परीक्षा स्मरणशक्तीची

डॉ. आरती दिनकर
Sunday, 3 February 2019

परीक्षा जवळ आली आहे आणि स्मरणशक्तीच परीक्षा घेऊ लागली आहे, असे काही वेळा होते. अशा वेळी काय कराल?

स्मरणशक्तीमध्ये चार प्रकार पाहायला मिळतात.
आयमेमरी किंवा व्हिज्युअल मेमरी किंवा    
फोटोग्राफिक मेमरी
इअर किंवा ऑडियल मेमरी
मोटर किंवा मसल मेमरी    लॉजिकल मेमरी.

पहिल्या आयमेमरी किंवा व्हिज्युअल मेमरी किंवा फोटोग्राफिक मेमरीमध्ये वाचलेले लक्षात राहते,  पण ते फक्त मनात. म्हणजेच आयमेमरीमध्ये वाचलेले सांगू शकत नाहीत. बोलून दाखवू शकत नाहीत. यात लोकांचे चेहरे लक्षात राहतात, पण नावे लक्षात राहत नाहीत. मात्र, जे बघितलेले आहे ते त्यांच्या लक्षात राहते. मग ते पुस्तकातील पान क्रमांकही लक्षात ठेवतील. 

इअर किंवा ऑडियल मेमरीमध्ये मोठ्याने वाचलेले लक्षात राहते. शांततेने वाचून लक्षात राहत नाही. चेहरे व नावे लक्षात राहत नाहीत. पण, दुसरे कुणी वाचून दाखवत असले, तर ते चांगल्या प्रकारे लक्षात राहते. अशी स्मरणशक्ती असलेल्या व्यक्ती जे ऐकले त्याचा आलेख तयार करतात व मेंदूमध्ये नोंदवतात.   

मोटर किंवा मसल मेमरी असलेल्यांच्या लिहून किंवा हालचाली करून लक्षात राहते, पण अभ्यास करताना, वाचताना ते स्वस्थ बसत नाहीत. सतत काही तरी करीत असतात. पेनाशी खेळत बसतील. इकडून तिकडे फेऱ्या मारून वाचतील. यांचे चालून-फिरून लक्षात राहते. हालचाल केल्याने मोटर किंवा मसल मेमरी असलेल्या मुलांच्या लक्षात राहते आणि लॉजिकल मेमरी असलेली मुले वाचलेले नीट समजून घेतात. विश्‍लेषण करतात. विषयाच्या मुळाशी जातात. त्या-त्या विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात करतात, अशी लॉजिकल मेमरी असलेली मुले बऱ्याचदा हुशार असतात.

विनय स्मरणशक्तीसाठी उपचार घेतो आहे. विनय नावाप्रमाणेच विनयशील, सरळ स्वभावाचा, दिलेली औषधे कधीच घ्यायला विसरायचा नाही. विनयची ‘केस हिस्ट्री’ घेतली तेव्हा असे लक्षात आले, की चार-पाच वेळा जरी पुस्तकातील एखादे प्रकरण वाचले, तरी काही केल्या लक्षात राहात नसे. पण मी त्याला सांगितले, की लिहून बघ लक्षात राहते का? त्याने मी सांगितलेले केले. बरोबरीने औषधे दिली होतीच. तो ती कटाक्षाने घेत होता. केलेला अभ्यास तो लिहून काढायचा. त्याला मागील सत्रामध्ये ५३ टक्के गुण मिळाले. हा प्रयत्न सुरू ठेवल्यावर त्याला नंतरच्या परीक्षेमध्ये ६८ टक्के गुण मिळाले. 

अभय भयंकर खोडकर मुलगा, त्याची स्मरणशक्ती इतकी कमी, तो औषधेही घ्यायला विसरायचा. परिणामी, परीक्षेत गुण कमी. त्याला जेवायला बसण्यापूर्वी फ्रीजमधील पाणी काढण्यासाठी तो फ्रीज उघडतो, तेव्हा त्याला औषधे घेण्याची सवय लावली. ‘फ्रीज’ हा आठवणीचा शब्द आठवून लक्षात ठेव, असे सांगितले आणि ‘तू पण फ्रीजसारखा थंड राहा,’ असा सांकेतिकशब्द तयार केला. नशिबाने तो विसरला नाही. हळूहळू अभ्यासात प्रगती होत गेली. अभय फ्रीजसारखा शांत व थंड झाला.

वैभव हुशार, शांत, एकलकोंडा, एकदा स्टडीरुमध्ये गेला, की आईने जेवायला बोलावल्याशिवाय बाहेर येणार नाही. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, अभ्यासातील किडा म्हटले तरी चालेल. वैभव इतका अभ्यास करायचा, की त्याचे डोके दुखायला लागायचे. जो अभ्यास करीत असे ते लक्षातही राहत असे, पण खाण्यापिण्याची शुद्ध नाही, झोप नाही. अतिअभ्यासाने डोके दुखू लागायचे. जास्त नंबरचा चष्माही लागला. बाहेर खेळायला जाणे नाही, की घरातील लोकांव्यतिरिक्त फारसे बोलणे नाही. शाळेतील स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. आईने दिलेला डबा तस्साच घरी आणत असे. शरीराने अशक्त. यामुळे अभ्यासाचे लक्षात राहत असले, तरी सतत शारीरिक तक्रारी असायच्या. औषधे दिल्यावर त्याच्या अभ्यासावर काही परिणाम झाला नाही. उलट पहिल्यासारखाच तो एकाग्रतेने अभ्यास करीत असे, शिवाय भूक लागत असल्यामुळे तो वेळच्या वेळी जेवण खाणे घेऊ लागला. शाळेत सगळ्यांशी बोलू लागला. खेळातही रस घेऊ लागला. त्याची डोकेदुखीही थांबली.

