‘अपत्यानां मूलं नार्य: परं नृणा।’ | Pregnancy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अपत्यानां मूलं नार्य: परं नृणा।’
‘अपत्यानां मूलं नार्य: परं नृणा।’

‘अपत्यानां मूलं नार्य: परं नृणा।’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- डॉ. अश्विनी राऊत (अकलूज) स्त्रीरोग आणि प्रसूतितज्ज्ञ

नुकताच ‘जागतिक अन्न दिन’ साजरा होऊन गेला. या दिवसाच्या अनुषंगाने आपण आजच्या लेखात गरोदर मातांच्या आहाराविषयी माहिती घेणार आहोत.

अन्न, आहार, शरीराच्या वाढीसाठी, निरोगी आयुष्यासाठी आवश्यक मूलभूत गरज... संतुलित, पौष्टिक, सुरक्षित आहाराबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिवस साजरा झाला. किंबहुना आपण काय खातो यावरच आपले आरोग्य अवलंबून असते. दूषित अन्नसेवन किंवा विरुद्ध आहार सेवन केल्याने गंभीर आजार उद्‌भवतात. विरुद्ध आहारात पुढील अन्नद्रव्यांचा समावेश होतो...

 • दुधासोबत आंबट पदार्थ, फळे

 • मासे आणि दूध

 • गरम मध, गरम दही

 • मध आणि तूप समप्रमाणात असणे

 • उडीद आणि मुळा

विरुद्ध आहाराची यादी बरीच मोठी आहे. परंतु त्यातील काही ठराविक अन्नपदार्थांची यादी इथे दिली आहे. वरील विरुद्ध आहाराने शरीराला त्वरित वा कालांतराने अपाय होतात. म्हणून अन्नपदार्थ खातानादेखील काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय अन्नाची नासाडी करण्यापासून स्वतःला रोखणे, हवे तेवढेच अन्न ताटात वाढून घेण्याची शिस्त प्रत्येकाने लावून घ्यायला हवी. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ याची जाण प्रत्येकांनी ठेवावी. संयुक्त राष्ट्र संघाच्या कृषी आणि अन्न संघटनेची स्थापना १६ ऑक्टोबर १९४५ साली झाली. या संघटने अंतर्गत अन्नाची नासाडी रोखण्यासाठी, उपासमारीला रोखण्यासाठी, जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस ‘जागतिक अन्न दिवस’ म्हणून साजरा होतो.

या जागतिक अन्नदिवसाचे औचित्य साधून गर्भिणीचा आहार कसा असावा, हे आपण पाहू या...

‘अपत्यानां मूलं नार्य: परं नृणा।’ मनुष्यामध्ये स्त्री हीच अपत्याला मुख्य आधार आहे, असे आचार्य चरकांनी संहितेत सांगितले आहे. त्यासाठी मातांनी स्वतःच्या आहाराकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. गर्भधारणा झाल्यापासून गर्भिणीच्या शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे उलटी, मळमळ, थकवा, अरुची, वास येणे, अशक्तपणा, मलावष्टंभ अशी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे खाण्याची इच्छा उत्पन्न होत नाही. अशा वेळीं पुढील गोष्टी पाळाव्यात.

 • कोरडे पदार्थ खावेत.

 • स्वयंपाक करताना मास्क वापरावा किंवा बाहेर थांबावे.

 • दर दोन तासांनी थोडे थोडे खात राहावे.

 • पाणी भरपूर प्यावे. त्यामुळे थकवा जाणवणार नाही.

 • मोकळ्या हवेत फिरावे. फळे, पालेभाज्या खावीत.

यामधून २ व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स मुबलक भेटतात. जेणेकरून मलावष्टंभचा त्रास कमी होतो. बऱ्याच गर्भिणीच्या पोटात जळजळ करते, पित्ताचा त्रास होतो. अशावेळी ग्लासभर थंड दूध सकाळी आणि संध्याकाळी घ्यावे. दुधात मध, साखर, तूप घालू शकता. सुरवातीचे काही महिने गर्भाचे कोणतेही अवयव विकसित झालेले नसतात. अशा स्थितीत गर्भाचे पोषण मातेच्या रसवह स्रोतांद्वारे होत असते. चौथ्या महिन्यात गर्भ अवयव हलके स्पर्शागम्य होतात.

