​संस्कृती व आरोग्य 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 21 February 2020

ऋतुमान, आपण राहतो तेथील भौगोलिक परिस्थिती, घरातील वातावरण, नातेवाईक, मित्रमंडळी, समाज, शिक्षण व वाचन वगैरे असंख्य गोष्टींचा आपल्यावर बरा-वाईट परिणाम होत असतो. यातूनच आपण सर्व घडत असतो. हे घडणे सकारात्मक व्हावे, मनुष्यमात्राची वाटचाल उन्नतीकडे, यशस्वितेकडे व्हावी यासाठी संस्कृती मोलाची ठरते. वागणे, खाणे, पिणे, विचार करणे या सर्व गोष्टींना योग्य दिशा देण्याचे काम संस्कृती करत असते. भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे करण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा आरोग्यरक्षणाला धरूनच आलेली आहे.

ऋतुमान, आपण राहतो तेथील भौगोलिक परिस्थिती, घरातील वातावरण, नातेवाईक, मित्रमंडळी, समाज, शिक्षण व वाचन वगैरे असंख्य गोष्टींचा आपल्यावर बरा-वाईट परिणाम होत असतो. यातूनच आपण सर्व घडत असतो. हे घडणे सकारात्मक व्हावे, मनुष्यमात्राची वाटचाल उन्नतीकडे, यशस्वितेकडे व्हावी यासाठी संस्कृती मोलाची ठरते. वागणे, खाणे, पिणे, विचार करणे या सर्व गोष्टींना योग्य दिशा देण्याचे काम संस्कृती करत असते. भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे करण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा आरोग्यरक्षणाला धरूनच आलेली आहे. सण साजरा करताना संस्कृतीने आखून दिलेल्या रूपरेषा थेट आरोग्यापर्यंत पोहोचताना दिसतात. 

संस्कारातून जे घडते त्याला संस्कारित असे म्हणतात. जीवन फुलविण्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टींचा अंगीकार करावा हे सांगणारी ती संस्कृती. आयुर्वेदात संस्कारांची व्याख्या केली आहे, 
संस्कारो हि गुणान्तराधानाम्‌ । 
....चरक विमानस्थान 
गुणात बदल करणे म्हणजे संस्कार करणे. 

संस्कार समजावताना ‘दोषापनयनम्‌’ हा शब्द सुद्धा वापरलेला आहे. दोष दूर करून गुण वाढवायचे काम सुद्धा संस्काराच्या माध्यमातून घडत असते. म्हणून आहार असो, औषध असो किंवा आपले आरोग्य असो, ते उत्तम प्रतीचे हवे असेल तर त्यावर संस्कार व्हायला हवेत. आहारावर संस्कार स्वयंपाकाच्या रूपाने करायचे असतात, औषधावर काय संस्कार करायचे ते औषधशास्त्रात समजावलेले असते. तसेच आरोग्याचा संस्कार निरोगी जीवनशैली, अनुशासन, पंचकर्म यांच्या माध्यमातून होत असतो तर जीवनावर संस्कार करण्याचे काम संस्कृतीच्या योगे होत असते. मुळात ज्या संस्कारामुळे अशुद्धी, वाईट गोष्टी दूर होत राहतात आणि चांगल्याची अभिवृद्धी होते ते सर्व संस्कार होत. 

