दिवस डॉक्‍टरांचा

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Tuesday, 2 April 2019

रोगांचे स्वरूप यथार्थाने समजून घेणे व त्यानुसार तो रोग दूर करण्यासाठी, रुग्णाचे दुःख दूर करण्यासाठी योग्य उपचार करणे वैद्याच्या हातात आहे, तो रुग्णाच्या आयुष्याचा स्वामी नाही. रुग्ण व वैद्य यांच्यामध्ये ग्राहक व व्यापारी असे नाते असत नाही. वैद्यांनी जसे प्रेमाने, आपल्या परीने उत्तमोत्तम उपचार करायचे, तसेच रुग्णानेही वैद्यांवर, वैद्यांनी केलेल्या उपचारांवर विश्वास ठेवायला पाहिजे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे वैद्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करायची तयारी ठेवायला पाहिजे. 

‘फॅमिली डॉक्‍टर’ हा कुटुंबाचा जणू एक अविभाज्य भाग असतो. अनेकदा घरातील व्यक्‍तींशी जे विषय बोलण्यात संकोच वाटू शकतो, असे अवघड विषयही फॅमिली डॉक्‍टरला सहज सांगता येतात. सध्याच्या मल्टिस्पेशालिटीच्या जमान्यातही अनेक ‘फॅमिली डॉक्‍टर’ स्वतःची ओळख टिकवून आहेत. ‘डॉक्‍टर, तुम्हाला नुसते भेटले, सगळ्या तक्रारी नुसत्या सांगितल्या, की तेवढ्यानेच बरे वाटायला लागले’ हे शब्द अनेक डॉक्‍टरांनी ऐकलेले असतात. नुसत्या भेटीनेही आश्वस्त करणाऱ्या अशा डॉक्‍टरांना धन्यवाद म्हणण्याचा दिवस म्हणजे ‘जागतिक डॉक्‍टर डे’. डॉक्‍टर किंवा वैद्य आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाचे नाते नेमके कसे असते, ते कसे टिकवायचे हे पाहूया.

उपचार कुठलाही असो, रोगनिवारणासाठी करायचा असो किंवा आरोग्यरक्षणासाठी योजायचा असो, यासाठी चार मुख्य आधारस्तंभ आवश्‍यक असतात. आयुर्वेदात याला चिकित्सा चतुष्पाद असे म्हटलेले आहे. पहिला स्वतः वैद्य, दुसरे औषध, तिसरा परिचारक आणि चौथा रुग्ण. यामध्ये वैद्यांचा क्रमांक पहिला येतो, कारण कोणते औषध, किती प्रमाणात, कधी, किती दिवस द्यायचे हे वैद्य ठरवतात, तसेच परिचारकाने रुग्णावर काय उपचार करायचे हेही वैद्यच सांगतात. तरीही या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, की जर रुग्णच नसला तर बाकीचे तिन्ही आधारस्तंभ निरुपयोगी ठरतात. म्हणूनच योग्य उपचार करण्यामध्ये वैद्यांचे जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व रुग्णाला आहे.

वैद्य, रुग्ण, औषध, परिचारक या सर्वांचा मुख्य उद्देश असतो रुग्णाला बरे करणे. वैद्यांनी अगदी शंभर टक्के परिपूर्ण उपचारांची योजना केली तरी फक्‍त त्यामुळेच संपूर्ण गुण येईल असे नाही, उलट वैद्यांनी घ्यायला सांगितलेली काळजी, पथ्य, अनुशासन यांचे योग्य प्रकारे पालन करणारा रुग्णच उपचार यशस्वी होण्यास महत्त्वाचे योगदान देत असतो. 

मुळात आयुर्वेदशास्त्र पृथ्वीतलावर आले ते प्राणिमात्रांचे कष्ट दूर करून त्यांना मदत करण्यासाठी. ज्याच्याशी खरी मैत्री असते, ज्याच्याविषयी अनुकंपा वाटत असते, त्याच्यासाठी वेळप्रसंगी स्वतःच्या सुख, आरामाकडे दुर्लक्ष करण्याचीही तयारी असावी लागते. वैद्यांकडे वा डॉक्‍टरांकडे ज्ञान तर असतेच, पण त्याचबरोबरीने आपल्याकडे असलेल्या ज्ञानामुळे रुग्णाचे कष्ट, रुग्णाचा रोग दूर होईल ही भावना असणेही आवश्‍यक असते हे या सूत्रातून समजते. 

