नैराश्याचा काळोख फिटू दे! 

डॉ. अपर्णा पित्रे
Friday, 4 October 2019

निराशेचा काळोख आपल्या भोवती पसरू लागला, तर लगेच सावध व्हा. ही निराशा दूर करण्याचे उपाय आपल्या हातात नाहीत, तर आपल्या आतच आहेत. ‘इन बिल्ट’. फक्त ते ओळखून नीट उपयोगात आणायला हवेत. 
 

निराशेचा काळोख आपल्या भोवती पसरू लागला, तर लगेच सावध व्हा. ही निराशा दूर करण्याचे उपाय आपल्या हातात नाहीत, तर आपल्या आतच आहेत. ‘इन बिल्ट’. फक्त ते ओळखून नीट उपयोगात आणायला हवेत. 
 
सळसळत्या तारुण्यातली मुले-मुली जेव्हा समोर येऊन बसायची आणि म्हणायची, ‘‘डॉक्टर, कशातही रस वाटत नाही. काहीही करायची इच्छा होत नाही. खूप लो वाटते.’’ तेव्हा सुरुवातीला मलाच हतबल झाल्यासारखे वाटायचे. मनात यायचे, काय वेडेपणा हा! या वयात कसे खाऊन, पिऊन, खेळून मस्त मजेत राहायला पाहिजे. हळूहळू लक्षात यायला लागले, की असे राहणे, या मुलांच्याही हातात राहिलेले नाही! त्यांना सगळे कळते पण वळत नाही आणि आपल्याला काहीतरी मदत मिळेल म्हणून ती इथे येत आहेत. हे खिन्न उदास असणे त्यांना तरी कुठे आवडते? त्यांना यातून बाहेर काढणारे कोणीतरी आणि काहीतरी हवे आहे. 

नैराश्य ही मानसिक आजाराची आणि त्यानंतर येणाऱ्या शारीरिक आजारांची सुरुवात असते. मनात घर करून बसलेली खिन्नता, सतत उदास वाटणे, कोणत्याही गोष्टीत रुची न वाटणे, ही महत्त्वाची लक्षणे. दैनंदिन जीवनातही बिघाड निर्माण करणारी. हे असे का होते, याचे शास्त्रीय स्पष्टीकरण द्यायचे, तर शारीरिक, मानसिक, सामाजिक अशा कोणत्याही कारणाने झालेला मनस्ताप, पीडा, मेंदूतील मज्जातंतूंच्या कार्यामध्ये बदल आणि कमजोरी निर्माण करतो. झोप न लागणे किंवा सारखे झोपून राहावे असे वाटणे, भूक मंदावणे किंवा अति खावेसे वाटणे, कमी झालेली एकाग्रता, स्वतःमध्ये कमतरता भासणे, स्वतःचे आयुष्य संपवून टाकण्याचे विचार येणे, या सर्व घडामोडी मेंदूच्या कार्य बदलामुळे होतात. 

पूर्वी आनंद देणाऱ्या गोष्टींनी आता काही फरक न पडणे, आयुष्यातील आनंद निघून गेला आहे असे वाटणे, या भावना अशा उद्विग्नतेच्या या अवस्थेत दिसून येतात. या निराशेच्या भावनेबरोबरच लैंगिक उदासीनता, अस्वस्थता व स्वतःच स्वतःच्या नजरेतून खाली उतरणे, स्वतःला काहीही किंमत नाही असे वाटणे, कोणताही निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास गमावून बसणे, या सर्व गोष्टींनी आयुष्य झाकोळून जाते. सतत चिडचिड, काळजी, चिंता, राग, आतून रिते वाटणे ही नैराश्याची लक्षणे आहेत. किशोर, पौगंडावस्था आणि तारुण्य अशा वळणावरती येणारे हे नैराश्य या वयात आवश्यक असलेली एकाग्रता, उत्साह, उमेद नाहीसे करते. कधी कधी तर या अवस्थेतूनच लठ्ठपणा आणि स्थूलतेची सुरुवात होते. थोडेसे मागे वळून पाहिले तर लहानपणी भावंडांमध्ये झालेले भेदभाव, दुर्लक्ष, दिली गेलेली कठोर वागणूक, शारीरिक आणि लैंगिक छळ अशी अनेक कारणे या नैराश्याची पायाभरणी करतात असे लक्षात येते. मध्यम वयात सामाजिक वर्तुळ, व्यावसायिक किंवा नोकरीतील ताणतणावांमुळे नैराश्याची सुरुवात होऊ शकते. स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या आधी, रजोनिवृत्तीच्या आसपास अशा तऱ्हेची मनःस्थिती निर्माण होते, असे सामान्यतः दिसून येते. काही वेळा तर काहीही प्रमुख कारण दिसत नसूनही केवळ मनाच्या खेळांमुळे, तुमच्या मनाच्या दुर्बलतेमुळे नैराश्याच्या दरीत फेकले जाता. 

