अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 8 June 2018

शारीरिक श्रम करावे लागत असल्यास, रोजच्या दिनक्रमामुळे थकवा जाणवत असल्यास, जास्त बोलण्याचे काम करावे लागत असल्यास, तसेच बौद्धिक काम करावे लागत असल्यास दुधाचे नियमित सेवन करणे श्रेयस्कर होय. तसेच बुद्धी, स्मृती, आकलनशक्‍ती या तिन्ही प्रज्ञाभेदांसाठी तूप उत्कृष्ट असते. तुपामुळे बुद्धिसंपन्नता मिळते, जीवनशक्‍ती वाढते, प्रतिकारशक्‍ती वाढते.

मागच्या वेळी आपण गोक्षुर, हिंग, अम्लवेतस, यवक्षार ही द्रव्ये कोणत्या कार्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत याची माहिती घेतली, आता यापुढचा भाग पाहू.

क्षीरघृताभ्यासो रसायनानाम्‌ - दूध आणि तूप नियमित सेवन करणे हे सर्व रसायनांमध्ये उत्तम रसायन असते.

दुग्धं समधुरं स्निग्धं वातपित्तहरं सरम्‌ । 
सद्यः शुक्रकरं शीतं सात्म्यं सर्वशरीरिणाम्‌ ।। ...भावप्रकाश

दूध चवीला मधुर, गुणाने स्निग्ध व वातदोष-पित्तदोष कमी करणारे असते, सारक असते, शीत वीर्याचे असते, तत्काळ शुक्रधातूचे पोषण करते व शरीरासाठी अनुकूल असते. 

दुधामुळे जीवनशक्‍ती वाढते, आकलनशक्‍ती सुधारते, ताकद वाढते, तारुण्य टिकून दीर्घायुष्याचा लाभ होतो, तुटलेले हाड सांधते, हाडे बळकट राहतात, ओज वाढते. अनेक मनोरोगात, हृदयरोगात, गर्भाशयाच्या रोगात दूध उत्तम असते. 

दूध सर्वांसाठी आवश्‍यक असतेच, आरोग्य टिकावे, जीवनशक्‍ती उत्तम राहावी आणि हाडांचा-सांध्यांचा बळकटपणा कायम राहावा यासाठी दूध नियमित सेवन करणे उत्तम असते. विशेषतः चमचाभर खारकेची पूड टाकून सकाळी कपभर दूध पिणे हाडांसाठी विशेष उपयुक्‍त असते. लहान मुलांनी नियमित दूध घेतल्याने त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाला हातभार लागतो. ‘संतुलन चैतन्य कल्पा’सारखे रसायन टाकून दूध घेतल्याने दुधाचे गुण अजूनच वृद्धिंगत होतात. शारीरिक श्रम करावे लागत असल्यास, रोजच्या दिनक्रमामुळे थकवा जाणवत असल्यास, जास्ती बोलण्याचे काम करावे लागत असल्यास तसेच बौद्धिक काम करावे लागत असल्यास दुधाचे नियमित सेवन करणे श्रेयस्कर होय.

दुधाचा सारभाग म्हणजे तूप असते. म्हणूनच तूप गुणांनी सर्वश्रेष्ठ असते, फक्त ते साजूक म्हणजे सर्व संस्कार नीट केलेले असायला हवे. 

घृतं रसायनं स्वादु चक्षुष्यं वदिपिनम्‌ । 
शीतवीर्यं विष अलक्ष्मीपापपित्तानिलापहम्‌ ।। ...भावप्रकाश

शास्त्रोक्‍त पद्धतीने बनविलेले साजूक तूप हे रसायन गुणांनी युक्‍त असते, चवीला गोड असते, डोळ्यांसाठी हितकर असते तसेच अग्नी प्रदीप्त करते. तूप वीर्याने शीत असते, वात-पित्तदोषांना कमी करतेच पण विषदोष, अलक्ष्मी, पाप यांचाही नाश करते. 

बुद्धी, स्मृती, आकलनशक्‍ती या तिन्ही प्रज्ञाभेदांसाठी तूप उत्कृष्ट असते. शिक्षण क्षेज्ञातील व्यक्‍तींनी, बौद्धिक काम करावे लागणाऱ्यांनी तसेच कामाचा ताण असणाऱ्यांनी नियमित तूप सेवन करणे उत्तम असते. तुपामुळे बुद्धिसंपन्नता मिळतेच पण जीवनशक्‍ती वाढते, प्रतिकारशक्‍ती वाढते. एकंदर तेजस्विता वाढते म्हणूनच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सर्वांसाठी तूप उत्तम असते. मलावरोधाचा त्रास असल्यास गरम पाण्यासह १-२ चमचे तूप घेण्याचा उपयोग होतो. याने अग्नीची ताकद तर वाढतेच, शिवाय पचनसंस्थेतील रुक्षता दूर होऊन पोट साफ व्हायला मदत मिळते. 

मानसिक विकारांवर तुपासारखे उत्तम औषध नाही असे म्हटल्यास अतिशयोक्‍ती ठरू नये. उन्माद, अपस्मार, नैराश्‍य यांसारख्या विकारात आहारासह तूप खाणे आणि ‘संतुलन ब्रह्मलीन घृता’सारखे औषधांनी सिद्ध तूप खाणे या दोहोंचाही अप्रतिम उपयोग होताना दिसतो. 

समघृतसक्‍तुप्राशाभ्यासो वृष्योदावर्तहराणाम्‌ - तूप व सातूचे पीठ नियमित सेवन करणे हे शुक्रधातूला पोषक आणि उदावर्तामध्ये (वायूची स्वाभाविक गती बदलून ती खालून  वरच्या दिशेला होते ती अवस्था) उत्तम असते.

तैलगण्डुषाभ्यासो दन्तबलरुचिकराणाम्‌ - तेलाचा गंडुष नियमितपणे करणे हे दाताची शक्‍ती आणि तोंडाची चव देणाऱ्या द्रव्यांमध्ये सर्वोत्तम असते. गंडुष कवल हे विशेष उपचार आयुर्वेदात सुचविलेले आहेत. 

औषधी द्रव मुखामध्ये काही वेळासाठी धारण करणे ही यातली मुख्य क्रिया होय. जेव्हा मुखात धारण केलेले द्रव इतक्‍या प्रमाणात असतो की मुखात खुळखुळवता येईल तेव्हा त्याला ‘कवल’ असे म्हणतात. तर जेव्हा द्रव मुख भरून धारण केला जातो व त्यामुळे खुळखुळवता येत नाही तेव्हा त्याला ‘गंडूष’ करणे असे म्हणतात. गंडूष वा कवल करण्याने मुखातील रुक्षता कमी करून वातदोषाचे शमन होते, उष्णता-दाह कमी करून पित्तदोषाचे शमन होते, मुखातील चिकटपणा, जिभेचा जडपणा नष्ट होतो, कफदोषाची शुद्धी होते, मुख, दात, हिरड्या, जीभ वगैरे कुठेही जखम झाली असेल तर ती भरून येते. गंडूष वा कवल करण्यासाठी निरनिराळे द्रव वापरता येतात, परंतु यासाठी तेल हे उत्तम असते. ईरिमेदादि तेल किंवा संतुलन सुमुख तेल यासाठी उत्तम होय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Balaji tambe article