वजन नको, पण व्यक्‍तिमत्त्व वाढवा

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 17 November 2017

त्रिदोष समत्वात असतील, शरीरातील अग्नीची रासायनिक क्रिया (संप्रेरकांचे कार्य) व्यवस्थित चालू असेल, सर्व धातू त्या त्या जागी योग्य प्रमाणात असतील, स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देणारे असाल, मन हेवे-दावे, निंदा-नालस्ती न करणारे, तसेच सर्वांभूती समाभावाचा व प्रेमभावाचा अनुभव घेणारे असेल, तर त्याच्या ठायी समत्व असेल. ज्याच्या ठायी असे समत्व असेल त्याला जाड-बारीक असण्याचा फार विचार करायचे कारण नाही.

माणसाचे एकूण व्यक्‍तिमत्त्व त्याच्या रंगरूपावर, म्हणजेच आकार व तेजावर अवलंबून असते. आपण पाहतोच, की माणसाची उंची ही त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाची उंचीही वाढवते. उंच माणसाचा प्रभाव पडतो. अति बुटक्‍या व्यक्‍तीकडे बहुतेक वेळा वेगळ्या कुतूहलाने पाहिले जाते. विशेष बुटके (पिग्मी) असणाऱ्यांना सर्कसमध्ये विदूषकाची कामे मिळतात; किंवा पायाला लाकूड लावून अति उंच केलेला विदूषक हे त्याची उंची व जाडी यांच्या असमानतेतून तयार करण्यात आलेले रंजन असते. 

वाताची माणसे साधारणतः अति उंच असतात किंवा अति बुटकी आणि सडसडीत शरीरयष्टीची असतात. पित्ताची माणसे साधारणतः मध्यम आकाराची व सम शरीरयष्टीची असतात. कफप्रकृतीची माणसे साधारणतः रुंद ठेवणीची म्हणजे जाड असतात. वाताची असो, पित्ताची असो वा कफाची असो, एक गोष्ट नक्की, की व्यक्‍तीचे तेज तिच्या व्यक्‍तिमत्त्वाला मदत करते. डोळे पाणीदार व तेजस्वी हवेतच, परंतु ते प्रत्येकाला मिळतीलच असे नसते. शरीराचे आकर्षण मांस धातू व योग्य जागी असलेल्या कफामुळे असते. ज्यांचा मांसधातू कमी असल्यामुळे आतली हाडे दिसत असतात व जे किडकिडीत दिसत असतात, अशा व्यक्‍तीही बरेच दिवस मी अगदी सडसडीत आहे, माझ्या अंगावर मुळीच मेद नाही अशा भ्रमात असतात. ‘मला वजन वाढवायचे आहे’ असे म्हणणारी माणसे विरळच असतात. संपूर्ण जग हे माझे वजन कमी कसे होईल या विवंचनेत असते. अर्थात, वजन कमी करण्याच्या नादात शरीराचा डौल व घाट बदलतो आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही. शरीराला असलेला सुंदर आकार हा मांसामुळे असतो आणि कफप्रकृतीच्या व्यक्‍तीमध्ये कफाचे व्यवस्थित समत्व असले तर ती व्यक्‍ती आकर्षक असते. शरीर डौलदार, घाटदार असल्यास म्हणजे शरीराचे निरनिराळे गोलावे शरीरात जागच्या जागी असल्यास ते व्यक्‍तिमत्त्व आकर्षक ठरते. व्यक्‍ती कितीही बारीक असली, पण तिचे सर्व बाजूंनी आकार व गोलाकार व्यवस्थित असतील तर ती हास्याचा विषय ठरत नाही. काटकपणा व किडकिडीतपणा यातही फरक असतो. व्यक्‍ती बारीक असली, पण काटक असली, शरीर लोखंडाच्या कांबीसारखे मजबूत असले, त्वचा तेजस्वी असली, डोळे पाणीदार असले तर तिचे फारसे काही बिघडत नाही. वातदोषामुळे किडकिडीतपणा, वाताचे विरळ केस, निस्तेज डोळे, रुक्ष त्वचा, तेजोहीन कांती, ताकदीचा अभाव असला तर तो आरोग्याच्या दृष्टीने चांगला नाही. अशा व्यक्‍तीने जाड व्हायचे म्हटले तर वातदोषावर इलाज करून पुन्हा आकर्षक शरीर मिळवता येऊ शकते. 