महागुणी आवळा 
आयुर्वेदात औषध बनविताना अग्निसंस्कार, मंथनसंस्कार, भावनासंस्कार, वासनसंस्कार वगैरे अनेक संस्कारांची मदत घेतली जाते. या संस्कारांमुळे औषध कमी मात्रेतही अधिक प्रभावी ठरते, सहजतेने घेता येते, दुष्परिणामरहित असे बनते आणि लवकर खराब होत नाही. उदा. पाचक औषधाला लिंबू किंवा महाळुंगाच्या रसाच्या भावना दिल्या की, ते अनेक पटींनी प्रभावी बनते. सुवर्ण, अभ्रक, रौप्य वगैरे धातू उत्तम रसायन गुणांनी युक्‍त असतात, मात्र ते तसेच्या तसे सेवन करणे अशक्‍य असते. त्यामुळे त्यांचे भस्म बनविले की ते सहज घेताही येते, शिवाय अगदी कमी मात्रेतही उत्तम गुणकारी ठरते. लसूण, हिंग वगैरे गोष्टी रक्‍ताभिसरण व पचनासाठी उत्तम असतात, मात्र तीक्ष्ण व उष्ण असल्याने प्रत्येकाला सोसवतील अशा नसतात. म्हणून औषधात वापरण्यापूर्वी त्यांची शुद्धी करून घेता येते. गुंज, धोतरा, वत्सनाभ यासारखी विषारी द्रव्ये सुद्धा अगोदर शुद्धी करून वापरली की त्यांच्यातील दोष निघून जातात, गुणाची मात्र वृद्धी होते. तुपाबरोबर संस्कारित केलेले औषध सहसा अस्थी, मज्जा, शुक्र वगैरे धातूंपर्यंत पोहोचविण्याच्या क्षमतेचे बनते.

आसवारिष्टाच्या रूपात घेतलेले औषध ताबडतोब रक्‍तापर्यंत पोहोचण्यास सक्षम असते. काढा काही तासातच घ्यावा लागतो, मात्र त्याच काढ्याचे सिरप किंवा आसव बनविले तर दीर्घकाळ टिकते. आवळ्याचा पल्प फार तर दोन-तीन दिवस टिकू शकतो, पण तोच आवळा साखरेत मुरवला तर वर्षभरही टिकतो. आवळ्यापासून बनविलेले च्यवनप्राशसारखे रसायन गुणाने संपन्न बनते, शिवाय दीर्घकाळ टिकतेही. 

ऋतुमान, आपण राहतो तेथील भौगोलिक परिस्थिती, घरातील वातावरण, नातेवाईक, मित्रमंडळी, समाज, शिक्षण व वाचन वगैरे असंख्य गोष्टींचा आपल्यावर बरा-वाईट परिणाम होत असतो. यातूनच आपण सर्व घडत असतो. हे घडणे सकारात्मक व्हावे, मनुष्यमात्राची वाटचाल उन्नतीकडे, यशस्वितेकडे व्हावी यासाठी संस्कृती मोलाची ठरते. वागणे, खाणे, पिणे, विचार करणे या सर्व गोष्टींना योग्य दिशा देण्याचे काम संस्कृती करत असते. 

भारतीय संस्कृती ही एक प्राचीनतम संस्कृती. हजारो वर्षांपासून आपल्या संस्कृतीची मुळे भारतीय जनमानसात घट्ट रोवलेली आहेत. असंख्य आक्रमणांना तोंड देण्याचे सामर्थ्य या संस्कृतीनेच आपल्याला दिले. आज एकविसाव्या शतकातही भारत देश आरोग्य, मनःशांती, आध्यात्मिक उन्नती वगैरेंसाठी संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्याच्या प्रयत्न करत आहे. ही आपली भारतीय संस्कृती आहे. 
आयुर्वेद, योग ही शास्त्रे, श्रीमद्‌भगवद्‌गीता, रामायण, महाभारतासारखी जीवनाचे तत्त्वज्ञान जित्याजागत्या पात्रांच्या माध्यमातून उलगडून दाखविणारी महाकाव्ये, उपनिषदे, वेद, वगैरे सर्वच भारतीय ज्ञान-विज्ञान हे भारतीय संस्कृतीत समाविष्ट असते. आयुर्वेद हे तर जीवन जगण्याचे शास्त्र. त्यामुळे त्यात संस्कृतीपूर्ण जीवन कसे जगावे आणि त्यातून आरोग्य कसे मिळते

