#FamilyDoctor शक्‍ती

डॉ. श्री बालाजी तांबे
Sunday, 14 October 2018

प्राचीन भारतीय शास्त्रात शक्‍तीला देवतास्वरूप मानले आहे. किंबहुना, शक्‍तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत. बुद्धी व स्मरणशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मीदेवी, शरीरशक्‍तीच्या साहाय्याने दुष्ट व अभद्र गोष्टींचे नामोहरण करणारी दुर्गादेवी, संपूर्ण वैश्विक शक्‍तीवर अधिकार असणारी गायत्रीदेवी अशा सर्वच देवता शक्‍तीशी संबंधित असल्याचे सापडेल.

प्राचीन भारतीय शास्त्रात शक्‍तीला देवतास्वरूप मानले आहे. किंबहुना, शक्‍तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत. बुद्धी व स्मरणशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मीदेवी, शरीरशक्‍तीच्या साहाय्याने दुष्ट व अभद्र गोष्टींचे नामोहरण करणारी दुर्गादेवी, संपूर्ण वैश्विक शक्‍तीवर अधिकार असणारी गायत्रीदेवी अशा सर्वच देवता शक्‍तीशी संबंधित असल्याचे सापडेल. आई-वडिलांपासून किंवा पूर्वजन्माच्या इच्छा, आकांक्षांतून निर्माण झालेली कर्मबंधने जनुकांनी साठवलेली असतात आणि त्यामुळे मनुष्य बराचसा परस्वाधीन होतो. या बंधनातून सुटून स्वातंत्र्य व मुक्‍तीचा मार्ग मोकळा करण्यासाठी ज्या शक्‍तीची आवश्‍यकता असते व त्यासाठी जी उपाययोजना करायची त्यातून नवदुर्गा नवरात्रमहोत्सवाची आवश्‍यकता लक्षात येऊ शकेल.

जीवन जगताना शक्‍ती ही लागतेच. मनुष्यालाच नाही, तर प्राणी, वनस्पती, अगदी एखाद्या यंत्रालाही काम करण्यासाठी शक्‍तीची आवश्‍यकता असतेच. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला शारीरिक शक्‍तीची जास्ती आवश्‍यकता असेल, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला बौद्धिक शक्‍तीची जास्ती आवश्‍यकता असेल, एखाद्या कलाकाराला त्याच्यामधल्या प्रतिभाशक्‍तीची अधिक गरज असेल. शक्‍तीची रूपे गरजेप्रमाणे निरनिराळी असू शकतात, पण मुळात शक्‍ती ही लागतेच. प्राणशक्‍ती ही तर सर्वांत मोठी शक्‍ती, जिच्यामुळे आयुष्य चालू राहते. रोगप्रतिकारशक्‍तीसुद्धा महत्त्वाची, जिच्यामुळे आयुष्य निरोगी राहू शकते. एकंदरच शक्‍तीचा महिमा मोठा आणि याच शक्‍तीची उपासना म्हणजे नवरात्रातील महाशक्‍तीचा उत्सव.
दुर्बल मनुष्य सगळ्याच बाजूंनी असहाय असतो. शक्‍ती कमी असली, की शरीराची कार्यक्षमता कमी होते, मनाचा उत्साह कमी होतो, काय करावे व काय करू नये, याबाबत निश्‍चित निर्णय घेता येत नाही. यातूनच प्रज्ञापराधाची सुरुवात होते आणि त्रिदोषांचा प्रकोप होऊन अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकते. आयुर्वेदशास्त्रात शक्‍ती मिळवण्याच्या व अधिकाधिक टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने अनेक उपाय सांगितले आहेत. आरोग्यपूर्ण जीवन जगण्यास आवश्‍यक असणाऱ्या सर्व अंगांचा विचार करून आयुर्वेदाने ‘अष्टांग’ संकल्पना समजवली. त्यातील दोन मुख्य अंगे म्हणजे रसायन व वाजीकरण. या दोघांचाही मुख्य उद्देश शक्‍ती संवर्धन व शक्‍तिसंरक्षण हाच आहे. कायचिकित्सा या अंगातही स्वस्थवृत्त, सद्‌वृत्ताच्या माध्यमातून शक्‍तीचा अपव्यय होणार नाही, यासाठी मार्गदर्शन केलेले आहे.

कौमारभृत्यतंत्रात गर्भसंस्कारांद्वारे गर्भाची मूळ शक्‍ती अधिकाधिक विकसित होण्याच्या दृष्टीने अनेक उपाय सांगितले आहेत, ग्रहचिकित्सा या अंगात अभौतिक शक्‍ती, अदृश्‍य जीवाणू, विषाणू, ग्रह वगैरेंपासून रक्षण मिळून शक्‍तिव्यय होण्यास प्रतिबंध होण्याच्या दृष्टीतून विविध उपाय सुचवलेले आहेत. 

