esakal | भास आभासांची दुनिया !
sakal

बोलून बातमी शोधा

Women

भास आभासांची दुनिया !

sakal_logo
By
डॉ. अविनाश भोंडवे

जर एखाद्या व्यक्तीला खूप भास जाणवत असतील, तर त्याला एकटे ठेवू नये. त्याच्यासोबत एखादा विश्वासू माणूस असणे गरजेचे असते. कारण भास होणाऱ्या व्यक्तीमध्ये कमालीची भीती आणि अकारण संशयी भावना निर्माण होते. यामध्ये ते स्वतःला इजा करून घेण्याची दाट शक्यता असते.

आपल्या पाच ज्ञानेंद्रियांच्या कार्यामुळे बाह्य जगाशी आपला संपर्क होत असतो. या इंद्रियांना मिळणाऱ्या असंख्य नमुन्यांच्या भौतिक उत्तेजनांमुळे आपल्याला अगणित संवेदनांची जाणीव होते. कानांमुळे आवाज ऐकू येतात, डोळ्यांमुळे विविध रंगांनी नटलेली दुनिया दिसते,जिभेने तऱ्हतऱ्हेच्या चवींचा आस्वाद घेता येतो, नाकाद्वारे जगातील सुवासांचा गंध येतो आणि त्वचेमुळे स्पर्शाची जादू कळते. पण जेंव्हा कुठल्याही प्रकारची भौतिक उत्तेजना नसताना जर ती संवेदना होत असेल तर त्याला भास किंवा भ्रम म्हणतात. ज्या व्यक्तीला हे भास होतात, ती पूर्ण जागी असते आणि तिचा विश्वास असतो की या संवेदना खऱ्याच आहेत. पाचही ज्ञानेंद्रियांना होणाऱ्या या वेगवेगळ्या आभासांचे त्या त्या ज्ञानेंद्रियानुसार पाच प्रकार पडतात.

1. दृष्टीभ्रम- यात प्रत्यक्षात समोर नसलेल्या गोष्टी दिसत राहतात. यामध्ये कुणाला काही वस्तू दिसते तर कुणाला एखादी ज्ञात-अज्ञात व्यक्ती. काही जणांना काही वर्तुळाकार फिरणारे रंगीत पट्टे दिसतील, तर काहींना तीव्र प्रकाशाचे झोत दिसतील.

2. गंधभ्रम- यामध्ये अस्तित्वात नसलेले वास यायला लागतात. मध्येच मध्यरात्री खूप घाण वास येतोय म्हणून जाग येते. या उलट एखाद्याला गुलाबाच्या फुलांचा सुगंध आवडत असेल, तर तो असो वा नसो त्याला सर्वत्र तो गंध जाणवत राहतो.

3. स्वादभ्रम- अस्तित्वात नसलेल्या चवीचा भास खाण्याच्या पदार्थांना येत राहतो. अनेकदा पदार्थ न खाताही त्याची चांगली वाईट चव जिभेला जाणवते, या चवी विचित्र, अपरिचित, अप्रिय आणि कटू असू शकतात. अनेकांच्या तोंडाला धातूचा पत्रा चघळत असल्यासारखी चव जाणवत राहते.

4. स्पर्शभ्रम- यामध्ये शरीराला कशाचा तरी स्पर्श होतोय किंवा हातापायांवर, पोटावर काहीतरी वळवळते आहे अशी जाणीव होत राहते. अनेकांना आपल्या शरीरावर सूक्ष्म किडे फिरतायत असं वाटतं, तर काही व्यक्तींना आपल्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवलाय असा आभास होत राहतो.

5. ध्वनीभ्रम- यामध्ये प्रत्यक्षात होत नसलेल्या आवाजाची जाणीव कानांना होत राहते. नुकत्याच दिवंगत झालेल्या व्यक्तीचा आवाज ऐकू येणे, कुणीतरी आपल्याला हाक मारतेय, प्रश्न विचारतेय किंवा अनामिक व्यक्ती हसते आहे, एखादा संगीताचा किंवा गोंगाटाचा आवाज अशा अस्तित्वात नसलेल्या ध्वनीच्या जाणीवा होऊ लागतात.

कारणे

मानसिक आजार : स्किझोफ्रेनिया, डिमेंशिया, डेलीरिअम अशा विकारांनी ग्रस्त मनोरुग्णांना हे भास होतात. रुग्णांना भास जाणवण्याचे मानसिक आजार हेच सर्वात महत्वाचे कारण असते.