केवळ नैराश्याची कारणे समजून घेऊन उपयोग नाही. त्यावर मार्ग काय, याचा विचार करणे महत्त्वाचे. त्याआधी आपण थोडे ‘हॅपी हॉर्मोन्स’बद्दल जाणून घेऊ. ‘हॅपी हार्मोन्स’ हे चेतासंस्थेमध्ये स्त्रवले जाणारे स्त्राव आहेत. ते मेंदूची स्थिती आणि त्यामुळेच मनाची स्थिती आनंदी बनवू शकतात. ‘डोपामाइन ऑक्सिटोसिन सिरोटोनिन’ आणि ‘एन्डोर्फीन्स’ अशी त्यांची नावे आहेत. यापैकी सिरोटोनिन या रासायनिक स्त्रावामुळे आनंदी मनःस्थिती आणि उत्साह येतो, तर ऑक्सिटोसिन तुम्हाला सामाजिक बनवते. इतर लोकांबरोबरची स्नेहभावना निर्माण करते. एखाद्या बाळाला किंवा प्राण्याला जवळ घेतले असताना ऑक्सिटोसिनची पातळी वाढते. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला छान म्हटले, स्तुती केली, बक्षीस दिले तर डोपामाइन या संप्रेरकाची पातळी वाढते आणि म्हणून आनंदाची निर्मिती होते. एन्डॉर्फिंन्समुळे ताण-तणाव आणि वेदना कमी होतात. याचा अर्थ नैराश्य दूर करण्याचे उपाय आपल्या हातात नव्हे तर, आपल्या शरीरातच आहेत आणि आपण मात्र असहाय्य होऊन, दुःखी होऊन राहतो. खरे तर हे सगळे कळत असते, पण नैराश्य ही स्थिती अशी आहे की सगळे कळते पण वळत मात्र नाही. तेव्हा मनाला आनंदाच्या दिशेने वळवू शकेल, निदान दुःखी मनःस्थितीकडे पाठ फिरवायला लावू शकेल, असे कोणते तरी सकारात्मक बळ हवे. होमिओपॅथिक ऊर्जा स्वरूपातील औषधे नैराश्यावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरतात. अनेक वर्षांच्या अनुभवातून लक्षात येते की, होमिओपॅथिक औषधांनी मनाला आलेली नैराश्याची भूल उतरते. आपले काहीतरी चुकतेय हे कळणे ही पहिली पायरी असते, नंतर मग स्वतःच्या भावनांकडे पाहता येऊन भावनांचे भान येते. चुकीच्या भावनांना नकार देण्याची क्षमता हळूहळू वाढायला लागते. अर्थात ही सर्व प्रक्रिया संथ गतीने होत जाते. एकदा का हा मनाचा समतोल मिळाला की तो टिकवणे हे मात्र आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर करावे लागते आणि त्यासाठी ‘हॅपी हार्मोन्स’ वाढवणे, व्यायाम, योग्य आहार, सकारात्मकता या सर्वांची मदत घ्यावी लागते. निराश मनःस्थितीला नैसर्गिक तऱ्हेने आनंदी बनवणे हा अगदी सोपा उपाय आहे. नैसर्गिक तऱ्हेने म्हणजे ‘न्यूरो केमिकल्स’चे प्रमाण वाढवून. 