आयुर्वेदाने सांगितलेले आचरणासंबंधीचे लहान-मोठे सर्वच नियम शक्‍तिरक्षणाच्या दृष्टीतूनच सांगितलेले आहेत. उदा.- दिनचर्येत रोज करायला सांगितलेले अभ्यंग शरीरधातूंची शक्‍ती वाढवते, त्यांना कणखर बनवते, पादाभ्यंग करण्याने डोळ्यांची शक्‍ती वाढते. प्रकृतीनुरूप व्यायाम करण्याने एकंदर कार्यक्षमता वाढते, ऋतुमान व प्रकृतीनुरूप सात्त्विक व पौष्टिक आहार घेतल्याने व योग्य रसायनांचे सेवन करण्याने धातूंचे पोषण होऊन शरीरशक्‍ती मिळते.

शक्‍ती अनाठायी खर्च होऊ नये, यासाठी ‘साहस’ करू नये, म्हणजे शरीरशक्‍तीचा विचार न करता अत्याधिक परिश्रम करू नये, असे सांगितले आहे. नदीच्या प्रवाहाविरुद्ध पोहू नये, फार उंच स्वरात फार वेळासाठी ओरडू नये, अतिप्रमाणात हसू नये यांसारखे नियम सांगतानाही त्यात शक्‍तीचा अपव्यय होऊ नये, हाच उद्देश ठेवलेला आहे. मानसिक शक्‍तीचाही आयुर्वेदात विचार केलेला आहे. 

धारयेत्तं सदा वेगान्‌ हितैषी प्रेत्य चेह च।
...अष्टांगहृदय सूत्रस्थान
मानसिक वेग अर्थात राग, लोभ, असूया, दुःख, अहंकार वगैरे जे सगळे मानसिक भाव आहेत, त्यांच्यावर संयम ठेवावा; कारण या गोष्टींच्या आहारी गेल्यास शक्‍तीचा सर्वाधिक अपव्यय होऊ शकतो.

‘शक्‍ती’ची विविध स्वरूपे असू शकतात. एकदा मूळ शक्‍ती मिळाली की विविध रूपांत रूपांतरित होऊ शकते, उदा.- रसायन म्हणजे शुक्रधातू, ओजस वाढवणारा विशिष्ट ‘औषध योग’ असे समजले, तर त्यापासून शक्‍ती मिळू शकते, वर्ण उजळू शकतो. रोग बरा होऊ शकतो, आयुष्य वाढू शकते; स्मृती, बुद्धी, प्रज्ञासंपन्नता मिळू शकते. एवढेच नाही, तर ‘सौभाग्यवर्धन’, ‘अलक्ष्मीनाश’, ‘वाचासिद्धी’ या गोष्टीही मिळू शकतात, असे आयुर्वेदात स्पष्ट सांगितले आहे.

परं देहेन्द्रियबलं वाक्‌सिद्धिः प्रणतिः कान्तिश्‍च ।।
...चरक चिकित्सास्थान
ससुवर्णस्तिलैः सार्धं अलक्ष्मीनाशनः स्मृतः ।
अलक्ष्मीघ्नं सदाऽयुष्यं राज्याय सुभगाय च ।।
मेध्यमायुष्यमारोग्यपुष्टिसौभाग्यवर्धनम्‌ ।।
...सुश्रुत चिकित्सास्थान
वगैरे सूत्रांवरून स्पष्ट होते, की रसायनाचा परिणाम केवळ शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक स्तरावरच होतो असे नाही, तर भाग्य, लक्ष्मी-संपत्ती, वाचासिद्धीसारख्या सहसा जन्मजात किंवा दैवजात समजल्या जाणाऱ्या गोष्टीही मिळू शकतात. 

यावरून एक गोष्ट लक्षात येईल, की रसायनाच्या सेवनाने एकदा शक्‍ती मिळाली की मग ती हव्या त्या स्वरूपात रूपांतरित होऊ शकते. अर्थात, त्यासाठी शक्‍तीला योग्य प्रकारे वळण देण्याची आणि त्यासाठी योग्य प्रयत्न करण्याची आवश्‍यकता असतेच. मुळात शुक्रधातू, सप्तधातूंचे सारस्वरूप असणारे ओजतत्त्व यांच्यावर शक्‍ती अवलंबून असते. त्यादृष्टीने धातुपोषक आहार, रसायनसेवन, कफदोषाचे संतुलन व  धातूंची दृढता व सारता टिकून राहील, या प्रकारचे आचरण, योग्य आचरणासाठी मनावर संयम या गोष्टी सांभाळल्या, तर शक्‍तिसंवर्धन करता येईल.

