प्रकृतीनुरूप आहार

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 22 November 2019

जिवंत राहण्यासाठी, शरीराचे भरणपोषण होण्यासाठी अन्न लागतेच. जन्माला आल्या क्षणापासून ते शेवटचा श्वास घेईपर्यंत प्रत्येक मनुष्यप्राणी एवढेच नव्हे तर पक्षी, वनस्पती, अगदी एवढीशी किडा-मुंगीही अन्नाचाच शोध घेत असतात, अन्नासाठीच धडपड करत असतात, कारण प्राण हे आहाराधीन आहेत. अन्न फक्‍त पोट भरण्यासाठी नसते तर त्यामुळे अनेक गोष्टींचा लाभ होत असतो. 

आहार प्राणिमात्रांना तृप्त करतो, शरीरधारणेसाठी आवश्‍यक असतो, ताबडतोब बलवृद्धी करतो, तसेच स्मरणशक्‍ती, शरीरशक्‍ती, तेजस्विता, ओज, आयुष्य या गोष्टी आहारावरच अवलंबून असतात. शरीराचे सौंदर्य तसेच मनाचे औदार्य हेसुद्धा आहारातूनच वाढत असते. अर्थात, आहारातून हे सर्व परिणाम मिळण्यासाठी ‘आहारयोजना’ नीट करावी लागते. योजना न करताच केलेला आहार म्हणजे उपलब्ध असेल, जिभेला रुचत असेल, तेच खाण्याने रोगाला आमंत्रण मिळत असते. 

आहार हा जीवनाच्या तीन मूलभूत आधारस्तंभांपैकी पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा होय. 

‘अन्नं वृत्तिकराणां श्रेष्ठम्‌'' म्हणजे शरीराचे धारण करणाऱ्या पदार्थांत अन्न सर्वश्रेष्ठ असते. जिवंत राहण्यासाठी, शरीराचे भरणपोषण होण्यासाठी अन्न लागतेच. जन्माला आल्या क्षणापासून ते शेवटचा श्वास घेईपर्यंत प्रत्येक मनुष्यप्राणी एवढेच नव्हे तर पक्षी, वनस्पती, अगदी एवढीशी किडा-मुंगीही अन्नाचाच शोध घेत असतात, अन्नासाठीच धडपड करत असतात, कारण प्राण हे आहाराधीन आहेत. अन्न फक्‍त पोट भरण्यासाठी नसते तर त्यामुळे अनेक गोष्टींचा लाभ होत असतो. 

आहारः प्रीणनः सद्योबलवृद्धिकृद्‌ देहधारणः।
स्मृत्यायुः शक्‍तिवर्णौजः सत्त्वशोभाविवर्धनम्‌।।
...निघण्टुरत्नाकर

 

आहार प्राणिमात्रांना तृप्त करतो, शरीरधारणासाठी आवश्‍यक असतो, ताबडतोब बलवृद्धी करतो, तसेच स्मरणशक्‍ती, शरीरशक्‍ती, तेजस्विता, ओज, आयुष्य या गोष्टी आहारावरच अवलंबून असतात. शरीराचे सौंदर्य तसेच मनाचे औदार्य हेसुद्धा आहारातूनच वाढत असते. 

अर्थात आहारातून हे सर्व परिणाम मिळण्यासाठी ‘आहारयोजना'' नीट करावी लागते. योजना न करताच केलेला आहार म्हणजे उपलब्ध असेल, जिभेला रुचत असेल तेच खाण्याने रोगाला आमंत्रण मिळत असते. चरकसंहितेतील चिकित्सास्थानाच्या पहिल्याच अध्यायात सांगितले आहे, 

सर्वे शारीरदोषाः भवन्ति ग्राम्याहारात्‌ ।

सर्व दोष, सर्व रोग हे ग्राम्याहारातून उत्पन्न होत असतात. ग्राम म्हणजे गाव किंवा शहर. तेव्हा गावात किंवा शहरात सरसकट उपलब्ध असणाऱ्या किंवा सोयीपरत्वे, आवडीच्या म्हणून ज्या गोष्टी खाल्ल्या जातात त्या ग्राम्याहारात मोडतात आणि त्या रोगाला कारण ठरतात. ग्राम्याहारात त्या वेळी अंतर्भूत केलेल्या गोष्टी म्हणजे आंबट, खारट, तिखट पदार्थ, सुकवलेल्या भाज्या, सुकवलेले मांसाहारी पदार्थ, तिळाचे चूर्ण, मैद्यासारख्या पिठापासून बनविलेले पदार्थ, पाण्यात भिजवून मोड आणलेली धान्ये, एक वर्ष होण्यापूर्वी खाल्लेली धान्ये व कडधान्ये, रुक्ष पदार्थ, क्षारयुक्‍त पदार्थ, शरीरात गेल्यावर जलीय अंश वाढविणारे पदार्थ, शिळे पदार्थ वगैरे. म्हणजेच प्रकृती कोणतीही असो, ग्राम्याहारात उल्लेख केलेल्या गोष्टींपासून दूर राहणेच श्रेयस्कर. आज हजारो वर्षांनंतरही यातील बहुतेक सगळ्या गोष्टी आपल्या आहारात असतात, उलट यात अनेक गोष्टींची भर पडलेली दिसते. आरोग्य टिकवायचे असेल तर मात्र या सर्वांपासून दूर राहणेच चांगले. 