व्यसने : खूप मद्यप्राशन केल्यानंतर अनेक व्यक्तींना काही दृष्टीभ्रम किंवा ध्वनीभ्रम जाणवतात. गांजा, अफू, चरस, एलएसडी, कोकेन अशा नशील्या पदार्थांनी किंवा ड्रग्जमुळे, अनेकांना विविध प्रकारचे भास हमखास होत राहतात. यामध्ये पंचेंद्रियांना एकत्रित किंवा वेगवेगळे आभास जाणवतात.

निद्रानाश : दिवस दिवस बिलकूल झोप नसणे म्हणजे निद्रानाश. अशा व्यक्तींना किंवा फारच अपुरी झोप लागली असेल तरी काही जणांना दृष्टीभ्रम होतात. आजारी नसलेल्या, सुदृढ व्यक्तींना देखील काही कारणांनी सलग बरेच दिवस पुरेशी झोप न मिळाल्यास हा प्रकार घडू शकतो.

औषधे : काही विशिष्ट शारीरिक आजारांसाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांनी असे भास होऊ शकतात. विशेषतः पार्किंसन्स डिसीज, अल्झायमर्स, अपस्मारासारखे झटके येण्याचे आजार, तीव्र नैराश्य, विकृत मनस्थिती किंवा सायकोसिस अशा आजारांच्या औषधोपचारात रुग्णांना भास होऊ शकतात.

गंभीर आजार : यकृताचे आजार, मूत्रपिंडे निकामी होणे, मेंदूचे ट्युमर्स, एड्स अशा आजारांच्या अंतिम स्थितीत भास होऊ शकतात.

ताप : लहान मुलांना किंवा वृद्धांना खूप कडक ताप असल्यास काही काळापुरते भास होतात.

डोकेदुखी : तीव्र स्वरूपात डोके दुखत असल्यास, विशेषतः अर्धशिशीमध्ये डोळ्यांसमोर ठिपके दिसू शकतात.

झटके : मेंदूच्या, किंवा तत्सम इतर कारणांनी झटके आल्यास आणि झटके येऊन गेल्यानंतर काही काळ आभास जाणवतात. मेंदूच्या विशिष्ट भागातील दोषामुळे झटके येत असतात. त्याभागात ज्या ज्ञानेंद्रियांचे केंद्र असेल ते आभास त्या व्यक्तीला होतात.

अंधत्व, बहिरेपणा, किंवा मोठ्या प्रमाणात दृष्टीदोष आभास होण्यास कारणीभूत ठरतात. यामध्ये चार्ल्स बॉनेट सिंड्रोम सारखा आजार येतो.

भास होत असतील, तर ते सिध्द करण्यासाठी कुठल्याही शारीरिक तपासण्या नसतात. अशा व्यक्तींची संपूर्ण शारीरिक वैद्यकीय तपासणी आणि बरीच प्रश्नोत्तरे डॉक्टरांसमवेत होतात. त्यातून मानसिक रोगांचे निदान होऊ शकते.

उपचार

भास होत असलेल्या व्यक्तीच्या तपासणीमध्ये ज्या आजारांचे निदान होईल त्याप्रमाणे उपचार करावे लागतात. उदा. मद्यप्राशन किंवा ड्रग्जच्या व्यसनाने हे त्रास होत असतील तर ते सोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. निद्रानाश झाल्याने जर भास होत असतील तर त्याच्या झोपेचा इलाज करावा लागेल. जर औषधोपचारांमध्ये अशी काही औषधे आढळली की ज्यायोगे आभास होतायत, तर ती बदलावी लागतात. साहजिकच भास होण्यामागचे अचूक निदान होणे हा उपचारांचा मुख्य भाग असतो. जर एखाद्या व्यक्तीला खूप भास जाणवत असतील, तर त्याला एकटे ठेवू नये. त्याच्यासोबत एखादा विश्वासू माणूस असणे गरजेचे असते. कारण भास होणाऱ्या व्यक्तीमध्ये कमालीची भीती आणि अकारण संशयी भावना निर्माण होते. यामध्ये ते स्वतःला इजा करून घेण्याची दाट शक्यता असते. या व्यक्तींना इतर औषधोपचार देण्याबरोबर मानसोपचार तज्ञांकडून समुपदेशन करणे नितांत आवश्यक असते. त्याला वाटणारी भीती, नैराश्य यांचाही परामर्श घेता येतो. भास आभासाच्या दुनियेत गटांगळ्या खाणाऱ्या रुग्णाला, ज्यां कारणांमुळे हा त्रास होतो त्याचे सतत भान ठेवावे लागते. तात्कालिक कारणांनी होणारे भास लगेचच आटोक्यात येऊ शकतात, मात्र मानसिक आजारांसाठी खूप दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. काही रुग्णांना आयुष्यभर नियमितपणे औषधपाणी केल्यास ते नियंत्रित राहू शकतात.

loading image
go to top