नेत्ररुपी उरावे! 

 Donate Eyes
Donate Eyes

मृत्यूनंतरही हे सुंदर जग आपण पाहू शकतो. स्वेच्छेने केलेले नेत्रदान आपल्या मृत्यूनंतर जिवंत व्यक्तींना डोळस बनवू शकते. परंतु आजही ही चळवळ अंधांचे अश्रू पुसण्यासाठी फारच अपुरी आहे. जितक्या प्रमाणात नेत्रदान व्हावयास हवे तितकी जागृती आजही आपल्या समाजात झालेली नाही. म्हणूनच २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत भारतात ‘नेत्रदान पंधरवडा़’ मानून विशेष जागृती केली जाते. 

‘मरावे परी कीर्ती रुपे उरावे,’ किती सार्थ आहे ही म्हण! आपल्या भारतीय संस्कृतीत दान देण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यांच्याकडे ज्या वस्तूची कमतरता आहे अशा व्यक्तीस आपल्याजवळील ती वस्तू दान देण्यात जे आत्मिक समाधान लाभते त्याची कल्पना करता येणार नाही. जुन्या काळी राजे, श्रीमंत वगैरे धन, कपडे, अन्नदान करीत असत व गरीब लोकांचा दुवा घेत. आजच्या युगात लोकांचा जीव वाचविण्यासाठी ‘रक्तदान’, अंध लोकांना दृष्टी प्राप्त होण्याठी ‘नेत्रदान’, गरजू व्यक्तीस यकृतदान, मूत्रपिंडदान, हृदयदान, एकूणच अवयवदान आणि वैद्यकीय ज्ञानासाठी व संशोधनासाठी मरणोत्तर ‘देहदान’ या नवीन संकल्पना रुढ होत आहेत. याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत दान करून पुण्य मिळते अशी एक भावना आहे. कुणातरी गरजू रुग्णास अवयव दान करण्यास काही श्रीमंत किंवा राजा व्हायची गरज नाही. कोणीही सामान्य व्यक्ती धर्म, लिंग, वर्ण भेद न ठेवता हे सत्कार्य करू शकतो व मानवतेची मूल्ये राखू शकतो. 

 

जगातील आठ कोटी अंध व्यक्तींपैकी जवळपास पंचवीस टक्के अंध व्यक्ती भारतात आहेत. कुपोषण, ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव, डोळ्यात कचरा अथवा रसायने गेल्यामुळे, गोवर, कांजण्या किंवा इतर अन्य कारणांमुळे टीक पडून लहान वयात अथवा तारुण्यात दृष्टी गमावलेल्या रुग्णांची संख्या पंचवीस लाखांपर्यंत आहे. यास कॉर्निआ ओपेसिटी म्हणजे टीक अथवा फूल पडणे असे म्हणतात. अशा व्यक्तीच्या आयुष्यासमोर किर्रर्र काळोख पसरलेला असतो. सभोवतालच्या जगाचा रंगीबेरंगी आस्वाद घेण्याचे भाग्य नसते. पदोपदी ठेचकाळत निराशेच्या अंधारात हा रुग्ण वाटचाल करीत असतो. यातील बऱ्‍याच नेत्ररुग्णांना बुबुळावरील पांढरे आवरण नसते. त्याची शस्त्रक्रिया करून जर त्या जागी निरोगी पारदर्शक बुबळ बसवण्यात आले तर गेलेली दृष्टी बऱ्‍याच अंशी परत लाभू शकते. 
 

