दीपावली 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 18 October 2019

अग्नी पेटत राहण्यासाठी त्यात इंधन टाकत राहणे गरजेचे असते, तसेच शरीरस्थ अग्नीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारच्या फराळाची योजना केलेली असावी. सर्वांना आवडतील असे रुचकर, तरीही आरोग्यपूरक पदार्थ अशा या दीपावलीत करायचे ठरविले तर उत्सवाचा आनंद अजूनच वृद्धिंगत होईल. 

दीपावली हा तेजाचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. पावसाळ्यामुळे आलेला हवेतील दमटपणा नाहीसा व्हावा, अग्नीची मंदता नष्ट व्हावी आणि मनातील मरगळ दूर व्हावी या हेतूने शरद ऋतूच्या शेवटी दीपावलीची योजना केलेली आढळते. 

अग्नी पेटत राहण्यासाठी त्यात इंधन टाकत राहणे गरजेचे असते, तसेच शरीरस्थ अग्नीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारच्या फराळाची योजना केलेली असावी. सर्वांना आवडतील असे रुचकर, तरीही आरोग्यपूरक पदार्थ अशा या दीपावलीत करायचे ठरविले तर उत्सवाचा आनंद अजूनच वृद्धिंगत होईल. 

दीपावली हा तेजाचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. पावसाळ्यामुळे आलेला हवेतील दमटपणा नाहीसा व्हावा, अग्नीची मंदता नष्ट व्हावी आणि मनातील मरगळ दूर व्हावी या हेतूने शरद ऋतूच्या शेवटी दीपावलीची योजना केलेली आढळते. 

दीपावलीत तेलाच्या पणत्या, आकाशकंदील, रोषणाईच्या मदतीने घर-दार उजळून जाते हे खरे, पण त्यापूर्वी घरादाराच्या कानाकोपऱ्याची कसून स्वच्छता झालेली असावी लागते. तसेच शरीरस्थ अग्नी प्रदीप्त होण्यासाठी शरीराची शुद्धी होणेही गरजेचे असते. यासाठी शरद ऋतूमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने विरेचन, बस्ती करून घेणे उत्तम असतेच, किमान घरच्या घरी जुलाबाचे औषध किंवा जंतांचे औषध घेणे तरी सर्वांना जमण्यासारखे असते. यासाठी वात-पित्ताच्या व्यक्‍तींना एरंडेल किंवा अविपत्तिकर चूर्ण तर कफ प्रकृतीच्या व्यक्‍तींना त्रिफळा, गंधर्वहरितकीसारखे चूर्ण घेता येते. पोट व्यवस्थित साफ झाले की अग्नीची कार्यक्षमता आपसूकच सुधारते. शिवाय, जसे अग्नी पेटत राहण्यासाठी त्यात इंधन टाकत राहणे गरजेचे असते, तसेच शरीरस्थ अग्नीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारच्या फराळाची योजना केलेली असावी. 
चकली, कडबोळी, करंजी, अनारसे वगैरे खास दिवाळीचे पदार्थ सर्वांच्या परिचयाचे असतातच, याची आयुर्वेदातील पाककृतीसुद्धा आपण यापूर्वी पाहिलेली आहे. 

दीपावलीमध्ये फराळाचे पदार्थ महत्त्वाचे असतातच, त्याबरोबरीने रोजच्या जेवणाचा बेत आखतानासुद्धा नेहमीपेक्षा वेगळ्या सणाचा आनंद द्विगुणित करणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जातो. आज अशाच काही आयुर्वेदातील पाककृतींची माहिती घेऊ या. 

पायस 
दुग्धस्याष्टमभागेन तन्दुलान्घृतसंस्कृतान्‌ । शुद्धेऽर्धपक्वे दुग्धे तु क्षिप्त्वा सिद्धा हि

क्षीरिका ।। 
पायसं शर्करायुक्‍तघृतप्रक्षेपणात्‌ भवेत्‌ । केचिदस्यां कुंकुमैलां क्षिप्त्वा कुर्वन्ति
पायसम्‌ ।। 

...निघण्टु रत्नाकर 
दुधाच्या अष्टमांश प्रमाणात तांदूळ घ्यावेत, थोड्या तुपावर भाजून घ्यावेत. दूध अग्नीवर ठेवून त्यात तांदूळ घालावेत व ढवळत राहावे. तांदूळ शिजले व दूध जवळजवळ अर्धे आटले की त्यात चवीनुसार साखर व तूप टाकले की पायस तयार होतो. कोणी कोणी यात वेलची व केशर टाकतात. 