मुलांनी फक्त अभ्यास एके अभ्यास करू नये. अभ्यासाबरोबर वाचन, खेळ, सर्वांशी मिळून, मिसळून वागण्याची वृत्तीही मुलांच्या सर्वांगीण विकासाला आवश्‍यक आहे. बऱ्याचदा अशा रुग्णांबाबत त्यांचे आई-वडील, पालक यांचे सहकार्य मिळू शकते. ते जास्तीत जास्त या रुग्णांच्या सहवासात असतात. त्यांना औषधे सुरू केल्यानंतरचा फरक जाणवतो. परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होण्यास व स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करते.     

बऱ्याचदा अनेकांना परीक्षेला जाताना, मुलाखतीला जाताना एक प्रकारची भीती वाटते. येणारे यश हे भीतीमुळे त्याच्या स्मरणशक्तीला धोका पोहोचून हरवून बसतात. जीवनद्रव्याची हानी झाल्यामुळे रोग्यास मानसिक अशक्तता आलेली असते. चारचौघांत बोलण्याची, चारचौघांत मिसळण्याची भीती वाटते. स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो. मानसिक असहिष्णुता असते. त्यामुळे रोगी निराश, उदासीन, भावनाशून्य, खिन्न, विषष्ण, अबोल किंवा मितभाषी असतो. शारीरिक, तसेच मानसिक श्रम करावेसे वाटत नाही. झोप लागत नाही, सतत गोंधळलेला असतो, ज्ञानेंद्रिये बधिर झालेली असतात. बऱ्याचदा शरीराचा थरकाप होतो. या सगळ्या लक्षणांवर उपाय आहेत.

स्मरणशक्तीबाबतचा त्रास बहुधा म्हातारपणात होतो. पण, आजकाल तरुण मुला-मुलींना एवढेच काय लहान मुलांनाही झालेला आढळून येतो. तरुण मुलांमध्ये याचे आजकाल प्रमाण जास्त आढळते. याचे कारण म्हणजे मोबाईल, टीव्ही यांचा अतिवापर, अतिमद्यपान, सिगारेट ओढणे किंवा इतर नशेसाठी ‘ड्रग्ज’ घेणे. तंबाखूचे अतिसेवन ही कारणे तर आहेतच. पण आनुवंशिक प्रवृत्ती, आत्यंतिक मनःक्षोभ, झळ लागणे, मेंदूचे रोग (रक्तस्त्राव, दाह वगैरे) हृदयाचे रोग, लकवा, अपस्मार इत्यादी कारणांनीही स्मरणशक्ती कमी झालेली दिसून येते.

स्मरणशक्तीसाठी काय घ्याल?
 ॲनाकार्डियम -
रोगी कधीकधी स्वतःचेही नाव विसरतो. स्थळे, मित्रांची नावेसुद्धा रोगी विसरतो.

 अर्निका - वाचलेले लक्षात राहत नाही. आता, माझ्यासमोर ते नाव होतं बघा, पण या घटकेला आठवत नाही. भयंकर विसराळू असतो, हातात पडेल ते वाचतो, पण काय वाचले ते सांगता येणार नाही.

 अर्जेन्टम नायट्रिकम - स्मरणशक्तीचा ऱ्हास झालेला असतो. योग्य शब्द शोधता न आल्यामुळे किंवा आठवत नसल्यामुळे त्याच्या भाषणात किंवा बोलण्यात चुका होतात. गर्दीत, सभा, परीक्षा, कार्यक्रम, पार्टी, सहल अशा कार्यक्रमात जाण्यास भीतो. त्या वेळेस रोग्यास भीतीमुळे शौचाचे आवेग येतात किंवा पोटात दुखायला लागते.

 बर्याटा कार्ब - मानसिक अशक्‍यता, आत्मविश्‍वासाचा अभाव असतो. त्याला काहीच आठवत नसल्यामुळे तो विचार करू शकत नाही. वयानुसार मनाची व बुद्धीची वाढ झालेली नसते.

 जल्सेमियम - मठ्ठपणा, मंदपणा, शैथिल्य, सुस्ती, कापरे, थरकाप, चांगली तयारी असतानाही परीक्षेस बसण्याची भीती वाटते, आत्मविश्‍वास नसतो.

 मेडोऱ्हीनम - खुळेपणा, विसर भोळेपणा, आपल्या जवळच्या व्यक्तींची नावेसुद्धा आठवत नाहीत. ती घेताना वाक्‍यामधील शब्द विसरतो. स्वतःचे नावही विसरतो. रोगी सुस्त आणि आळशी असतो.
ही औषधे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. aarati Dinkar article on Memory power