अमेरिकेत १९२४ मध्ये अशी कल्पना सुचली व ती यशस्वी झाली आणि अंध:कारात एका प्रकाशाचा झोत आला. या शस्त्रक्रियेस ‘नेत्ररोपण’ असे म्हणतात. मृत व्यक्तीने स्वेच्छेने केलेले नेत्रदान जिवंत व्यक्तींना डोळस बनवू लागले. परंतु दुर्दैवाने आजही ही चळवळ अंधाचे अश्रू पुसण्यासाठी फारच अपुरी आहे. ज्या प्रमाणात नेत्रदान व्हावयास हवे तितकी जागृती आजही आपल्या समाजात झालेली नाही. भारतामध्ये दर वर्षी एक लाख डोळ्यांची गरज भासते, परंतू फक्त पन्नास हजार डोळे नेत्रदानामुळे उपलब्ध होतात. आज श्रीलंकेसारख्या देशात मरणोत्तर डोळे काढून घेण्याचा अधिकार सरकारचा आहे. म्हणून श्रीलंका हा देश स्वत:ची गरज पूर्ण करून संपूर्ण जगात अतिरिक्त डोळे उपलब्ध करून देतो. 

नेत्रदान म्हणजे काय? 
कुणाही व्यक्तीने स्वेच्छेने मृत्यूनंतर आपले डोळे काढून कुणाही परिचित किंवा अपरिचित व्यक्तीला दृष्टी मिळावी म्हणून अथवा संशोधनासाठी वापरावयास देणे म्हणजे नेत्रदान होय. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींना दृष्टी लाभ होतो. 

 

नेत्रदान कोण करू शकतो? 
कुणीही. कोणत्याही जाती-धर्मातील, वंश-वर्णातील, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, लहान-मोठा यापैकी कोणीही मरणोत्तर नेत्रदान करू शकतो. वय साधारण एक वर्षापुढे ते सुमारे सत्तर-ऐंशी वर्षापर्यंतच्या व्यक्तीचे डोळे अंध व्यक्तीस दृष्टी देऊ शकतात. 

 

कोणाचे नेत्रदान स्वीकारता येत नाही? 
मृत व्यक्तीला जर कावीळ, कर्करोग, एड्स, डोळ्यास पूर्वी काही शस्त्रक्रिया झाली असल्यास किंवा बुडून मृत्यू आल्यास, गळफास घेतला असल्यास अशा मृत व्यक्तीचे डोळे स्वीकारता येत नाहीत. म्हणून रुग्णांचे मृत्यू निदान डोळे काढण्यापूर्वी होणे आवश्यक आहे. 

 

नेत्रदान कसे करावे? 
आपण मरणोत्तर नेत्रदान करू इच्छिता याची आपल्या नातेवाइकांना माहिती द्यावी व आवश्यक ते फॉर्मस् जवळच्या नेत्रपेढीत भरून द्यावेत. असे इच्छापत्र भरलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याच्या जवळच्या नातेवाइकांनी लगेच मृत्यूकारणमीमांसा करून घ्यावी व जवळच्या नेत्रपेढीस कळवावे 

 

मृत व्यक्तीचे डोळे बंद करून त्यावर बर्फाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. अधूनमधून अँटिबायोटिक औषधांचे थेंब डोळ्यात टाकावेत. खोलीतील पंखे बंद करावेत, यामुळे डोळे वाळणार नाहीत. 
 

नेत्रपेढी म्हणजे काय? 
नेत्रपेढी (आय बँक) ही एक समाजसेवी संस्था असून, ती नेत्रदान केले असल्यास मरणोत्तर डोळे काढून घेते व त्यांची जपणूक करून गरजू रुग्णांना डोळे उपलब्ध करून देते. नेत्रदाता व गरजू रुग्ण यांची सूची तयार करणे, संपर्क साधणे, नेत्रदान घडवून आणणे व मिळालेल्या डोळ्याचा सांभाळ करणे व ते गरजूंना उपलब्ध करून देणे, नेत्रदानाबाबत चळवळ चालवणे, विविध संशोधन करणे इत्यादी प्रमुख कार्ये या संस्थेत केली जातात. 

 

मृत्यूनंतर किती वेळात डोळे काढावेत? 
मृत्यूनंतर साधारण चार ते सहा तासांत डोळे काढून योग्यरीत्या जपावे लागतात. 