पायस वात-पित्तशामक असतो, धातूंसाठी पोषक असतो, पचण्यास जरा जड असतो. अति प्रमाणात सेवन केल्यास मात्र कफदोष वाढू शकतो, अग्नी मंद होतो व मेद वाढू शकतो. पायस पचायला अजून हलका हवा असेल तर दूध जास्ती आटवत नाहीत. तांदूळ शिजले की अग्नी देणे थांबवता येते, असा पायस पचायला जड नसतो. 

पायसाचे वैशिष्ट्य म्हणजे यात तांदूळ तुपावर भाजून घेतलेले असल्याने ते पचण्यास अधिकच हलके होतात. साखर वरून टाकलेली असल्याने ती शरीराकडून चटकन स्वीकारली जाते. केशर, वेलचीसुद्धा पायसाची रुची वाढविण्यास व पायस पचण्यास सोपा होण्यास मदत करतात. 

मोहनभोग 
त्रिंशत्कर्षं घृतं तप्त्वा तस्मिन्‌ गोधूमचूर्णकम्‌ । निस्तुषं घृतमानेन क्षिप्त्वा दर्व्यां विचालयेत्‌ ।। 
गृहीत्वा च समं दुग्धमल्पमल्पं विनिक्षिपेत्‌ । तिष्ठेद्‌ आलोड्यं तावद्‌ यावद्‌ आज्यदर्शनम्‌ ।। 
पक्वे ततः क्षिपेत्तस्मिन्‌ शर्करां सममानतः । एलालवंगमरिचचूर्णं क्षिप्त्वा विलोडयेत्‌ ।। 
क्षणेन च ततोत्तार्य सिद्धोऽयं भोगमोहनः । 

...निघण्टु रत्नाकर 
तीस तोळे (३०० ग्रॅम) तूप गरम करून त्यात समभाग गव्हाचा रवा घालून पळीने ढवळावे. तूप व रव्याच्या समभाग दूध घेऊन ते थोडे थोडे शिंपावे व हलवत राहावे. जोपर्यंत तूप दिसू लागत नाही तोपर्यंत रवा शिजू द्यावा, नंतर रव्याच्या समप्रमाणात पिठीसाखर घालावी, तसेच वेलची, लवंग, मिरे यांचे चूर्ण घालून नीट हलवून एकजीव होऊ द्यावे व अग्नीवरून उतरवावे. 

हा मोहनभोग ताकद वाढवतो. शुक्रधातूसाठी हितकर असतो, स्निग्ध असतो, कफवर्धक असतो, धातुवर्धक असतो, चवीला व विपाकाला मधुर असतो आणि वात-पित्तदोषांचे शमन करतो. 

मुग्‌दमोदक

मुगाचे पीठ पाण्यात मिसळून साधारण पातळ मिश्रण तयार करावे. कढईमध्ये तूप गरम करून त्यावर झारा धरून मुगाची बुंदी पाडावी. तयार झालेली बुंदी साखरेच्या पाकात घोळावी. थंड झाली की लाडू बनवावे. हे मुगाच्या बुंदीचे लाडू होत. 
लघुर्ग्राही त्रिदोषघ्नः स्वादुः शीतो रुचिप्रदः । चक्षुष्यो ज्वरहृद्बल्यस्तर्पणो मुद्गमोदकः ।। 
...भावप्रकाश 
असे हे मुगाच्या बुंदीचे लाडू स्वादिष्ट लागतातच व ते पचायला हलके, त्रिदोषांना संतुलित करणारे, शीतल गुणधर्माचे असतात. हे लाडू डोळ्यांना हितकर, ज्वरनाशक, हृदयाला हितकारक असतात. ताकद वाढवितात व शरीरधातूंना तृप्त करतात. 

मोतीचूर लाडू

याच प्रकारे चण्याच्या पिठाचे लाडू करता येतात. हे मोतीचूर लाडू पचनास हलके, शीत वीर्याचे, बलवर्धक, किंचित वातकारक, मलावष्टंभ करणारे, ज्वरनाशक, पित्तशामक तसेच रक्‍तविकार दूर करणारे असतात. 
जेवण रुचकर होण्यासाठी गोडाच्या जोडीला तिखट-मिठाचे पदार्थ लागतातच, जिभेला चव यावी, अन्नपचनाला मदत मिळावी आणि अग्नीला संधुक्षित करण्याचा मुख्य हेतू पूर्ण व्हावा यासाठी तिखट-मिठाचे पदार्थ उत्तम असतात. 

