अन्नाविषयी बोलू काही 

अन्नाविषयी बोलू काही 

आपल्याकडे अन्नाला ‘परब्रह्म’  म्हणतात. वेदांमध्येही ‘आहार’ या शब्दाचा अर्थ व्यापक आहे. डोळ्यांना भावणारे, नाकाला सुवास देणारे, जिव्हेला तृप्त करणारे असे अन्न (आहार) असावे. तसेच,  शरीराच्या पोषणास व वाढीस उपयुक्त किंवा सकस आहार नेहमीच घ्यावा. भारतामध्ये विविध प्रांतात परंपरेनुसार व सणवारांनुसार स्वयंपाक किंवा पदार्थ बनविले जातात. गेल्या काही वर्षांत मात्र एकीकडे आहारविषयक जागरुकता निर्माण झाली असूनही खाण्याचा मूळ उद्देश्‍य काय आहे हे समजून न घेता खूप कमी अथवा खूप जास्त, एकाच अन्नघटकाचा समावेश असलेला अथवा विरुद्ध  गुणधर्माच्या पदार्थांचा एकत्र आहार घेतला जातो, असेही दिसत आहे.

सर्वप्रथम आपल्या प्रकृतीनुसार अथवा पचन शक्तीनुसार आणि हवामानास अनुकूल असे अन्न खावे हे समजून घ्यावे. तसेच, वय व इतर काही आजार जसे मधुमेह, रक्तदाब, गाऊट, यकृताचे विकार, किडनीचे विकार इत्यादि, याप्रमाणे कोणते पदार्थ खावे व कोणते टाळावे हे ठरविता येते. कच्च्या भाज्यांचे सॅलेड, फळांचे रस, भाज्यांचे रस, अनेक वेळा खाणे, जास्त प्रमाणात एकाच वेळी खाणे, तसेच इतर प्रांतातील पदार्थ आपल्याकडे बनवून खाणे आपल्या पचनसंस्थेस पचवायला भारी पडू शकते.

सकाळी उठल्यावर उष:पान करावे. म्हणजे रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी (भांडभर) पिऊन दिवसाला सुरुवात करु शकतो. सकाळी व दिवसभरात चहा किंवा कॉफी पिणे मर्यादितच  ठेवावे. दिवसभराच्या खाण्याची आखणी करावी. सकाळी जास्त, दुपारी मध्यम व रात्री हलका आहार अशी ही आखणी करावी. प्रथिनयुक्त, स्निग्ध व कॅल्शियमयुक्त न्याहारी सकाळी घ्यावी. दुपारी  कर्बोदके, भाज्या, सॅलड  इत्यादि आहारात असावे. रात्री पचायला हलके पदार्थ असावेत. असे आहारनियोजन आरोग्यस्वास्थ्यासाठी उत्तम ठरते. साखर, भात व कर्बोदके खाण्याचा फार बाऊ करु नये. कारण ह्याही अन्नघटकांचे स्वत:चे चांगले गुणधर्म असतात. फक्त त्याचे प्रमाण योग्य तेवढे ठेवावे. आल्याच्या तुकड्यास काळे मीठ अथवा साखर लावून खाऊन मग जेवले तर पचनास मदत होते. 

‘उदरभरण  नोहे जाणिजे यज्ञकर्म’  हे आठवून खाण्यासाठीचा वेळ फक्त खाण्यासाठी तेही योग्य चावून खाण्यासाठी राखून ठेवावा. यावेळी कोणतेही काम करु अथवा पाहू नये. राग आलेला असताना  अथवा मानसिक ताणतणावाखाली असताना खाऊ नये. जेवणाच्या आधी, जेवताना सारखे अथवा जेवल्यावर लगेच पाणी पिऊ नये. जेवणानंतर कॉफी, आईस्क्रीम, शीतपेये इत्यादी घेणे पचनास योग्य ठरत नाही. खाण्यामध्ये साजुक तुपाचा समावेश असावा.

