडे व स्नायू बळकट करा. सांध्यांचा वापर करा. चौरस आहार व पुरेसा व्यायाम यातील नियमितता आपली हाडे, स्नायू, सांधे यांची काळजी घेईल. 

स्वतःलाही वेळ द्या. हाडे व स्नायू बळकट करा. सांध्यांचा वापर करा. चौरस आहार व पुरेसा व्यायाम यातील नियमितता आपली हाडे, स्नायू, सांधे यांची काळजी घेईल. 

हाड म्हणजे आपल्या शरीराचा सांगाडा म्हणजेच ‘स्ट्रक्‍चरल सिस्टीम.’ आपण जशी इमारतीची स्ट्रक्‍चरल सिस्टीम पाहतो, की ती खूप चांगली असेल तर ती वर्षानुवर्षे राहते. तशीच आपल्या हाडांची भूमिकाही आपल्या शरीरातील मांसरूपी गोळ्याला ‘स्ट्रक्‍चर’ रूपाने उभे करण्याचे आहे. निसर्गाने एका हाडाला एवढी कामे दिलेली आहेत, तरी ते कंटाळत नाही. हाडाच्या टोकाला ‘कूर्चा’ (कार्टिलेज) लावून सांध्याचे काम दिले. हाडाच्या पोकळीमध्ये ‘रक्तनिर्मिती कारखाना’ टाकलेला आहे. नंतर हाडांना स्नायू जोडण्यासाठी एक पापुद्रा दिलेला आहे आणि त्यावर स्नायू जोडले जातात. ते स्नायू सांध्याच्या खालच्या बाजूला जाऊन तो सांधा हलवणारी मोटार तयार होते. याच हाडांच्या स्नायूंनी आपल्या महत्त्वाच्या नसा, धमन्या, ज्या मेंदूकडून व हृदयामधून खाली जातात, त्याना असे काही संरक्षण दिले आहे, की त्याला सहज काही इजा झाली तरी त्यांचे नुकसान होऊ शकत नाही. हाडांमधील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हाडे ही बदलानुकारी (ॲडजेस्टेबल) असतात. आता बरीच माणसे आसने करतात. आसने करतात म्हणजे काय तर हाडांच्या सांध्यामधली जी हालचाल आहे, ती वेगळ्या पद्धतीने करतात. 

हाडांची काळजी हा काहीसा दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. दुखणे सुरू झाले तरच त्याच्याकडे लक्ष जाते. 
हाडांची काळजी घेणे यात दोन भाग आहेत. कॅल्शिअम आणि ‘ड’ जीवनसत्त्व याची पूर्तता करणे, तसेच आपण कुठलीही गोष्ट वापरली नाही तर ती गंजते. तसेच आपल्या शरीरातील हाडांचे व स्नायूंचे आहे. जर आपण या हाडांना व स्नायूंना नैसर्गिकरीत्या ‘न्यूट्रीशन’ देणे म्हणजे व्यायाम करणे आवश्‍यक आहे. व्यायामाच्या रूपातून जर आपण स्नायू व सांधे यांची हालचाल केली तर यातून हाडांना व स्नायूंना ऊर्जा मिळते. ‘ड’ जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून सहज मिळते. म्हणूनच शास्त्रात सांगितले आहे, की सूर्योदयाच्या अगोदर घराच्या बाहेर पडावे व थोडे फिरून सूर्योदय झाल्यावर घरी परतावे. असे जर आपण केले तर, हाडांची निगा राखण्यासाठी आवश्‍यक असलेले ‘ड’ जीवनसत्त्व शरीरात नैसर्गिकरीत्या आणण्यासाठीची महत्त्वाची प्रक्रिया घडेल. 

