नजर डायबेटिक रेटिनोपॅथीवर

डॉ. श्रुतिका कांकरिया
Friday, 6 April 2018

मधुमेह जडल्यानंतर इतर व्याधी रुग्णाच्या शरीरावर आक्रमण करू लागतात. त्यात हृदयविकार, रक्तदाबाचा विकार याबरोबरच ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’ हा नेत्रपटलाशी संबंधित गंभीर विकारही जडू शकतो. त्यावर वेळीच उपचार केले नाही, तर दृष्टी जाण्याचीही भीती असते.

रेटिनाशी (नेत्रपटल) संबंधित अनेक व्याधी आहेत. या सर्वच व्याधी कमी-अधिक प्रमाणात धोकादायक आहेत. कोणत्याही कारणांनी रेटिनाच्या पेशींची हानी झाल्यास ती भरून निघून शकत नाही. त्यामुळे रेटिनाशी संबंधित विकारांच्या उपचारांबाबत हलगर्जीपणा करू नये. खरें तर रेटिनाशी संबंधित सर्वच विकार गंभीर आहेत; पण या विकारांमध्ये ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’ अर्थात मधुमेहजन्य नेत्रपटलविकार अधिक गंभीर आहे. यात रेटिनाचा काही भाग निकामी होणे, पडद्यापुढे रक्तस्राव होऊन काळे डाग दिसणे किंवा दृष्टी पूर्णपणे निकामी होणे असे परिणाम दिसून येतात. प्रत्येक मधुमेही व्यक्तीला डायबेटिक रेटिनापॅथी जडेलच असे नाही; पण मधुमेह जडल्यानंतर ही व्याधी होण्याची शक्‍यता अनेक पटींनी वाढते.

आपल्या आहारातून शरीरात जाणाऱ्या कार्बोदकांचें (कार्बोहायड्रेट्‌स) ग्लुकोजमध्ये रूपांतर होतें. ग्लुकोज शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतें आणि शरीरातील इन्सुलिन या संप्रेरकाच्या (हार्मोन) साह्याने ग्लुकोजचे रूपांतर ऊर्जेत केलें जातें; परंतु काही कारणांमुळे शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही आणि ग्लुकोजचें ऊर्जेत रुपांतर होऊ शकत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचें प्रमाण वाढतें. यालाच मधुमेह असें म्हणतात.

मधुमेह ही व्याधी सर्वव्यापी आहे. ती शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम करते. मधुमेहामुळे हृदय, मूत्रपिंड, आतडे यावर तर परिणाम होतोच; पण रक्तदाबासारख्या गंभीर व्याधीही जडू शकतात. मधुमेहाचें निदान झाल्यावर मधुमेहतज्ज्ञ रुग्णाला डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्यायला सांगतात. कारण त्याचा सर्वाधिक परिणाम डोळ्यांवर होतो. मधुमेहामुळे चष्म्याचा नंबर अचानक वाढतो, तर काही रुग्णांना भुरके दिसायला लागते. या रुग्णांना मोतीबिंदूही इतरांच्या तुलनेत कमी वयात होतो. मधुमेहींमध्ये काचबिंदूचें प्रमाणही अधिक असते. बुब्बुळाची त्वचा कमकुवत होऊन कोरडेपणा येणें किंवा डोळ्यांचे स्नायू निकामी होऊन तिरळेपणा येणें यासारखे दुष्परिणाम जाणवू शकतात; परंतु या सर्वांपेक्षा गंभीर आणि दृष्टी कायमची अधू किंवा अंध करू शकणारा विकार म्हणजे मधुमेहजन्य नेत्रपटल विकार अर्थात डायबेटिक रेटिनापॅथी!

