वयोमानानुसार होणारे नेत्रविकार

वयोमानानुसार होणारे नेत्रविकार

वृद्धापकाळ ही जीवनातली अशी अवस्था असते, जेव्हा माणसाचे केवळ शरीरच थकते असे नाही तर वयोमानानुसार होणारे विकारही बळावतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये मुख्यत्वे दिसून येणारे विकार म्हणजे डीमेंशिया, अल्झायमर, ओस्टीओआर्थयाटीस, पार्किंन्सन्स आणि वयोमानामुळे होणारे मॅक्‍युलर डीजनरेशन (एएमडी)सारखे डोळ्यांचे विकार. एकूण डोळ्यांच्या विकारांपैकी वयोमानानुसार होणाऱ्या मॅक्‍युलर डीजनरेशन (एएमडी) या विकारामुळे जगात ८.७ टक्के अंधत्वाचे प्रमाण आहे. ज्येष्ठांमध्ये गंभीर स्वरुपात अंधत्व येण्याच्या कारणांपैकी हे एक महत्वाचे कारण आहे. यामध्ये रेटीनाच्या मध्यभागापाशी एक छोटा ठिपका असलेल्या आणि स्पष्ट, केंद्रवर्ती नजर यासाठी डोळ्याला गरजेच्या असलेल्या मॅक्‍युलाचे नुकसान होते. यामुळेच आपण बरोबर डोळ्यासमोर असलेल्या गोष्टी बघू शकतो. 

 एएमडीचा रुग्णाच्या सर्वसाधारण आयुष्यावर मोठा परिणाम होतो. संशोधकांना असे आढळून आले आहे की, ८१ टक्के एएमडी रुग्णांना त्यांना पूर्वी जितका वेळ लागायचा त्यापेक्षा बराच जास्त काळ दैनंदिन गोष्टी पूर्ण करण्यासाठी लागतो. जोडीला, ४० टक्के रुग्ण स्वत-च्या दैनंदिन गोष्टी करण्याच्या क्षमतेविषयी समाधानी नसतात. एएमडी हा दीर्घकालीन आजार आहे आणि रुग्ण तसेच त्यांची काळजी घेणारे यांच्यावर या विकाराचा शारीरिक, सामाजिक, आर्थिक व भावनिक परिणाम होत असतो. 

वयोमानानुसार मॅक्‍युलर डिजनरेशन म्हणजे काय?
वयोमानानुसार मॅक्‍युलर डिजनरेशन या अवस्थेत रेटिनामधील मॅक्‍युला या भागावर परिणाम होतो. मॅक्‍युला हा डोळ्याच्या मागील भागात असलेला रेटिनाचा सर्वांत संवेदनशील भाग आहे. या विकारात दृष्टीकेंद्रात काळे बिंदू तयार होऊन मॅक्‍युलाला हानी पोहोचते. रुग्णाला वाचन, ड्रायव्हिंग, स्वयंपाक आदी दैनंदिन कामे अवघड होऊन बसतात. तसेच चेहरे ओळखण्यातही समस्या येतात. या विकारामुळे दृष्टी अस्पष्ट किंवा अंधुक होते, रंग संवेदनशीलतेवर परिणाम होतो, काळे डाग दिसतात, सरळ रेषा नागमोडी दिसतात.

मॅक्‍युलर डिजनरेशन झाल्यास काय करावे? 
चांगल्या गोष्टींसाठी बदल - रुग्ण व त्यांचे काळजीवाहक यांना या स्थितीची संपूर्ण कल्पना असणे गरजेचे असते. रुग्णांना सोयीचे जावे यासाठी एएमडी बरोबर जगण्याच्या दृष्टीने त्यांनी जीवनशैलीत बदल करणे गरजेचे असते.
 
तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा -
तुमच्या नेत्रतज्ज्ञाकडून नियमितपणे डोळ्यांची तपासणी करावी. त्यामध्ये प्युपिल डायलेशनचा समावेश असावा. तुम्हांला लक्षात येण्याच्या आधी नेत्रतज्ज्ञाना ही लक्षणे जाणवू शकतात. त्यामुळे लवकर आणि वेळेवर निदान झाल्यास त्यावर होणाऱ्या उपचारामुळे एएमडीचा फैलाव होण्यावर नियंत्रण मिळते. किती महिन्यांनी डोळ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे, हे तुमच्या डॉक्‍टरांना विचारून घ्या.
 
चुकीच्या सवयी सोडा -
धूम्रपान हे संपूर्ण शरीराप्रमाणे तुमच्या दृष्टीसाठीही हानीकारक असते. एएमडीचा धोका धूम्रपान करणाऱ्यांना ते न करणाऱ्यांच्या पेक्षा दुपटीने जास्त असतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि त्यामुळे डोळ्यांना होणारा रक्तपुरवठा कमी होतो. 
 
पुरेसा योग्य प्रकाश आणि रंगसंगती निवडा -
मॅक्‍युलर डीजनरेशन विकार बळावायला लागल्यावर जेव्हा पुरेसा विरोधाभासी रंग नसतो वा दोन रंगांमध्ये फारसा फरक नसतानाही वस्तू बघणे वा ती लक्षात येणे अधिक कठीण होते. योग्य प्रकाशयोजना आणि व्यवस्थित रंगसंगती साधली तर रुग्णाचे आयुष्य बरेच सुकर होते. विरोधाभासी रंग वापरून रुग्ण हा प्रश्न सोडवू शकतात. उदाहरणार्थ, गडद रंगाच्या टेबलक्‍लॉथवर पांढऱ्या रंगाची ताटं मांडणे. वाचण्यात अडचण येत असेल तर भिंगाचा वापर करणे वा तुमच्या संगणक, सेलफोन किंवा इ- रीडरवर कॉनट्रास्ट पातळी वाढविणे असे उपाय करता येतात.
 
स्पर्शाची जाणीव बळकट करा -
दृष्टी अधू होत असल्यामुळे स्पर्शाची जाणीव आणखी महत्वाची बनते. घरातल्या जवळपास प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून रुग्ण त्यांची स्पर्शाची ताकद वाढवू शकतात. विविध प्रकारच्या वस्तू लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळे आकार, रंग आणि पदार्थांच्या उंचवट्यांचा उपयोग करू शकतात. उदाहरणार्थ- विविध प्रकारच्या इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांवरील दिव्याच्या बटणासाठी जास्त उंच उंचवटा. विविध प्रकारची भांडी ओळखण्यासाठी रबर बॅंडचा वापर. 
 
सकस पदार्थ खा -
रंगीत फळे आणि हिरव्या पालेभाज्या असलेले ‘इंद्रधनुषी’ जेवण घ्या. त्यांच्यामध्ये अँटीऑक्‍सिडंट्‌स असतात. रेटीनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी ते उपयुक्त असतात. काले ही कोबीची एक जात, पालक, लेट्युस, कोलार्ड प्रकारचा कोबी आणि सलगम यासारख्या गडद हिरव्या भाज्या आणि पालेभाज्या यामध्ये ल्युटेन आणि झेक्‍सांथिन ही डोळ्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त पोषक द्रव्ये असतात. साल्मन आणि ट्युनासारखे मासे असलेल्या आहारात ओमेगा  फॅटी ॲसिड असतात. राष्ट्रीय नेत्र संस्थेने म्हटल्यानुसार एएमडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com