आहाराच्या बाबतीत सांगायचे झाले तर आपल्याला कॅल्शिअम व व्हिटॅमिन डी-3 व बी-12 पाहिजे. व्हिटॅमिन बी-12 हे मोड आलेल्या कडधान्यांतून जास्तीत जास्त मिळते. रात्री कडधान्ये भिजत घालावी आणि सकाळी मोड आल्यावर ते सॅलॅड म्हणून खावीत म्हणजे त्यातून आपल्याला व्हिटॅमिन बी-12 व प्रथिने (प्रोटिन्स) भरपूर प्रमाणात मिळते. ज्या कडधान्याला दोन दले म्हणजे पाकळ्या असतात, त्यामध्ये प्रथिने (प्रोटिन्स) असतात. उदा. मूग, मटकी, शेंगदाणे... आणि ज्याच्यामध्ये दोन दले किंवा पाकळ्या निर्माण होत नाहीत, त्यामध्ये कार्बोहाड्रेट असतात. उदा. तांदूळ, गहू, बाजरी, नाचणी. अशा दोन्ही प्रकारच्या धान्य व कडधान्यांचा वापर आपल्या आहारात समान प्रमाणात करावा. मोड आलेले कडधान्य हे सकाळी नाष्ट्यामध्ये आवर्जून खावे. आपल्या आहारामध्ये सगळे अन्न हे शिजवलेले न खाता काही अन्न हे कच्च्या कडधान्यांच्या स्वरूपात खावे, तसेच पालेभाज्यांचा समावेश आपल्या आहारात होणे तितकेच आवश्‍यक आहे. ज्या लोकांना युरिक एसिड त्रास असतो, अशा लोकांनी पालक, कोबी, टोमॅटो कमी प्रमाणात खावे अथवा खाण्याचे टाळावे. त्यामुळे युरिक अॅसिड कमी होते. 

हाडे म्हटली, की हाडांबरोबर स्नायू व सांधे आले. स्नायू व सांधे या दोन गोष्टी अशा आहेत, की त्या जर आपण वापरल्या नाहीत तर त्यांची कार्यक्षमता कमी होते. तसेच त्याला काही कारणास्तव इजा झाली, काही विकार झाले आणि त्या विकाराने आपण ते हलवू शकलो नाही, सूज आली असेल या कारणामुळेसुद्धा त्यांची कार्यक्षमता कमी झाली असेल किंवा सांधेरोपण केले असेल, मोडलेले हाड जरी शस्त्रक्रिया करून जुळवले किंवा त्याला झालेला विकार जरी बरा केला तरी त्यांची गेलेली कार्यक्षमता परत आणण्यासाठी फिजिओथेरपी फार महत्त्वाची आहे. याची जाणीव प्रत्येकाने करून घेणे फार गरजेचेच आहे. सांधा बदलला की रुग्णाला असे वाटते, की मी पूर्ण बरा झालो, पण सांधा बदलणे हा एक अर्धा भाग आहे; तर त्या सांध्याची, स्नायूंची गेलेली किंवा कमी झालेली कार्यक्षमता परत आणण्यासाठी फिजिओथेरपी फार महत्त्वाची आहे. 

प्रत्येकाने काही गोष्टी ध्यानात घेतल्याच पाहिजेत. मला माझ्या आईने सांगितले होते, की दिवसभराच्या व्यावसायिक धावपळीबरोबरच स्वतःच्या शरीराची योग्य ती काळजी घे. शरीर दुरुस्त, तर मन तंदुरुस्त. अविरत काम करण्याची सवय असेल, सतत हालचाल असेल, तर आपल्या शरीराचे जास्तीत जास्त अवयव सतत कार्यक्षम असतात. त्याची कार्यक्षमता वाढविली पाहिजे. शरीराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम. सतत कार्यक्षम असल्याने स्नायूंची आणि सांध्यांची नैसर्गिकपणे होणारी झीज कमी व्हायला हवी. व्यायामाचे चार प्रकार करणे आवश्‍यक आहे. स्नायूंची बळकटी वाढविणे, त्यांची कार्यक्षमता वाढविणे, अस्थिबंधातील (लिगामेंट) ताकद वाढविणे, सांध्याचे व्यायाम हे सर्व रोज करावेत. इतर वाईट व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा व्यायामाचे व्यसन लावून घेणे कधीही चांगलेच. मी लोकांना व्यायामाचा सल्ला दिल्यावर नेहमीच एकच उत्तर मिळते, ‘वेळच नाही मिळत.’ आपण जर इतरांसाठी वेळ काढत असू, तर मग स्वतःसाठी वेळ काढायलाच लागतो. स्वतःच्या शरीराला वेळ दिलाच पाहिजे. अन्यथा एक दिवस ते कुरबूर करू लागते. 
 