मधुमेहामुळे रक्तातील साखरेचें प्रमाण वाढतें. त्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारतात आणि आतून पातळ होतात. रेटिनामधील या रक्तवाहिन्यांमधून द्रवही पाझरतो (लिकेज). यामुळे रेटिनावर सूज येते. रक्तवाहिन्यांच्या भिंती कमकुवत झाल्याने कधी कधी त्यातून रक्तस्राव होतो, तर कधी कधी या रक्तवाहिन्या (केशवाहिन्या) अरुंद होऊन रेटिनाचा रक्तपुरवठा कमी होतो किंवा थांबतो. पर्यायाने रेटिनाच्या पेशींपर्यंत ऑक्‍सिजन आणि प्रथिने पोचू शकत नाहीत. रेटिनाला ऑक्‍सिजनचा पुरवठा न झाल्याने किंवा पडद्यापुढे रक्तस्राव झाल्याने रेटिनाचा काही भाग निकामी होतो. त्यामुळे रुग्णाला काहीसें धूसर दिसू लागतें. केशवाहिन्या अरुंद झाल्यावर रेटिनाचा रक्तपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आपोआप नवीन केशवाहिन्या तयार होता. पण या केशवाहिन्या अत्यंत नाजूक असल्याने त्या सहज फुटू शकतात. या केशवाहिन्या फुटल्यास अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. त्यात रेटिना जागेवरून हलणें, डोळ्याच्या आत रक्तस्राव होणें यांचा समावेश होतो. अशा विकारांमध्ये उपचार करूनदेखील दृष्टी पूर्ववत होऊ शकत नाही. वेळीच उपचार न केल्यास विकार वाढत जाऊन अंधत्वही येऊ शकतें.

डायबेटिक रेटिनोपॅथीचा प्रवास साधारणतः चार टप्प्यांमधून होतो. पहिला टप्पा म्हणजे माइल्ड नॉन प्रॉलिफरेटिव्ह रेटिनोपॅथी. यात रेटिनामधील केशवाहिन्यांमध्ये फुग्याप्रमाणे सूज येते. या सूज आलेल्या भागातून रेटिनावर एक प्रकारचा द्रव पदार्थ पाझरू लागतो (लीक होतो). दुसरा टप्पा म्हणजे मॉडरेट नॉन प्रॉलिफरेटिव्ह रेटिनोपॅथी. डायबेटिक रेटिनोपॅथीची व्याप्ती वाढते तशा रेटिनाचा रक्तपुरवठा करणाऱ्या केशवाहिन्या सुजतात आणि त्या वेड्यावाकड्या होऊ लागतात. या टप्प्यात त्यांची रक्त वाहून नेण्याची क्षमताही नष्ट होऊ लागते. यामुळे रेटिनामध्ये काही विशिष्ट बदल होतात. शिवाय यामुळे डायबेटिक मॅक्‍युलर एडिमा या विकारास सुरवात होऊ शकते. तिसऱ्या टप्प्याला सिव्हियर नॉन प्रॉलिफरेटिव्ह रेटिनापॅथी असें म्हणतात. या टप्प्यात आणखी अनेक केशवाहिन्यांमधून रक्त वाहणें बंद होतें. त्यामुळे रेटिनाचा रक्तपुरवठा मोठ्या प्रमाणावर रोखला जातो.  त्यानंतर रक्तपुरवठा न होणाऱ्या भागात काही ग्रोथ फॅक्‍टर्स स्रवतात आणि त्यातून रेटिनाला नवीन केशवाहिन्या तयार करण्यासंबंधीचे संकेत मिळतात. चौथ्या टप्प्यात म्हणजे प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनापॅथीमध्ये नवीन केशवाहिन्यांचें जाळें तयार होऊ लागतें. या केशवाहिन्या रेटिनाच्या आतील पृष्ठभागावर आणि डोळ्यातील द्रवपदार्थामध्ये वाढतात. या केशवाहिन्या अत्यंत नाजूक असल्याने त्यातून रक्तस्राव होऊ शकतो. त्याचबरोबर स्कार टिश्‍यू अंकुचन पावून एखाद्या भिंतीवरून वॉलपेपर ओढून काढावा त्याप्रमाणे रेटिना ओढला जाऊ शकतो. याला रेटिनल डिटॅचमेंट असें म्हणतात. रेटिनल डिटॅचमेंटमुळे दृष्टी कायमची जाऊ शकते.

