गर्ड

डॉ. अपर्णा पित्रे
Friday, 12 January 2018

गर्ड म्हणजे जठर आणि अन्ननलिका यांच्यामधील झडप नादुरुस्त होणे, असे म्हणता येईल. ही झडप पूर्ण बंद न झाल्याने जठरातील आम्ल मिसळलेले अन्न अन्ननलिकेत उलट फिरते. त्याचा रुग्णाला त्रास होतो.

‘गर्ड’ (GERD) हा शब्द अलीकडे अनेक वेळा कानावर पडतो. काय आहे हा ? याची पूर्ण संज्ञा - Gastro-osophageal reflux disease अशी आहे. ही पचनसंस्थेची व्याधी आहे. त्यामध्ये जठरातील आम्ल अन्ननलिकेत उलट्या दिशेने येते आणि ॲसिडिटीसदृश अनेक लक्षणे निर्माण करते. 

तोंडात आंबट गुळणी येणे, 
छातीत जळजळणे, 
दात आंबणे,
तोंडाला दुर्गंधी येणे, 
कधी कधी छातीत दुखून दम लागणे.

अनेक तरुण मुलांमध्येही हा विकार दिसून येतो. जठर, ही एक स्नायूंशी बनलेली पिशवी आहे. ज्यामध्ये खाल्लेल्या अन्नावर विकरांची (एन्झाइम्स) व आम्लाची प्रक्रिया होते आणि अन्न पचनासाठी योग्य अशा स्थितीत आणले जाते.

अन्ननलिकेच्या खालच्या बाजूला आणि जठराच्या तोंडाशी एक झडप असते, ती बंद झाल्यामुळे सामान्यतः जठरातील आम्ल वर परत अन्ननलिकेत येण्यापासून थांबवले जाते. गर्ड - या व्याधीमध्ये ही झडप पूर्णपणे बंद होत नाही, त्यामुळे जठरातील आम्ल मिसळलेले अन्न उलट्या दिशेने वर येते आणि अन्ननलिकेच्या आतील आवरणाला इजा करते. ही झडप मुळातच दुर्बल का असावी याला उत्तर नाही; परंतु स्थूलता, गर्भावस्था, पोटातील हर्निया यांसारख्या गोष्टींमुळे अन्ननलिकेवरचा दाब वाढून अत्यंत तीव्र अशा प्रकारचे जठरातील हायड्रोक्‍लोरिक ॲसिड व खाल्लेले अन्न हे परत अन्ननलिकेत येते. 

या प्रक्रियेमुळे अन्ननलिकेचा दाह, सूज येते व वर्णन केलेली सर्व लक्षणे रुग्णाला जाणवू शकतात. कधी कधी वर येणाऱ्या आम्लामुळे स्वरयंत्राला इजा होऊन आवाज बसणे किंवा खोकला येणे अशीही लक्षणे निर्माण होतात.

‘अनेक वर्षे मला ॲसिडिटी होते’, असे मोघम विधान करणाऱ्या या रुग्णांची गॅस्ट्रोस्कोपी किंवा एंडोस्कोपी केल्यानंतर या झडपेच्या दुर्बलतेमुळे अन्ननलिकेचा होणारा दाह व सूज लक्षात येते.

काही साध्या उपायांनी हे आम्ल वर न येण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. गर्ड असलेल्या व्यक्तींनी जेवल्यानंतर लगेचच आडवे पडू नये. काही तासांसाठी पूर्ण आडवे न होता टेकून थोडीशी आरामदायक स्थिती घेणे जास्त फायद्याचे ठरते. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे जठराची जागा अन्ननलिकेच्या खाली येते व आम्लमिश्रित अन्न सहजासहजी वर येत नाही.

असा त्रास असलेल्या व्यक्तींनी आकंठ खाऊ नये. एकावेळी कमी प्रमाणात, पण थोड्या थोड्या वेळाने मोकळा आहार ठेवावा. हे तर सर्वच लोकांच्या दृष्टीने योग्य ठरते. पोटाचा घेर कमी केल्यानेही अन्ननलिकेवरचा हा दाब आपण कमी करू शकतो. आंबट, तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवल्यामुळे जठरातील आम्लता योग्य प्रमाणातच राहण्यास मदत होते आणि हा ॲसिडिटीचा त्रास कमी जाणवतो. तरीही असे लक्षात येते, की अशी खबरदारी घेऊनही ज्या व्यक्तींना ‘गर्ड’ आहे त्यांना अधूनमधून ॲसिडिटीची तीव्र लक्षणे निर्माण होतात. 

होमिओपॅथीमध्ये अशी औषधे आहेत, जी अन्ननलिकेचा दाह कमी करतात. आम्लाची तीव्रता संतुलित करतात. अन्ननलिकेच्या आवरणाला आत्तापर्यंत जी इजा झाली आहे ती बरी करण्यास मदत करतात आणि वारंवार ॲसिडिटी होण्याची प्रवृत्तीही कमी करतात.

‘गर्ड’ ही व्याधी यांत्रिक (अवयव दोषामुळे आलेली), तसेच कार्यदोषामुळे आलेली आहे. त्यातील कार्यदोषाची पूर्ण काळजी होमिओपॅथी घेऊ शकते. सतत ॲसिडमुळे झडपेला झालेल्या दुखापतीमुळे झडप दुर्बल होते. ॲसिडिटीची वारंवारता औषधांनी जशीजशी कमी होईल, तसतशी झडपेची दुर्बलताही कमी होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Aparna Pitre article