गर्भस्पंदने ऐकू येतात. गर्भाला स्थिरत्व येते. गर्भअवयवांची विशेष वाढ सुरू असते. या महिन्यात वरील आहारासोबत लोणी, तूप, दही खावे. फळे, पालेभाज्या खाव्यात, पाणी वाढवावे. रोज किमान पंधरा मिनिटे सकाळी आणि संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरावे. पाचव्या महिन्यांत गर्भअवयव स्पष्टपणे लागतात. त्यामुळे गर्भिणीच्या ठिकाणी दुर्बलता येते. अशा अवस्थेत दूध, दुधाचे पदार्थ, पनीर, अंडी, खावीत. या आहारातून लोह, कॅल्शियम, प्रोटिन्स, व्हिटामिन B12 मुबलक प्रमाणात मिळते. सहाव्या महिन्यांत त्वचेवर वांग येणे, पोटावर काळ्या रेषा येणे असे त्वचाबदल दिसू लागतात. हे बदल हार्मोन्सच्या असंतुललामुळे होतात. डिलिव्हरीनंतर काही महिन्यांमध्ये हे बदल नाहीसे होऊन त्वचा पूर्ववत होते. शिवाय केस, नखे, वर्ण, स्नायू असे अवयव विकसित होतात. आहारात गूळ शेंगदाणे लाडू, चिक्की, खजूर, मनुका, सुकामेवा यांचा समावेश करावा. सातव्या महिन्यांत क्वचित प्रसंगी पायावर सूज येते. अशावेळी डॉक्टरांकडे जाऊन रक्तदाब मोजून घ्यावा. डाव्या कुशीवर झोपावे. सातव्या महिन्यात गर्भ सर्व अंगाने परिपूर्ण होतो. आहारात वरील सर्व घटकांचा समावेश करावा.

आठव्या महिन्यात ‘अस्थिरभवति ओज:।’ असे आचार्य सुश्रुत म्हणतात. म्हणजेच या महिन्यात ओज कधी गर्भिणीमध्ये तर कधी गर्भामध्ये संचार करते. यामुळे या महिन्यांत प्रसुती होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी. या महिन्यात प्रवास करू नये. आराम करावा. चालण्याचा हळुवार व्यायाम करावा. नवव्या महिन्यात गर्भ परिपूर्ण होऊन प्रसूतीसाठी योग्य होतो. डिलिव्हरीनंतरदेखील मातेने वरील आहार सुरू ठेवावा. अंगावर दूध व्यवस्थित येण्यासाठी आणि डिलिव्हरी मुळे आलेला थकवा जाण्यासाठी शतावरीचा दुधातून वापर करावा.

गर्भिणीने घ्यावयाची काळजी

 • प्रवास करू नये

 • जड वस्तू उचलू नयेत. पटकन उठणे बसणे टाळावे.

 • शारीरिक संबंध ठेवू नयेत

 • मानसिक शारीरिक ताणतणाव, जागरण करू नये. दुपारी एक ते दोन तास आराम करावा.

 • सौम्य चालण्याचा व्यायाम करावा. प्राणायाम करावे.

 • संतुलित, पौष्टिक आहार घ्यावा. गर्भिणीचे नऊ महिन्यात नऊ ते दहा किलो वजन वाढणे अपेक्षित आहे. बाहेरचे खाणे टाळावे.

 • आरामदायी, सैल कपडे वापरावेत.

ऍनिमिया म्हणजे रक्त कमी असणे ही गंभीर समस्या भारतातील बऱ्याच गरोदर स्त्रियांमध्ये आढळते. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्याने चक्कर येणे, थकवा, नख, त्वचा, डोळे फिके पडणे, धाप लागणे, अंग गळून जाणे. गर्भिणीमध्ये रक्ताचे प्रमाण कमी असल्यास बाळाची वाढ खुंटते, अशक्त बाळ जन्माला येते, वेळेआधी प्रसुती होते, अपंग, मतिमंद मूल जन्माला येणे असे गंभीर परिणाम दिसून येतात. शिवाय प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव होऊन स्त्रीला अपाय होऊ शकतो. म्हणून गर्भिणीने प्रशिक्षित डॉक्टरांकडे उपचार सुरू करून आहारात वरील बदल करावेत. जागतिक अन्नदिनाच्या निमित्ताने अन्नाचे महत्व समजून घेऊन दिनचर्येत समाविष्ट करून निरोगी आरोग्याचा मूलमंत्र आपल्या प्रियजनांना द्यावा.

loading image
go to top