व्याधीच्या सुरवातीच्या टप्प्यात रेटिनोपॅथीची कोणतीही लक्षणें दिसून येत नाहीत. त्यामुळे लक्षणे आढळून येईपर्यंत रेटिनाचें बरेंच नुकसान झालेलें असू शकतें. शिवाय एका टप्प्यानंतर (ॲडव्हान्स्ड स्टेजमध्ये) डायबेटिक रेटिनापॅथी हा विकार पूर्णपणे बरा होऊन दृष्टी पुन्हा पूर्ववत होणें शक्‍य नसल्याने त्यावर प्रतिबंध हाच प्रभावी उपाय ठरतो. या प्रतिबंधात्मक उपायांमुळे व्याधी ज्या टप्प्यात आहे त्याच टप्प्यात रोखता येते. त्यामुळे मधुमेह जडला असल्याचें निदान झाल्यानंतर प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा नेत्रपटलतज्ज्ञाकडून (रेटिना स्पेशालिस्ट) डोळ्यांची संपूर्ण तपासणी करून घ्यायला हवी. डायबेटिक रेटिनोपॅथीची सुरवात साधारणतः नेत्रपटलाच्या मध्यबिंदूच्या अवतीभोवती होते. त्यामुळे सुरवातीला दृष्टीमध्ये फरक पडल्याचें रुग्णांना जाणवत नाही; मात्र विकार मध्यबिंदूवर पोचतो, तेव्हा भुरकट दिसायला सुरवात होते. नेत्रपटलाच्या पुढे रक्तस्राव झाल्यास काळे डाग दिसू लागतात; पण हे दृश्‍य परिणाम लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. डोळ्यांची नियमित तपासणी केल्यास हे टाळता येते.

या तपासण्यांमध्ये डोळ्यांमध्ये एक विशिष्ट औषध टाकून डोळ्यांच्या बाहुलीचा आकार मोठा केला जातो. त्यामुळे रेटिना आणि डोळ्यांतील इतर भाग स्पष्ट दिसतात. या तपासणीला फंडोस्कोपी असें म्हणतात. त्यानंतर विशिष्ट मशिनच्या साह्याने मॅक्‍युलर एडिमा आणि प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनापॅथीचें परीक्षण केलें जातें. दुसऱ्या एका तपासणीमध्ये फ्ल्युरोसीन अँजिओग्राफी केली जाते. यात हाताच्या रक्तवाहिनीमध्ये एक डाय इंजेक्‍शनने टोचला जातो. त्यानंतर एका विशिष्ट कॅमेऱ्याच्या साह्याने रेटिनाची छायाचित्रे घेतली जातात. या छायाचित्रांमुळे रेटिना स्पेशालिस्टना व्याधीच्या प्रसाराबाबत नेमका अंदाज येतो. त्यावरून उपचारांची पुढची दिशा ठरवता येते. ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी या आणखी एका चाचणीत मॅक्‍युलर एडिमाचें प्रमाण किती आहे हे समजतें.

डायबेटिक रेटिनोपॅथीवरील उपचार व्याधीची तीव्रता आणि व्याप्ती यावर अवलंबून असतात. वर उल्लेख केलेल्या चाचण्यांवरून व्याधीची व्याप्ती आणि प्रसार याची माहिती मिळू शकते. सौम्य प्रकारात डायबेटिक रेटिनोपॅथीवर उपचार करण्याची गरज नसते. प्रसाराचें परीक्षण करण्यासाठी नियमित तपासणी करणें गरजेचें असतें. रक्तातील साखरेचें प्रमाण आणि रक्तदाब यावर नियंत्रण ठेवलें तर ही व्याधी होण्याची शक्‍यता बरीच कमी होते किंवा टाळताही येते. व्याधीच्या सुरवातीच्या काळात नेत्रपटलावर सूज असताना डोळ्याच्या आत एक विशिष्ट इंजेक्‍शन देऊन उपचार केले जातात आणि लेसर किरणांद्वारे सूज कमी केली जाते. यात रुग्णाला काहीही वेदना होत नाहीत आणि उपचारानंतर घरी जाता येतें. इंजेक्‍शन दिल्यानंतर दर महिन्याला ओसीटी या मशिनद्वारे तपासणी करून नेत्रपटलाच्या सूजेची चढउतार पाहिली जाते. सूजेचें प्रमाण अधिक असल्यास किंवा केशवाहिन्यांचें जाळें तयार झाल्यास लेसर किरणांचा वापर करून व्याधीवर नियंत्रण मिळवलें जातें. अधिक गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाल्यास शस्त्रक्रिया करून दृष्टी वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. पण ही वेळ न येऊ देता वेळीच सावध होऊन या व्याधीबद्दल जनजागृती व्हायला हवी. त्यामुळे मधुमेहींनी नेत्रतपासणी आणि उपचार याबाबत टाळाटाळ न करणेंच श्रेयस्कर!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diabetic retinopathy