‘आत्मानं अभिसमीक्ष्य भुञ्जीत'' म्हणजे आपली प्रकृती समजून घेऊन त्यासाठी अनुकूल काय, प्रतिकूल काय हे लक्षात घेऊन त्यानुसार आहारयोजना करावी. 

‘व्यक्‍ती तितक्‍या प्रकृती" हे लक्षात घेतले तर हे काम तितकेसे सोपे नाही हे समजेल. यासाठी एकदा तज्ज्ञ वैद्यांना भेटून प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे उत्तम होय. या ठिकाणी आपण वात, पित्त आणि कफ या तीन प्रकृतींसाठी काय हितकर, काय अहितकर हे पाहू या. 

वातप्रकृती 
आकाश व वायू या तत्त्वांचा अधिक प्रभाव असल्याने या प्रकृतीच्या व्यक्‍तींनी आहार गरम व योग्य प्रमाणात, स्निग्धांश असणारा तसेच पचायला सोपा असा घेणे आवश्‍यक असते. सहसा मिळणाऱ्या आहारद्रव्यांपैकी काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्या वातप्रकृतीसाठी पथ्यकर असतात त्या अशा, 

धान्य : गहू, तांदूळ, ज्वारी, नाचणी
कडधान्य - मूग, उडीद, तूर, कुळीथ
फळभाज्या : दुधी, पडवळ, कोहळा, घोसाळे, दोडके, तांबडा भोपळा, परवर, भेंडी
पालेभाज्या : चाकवत, पालक, मेथी, चुका, तांदुळजा, अंबाडी, माठ
फळे : द्राक्षे, अंजीर, नारळ, केळे, बोर, सफरचंद, संत्री, मोसंबी, डाळिंब, आंबा, अननस, खरबूज, टरबूज
मसाल्याचे पदार्थ : हिंग, जिरे, मोहरी, धणे, बडीशेप, सैंधव, वेलची, मिरी, चिंच, लिंबू, आले, कांदा, लसूण, तीळ, केशर, कढीपत्ता, गवती चहा, पुदिना
दुधाचे पदार्थ : दूध, लोणी, ताक, तूप
इतर : खडीसाखर, गूळ, मध, लाह्या 

पित्तप्रकृती 
मुख्यत्वे अग्नितत्त्वाचा प्रभाव असल्याने या प्रकृतीच्या व्यक्‍तींनी आहार वेळेवर, शीतल गुणयुक्‍त, उचित स्निग्धांश असणारा घेणे आवश्‍यक असते. गोड, कडू आणि तुरट चवी पित्तप्रकृतीसाठी अनुकूल असतात. पाणी उकळलेले व नंतर सामान्य तापमानाचे झाल्यावर पिणे हितावह असते. 

धान्य : गहू, जव, तांदूळ, ज्वारी, नाचणी, राजगिरा
कडधान्य : मूग, मटकी, मसूर, तूर, हरभरा, चवळी
फळभाज्या : दुधी, पडवळ, कारले, कोहळा, घोसाळे, दोडके, तांबडा भोपळा, परवर, भेंडी, बटाटा, बीट, रताळी, मुळा
पालेभाज्या : चाकवत, पालक, तांदुळजा, माठ
फळे : गोड द्राक्षे, अंजीर, नारळ, केळे, सीताफळ, बोर, जांभूळ, सफरचंद, 

डाळिंब, आंबा, फणस, खरबूज, टरबूज, ऊस
मसाल्याचे पदार्थ : हळद, जिरे, धणे, सैंधव, वेलची, दालचिनी, तमालपत्र, लवंग, आमसूल, लिंबू, सुंठ, पांढरा कांदा, केशर, कढीपत्ता, गवती चहा, पुदिना
दुधाचे पदार्थ : दूध (सामान्य तापमानाचे), लोणी, ताक, तूप
इतर : खडीसाखर, मध (जुना), लाह्या 

कफप्रकृती 
जल व पृथ्वी या तत्त्वांचा प्रभाव असल्याने या प्रकृतीच्या व्यक्‍तींनी आहार गरम, उष्ण वीर्याने युक्‍त व प्रमाणात स्निग्धांश असणारा घेणे आवश्‍यक असते. पचण्यास सोपा आणि कमी प्रमाणात घेतलेला आहार कफप्रकृतीसाठी अनुकूल असतो. पाणी उकळलेले व गरम पिणे हितावह असते.

