esakal | पथ्यापथ्य - जुलाब
sakal

बोलून बातमी शोधा

Diet diarrhea

पथ्यापथ्य - जुलाब

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

आजारावर औषध जितके महत्त्वाचे, तितकेच, किंबहुना काकणभर अधिक महत्त्वाचे असते पथ्य. औषधाला पथ्याची जोड म्हणजे जणू दुधात साखर असे म्हणायला हरकत नसावी. औषध वैद्यकीय सल्ल्याने घेतलेले असते, त्यामुळे ते वेळेवर व योग्य अनुपानाबरोबर वगैरे घेणे सोपे असते, मात्र आजारपणात "काय खावे' हा प्रश्न "आ' वासून उभा असतो. आयुर्वेदाने मात्र या प्रश्नाचेही सोपे उत्तर दिलेले आहे.

जुलाब होत असले तर जोवर ताकद चांगली आहे आणि भूक लागलेली नाही तोपर्यंत लंघन करणे उत्तम असते आणि जसजशी भूक लागेल तसतसे औषधी सिद्ध पाण्यात शिजवलेली पेज वगैरे पदार्थ घ्यायचे असतात, हे आपण मागच्या वेळी पाहिले. कढण, सूप, पातळ खिचडी वगैरे पदार्थ बनविताना त्यात चवीसाठी आले, जिरे, बडीशेप, डाळिंबाचे दाणे, धणे, सैंधव वगैरे द्रव्ये टाकता येतात. पोटात वायू धरला असेल, मुरडा किंवा पोटात दुखून जुलाब होत असले तर लोणी काढून टाकलेल्या गोड ताज्या ताकात जिरे, ओवा वगैरे मिसळून प्यायला देणे हितावह असते. भूक लागलेली असली तर साळीच्या लाह्या ताकाबरोबर खाता येतात.

जुलाबात पुढील विशेष पद्धतीने बनविलेले ताक घेण्याचा फायदा होतो. मातीच्या मडक्‍याला आतून उगाळून घेतलेल्या सुंठीचा लेप करावा व त्यात दूध विरजण्यास ठेवावे. सात-आठ तासांनंतर दही नीट लागले की रवीच्या मदतीने मडक्‍यातच दह्याचे ताक करावे व लोणी काढून घ्यावे. हे ताक जुलाब होणाऱ्या व्यक्‍तीला प्यायला द्यावे.
सशूल पिच्छमल्पाल्पं बहुशः सप्रवाहिकम्‌ । यूषेण मूलकानां तं बदराणामथापि ।।....चरक चिकित्सास्थान

ज्या जुलाबात आमाचा संबंध असतो व त्यामुळे जुलाब होताना वेदना होतात, वारंवार आवेसकट मलप्रवृत्ती होते, त्यात मुळा किंवा बोरापासून बनविलेल्या यूषाबरोबर तांदळाचा भात खाण्याचा उपयोग होतो. यूष बनविण्यासाठी मूळ द्रव्यांत सोळा पट पाणी मिसळून ते निम्मे किंवा एक चतुर्थांश शिल्लक राहीपर्यंत उकळायचे असते व गाळून घ्यायचे असते.
यवानां मुद्गमाषाणां शालीनां च तिलस्य च । कोलानां बालबिल्वानां धान्ययूषं प्रकल्पेत्‌ ।।....चरक चिकित्सास्थान

जव, मूग, उडीद, साठेसाळीचे तांदूळ, तीळ, बोर आणि अर्धवट पिकलेले बेलाचे फळ यांच्यापासून बनविलेले यूष जुलाबामध्ये योजावे. विशेषतः फार जुलाबामुळे पुरीषक्षय झालेला असताना हे यूष उपयोगी असते.
काही वेळा जुलाबासह रक्‍त पडते. यावर पुढील पथ्य सुचवलेले आहे,
तत्र च्छागं पयः शस्तं शीतं समधुशर्करम्‌ । ओदनं रक्‍तशालीनां पयसा तेन भोजयेत्‌ ।।....चरक चिकित्सास्थान

बकरीच्या थंड दुधात मध व साखर मिसळून त्यासह लाल रंगाच्या (रक्‍तसाळ) तांदळाचा भात खायला द्यावा.
द्राग्‌ भक्‍तं नवनीतं वा दद्यात्‌ समधुशर्करम्‌ ।

घरी बनविलेले ताजे लोणी त्यात मध व साखर मिसळून जेवणापूर्वी खायला द्यावे.
कवठाचा गरसुद्धा जुलाबामध्ये औषधाप्रमाणे उपयोगी असतो.
कपित्थमध्यं लीढ्‌वा तु सव्योषक्षौद्रशर्करम्‌ ।....चरक चिकित्सास्थान
चांगल्या प्रकारे पिकलेल्या कवठाचा गर, त्यात चवीप्रमाणे सुंठ, मिरी, पिंपळी, मध व साखर मिसळून खाण्याने रुग्ण अतिसारातून मुक्‍त होतो.

जुलाबात पथ्य - रक्‍तसाळ, साठेसाठीचे तांदूळ, ज्वारी, मूग, तूर, मसूर, केळफुलाची भाजी, चुका, कवठ, डाळिंब, जांभूळ, कमरख, लोणी काढलेले ताजे गोड ताक, घरी बनविलेले साजूक तूप, उकळलेले गरम वा कोमट पाणी, आले, धणे, जिरे, बडीशेप, सैंधव, सुंठ.

जुलाबात अपथ्य - मका, गहू, चणे, उडीद, वाल, वाटाणे, पावटे, पालक, मेथी वगैरे बहुतेक सगळ्या पालेभाज्या, शेवग्याच्या शेंगा, आंबा, अननस, स्ट्रॉबेरी वगैरे आंबट फळे, थंडगार तसेच न उकळलेले पाणी, सर्व प्रकारची कंदमुळे, लसूण, आंबवलेले पदार्थ, क्षार (पापडखार वगैरे) अति प्रमाणात मीठ, अंडी, मांसाहार वगैरे.