 

अशा डोळ्यांचे ‘रोपण’ किती वेळेच्या आत करावे? 
साधारणपणे २४ ते ४८ तासांत नेत्ररोपण करणे सर्वात योग्य असते. परंतु काही कल्चर मीडिया, लिक्विड नायट्रोजन व अन्य रासायनिक प्रक्रियेमुळे महिना दोन महिनेदेखील असे डोळे सांभाळून नंतर वापरता येतात. काढलेला डोळा हा संपूर्ण कधीच बसविला जात नाही, त्यातील बुबुळाचा भागच फक्त बदलला जातो. 

 

अशा किती शस्त्रक्रिया यशस्वी होतात? 
सर्व गोष्टी योग्य प्रकारे घडल्यावर सर्वसाधारण सत्तर टक्के शस्त्रक्रिया यशस्वी होतात. जर दाता व गरजू दोन्हीही तरुण असल्यास आणि डोळे काढणे व शस्त्रक्रिया यात जास्त वेळ गेला नसेल तर यशस्वितेचे प्रमाण सर्वाधिक असते. जर दाता व गरजू यांच्या पेशी एकमेकास अनुरुप न झाल्यास अशा शस्त्रक्रिया अयशस्वी होऊ शकतात. 

 

बुबुळावर टीक पडून अंधत्व येणे लहान मुलांत, तरुणांमध्ये, काम करणाऱ्या वर्गात विशेषत्वाने आढळून येते. भारतात सुमारे पंचवीस लाख लोकांमध्ये ह्या प्रकारच्या अंधत्वाचे कारण आढळते. जगात सर्वात जास्त अंध व्यक्ती भारतात राहतात. पंचवीस लाख गरजू आणि नेत्रदान फक्त ३५ ते ४० हजार हे फारच व्यस्त प्रमाण आहे. अंधश्रद्धा व अज्ञान यामुळे नेत्रदानाचे प्रमाण भारतात कमी आहे. श्रीलंका ह्या आपल्या शेजारील छोट्याशा देशाकडे आपण पाहायला हवे. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात नेत्रदान होते, आपली गरज भागवून जगातील अनेक देशांना श्रीलंकेतून डोळे निर्यात करण्यात येतात. भारतात जैन समाजात नेत्रदानाचे प्रमाण सर्वात जास्त आहे, त्याचे इतरांनी अनुकरण करणे गरजेचे आहे. 
 

भारतामध्ये नेत्रपेढीच्या संख्येत वाढ व्हायला हवी. या सुविधा अतिशय अपुऱ्या आहेत. आता नेत्रदान केलेल्या बुबुळाचे वेगवेगळे भाग दोन किंवा अधिक अंध व्यक्तींना वापरता येतात. यावर जगात मोठ्या प्रमाणत संशोधन चालू आहे. भारतात याचे प्रमाण कमी आहे. नेत्रपेढ्या उभारण्यासाठी मोठा खर्च येतो. त्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढे यायला हवे. सरकारनेही आर्थिक मदत करायला हवी. गरिबांमध्ये डोळ्यात फूल पडून अंध होण्याचे प्रमाण अधिक आहे. शस्त्रक्रियेचा खर्च त्यांना झेपत नाही. सरकारने यासाठी आर्थिक मदत करायला हवी, तरच व्यापक प्रमाणात ही मोहीम राबविता येईल. 

नगरमध्ये सर्वाधिक नेत्रदान 
नगर शहरात सुमारे वीस वर्षांपूर्वी मान कन्हय्या नेत्रपेढीची स्थापना साईसूर्य नेत्रसेवा या संस्थेत झाली. नगरकरांनी नेत्रदानाची चळवळ अतिशय प्रभावीपणे राबविली. यासाठी अनेक सामाजिक संघटना, वैद्यक व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, वर्तमानपत्रे, तरुण मंडळे पुढे आली आणि आज महाराष्ट्रात सर्वात जास्त नेत्रदान नगरसारख्या छोट्या गावात होते हे निश्‍चितच दिलासा देणारे आहे. मागील वीस वर्षांत येथे सुमारे अडीच हजार नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 

 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com