धान्य : जव, भाजून घेतलेले तांदूळ, बाजरी, नाचणी, भगर
कडधान्य : मूग, मटकी, मसूर, तूर, हरभरा, कुळीथ, वाटाणे, चवळी
फळभाज्या : दुधी, पडवळ, तोंडली, कारले, कोहळा, दोडके, तांबडा भोपळा, परवर, ढोबळी मिरची, भेंडी, सुरण, गाजर, बीट, मुळा
पालेभाज्या : चाकवत, पालक, मेथी, चुका, तांदुळजा, अंबाडी, माठ
फळे : द्राक्षे, अंजीर, जांभूळ, उकडलेले सफरचंद, संत्री, मोसंबी, डाळिंब
मसाल्याचे पदार्थ : हळद, हिंग, जिरे, मोहरी, धणे, बडीशेप, सैंधव, वेलची, दालचिनी, तमालपत्र, जायफळ, लवंग, ओवा, मिरी, आमसूल, लिंबू, आले, कांदा, लसूण, केशर, कढीपत्ता, गवती चहा, पुदिना 
दुधाचे पदार्थ : गरम दूध, तूप, ताक
इतर : खडीसाखर, गूळ, मध, लाह्या 

या प्रकारे आपापल्या प्रकृतीची माहिती घेऊन वात-पित्त किंवा पित्त-कफ, वात-कफ अशा मिश्रणानुरूप आहाराची योजना करणे आरोग्यदायी असते. मात्र आहार ठरविताना प्रकृतीखेरीज इतरही अनेक मुद्दे विचारात घ्यावे लागतात. 

मात्रा - आहारद्रव्य प्रकृतीसाठी अनुकूल असावे, पण योग्य मात्रेतही सेवन करायला हवे. उदा. स्वयंपाक करताना मीठ वापरावेच लागते, तसेच ते रुची वाढविणारे, पचनास मदत करणारे, मलप्रवृत्ती साफ होण्यास मदत करणारे असते, मात्र अति प्रमाणात खाल्ले तर शुक्रधातूला कमी करते, शक्‍तीचा ऱ्हास करते. 

काळ - कोणत्या ऋतूत काय खावे हे ऋतूचर्येत समजावलेले असतेच. त्याचा विचार न करता कधीही, काहीही खाल्ले तर एका ऋतूत पथ्यकर असणारी वस्तू दुसऱ्या ऋतूत अपथ्यकर ठरू शकते. उदा. मलई बर्फीसारखी मिठाई हेमंत ऋतूत खाल्ली तर तेव्हा अग्नी बलवान असल्याने नीट पचू शकते व धातूंचे पोषण करू शकते. मात्र हीच मलई बर्फी कफफ्रकृतीच्या व्यक्‍तीने शिशिर ऋतूत खाल्ली, तीसुद्धा आवडते म्हणून थोडी जास्तीच खाल्ली, तर त्यातून कफदोष तयार होऊ शकतो. आणि हीच बर्फी पावसाळ्यात, जेव्हा अग्नी मंद झालेला असतो, खाल्ली तर अपचनाला कारण ठरू शकते. 

क्रिया - आपली जीवनशैली व आपला व्यवसाय यावरसुद्धा काय खावे काय टाळावे हे ठरत असते. दिवसभर शेतात काम करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या व्यक्‍तीने जड अन्न खाल्ले तर ते त्याला पचू शकते, मात्र दिवसभर बसून असणाऱ्या व्यक्‍तीला ते अन्न अपचनाला कारण ठरू शकते. 

भूमी - त्या त्या देशात पथ्यकर काय, अपथ्यकर काय याच्या व्याख्या बदलतात. उदा. दक्षिण भारतात उष्णता जास्ती असल्याने तेथे थंड गुणाचे खोबरेल तेल स्वयंपाकात वापरले जाते, तर उत्तर भारतात थंडी अधिक असल्याने तेथे मोहरीचे तेल वापरता येते. रुचीपायी किंवा इतर कोणत्या कारणाने दक्षिण भारतात मोहरीचे तेल वापरले गेले तर ते अर्थातच अपथ्यकर ठरते. 

दोषाच्या भिन्न अवस्था - ऋतुमानाप्रमाणे तसेच दिवस व रात्रीच्या विभागानुसार शरीरात वात-पित्त-कफ दोषात चढ-उतार होत असतात. त्यानुसारही कधी काय खावे किंवा काय करावे हे ठरत असते. वेळ-काळाचे भान न ठेवता खाल्लेली वस्तू किंवा केलेली क्रिया ही अपथ्यकर ठरू शकते. उदा. दुपारी झोपण्याने कफ व पित्त दोष वाढत असल्याने दुपारची झोप अपथ्यकर असते, मात्र तीच झोप रात्री घेतली तर पथ्यकर असते. दुपारचे जेवण मध्याही जेव्हा पित्तदोष वाढलेला असतो तेव्हा केल्यास नीट पचते, मात्र ती वेळ उलटून गेल्यावर केलेले जेवण अपथ्यकर ठरते.

तेव्हा प्रकृती, वय, देश, हवामान, जीवनशैली या सर्व गोष्टींचा विचार करून आहारयोजना केली तर आहारच औषधाप्रमाणे काम करेल आणि अखंड आरोग्याचा अनुभव घेता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diet article written By Dr. balaji tambe