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाचे यथायोग्य पालन करणे हे मनुष्यजन्माचे ईप्सित मानले जाते व या चारही गोष्टी आरोग्याशिवाय मिळवता येत नाहीत. त्यामुळे आरोग्यदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. दान आणि व्यापार यात जसा फरक आहे तसाच फरक इतर नात्यात आणि वैद्य-रुग्ण या नात्यात आहे. व्यापारामध्ये देवघेव असते, सरळठोक व्यवहार असतो. रुग्ण व वैद्य यांच्यामध्ये मात्र फक्‍त ग्राहक व व्यापारी असे नाते असत नाही. वैद्यांनी जसे प्रेमाने, आपल्यापरीने उत्तमोत्तम उपचार करायचे, तसेच रुग्णानेही वैद्यांवर, वैद्यांनी केलेल्या उपचारांवर विश्वास ठेवायला पाहिजे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे वैद्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करायची तयारी ठेवायला पाहिजे. 

रुग्ण कसा असावा याचेही विवेचन आयुर्वेदाने केलेले आहे, 

स्मृतिनिर्देशकारित्वमभीरुत्वमथापि च ।
ज्ञापकत्वं च रोगाणामातुरस्य गुणाः स्मृताः ।।
...चरक 

रुग्णाची स्मरणशक्‍ती चांगली असावी, कारण कशामुळे त्रास झाला, काय केल्यावर बरे वाटले हे रुग्णाच्या लक्षात राहिले तर तो वैद्यांना तसे सांगू शकतो. तसेच त्यानुसार स्वतःच्या आहार-आचरणात बदल करू शकतो. 
रुग्णामध्ये असावा असा दुसरा गुण म्हणजे वैद्यांच्या आज्ञेचे पालन करण्याची प्रवृत्ती असणे. वैद्यांनी सांगितलेली खाण्या-पिण्याची पथ्ये, आचरणात करावयाचे बदल किंवा अंगाला तेल लावणे, वेळेवर नियमितपणे औषधे घेणे यांसारख्या गोष्टी रुग्णाने मनापासून पाळणेही अत्यावश्‍यक असते. 

तिसरी आवश्‍यक गोष्ट म्हणजे रुग्णाने निर्भय असावे. ‘विषादे रोगवर्धनम्‌’ म्हणजे विषाद, चिंता, दुःखी अवस्था रोग वाढविण्यास कारणीभूत ठरते. म्हणूनच रुग्णाने मनाचा धीर कायम ठेवावा, मनाची उमेद जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत रोग बरा होण्याची शक्‍यता सर्वाधिक असते. 

रुग्णामध्ये असायला हवा असा चौथा गुण म्हणजे स्वतःला होत असलेल्या त्रासाचे, रोगाच्या अवस्थेचे वैद्यांना यथायोग्य निरूपण करणे. काही रुग्ण होत असलेल्या त्रासाचे एवढे मोठे अवडंबर माजवतात की वैद्यांना उपचाराची योग्य दिशा मिळू शकत नाही. याउलट काही सोशिक रुग्ण होत असलेला त्रासही वैद्यांना सांगत नाहीत. अर्थात, कोणता रुग्ण कसा आहे आणि त्याने सांगितलेल्या कोणत्या गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या हे अनुभवाने वैद्यांनाही समजत असले, तरी स्वतःहून योग्यरीतीने आपली स्थिती सांगणारा रुग्ण उत्तम असतो. 

वैद्याने उपचार करण्यात कधीही मागे राहू नये, असे आयुर्वेद शास्त्र सांगते. 
क्वचित्‌ धर्म क्वचित्‌ मैत्री क्वचित्‌ अर्थ क्वचित्‌ यशः ।
कर्माभ्यासं क्वचित्‌ चेति चिकित्सा नास्ति निष्फला ।।

उपचार करण्याने कधी कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधान मिळते, कधी मैत्री होते, कधी पैसा मिळतो, कधी यश मिळते, कधी यातील काही जमले नाही तरी अनुभव गाठीशी येतो. थोडक्‍यात सांगायचे म्हणजे उपचार कधीच निष्फळ जात नाहीत.