नवे शिक्षण, नवे प्रयोग 
हाडांसंबंधीच्या शस्त्रक्रियांचे शास्त्र व तंत्र आता खूपच प्रगत झाले आहे. पूर्वी वैद्यकीय अभ्यासक्रमातही ‘ऑर्थो’ हा विषय नव्हता. जनरल सर्जनच हाडांसंबंधी शस्त्रक्रिया करत. ग्रामीण भागात तर ‘बोनसेटर’ असत. अजूनही काही ठिकाणी आहेत. हाड मोडले की ताण देऊन, पट्ट्या बांधून ते जोडण्याचा उपचार करत. काहीजण वरून झाडपाल्यांचा लेप लावत. 
महाराष्ट्रातले पहिले हाडाचे रुग्णालय आम्ही सुरू केले. त्या वेळी सर्वांकडून शंका व्यक्त करण्यात आली, की फक्त हाडांचे रुग्णालय चालेल का? पूर्वी अस्थिविषयक सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मी स्वतः करीत होतो. जसे लहान मुलांची शस्त्रक्रिया, खांदा, मणका, गुडघा, खुबा, हात इत्यादी शस्त्रक्रिया. पण कालांतराने अमेरिका, युरोपमध्ये या सर्व ‘सब-स्पेशालिटी’ प्रगत होत गेल्या. लहान मुलांच्या हाडासंबंधी, आघात-अपघात, मणका, हात, खांदा, बोटे, पाय, घोटा व घोट्याची जोडणी, सांधे बदल असे वेगवेगळे ‘सब-स्पेशालिटी’ विकसित झाले. ते आता भारतातही आहेत. 
शस्त्रक्रियेतच्या तंत्रातही खूपच बदल झाले आहेत. सुरवातीला मोठ्या हाडांची शस्त्रक्रिया प्रामुख्याने प्लेटिंगनेच होत होती. एखाद्याला प्लेट घातली आहे, असे पूर्वी ऐकायला मिळत असे. पण १९४२ च्या दुसऱ्या महायुद्धामध्ये कुन्टशर नावाच्या डॉक्‍टरने ‘नेलिंग’ शस्त्रक्रिया करण्यास सुरवात केली. त्याला ‘कुन्टशर नेलिंग’ म्हणतात. पूर्वीच्या काळी खुब्याचे हाड मोडले तर ‘काहीही न करणे’ हाच उपाय केला जायचा किंवा बॉल काढून टाकला जात असे. नंतर एस. पी. नेलने हाड बसविण्यास सुरवात झाली. पण त्यामुळे हाडाचे नुकसान व्हायचे. त्यावर मी एका नेलच्या ऐवजी तीन पीन्स वापरायला सुरवात केली, त्याला ‘केएचएस पीन्स’ म्हणतात. उतारवयात खुब्याचे हाड मोडल्यावर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेमध्ये ‘संचेती मॉड्युलर प्रोस्थसिस’ वापरण्यास सुरवात केली. म्हणजे काय की, उतार वयात खुब्याचे हाड मोडले तर तेथील बॉल काढून त्याठिकाणी स्टीलचा बॉल बसवण्याची शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी आवश्यक असा बॉल मी तयार केला, तो म्हणजे ‘संचेती मॉड्युलर प्रोस्थसिस’ . लहान मुलांमध्ये मणक्‍यामध्ये बाक किंवा कुबड या शस्त्रक्रियेसाठी जॉन हॉल नावाच्या डॉक्‍टरचे तंत्रज्ञान वापरण्यास सुरवात केली. सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया सर्वप्रथम इंग्लंडमध्ये सुरू झाली. १९७२ मध्ये मी ही शस्त्रक्रिया शिकून आलो आणि पुण्यात सांधेरोपणाची शस्त्रक्रिया करण्यास सुरवातच केली. खुब्याचे प्रत्यारोपण, मणक्‍याच्या शस्त्रक्रिया, गुडघ्याचे प्रत्यारोपण यांसारख्या नवनवीन शस्त्रक्रिया करण्यास यशस्वीरीत्या सुरवात केली. विशेष म्हणजे गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठीचा ‘इंडसनी’चा शोध लावून वाजवी दरामध्ये ते तंत्रज्ञान रुग्णाला उपलब्ध करून दिले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Correct the mind, Correct the body article written by Dr K H Sancheti