प्रत्येक व्यक्‍ती लहानपणी थोडी बाळसेदार असते, कारण बालपणात शरीर वाढते असते. वयाच्या बारा-तेरा वर्षांनंतर शरीराची ठेवण तयार होत असते. चाळिशी येईपर्यंत जर शरीर सडसडीत राहिले व कुठलाही त्रास न होता शरीराचे आरोग्य सांभाळले गेले तर काहीच अडचण नसते. कोणीही उगाच जाड वा बारीक होण्याच्या मागे लागू नये. वय वाढल्यानंतर एकंदर वजन वा शरीराचे काही आकार वाढतातच. चरबी (मेद) अति वाढू नये, असंतुलित होऊ नये, थुलथुलीत होऊन लोंबायला लागू नये इकडे लक्ष देणे आवश्‍यक असते. चरबीशिवाय (फॅटशिवाय) शरीर नीट राहणारही नाही. वजन प्रमाणाबाहेर वाढू नये हे निश्‍चित. अमुक उंचीला, अमुक वजन पाहिजे असे पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे ठोकताळे बांधलेले असतात, परंतु यात वयाचा व प्रकृतीचा विचार केला नाही तर हे गणित कधीच बरोबर येणार नाही. तसेच स्त्रीच्या बाबतीत प्रसूतीनंतर तिच्या शरीरात होणारे बदल गृहीत धरावे लागतात. ते न धरता मला बारीक व्हायचे आहे किंवा मला जाड व्हायचे आहे असा अट्टहास धरण्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

समदोषः समाग्निश्‍च समधातुमलक्रियः। 
प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थमित्यभिधीयते ।। 

असे आयुर्वेदात म्हटलेले आहे. याचा अर्थ असा, की त्रिदोष समत्वात असावेत, शरीरातील अग्नीची रासायनिक क्रिया (संप्रेरकांचे कार्य) व्यवस्थित चालू असावी, सर्व धातू समत्वात (समत्वात म्हणजे सारख्या प्रमाणात असे नव्हे, तर त्या त्या जागी त्या त्या धातूचे प्रमाण योग्य असणे) असावे, मनुष्य हसतमुख असावा (स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देणारा), मन हेवे-दावे, निंदा-नालस्ती न करणारे तसेच सर्वांभूती समाभावाचा व प्रेमभावाचा अनुभव घेणारे असावे अशी आरोग्याची व्याख्या केलेली आहे. ज्याच्या ठायी असे समत्व असेल त्याला जाड-बारीक असण्याचा फार विचार करायचे कारण नाही. व्यक्‍ती आपल्या शरीराला मानवेल ते खाणारी असेल; लवकर उठणे, लवकर झोपणे असा विहार करणारी असेल; श्रद्धा वाढविण्यासाठी ध्यान-धारणेचा अवलंब करत असेल; प्रेमभावना जोपासणे, दुसऱ्याला मदत करणे, आपल्याला आवश्‍यक असणारे चार पैसे कमवत असताना दोघांचाही फायदा (विन-विन) विचारात घेऊन काम करणे अशा विचारांची असेल तर रंगरूपापेक्षा एकूण व्यक्‍तिमत्त्वाची छाप जास्त पडू शकते आणि जीवनाचा जास्तीत जास्त आनंद घेऊन जन्माची इतिकर्तव्यता अनुभवता येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not want weight increase the personality