क्षयरोग

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 22 March 2019

क्षयरोग होऊ नये म्हणून तसेच त्यावर उपचार करताना प्रतिकारशक्‍ती उत्तम ठेवण्यासाठी योग्य पौष्टिक आहार, योग, चालणे, मोकळ्या हवेत फिरणे, मन आनंदी ठेवणे वगैरेंची आवश्‍यकता असते. शरीरात असलेल्या इम्यून सेल्स - रोगप्रतिकार करणारे सैन्य - कमकुवत झाले तर रोगाची लागण पटकन होते, विशेषतः फुफ्फुसांमध्ये क्षयाची लागण पटकन होते. 

टी.बी. किंवा क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे जागतिक स्तरावर प्रयत्न होत आहेत, परंतु अजून तरी याला म्हणावे तसे यश मिळालेले दिसत नाही. १८८२ मध्ये सर्वप्रथम क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लागला तो डॉ. रॉबर्ट कॉक यांनी. हा दिवस होता २४ मार्च. म्हणून २४ मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून ओळखला जातो आणि क्षयरोगाबाबत जनजागृती व्हावी म्हणून प्रयत्न केले जातात. आपणही आज क्षयरोगाची माहिती करून घेऊया. 

सध्या आढळणारा क्षयरोग, त्याची लक्षणे व क्‍लिष्टता यांचा विचार करता आयुर्वेदातील ‘राजयक्ष्मा’ या रोगाच्या अंतर्गत त्याचा समावेश होऊ शकतो. यक्ष्मा म्हणजे रोग. नक्षत्रांचा राजा चंद्र याला हा रोग सर्वप्रथम झाल्याने याचे नाव ‘राजयक्ष्मा‘ पडले असे वर्णन आयुर्वेदाच्या ग्रंथात सापडते. चरकसंहितेमध्ये राजयक्ष्माची चिकित्सा सांगताना सुरवातीला पुढील कथा सांगितली आहे. दक्षप्रजापतीच्या २८ कन्यांचा विवाह चंद्राशी झाला होता. या २८ पैकी रोहिणीवर चंद्र विशेष आसक्‍त होता. शरीरशक्‍तीची पर्वा न करता रोहिणीसह अति प्रमाणात रत झाल्याने शुक्रक्षय होऊन चंद्र अत्यंत क्षीण झाला. आपल्या इतर मुलींचा चंद्राने स्वीकार न केल्याचे जेव्हा दक्षप्रजापतीला समजले तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले. त्याचा हा क्रोध निःश्वासरूपाने बाहेर पडून देह धारण करता झाला व रोहिणीशी रत असलेल्या क्षीण चंद्रामध्ये शिरला व चंद्राला क्षयरोग होऊन त्याचे तेज नाहीसे झाले. असा राजयक्ष्म्याने पीडित निष्प्रभ चंद्र इतर देवदेवतांसह दक्षप्रजापतीला शरण आला. तेव्हा पश्‍चात्ताप झालेल्या चंद्रावर दक्षप्रजापती प्रसन्न झाले व अश्विनीकुमारांनी चंद्राला ओज वाढवण्यासाठी औषध देऊन बरे केले. या गोष्टीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, शरीरशक्‍तीचा ऱ्हास क्षयासाठी कारणीभूत असतोच. क्षयाच्या बाबतीत शरीरशक्‍तीचा ऱ्हास पुढील कारणांमुळे होऊ शकतो. 

 रस, रक्‍तादी शरीरधातूंचा क्षय होत जाणे.
 मल, मूत्र, वायू वगैरे वेगांची संवेदना होऊनही अडवणे.
 अवेळी जेवणे, अत्यंत कमी प्रमाणात किंवा अत्याधिक प्रमाणात जेवणे.
 स्वशक्‍तीपेक्षा अधिक परिश्रम करणे.

या सर्व कारणांनी शरीराची शक्‍ती कमी होत गेली, रोगप्रतिकारशक्‍ती कमी झाली की क्षय होऊ शकतो. 