याविषयीचे अमूल्य मार्गदर्शन केलेले आहे, शिवाय हे मार्गदर्शन अमक एका भौगोलिक स्थानापुरते, समाजापुरते किंवा धर्मापुरते मर्यादित नाही तर ते संपूर्ण मानवजातीच्या, संपूर्ण प्राणिमात्रांच्या, वनस्पती-वेली इतकेच नाही तर सर्व सृष्टीच्या संतुलनासाठी, आरोग्यासाठी उपयोगी पडेल असे आहे. 
अभिनन्द्य प्रसन्नात्मा हुत्वा दत्त्वा च शक्‍तितः ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान 
भोजन करण्यापूर्वी अन्नाची प्रशंसा करावी, अन्नाला वंदन करावे आणि प्रसन्न चित्ताने प्रथम अग्नीला व आसपासच्या प्राणिमात्रांना यथाशक्‍ती द्यावे. म्हणजे फक्‍त स्वतःचे पोट भरेल याकडे लक्ष न ठेवता, त्याच्याही आधी आसपासच्या प्राणिमात्रांना यथाशक्‍ती अन्न द्यावे, याच घरातील पाळीव प्राणी तर येतातच पण पक्षी, मुंगी वगैरे निसर्गातील इतर जिवांचाही समावेश होतो. अग्नीमध्ये थोड्या अन्नाची आहुती दिली तर त्यातून उत्पन्न होणाऱ्या शक्‍तीचा संपूर्ण निसर्गाला फायदा होत असतो. 

प्रयच्छेत्‌ सर्वमुद्दिश्‍य पाचयेन्नान्नमात्मने । 
केवळ स्वतःपुरते अन्न शिजवू नये, तर थोडे अधिकच प्रमाणात तयार करावे, जेणेकरून ज्यांना गरज आहे त्यांनाही देता येईल. 
अशा प्रकारे रोजचे जेवण करताना आयुर्वेद व भारतीय संस्कृती आसपासच्या गरजवंतांचा, पशुपक्ष्यांचा, सूक्ष्म किड्या-कीटकांच्या भरणपोषणाचा तसेच संपूर्ण वातावरणाचा विचार केलेला दिसतो. 

भारतीय संस्कृतीत अन्नाप्रमाणे पाण्यालाही खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. योग्य संस्कारांनंतर साधे पाणी ‘तीर्थ’ होते. पाण्यावर विचारांचा, भावनांचा परिणाम असतो. कमंडलूतील पाणी हातात घेऊन ऋषिमुनींना एखाद्याला वर वा शाप दिल्याच्या कथा आपण ऐकलेल्या असतील. कारण पाण्यामध्ये ते सामर्थ्य असते. भारतातच नाही तर इतर देशांत, इतर पंथांमध्ये सुद्धा पाण्याला खूप महत्त्व दिलेले आढळते. भारतीय परंपरेत तसेच आयुर्वेदात पाण्याला शुद्ध आणि जीवनतत्त्वाने परिपूर्ण बनविण्यासाठी पाणी उकळून घेणे, सुवर्णसिद्ध करून घेणे, चांदी वा सोन्याच्या पात्रात भरून ठेवणे वगैरे उपाय सुचविलेले दिसतात. 

भारतीय संस्कृतीमध्ये ‘शील’ म्हणजे संस्कारित आचरणाला सर्वोच्च स्थान दिलेले आहे. आयुर्वेदातील हे एक सूत्र याचे द्योतक आहे, 
वित्तबन्धुवयोविद्यावृत्तौः पूज्या यथोत्तरम्‌  
भारतीय संस्कृतीत धनवान व्यक्‍तीपेक्षा भाऊ-बहिणीला आदर द्यावा, भाऊ-बहिणीपेक्षा वयाने मोठ्या व्यक्‍तींबद्दल मनात आदर बाळगावा, वयाने मोठ्या व्यक्‍तीपेक्षा विद्यासंपन्न व्यक्‍तीचा आदर करावा आणि विद्यासंपन्न व्यक्‍तीपेक्षाही शीलवान व्यक्‍तीला मान द्यावा अशी विचारसरणी आहे. कारण सुशील आचरण हे सर्वांत महत्त्वाचे आहे. शील पणाला लावून प्रतिष्ठा, धन, संपत्ती मिळविण्याचा प्रयत्न करणे हे किती चुकीचे आहे हे यातून समजते. 