नैसर्गिक तऱ्हेने ‘न्यूरो केमिकल्स’चे प्रमाण कसे वाढेल? 
- स्वतःची दैनंदिनी बनवा 

दिवसाची छोटी-छोटी ध्येये लिहून काढा. स्वयंशिस्तीचे बळ फार मोठे असते. त्यातून येणारे समाधान आणि स्फूर्ती ही तुम्हाला अधिकाधिक आत्मविश्वास आणि आनंद देते. 
- नवनवीन गोष्टी शिकत राहा 
त्यातून तुमची तत्परता, जीवनाबद्दलचे कुतूहल वाढत राहाते. आयुष्य किती अद्भुत आणि आनंदमय आहे हे पुन्हा पुन्हा जाणवते. 
- कमीत कमी आणि गरजेपुरते खा 
जास्त खाण्याची आवश्यकता नसतेच मुळी. जास्त खाणे, तुमच्यातील जडत्व वाढवून तुमच्यातील तत्परता आणि उत्साह कमी करते. काय खातो याकडे लक्ष ठेवा. जितके नैसर्गिक आणि कच्चे खाणे खाता येईल तेवढे खा. भुकेवरच्या नियंत्रणानेही आत्मविश्वासाचे बळ वाढते. यासाठीच उपवास असतात, साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी नव्हे. शिजवलेले अन्न चवीसाठी, तर नैसर्गिक अन्न सतेज मन आणि शरीरासाठी आहे. 
- गरम पाण्याने स्नान करा 
दिवसातून दोनदा गरम पाण्याने अंघोळ केल्याने निरुत्साह पळून जातो. रात्री अंघोळ केल्याने झोपही छान लागते. 
- नियमित व्यायाम करा 
व्यायामाला आपला मित्र बनवा. व्यायाम करताना आपल्या शरीरात एन्डोर्फिंन्स स्त्रवतात. शरीरातील वेदना आणि मनाचीही वेदना कमी करतात. स्वतःतील सकारात्मक भावना वाढवतात. संशोधनातून हे पुन्हा पुन्हा स्पष्ट झाले आहे. नियमित व्यायामाने मनाची स्थिती उल्हसित होते आणि नैराश्‍य कमी होते. योगाचा योग्य उपयोग करून घ्या. सूर्यनमस्कार, या व्यायामाच्या पद्धतीत अशी काही जादू आहे की त्याने शरीर सुडौल तर होतेच, पण प्रतिकारक्षमताही वाढते. पंधरा सूर्यनमस्कार घालायला केवळ दहा मिनिटे लागतात. तुमची इच्छाशक्ती वाढवून, तुमच्या कंटाळ्याकडे दुर्लक्ष करून एखादे आवडते स्तोत्र किंवा गाणे लावून, विचार काही मिनिटे बाजूला ठेवून सूर्यनमस्कार घाला. जेव्हा जेव्हा कंटाळा येईल, तेव्हा तेव्हा मनाचा सल्ला न घेता व्यायाम करायला चालू करा. स्पॉट जॉगिंग, जिने खाली-वर चढणे, घरातली शारीरिक कामे, घास पुस, आवराआवरी, वेगाने चालणे, सूर्यनमस्कार काहीही करा. कंटाळा पळून जाईल आणि कृतकृत्यही वाटेल. 
- आनंदाने राहा, विश्वासाने राहा 
संशय, असमाधान, निखळ दृष्टी न ठेवणे या गोष्टी आपल्या भोवतालच्या आपले रक्षण करणाऱ्या प्रतिकार क्षमतेच्या आवरणाचा भेद करतात. तर आनंद, दुसऱ्यांबद्दलचा स्नेह, प्रेम, विश्वास या गोष्टी हे आवरण जास्तीत जास्त सशक्त बनवतात. मनोरंजन, टीव्ही पाहात राहणे, चित्रपट पाहणे, हे उपाय स्वतःचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी आणि स्वतःला विसरण्यासाठी आहेत. हे मनाचे लाड नशेपेक्षा वेगळे नाहीत. पण जेव्हा ही नशा उतरते, तेव्हा नैराश्याच्या आणखी खोल गर्तेत गेल्याची भावना येऊ शकते. त्यामुळे नैराश्यावरचा उपाय मनोरंजनाने मनाला भूल देणे हा खचितच नाही तर स्वतःला आनंदाचा प्रकाश आणि स्फूर्ती देणे हा आहे. 
वरील सर्व उपायांपैकी आपल्याला आनंद आणि आत्मविश्वास कशातून मिळतो याचे प्रत्येकाने स्वतःसाठी संशोधन केले पाहिजे. स्वतः आनंदी कसे राहू शकतो, स्वतःला आनंदी ठेवण्याची युक्ती कोणती हे आपणच आपले शोधून काढले पाहिजे. मानवी मन अगाध आहे. मन ही एक ऊर्जा आहे. होमिओपॅथिक औषधांमध्ये औषधी नॅनो पार्टिकल्स अत्यंत सूक्ष्म स्वरूपात असतात हे आता सिद्ध झाले आहे. ! 

जर तुम्ही मनाला निराशेच्या दिशेने वळू देऊ शकता, तर मनाची तीच शक्ती वापरून तुम्ही आनंदाच्या दिशेलाही वळवू शकता. जेव्हा मनाशी तुम्ही खूणगाठ बांधता, की मला ही गोष्ट करायचीच आहे, मी हे करणारच. तेव्हा तुमचे शरीर, शरीरक्रिया आणि शरीर रसायने तुम्हाला आनंदाने साथ देतील आणि नैराश्य, आजारपण तुमच्यापासून कुठल्या कुठे दूर पळून जाईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darkness of Depression article written by Dr Aparna Pitre