याठिकाणी शक्‍तीचा खरा अर्थ लक्षात घ्यायला लागेल. उसनी, तात्पुरती किंवा इन्स्टंट पद्धतीने मिळवलेली शक्‍ती ही खरी शक्‍ती म्हणता येणार नाही. अनेक लोकांना दिवसभरामध्ये काम करण्यासाठी दर तीन-चार तासांनी कॉफीसारखे पेय प्यायची गरज भासते. कपभर कॉफी घेतल्यास थोडा वेळ ताजेतवाने वाटते, काम करायला हुरूप येतो हेही खरे, पण अशी तात्पुरती ओढून ताणून आणलेल्या शक्‍तीला खरी शक्‍ती नाही, तर शक्‍तीचा केवळ आभास म्हणावा लागेल. या आभासाने कमी पडत असलेली शक्‍ती भरून निघणे तर दूरच उलट असलेली शक्‍तीही कळत-नकळत हळूहळू खर्ची पडते.

आयुर्वेदाच्या नावाखाली आजकाल अशी अनेक इन्स्टंट शक्‍ती देणारी उत्पादने उपलब्ध होऊ लागली आहे. पण, जबरदस्तीने ओढून ताणून आणलेल्या क्षणिक शक्‍तीने मूळ आरोग्याचे नुकसानच होऊ शकते, याचे भान ठेवणे चांगले. शक्‍ती ही आपली आपण कमवावी लागते. शक्‍तीचा आभास निर्माण करता येत नाही. 

जीवनशक्‍ती, प्राणशक्‍ती उत्तम राहावी, यासाठी रसायनांच्या बरोबरीने आहार संतुलित असणे आणि सातही धातूंचे पोषण करणारा असणे हेसुद्धा महत्त्वाचे होय. आहाराची योजना उत्तम केली, तरी त्याचे पचन करणारा अग्नी सुस्थितीत असणेही गरजेचे असते, त्यादृष्टीने वयाच्या पस्तिशी-चाळिशीला शास्त्रोक्‍त पद्धतीने म्हणजे आभ्यंतर स्नेहन, अभ्यंग, स्वेदन वगैरे पूर्वतयारी करून नंतर पंचकर्माच्या मदतीने शरीर शुद्ध करून घेणे आवश्‍यक. याला उत्तम जोड मिळू शकते ती प्राणायामादी श्वसनक्रियांच्या योगे. नियमित दीर्घश्वसन, अनुलोम-विलोम, ॐकार यांच्या मदतीने प्राणशक्‍ती अधिक प्रमाणात आकर्षित करता येते. वेळेवर व पुरेशा प्रमाणात झोप घेणे हेसुद्धा शक्‍तीसाठी सहायक असते. उगवत्या सूर्याचे दर्शन, सूर्योपासना, सूर्यनमस्कार हेसुद्धा शारीरिक-मानसिक शक्‍तीसाठी मदत करतात. 

प्राचीन भारतीय शास्त्रात शक्‍तीला देवतास्वरूप मानले आहे. किंबहुना शक्‍तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत. बुद्धी व स्मरणशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मीदेवी, शरीरशक्‍तीच्या साहाय्याने दुष्ट व अभद्र गोष्टींचे नामोहरण करणारी दुर्गादेवी, संपूर्ण वैश्विक शक्‍तीवर अधिकार असणारी गायत्रीदेवी, अशा सर्वच देवता शक्‍तीशी संबंधित असल्याचे सापडेल. आई-वडिलांपासून किंवा पूर्वजन्माच्या इच्छा, आकांक्षांतून निर्माण झालेली कर्मबंधने जनुकांनी साठवलेली असतात आणि त्यामुळे मनुष्य बराचसा परस्वाधीन होतो. या बंधनातून सुटून स्वातंत्र्य व मुक्‍तीचा मार्ग मोकळा करण्यासाठी ज्या शक्‍तीची आवश्‍यकता असते व त्यासाठी जी उपाययोजना करायची, त्यातून नवदुर्गा नवरात्रमहोत्सवाची आवश्‍यकता लक्षात येऊ शकेल. 

आयुर्वेदातही शक्‍तिवर्धक रसायने तयार करताना त्यावर ‘श्रीसूक्‍त’ या अथर्ववेदातील लक्ष्मीदेवीच्या सूक्‍त-मंत्राचा संस्कार करायला सांगितला आहे.
श्रीसूक्‍तेन नरः कल्ये ससुवर्णं दिने दिने ।
...सुश्रुत चिकित्सास्थान
संतुलित सात्त्विक आहार, प्रकृतीनुरूप आचरण, शांत व पुरेशी झोप, संयमपूर्ण स्वभाव, नियमित व्यायाम, योग, ध्यान, स्वास्थ्यसंगीतादी गोष्टींचा रोजच्या दिनक्रमात समावेश आणि सरतेशेवटी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुजनांचे, परमशक्‍तीचे आशीर्वाद या सगळ्या गोष्टी मिळाल्या, तर शक्‍ती व त्या पाठोपाठ संपन्न जीवन मिळू शकेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Balaji Tambe Article