पथ्यापथ्य  उलटी

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 15 September 2017

काही आजारांत उलटी होऊ शकते. काही खाल्ले तर उलटी होण्याची भीती वाटते; पण त्या भीतीपोटी खाल्लेच नाही, तर अशक्तपणा वाढतो. त्यामुळे अशा काळात काही पथ्य- अपथ्य लक्षात घेऊन आहार घ्यायला हवा. 

काही रोग असे असतात, ज्यांत काहीही खायची भीती वाटते, उदा. उलटी. खाल्ले आणि उलटी झाली तर? या भीतीने खाल्ले जात नाही, तर दुसऱ्या बाजूने शरीरशक्‍ती झपाट्याने कमी होत जाते. अशा वेळी आत्ययिक परिस्थिती उद्भवू शकते. आज आपण उलटी होत असली तर कधी व काय खावे याविषयी माहिती घेणार आहोत.

आमाशयोत्क्‍लेशभवा हि सर्वाच्छर्द्यो मता लंघनमेव तस्मात्‌ ।
....चरक चिकित्सास्थान

सर्व प्रकारच्या उलट्या आमाशयात (अन्न सेवन केल्यावर जेथे साठते तेथे) उत्क्‍लेश झाल्यानेच होतात, त्यामुळे उलटी होत असताना लंघन करणे आवश्‍यक होय. 

उलटी झाल्यावर लगेच काही खावेसे वाटत नाही. कधी कधी एकाहून अधिक उलट्या होतात. अशा वेळी जोपर्यंत मळमळते, पुन्हा उलटी होईल असे वाटते, तोपर्यंत खाण्याची इच्छा होत नाही. परंतु, पोटातील जडपणा कमी झाला, दोष उलटीमधून पडून गेले आहेत अशी भावना झाली, मळमळणे थांबले, की साळीच्या कोरड्या लाह्या चावून खाणे हे सर्वांत चांगले असते. कधी कधी पोटातील दोष निघून गेलेला असतो; पण उलटीचे आवेग मात्र येत राहतात. अशा वेळीसुद्धा पोट शांत होण्यासाठी साळीच्या लाह्या नुसत्या किंवा तुपावर परतून खाणे चांगले असते. 

वाताची उलटी असली म्हणजे वारंवार आवेग येत असतील, उलटीतून फारसे काही पडत नसेल, नुसते उमासे येत असतील तर, 

मुद्गामलकयूषं वा ससर्पिष्कं ससैन्धवम्‌ ।
...भैषज्य रत्नाकर

मूग आणि आवळा यांच्यापासून बनविलेल्या सुपामध्ये तूप आणि सैंधव मीठ मिसळून घेणे चांगले असते. 

पित्ताची उलटी असेल म्हणजे उलटीतून पिवळसर पित्त पडत असेल; तहान, दाह, वगैरे लक्षणे असतील तर,

पित्तात्मिकायां त्वनुलोमनार्थंद्राक्षाविदारीक्षुरसैः 
त्रिवृत्‌ स्यात्‌ ।
...भैषज्य रत्नाकर

मनुका खाव्यात, उसाचा रस प्यावा, शक्‍य झाल्यास उसाच्या रसाबरोबर निशोत्तराचे चूर्ण घ्यावे. 

उलटीमधून कफ पडत असेल, तर उलटीचे औषध देऊन कफ काढून टाकावा व नंतर मुगाच्या सुपाबरोबर साठेसाळी तांदळाचा भात खायला द्यावा. कधी कधी पोटात दोष फारच वाढलेले असले, तर उलट्या आणि जुलाब दोन्ही एकत्र होऊ लागतात. अशा वेळी शक्‍ती फार पटकन कमी होण्याची शक्‍यता असते. यावर भृष्टमूद्ग कषाय घ्यायला सांगितला आहे. 

कषायो भृष्टमुद्गस्य सलाजमधुशर्करः । छर्द्यतीसारतृङ्‌दाहज्वरघ्नः संप्रकाशितः ।। ...भैषज्य रत्नाकर
भाजून घेतलेल्या मुगाचा काढा करावा व त्यात साळीच्या लाह्या, मध व साखर मिसळून प्यावा. यामुळे उलट्या, जुलाब, तहान, हातापायांची आग-आग, ताप हे सर्वच त्रास बरे होतात. 

पित्तामुळे उलट्या होत असल्या तर 
पुढील उपाय सुचवले आहेत,

    मूग, पिंपळी, वाळा आणि धणे ही चार द्रव्ये कुटून घ्यावीत, सहापट पाण्यात रात्रभर भिजत ठेवावीत, सकाळी गाळून घेतलेले पाणी प्यायला द्यावे. 
    चणे कुटून घेऊन त्यात सहा पट पाणी मिसळून रात्रभर भिजवावे, सकाळी गाळून घेतलेले पाणी प्यायला द्यावे.
    उसाचा रस रात्रभर चांदण्यात ठेवावा व सकाळी गाळून घेऊन प्यायला द्यावा. 
    गाईचे दूध रात्रभर चांदण्यात ठेवावे व सकाळी प्यायला द्यावे.
 
कफामुळे उलट्या होत असल्या तर, 
जुने गहू, जुने तांदूळ, जुने यव ही धान्ये; पडवळ, चित्रकमूळ व गुळवेल यांच्या षडंगपानीय पद्धतीने बनविलेल्या पाण्यात शिजवावीत व तयार झालेले सूप प्यावे. 
सुंठ, मिरी, पिंपळी यांचे षडंगपानीय पद्धतीने बनविलेल्या पाण्यात गहू, तांदूळ, जव शिजवून बनविलेले सूप प्यावे. 
 गहू, तांदूळ, जव हे ताकात शिजवून तयार केलेल्या तुपात डाळिंबाचा रस व मिरीचे चूर्ण मिसळून प्यायला द्यावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diet