जीवन जगण्यासाठी पैसा, धन-संपत्ती लागते परंतु हे धन धर्मपूर्वक म्हणजे योग्य मार्गदर्शनाने, कोणाची फसवणूक न करता व कष्ट करून कमावलेले असले तर त्यातून खरा आनंद मिळू शकतो. 
अर्थानां धर्मलब्धानाम्‌ अदाताऽपि ह्यसम्भवात्‌  
स्वर्गापवर्गविभवान्‌ अयत्नेनाधितिष्ठति ।। 
....अष्टांगसंग्रह सूत्रस्थान 
धर्माची कास धरून कमावलेला पैसा असला व त्यातील एक पैसा जरी दान केला तरी स्वर्ग म्हणजे सुख आणि अपवर्ग म्हणजे सद्गती मिळते, मात्र धन अधर्मपूर्वक मिळवलेले असले तर ते कितीही दान केले तरी त्यातून पुण्याचा लाभ होऊ शकत नाही. 

याठिकाणी सुख म्हणताना त्यात आरोग्य, आनंद हे सर्व ओघाने आलेच. त्यामुळे भारतीय संस्कृतीने आखून दिलेल्या अनुशासनात राहिले तर त्यामुळे इहलोकात तसेच परलोकातही मदतच होते. आरोग्य, ऐश्वर्य, मनःशांती या सर्वच गोष्टींचा अनुभव घेता येतो. 

प्रदूषणरोधक धूप 
भारतीय संस्कृती, आयुर्वेद, तसेच जगातील सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये ‘धूप’ ही संकल्पना आढळते. मंदिर असो, इतर कोणतेही प्रार्थनास्थळ असो, अजूनही धूप करण्याची पद्धत सर्वत्र दिसते. आयुर्वेदात तर घर, रुग्णालय, बाळंतखोली, शस्त्रकर्मानंतर रुग्णाला ठेवले जाते ती खोली वगैरे ठिकाणी सकाळ-संध्याकाळ औषधी धूप करायला सांगितले आहे. सूक्ष्म जीवाणू, विषाणू, इतर ज्ञानेंद्रियांना ग्राह्य नसणारे जीवजंतू, विषद्रव्ये, प्रदूषण यांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूप अग्रणी असतात. आयुर्वेदाच्या संहितांमध्ये अनेक प्रकारचे धूप सांगितलेले आहेत. हे धूप अनेक वनस्पतींच्या मिश्रणापासून, पाठानुसार बनविलेले असतात. 

भारतीय संस्कृतीमध्ये मंत्रांना मोठे स्थान आहे. रोज घरामध्ये सकाळ-संध्याकाळ म्हटल्या जाणाऱ्या श्लोकांपासून ते वेदऋचांचे पठण-गायन हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आयुर्वेदात आरोग्यप्राप्तीसाठी सुद्धा मंत्रांचा उपयोग करून घेण्याबद्दल सुचवले आहे. 
भूतेशं पूजयेत्स्थाणुं प्रमथारण्यांश्च तद्गुणान्‌ 
जपन्‌ सिद्धांश्च तन्मन्त्रात्‌ ग्रहान्‌ सर्वानपोहति 

...अष्टांगहृदय उत्तरस्थान 
भूतांचा ईश असणारे शंकरमहादेव व त्यांचे प्रमथादी गण यांची पूजा करावी. त्यांचे सिद्ध मंत्र जपावेत म्हणजे सर्व प्रकारची पीडा दूर होते. 

यादृष्टीने काही मंत्र सुद्धा सुचवले आहेत, उदाहरणार्थ, 
ईश्वरं दादशभुजं नाथमार्यावलोकितम्‌ । 
सर्वव्याधिचिकित्सन्तं जपन्‌ सर्वग्रहान्‌ जयेत्‌
 
या मंत्राचा जप केल्यास सर्व प्रकारच्या ग्रहांच्या पीडा, उन्माद, अपस्मार व इतरही सर्व मनोविकार दूर होतात. 
भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे करण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा आरोग्यरक्षणाला धरूनच आलेली आहे. संक्रांत असो, महाशिवरात्र असो, धूलिवंदन असो, गुढीपाडवा असो किंवा दिवाळी-दसऱ्यासारखा मोठा सण असो, तो साजरा करताना संस्कृतीने आखून दिलेल्या रूपरेषा थेट आरोग्यापर्यंत पोहोचताना दिसतात. याठिकाणी आपण एखादा सण व त्यामागची आरोग्यक्षणाची भूमिका पाहू या. 

