#FamilyDoctor पिलाटेज  - मणक्‍यांसाठी व्यायाम

डॉ. अजय कोठारी, डॉ. पराग संचेती, डॉ. अंकिता काळे
Friday, 2 November 2018

पाठदुखी, कंबरदुखी सुरू झाली आहे. मणक्‍यांची झीज  झाली आहे. करायचे काय? नुसतेच दुखणे सहन करायचे? आता बसू नका, पिलाटेज व्यायाम करा आणि पुन्हा खंबीरपणे उभे राहा.

प्रत्येक मनुष्याला कधी ना कधी मणक्‍याच्या दुखण्याचा सामना करावा लागतो. या दुखण्याला वयाची कोणतीही अट नाही. अतिशय साधारण वाटणारे हे दुखणे कोणत्याही वयात उद्‌भवू शकते. अर्थात, जसजसे वय वाढते, तसतसे हे दुखणे उद्‌भवते. व्यावसायिक कारणांमुळे दीर्घ काळ बसून किंवा उभे राहून काम केल्याने आणि हाडांची झीज झाल्याने या दुखण्याची शक्‍यता वाढते. पाठीचा कणा किंवा मणक्‍यांची माळ आपल्या शरीराचे संपूर्ण वजन पेलते. कशेरूक , त्यांना जोडणाऱ्या चकत्या, स्नायू आणि अस्थिबंध हे मणक्‍याचे मुख्य भाग त्याला भक्‍कम आधार देतात आणि हालचालही करणे शक्‍य बनवतात. यातील कोणत्याही भागाला झालेले नुकसान हे दुखण्याचे कारण ठरते. मग हे दुखणे कोणत्याही वयोगटातील व्यक्‍तीला होऊ शकते. त्यामुळे सुरवातीपासूनच प्रत्येकाने मणक्‍याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. 

या दुखण्याची काही सर्वसाधारण कारणे 
१)     वयानुसार चकत्यांची झीज. 
२)     दीर्घकाळ चुकीच्या पद्धतीने उभे राहणे किंवा बसणे.
३)    अनुचित पद्धतीने वस्तू उचलणे.
४)     अस्थिभंग 

दुखण्याचे लक्षण 
१)     पाठ, कंबर, हात किंवा पाय यात वेदना.
२)    हातापायांना मुंग्या येणे किंवा बधिरता येणे.
३)     दीर्घकाळ उभे राहणे किंवा चालणे त्रासदायक होणे. 
४)     स्नायूंचे आखडणे 
यातील पंच्याण्णव टक्के दुखणे विनाशस्त्रक्रिया पूर्णपणे बरे होऊ शकते. कसे ते पाहूया -
पाठदुखी, कंबरदुखी सुरू झाल्यास कोणत्याही प्रकारचे व्यायाम करू नयेत. व्यायाम केल्याने दुखणे अधिक वाढेल, असे वाटून बरेच रुग्ण तो टाळण्याचा प्रयत्न करतात. यामुळे रुग्णाला जास्तीत जास्त औषधोपचारावरच अवलंबून राहावे लागते. खरेतर योग्य व्यायाम केल्याने रुग्णाला दुखण्यापासून दीर्घकाळपर्यंत मुक्‍ती मिळते, शस्त्रक्रिया टाळता येते आणि मणक्‍यांची झीज होण्याची प्रक्रिया लांबवता येते. बहुतेक दुखण्यांसाठी योग्य व्यायाम व हालचाल ही नैसर्गिक उपाययोजना ठरते. निष्क्रियता किंवा शरीराला पूर्ण आराम यापेक्षा नियंत्रित आणि प्रगतिशील व्यायाम केल्याने हे दुखणे कमी होते आणि भविष्यकाळात हा त्रास होण्याची शक्‍यता टळूही शकते.
फिजिओथेरपीमधील एक अद्ययावत व अत्यंत फायदेशीर उपाययोजना म्हणजे ‘पिलाटेज’ हा व्यायामप्रकार. जोसेफ पिलाटेज या जर्मनतज्ज्ञाने विकसित केलेला हा व्यायाम प्रकार आहे. पूर्वी योगासने, जिम्नॅशियम व नृत्य यांच्या संयोगाने मानसिक व शारीरिक संतुलन साधणे हा ‘पिलाटेज’चा उद्देश होता. परंतु, आता नवीन पिलाटेजचे व्यायाम फिटनेस आणि पुनर्वसन यांवर केंद्रित केलेले आहेत. जोसेफ पिलाटेजचा मुख्य उद्देश हालचालींची कार्यक्षमता आणि मणक्‍याच्या स्नायूंची स्थिरता व ताकद वाढविणे आहे.

मणक्‍याचे व पोटातले स्नायू मणक्‍यांना आधार व स्थिरता देतात. स्नायूंच्या अनावश्‍यक सक्रियतेमुळे थकवा व शारीरिक अस्थिरता आणि अर्धवट सुधारणा दिसून येते. परंतु, पिलाटेजमुळे या सर्व कमतरतांवर मात करता येते. पिलाटेजचे व्यायाम प्रशिक्षित फिजिओथेरपिस्टच्या योग्य मार्गदर्शनाखालीच करणे आवश्‍यक आहे. हे व्यायाम फक्‍त मॅटवरच केले जातात असे नाही, तर अनेक उपकरणांच्या साहाय्याने केले जातात. त्यामध्ये पिलाटेज रिफार्मर, बॉल, चेअर, ब्लॉक व वेगवेगळे रेझिस्टंस बॅंडचा वापर केला जाऊ शकतो.

पिलाटेजची तत्त्वे 
१) एकाग्रता - प्रत्येक व्यायाम व हालचाल लक्षपूर्वक करणे. 
२) नियंत्रण - प्रत्येक हालचाल नियंत्रित असावी.  
३) व्यायामामध्ये सहजता असावी. 
४) व्यायामाची आणि योग्य श्‍वसनाची सांगड घालावी. 

फायदे 
१) स्नायूंची लवचिकता आणि सांध्यांची हालचाल ह्यात सुधारणा होते. 
२) मणक्‍याच्या स्नायूंची ताकद व स्थिरता वाढते. 
३) शरीराची ठेवण सुधारते.  
४) शारीरिक व मानसिक संतुलन वाढते. 
५) मणक्‍यातील वेदना कमी होतात.
६) इजा होणे टळते. 
७) काळजी करण्यासारख्या स्नायूंची ताकद वाढते. 
८) श्‍वसन क्रिया सुधारते. फिटनेस वाढतो. 
या नवीन उपचारपद्धतीमुळे रुग्णालाच नाही, तर इतर सर्वांनाच मणक्‍याचे दुखणे टाळणे शक्‍य होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. ajay kothari Dr parag sancheti Dr. ankita kale article