कोशिंबीर, भाजी, उसळ अथवा आमटी बनवितांना फार तीव्र मसाले अथवा तिखट वापरु नये. जिरे, हिंग, हळद, मिरे, सुंठ, धने, कोथिंबीर, कढीपत्ता, पुदीना, आले, लसूण अशा  मसाल्यांचा  वापर  करावा. गाळलेली खाद्यतेले व साजुक तुपाचा वापर स्वयंपाक बनवितांना करावा. वनस्पती तूप सहसा टाळावेच. दही, ताक गरम कराव्या लागतील अशा पाककृती टाळाव्यात. दूध आणि फळे किंवा  दुग्धजन्य  पदार्थ व मांसाहार असे एकत्र  करणे  म्हणजे विरुद्ध आहार होय. त्याने  पचनक्रियेवर ताण पडतो. कधीतरी किंवा नाईलाजाने कोणतेही ‘फास्ट फूड’  प्रकारात मोडणारे पदार्थ खाणे वेगळे,  पण जेवण म्हणून ह्या गोष्टी सतत घेणे शरीरपोषणास असमर्थ ठरतातच, किंबहुना स्थूलत्त्व वाढवणारे ठरतात हे लक्षात घ्यावे. जेवल्यानंतर हिंग, जिरे पावडर, कोथिंबीर  घातलेले पातळसर ताक घेणे हितकारक आहे. नारळपाणी किंवा काकडी व पाणी एकत्र करून रस काढून पिणे ह्यामुळे ॲसिडीटी कमी होण्यास मदत मिळते. (त्यासाठी योग्य उपचारही घ्यावेत.)

वारंवार  किंवा समोर दिसले म्हणून पहिले अन्न पचण्याच्या आधी  दुसरे खाणे खाऊ नये. उभे राहून भरभर खाण्यामुळे पोटदुखी, पोटफुगी,  गॅसेस, अपचन, करपट ढेकरा  इत्यादि  दुखण्याकडे  वाटचाल सुरू होते. सुंठ, जिरे, धने, बडीशेप, पुदीना पावडर स्वरुपात जेवल्यानंतर घेतल्यास अन्न पचनास मदत होते. चिमूटभर ओवा व हिंगही जेवल्यावर घेता येईल.

ज्यांना  मधुमेह  आहे  त्यांनी  गोड  पदार्थ, अधिक  कर्बोदके, स्निग्ध पदार्थ टाळून शरीरास पोषक अन्नपदार्थांचा वापर वाढवावा. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी आहारातील मीठ, स्निग्ध,  तेलकट पदार्थ कमी करावे, गाऊटचा त्रास असणाऱ्यांनीही शाकाहारी व मांसाहारी पदार्थातील काही पदार्थ पाळणे हा मुख्य इलाज असतो. स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आणि कृश  व्यक्तींनी वजन वाढविण्यासाठी ‘आहारात बदल’  हे सूत्र ठेवावे. वाढत्या वयाची मुले व मुली, गर्भवती स्त्रिया, खेळाडू, बुद्धीची कामे अधिक करणारे, शारिरीक कष्ट जास्त करणारे असे अनेक गट  पाहून आहार आखणी आवश्‍यकतेनुसार करता येते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी एकदम उपाशी राहणे टाळावे व महिनाभरात काही असे हळूहळू आपले उद्देश्‍य पूर्ण करावे. अन्यथा तीव्र ॲसिडिटी व इतर दुष्परिणाम शरीरास दीर्घकाळपर्यंत त्रास देऊ शकतात.

फळे, चणे-दाणे, गुळाची चिक्की, राजगिरा लाडू, सुका मेवा पावडर, लाह्या, खजूर इत्यादी पदार्थ जवळ सहज ठेवण्यासारखे आहेत. यामुळे भूक लागली असता पटकन ते आधी  खाल्ले जातील व  चटपटीत पदार्थ खाणे आपसूकच कमी होईल. मोरावळा, आवळा पावडर घेणे, आमसूल भिजवून ठेवून त्याचे पाणी पिणे हे ही सहज जमण्यासारखे व पचनास मदत करणारे आहे.

हल्लीच्या  बदलत्या  जीवनमानात  दैनंदिन  गोष्टींनासुद्धा  वेग  आला  आहे. रात्रपाळी  करणाऱ्यांना,  फिरतीची  नोकरी  करणाऱ्यांना  व  दुसऱ्या  ठिकाणी  (घरापासून)  राहून  नोकरी  करावी  लागून  बाहेरचे  खाणे  ज्यांना  अटळ  आहे, अशा  सर्वांनी  आपल्या  आहाराकडे  व  पचनसंस्थेकडे  जास्त  लक्ष  देणे  आवश्‍यक  आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com