होळीची खेळी 
हिवाळा संपता संपता होळी हा सण येतो. गोमयापासून बनविलेल्या गोवऱ्या, एरंडाची एखादी फांदी, वाळलेले गवत वगैरेंचा होळी तयार करून पेटवली जाते. यामुळे हवेतील, वातावरणातील सूक्ष्म जीवजंतू नष्ट होण्यास मदत मिळते, हिवाळ्यातील थंडीचा प्रतिकार करता येतो, पुढे येणाऱ्या वसंत ऋतूमुळे वितळणाऱ्या कफदोषाला आटोक्‍यात ठेवण्यासाठी होळी ही उपचारस्वरूप ठरते. 
याच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन असते. धूलिवंदनाच्या दिवशी होळी जळून शांत झाल्यावर शिल्लक राहिलेली रक्षा (राख) अंगाला लावण्याची, धुळवड खेळण्याची परंपरा आहे, होळीमध्ये ज्या ज्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात. उदा., नारळ, पुरणपोळी तूूप वगैरे तसेच एरंडाची फांदी, शेणाच्या गोवऱ्या वगैरे ज्या गोष्टींची होळी पेटवलेली असते, या सर्वांची राख बनते आणि हिच्यामध्ये जंतुघ्न हा मोठा गुणधर्म असतो. आधुनिक संशोधनानुसार राखेच्या मदतीने जखमेतील जंतुसंसर्ग दूर होतो आणि जखम भरून येते, हे सिद्ध झालेले आहे. त्वचेवर रक्षा लावणे, धुळवड खेळणे हा एक प्रकारचा उपचारच असतो. गवरी जाळून तयार झालेली रक्षा झाडांसाठी उत्तम जंतुनाशक असते. रासायनिक कीटकनाशके फवारण्याऐवजी याप्रकारे नैसर्गिक आणि तरीही प्रभावी जंतुनाशक वापरणे कधीही चांगले. होळीची उरलेली राख ही जमिनीतील अतिरिक्‍त आम्लता दूर करण्यासाठी सुद्धा उपयुक्‍त असते. 

भारतीय संस्कृतीत धूलिवंदनाच्या दिवशी चंदनाच्या गंधात आंब्याचा मोहोर मिसळून तयार केलेले पेय प्राशन करण्यास सांगितलेले आहे. आंब्याचा मोहोर कफदोष कमी करणारा, बरोबरीने हवामानातील वाढलेल्या उष्णतेचा शरीरावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून मदत करणारा असतो. चंदनही सुगंधी व कफपित्तशामक असते. अशा प्रकारे भारतीय संस्कृतीने आखून दिलेल्या पद्धतीने होळी साजरी करण्याने हवामानाचा प्राणिमात्रांवर होणारा बदल त्रासदायक ठरत नाही, आरोग्य सुधारते, शिवाय पर्यावरणाचेही रक्षण होते. 
या ठिकाणी होळी उदाहरणादाखल घेतली आहे. मात्र इतर सर्व उत्सव साजरे करताना त्यामागे आरोग्याचे भान ठेवलेले आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी खायची कडुनिंबाची चटणी असो, कोजागरीच्या रात्री पित्तशमनासाठी चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध असतो, श्रीगणेशचतुर्थीला उकडीच्या मोदकासारखे पावसाळ्यातही सहज पचणारे पक्वान्न असो, प्रत्येक सण, प्रत्येक रीतिरिवाज आरोग्याला योगदान देण्यासाठीच योजलेला आहे. अशी आहे भारतीय संस्कृती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Culture and Health article written by Dr Shree Balaji Tambe