वटक (वडे) 
माषाणां पिष्टिकां युक्‍तां लवणार्द्र्रकहिंगुभिः । कृत्वा विदध्यात्‌ वटकांस्तांस्तैलेषु पचेत्‌ शनैः ।। 
संचूर्ण्य निक्षिपेत्‌ तक्रे भृष्टजीरकहिंगुभिः । लवणं तत्र वटकान्‌ सकलानपि मज्जयेत्‌ ।। 

...भावप्रकाश 
उडदाच्या पिठात मीठ, आले, हिंग व पाणी टाकून पीठ मळावे, त्याचे गोल वा चपटे वडे तयार करावे व तेलात तळावे. तळलेले वडे बारीक करून ताकात टाकावेत व बारीक केलेले जिरे, हिंग, मीठ मिसळून खावेत. 

असे वडे मुगाच्या पिठाचेही बनवता येतात. उडदाचे वडे शुक्रजनक, बलकारक, वातनाशक, कफकारक व दाह करणारे असतात. मुगाचे वडे मात्र उडदाच्या वड्यापेक्षा पचायला सोपे असतात, त्रिदोषांचे शमन करतात व गुणाने थंड असतात. 

ताकातील वडे 
बाह्लीकचूर्णयुतनिर्मलतक्रपूर्णेकुम्भे यथोचितपटूत्तमराजिकाढ्ये । पूर्वोपदिष्टकृतिना सुकृताश्च पक्वाः सिद्धाश्च तक्रवटकाहि दिनोषिताः स्युः ।। 

...निघण्टरत्नाकर 
उडदाची डाळ धुवून घेऊन तिचे पीठ करावे. वरील पद्धतीने वडे करून ते तळून घ्यावेत व गरम असतानाच हिंग, मोहरी लावलेल्या ताकात सोडावेत. हे सर्व मिश्रण मातीच्या कोऱ्या मडक्‍यात रात्रभर झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी मऊ झालेले वडे सेवन करावेत. 
हृद्याः सुरुच्याः कफवर्धकाश्चपित्तप्रदाः शुक्रकृतोऽतिपुष्टिदाः । वातापहा रक्‍तविवर्धनाश्च ध्वांसीति नाम्ना प्रथिताश्च लोके ।। 
...निघण्टरत्नाकर 
हे अतिशय रुचकर, मनाला प्रिय, वातशामक असतात. रक्‍त वाढविण्यास मदत करतात, कफ व शुक्रधातूला पोषक असतात, काही प्रमाणात पित्त वाढवतात. 

पाटवड्या 
चण्याच्या पिठात पाणी, मिरी, मीठ, हिंग, धणे, हळद, किसलेला नारळ हे सर्व मिसळावे व मंद आचेवर युक्‍तीने शिजवावे. शिजले व साधारण घट्ट झाले की तूप लावलेल्या परातीत काढावे. तळहाताने थापटून एकसारखे पसरावे, पूर्ण थंड झाले की सुरीने चौकोनी आकारात कापून तुपात वा तेलात तळावे. 
शुक्रं वीर्यं बलं कान्तिं कफं पुष्टिं रुचिं तथा । कुर्वन्ति नाम्ना वट्यस्ताः कथिताः खण्डिताभिधाः । 
मलस्तम्भकरा गुर्व्यो वातपित्तास्रनाशनाः ।। 

...निघण्टरत्नाकर 
या पाटवड्या शुक्रधातू, वीर्यशक्‍ती, बल, कांती व पुष्टी यांचे वर्धन करतात. कफाचे पोषण करतात, चवीला रुचकर असतात. वात, पित्त तसेच रक्‍तदोष दूर करून मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात. 

घराघरात दीपावली उत्सवाची तयारी चालू आहे. सर्वांना आवडतील असे रुचकर तरीही आरोग्यपूरक पदार्थ अशा या दीपावलीत करायचे ठरविले तर उत्सवाचा आनंद अजूनच वृद्धिंगत होईल.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepawali article written by Dr Shree Balaji Tambe