रक्ताच्या गुठळीचा धोका 

डॉ. अद्वैत कोठूरकर 
Friday, 27 December 2019

रक्त प्रवाही राहिले पाहिजे. ते जसे फार पातळ होता नये, तसेच त्याच्या गुठळ्याही होता नये. रक्ताच्या गुठळ्या रक्ताचा प्रवाह थांबवतात, किंवा फुप्फुसात शिरतात तेव्हा त्या जीवघेण्या ठरतात. 
 

रक्त प्रवाही राहिले पाहिजे. ते जसे फार पातळ होता नये, तसेच त्याच्या गुठळ्याही होता नये. रक्ताच्या गुठळ्या रक्ताचा प्रवाह थांबवतात, किंवा फुप्फुसात शिरतात तेव्हा त्या जीवघेण्या ठरतात. 
 

डीप वेन थ्रॉम्बोसिस (डीव्हीटी) ही एक गंभीर वैद्यकीय परिस्थिती असते. यामध्ये शरीरात खोलवर असलेल्या नसांमध्ये रक्ताची गुठळी निर्माण होते. अशा प्रकारची गुठळी सामान्यतः मांडी किंवा पायामध्ये तयार होते; मात्र शरीराच्या इतर भागांतदेखील या तयार होऊ शकतात. डीप वेन थ्रॉम्बोसिसमुळे पाय दुखणे किंवा पायाला सूज येऊ शकते; पण यापेक्षाही गंभीर म्हणजे, जेव्हा या रक्ताच्या गुठळ्या रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाहाबरोबर फुप्फुसात जाऊन बसतात आणि रक्ताचा प्रवाह थांबवितात (ज्याला पल्मनरी एम्बॉलिझम म्हणतात) तेव्हा ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकते. 

डीव्हीटीची लक्षणे 
* एका किंवा दोन्ही पायांमध्ये सूज 
* नसांना सूज येणे 
* पायावरील त्वचा लाल रंगाची किंवा रंगहीन होणे 
* खोकल्यातून रक्त बाहेर येणे 
* छातीत तीव्र दुखणे किंवा छाती जड होणे 
* श्‍वसनाचा त्रास 
* खांद्यावर, हातावर, पाठीवर किंवा जबड्यात तीव्र वेदना 
* चक्कर येणे 

डीप वेन थ्रॉम्बोसिस होण्यामध्ये अनेक जोखमीचे घटक कारणीभूत ठरू शकतात. शस्त्रक्रिया झाल्यानंतर किंवा आजारातून बाहेर पडल्यानंतर शरीराची हालचाल न होणे हे काही वेळेस यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्याशिवाय लठ्ठपणा, धूम्रपान, कर्करोग, हदयविकार, कुटुंबात डीव्हीटी किंवा पल्मनरी एम्बॉलिझमचा इतिहास अशांसारखे अनेक जोखमीचे घटक डीव्हीटीला कारणीभूत ठरू शकतात. डीव्हीटी होऊ नये यासाठी जीवनशैली चांगली असणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे व धूम्रपान बंद करणे आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या आजारातून बरे झाला असाल किंवा तुमच्यावर शस्त्रक्रिया झाली असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हळूहळू हालचाली सुरू केल्या पाहिजेत. दीर्घकाळाचा प्रवास असेल तर एकाच जागी पाय स्थिर राहू देऊ नका. वाटेत मध्यंतर घेऊन थोड्या हालचाली कराव्यात. बैठे काम असले तरी दर तासाला किंवा अधूनमधून उठून थोडे चालावे किंवा हालचाली कराव्यात. 

डीव्हीटीची लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. निदानासाठी अल्ट्रासाउंड, रक्ताची चाचणी, वेनोग्राफी, सीटी किंवा एमआरआय स्कॅनची मदत घेतली जाऊ शकते. उपचारामध्ये बल्ड थिनर्स किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा सल्ला दिला जाऊ शकतो. याशिवाय पल्मनरी एम्बॉलिझम किंवा डीव्हीटीचा गंभीर प्रकार जर झाला असेल तर गुठळ्या तोडणाऱ्या (क्लॉट बस्टर्स) औषधांचा वापर केला जाऊ शकतो. तुटलेल्या गुठळ्या फुप्फुसात जाऊ नयेत यासाठी वेनाकावा फिल्टर पोटातील मोठ्या वाहिनीमध्ये टाकले जाऊ शकते. पायावर सूज येऊ नये म्हणून गुडघ्याच्या वरपर्यंत कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स घालण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deep Vein Thrombosis article written by Dr Adwait Kothurkar