चिकित्सा सिद्ध होण्यासाठी वैद्याला औषधांची, परिचारकाची आवश्‍यकता असली तरी यात वैद्य महत्त्वाचे असतात.

विज्ञाता शासिता योक्‍ता प्रधानं भिषगत्र तु ।
...चरक सूत्रस्थान

कारण औषधाचे ज्ञान असणारे, परिचारकाकडून कार्य करून घेणारे व रुग्णाच्या एकंदर स्थितीचा विचार करून उपचारांची योजना करणारे वैद्यच असतात आणि म्हणून ते प्रधान, मुख्य असतात. याखेरीज वैद्याने कसे असावे हे चरकाचार्य याप्रमाणे सांगतात, 
मैत्री कारुण्यमार्तेषु शक्‍ये प्रीतिरुपेक्षणम्‌ ।
प्रकृतिस्थेषु भूतेषु वैद्यवृत्तिश्‍चतुर्विधा ।।
...चरक सूत्रस्थान

मैत्री - वैद्याने सर्वांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करावा.

कारुण्यं आर्तेषु - रुग्णाचे दुःख, कष्ट शक्‍य तितक्‍या लवकर दूर करण्याची इच्छा असावी.
शक्‍ये प्रीती - जे रोग साध्य आहेत त्यांच्यावर प्रेमपूर्वक व काळजीपूर्वक उपचार करावेत. 

उपेक्षणम्‌ - मृत्युदर्शक लक्षणे दिसत असणाऱ्या रोगाची उपेक्षा करावी. या ठिकाणी उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष असा अर्थ अभिप्रेत नाही, तर आपण केलेल्या उपचारांनी रुग्ण बरा होईल असा नावदेखला दावा वैद्याने करू नये. रुग्णाला होता होईल तेवढी मदत करतील, रुग्णाचे दुःख, कष्ट कमी करण्यासाठी उपयुक्‍त ठरतील असे उपचार वैद्याने अवश्‍य करावेत. 
आयुर्वेदात एक श्‍लोक दिलेला आहे, 

यावत्कण्ठगतप्राणस्तावत्कार्या प्रतिक्रिया । 
कदाचित्‌ दैवयोगेन दृष्टरिष्टोऽपि जीवति ।।
...योगरत्नाकर

जोपर्यंत रुग्णाच्या कंठात प्राण आहेत तोपर्यंत वैद्याने औषधादी उपचार करत राहावेत कारण कधी कधी दैवयोगाने अरिष्ट (मृत्युसूचक) लक्षणे दिसत असलेला रुग्णही बरा होताना दिसतो.
थोडक्‍यात, कितीही वाईट, अवघड स्थिती असली तरी वैद्याने डगमगून न जाता शक्‍य ते सर्व उपचार करणे आयुर्वेदाला अपेक्षित आहे. मात्र बरोबरीने आयुर्वेद हेही सांगतो, 

व्याधेस्तत्त्वपरिज्ञानं वेदनायाश्‍च संग्रहः । 
एतद्‌ वैद्यस्य वैद्यत्वं न वैद्यः प्रभुरायुषः ।।

रोगांचे स्वरूप यथार्थाने समजून घेणे व त्यानुसार तो रोग दूर करण्यासाठी, रुग्णाचे दुःख दूर करण्यासाठी योग्य उपचार करणे वैद्याच्या हातात आहे, तो रुग्णाच्या आयुष्याचा स्वामी नाही.  
अशा प्रकारे वैद्य आणि रुग्ण या दोघांनी आपापल्या वाट्याचे कर्तव्य पार पाडले तर दोघांमधील विश्वासाचे नातेही कायम राहीलच, बरोबरीने आरोग्य टिकवणे, मिळवणे हे सुद्धा सहज शक्‍य होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor Day