क्षयाला रोगांचा राजा म्हणण्याचे अजून एक कारण असे की राजा जसा एकटा नसतो, त्याच्या अलीकडे पलीकडे मोठा लवाजमा असतो. तसेच क्षयरोगातही रोग होण्यापूर्वी व प्रत्यक्ष रोग झाल्यावर अनेक कष्टकारक लक्षणे असतात, वेळीच योग्य उपचारांच्या अभावी तो अनेक बिकट समस्याही निर्माण करू शकतो.

तीव्रतेवरून क्षयाचे तीन प्रकार पडतात. 
१. त्रिरूपक्षय - या प्रकारच्या क्षयात बरगड्या व खांदे दुखणे, ताप येणे आणि हात-पायाच्या तळव्यांची आग होणे अशी तीन लक्षणे असतात.

२. षड्‍रूपक्षय - या प्रकारच्या क्षयात खोकला येणे, तोंडाला चव नसणे,  ताप येणे, बरगड्या दुखणे, आवाज फुटणे, जुलाब होणे अशी सहा लक्षणे दिसतात.

३. एकादशरूपक्षय - या प्रकारच्या क्षयात डोके जड होणे, खोकला येणे, दम लागणे, आवाज फुटणे, कफाची उलटी होणे, थुंकीतून रक्‍त पडणे, बरगड्या दुखणे, खांद्यात वेदना होणे, ताप येणे, जुलाब होणे, तोंडाला चव नसणे अशी अकरा लक्षणे दिसतात. हा प्रकार बरा होण्यास अवघड असतो. मात्र लवकर निदान झाले व लगेच योग्य उपचार केले तर रोग बरा होण्याची शक्‍यता वाढते.

सहसा क्षयात हलका ताप असतो. मनुष्य ताप व खोकल्याने बेजार होऊन खंगत जातो. कधी कधी गळ्यातील वाढलेल्या गाठी किंवा शरीरातील इतर अवयवांनी दाखविलेली कामाची असमर्थता यांची तपासणी केली असताना कुठल्या तरी ग्रंथीचा, हाडाचा क्षय झालेला दिसतो. गाठी वरवर असल्या तर काढून टाकता येतात. अशा व्यक्‍तीने सुदृढ राहण्यासाठी म्हणजे शरीरातील प्रतिकार करणाऱ्या सैन्याचे आरोग्य नीट राहण्यासाठी प्रयत्न करणे खूप आवश्‍यक असते. निष्काळजीमुळे शरीरातील या सैन्याला कमकुवतपणा आला तर जंतू इतर ठिकाणी प्रादुर्भाव करू शकतात. औषधे सुरू केल्यावर रोग बरा झाला आहे अशा समजुतीतून औषधे घेणे मध्येच थांबविल्यास रोग दबा धरून बसतो व नंतर केव्हातरी प्रतिकारशक्‍ती कमी झाली की उफाळून येतो. क्षयरोगाचा इलाज पूर्ण केलेला नसेल, औषधे अर्धवट सोडलेली असतील तर पुन्हा रोग प्रकट झाल्यास त्यावर उपचार करणे खूप अवघड होते. 

क्षयरोग होऊ नये म्हणून तसेच त्यावर उपचार करताना प्रतिकारशक्‍ती उत्तम ठेवण्यासाठी योग्य पौष्टिक आहार, योग, चालणे, मोकळ्या हवेत फिरणे, मन आनंदी ठेवणे वगैरेंची आवश्‍यकता असते. शरीरात असलेल्या इम्यून सेल्स - रोगप्रतिकार करणारे सैन्य - कमकुवत झाले तर रोगाची लागण पटकन होते, विशेषतः फुप्फुसांमध्ये क्षयाची लागण पटकन होते. खोकताना वा शिंकताना नाकावर रुमाल धरणे, तोंड बाजूला करून खोकणे वगैरे काळजी घेतल्यास इतरांना संसर्ग होण्याची शक्‍यता कमी होते. अशी काळजी न घेतल्यास फक्‍त सर्दी, पडसे होईल असे नाही, पण एखाद्याला क्षयाची लागण झालेली असली तर त्याच्या थुंकीवाटे क्षयाचे जंतू बाहेर पडून इतरांना क्षयाची लागण होऊ शकते. रोग्याच्या थुंकीची विल्हेवाट नीट न लावल्यासही इतरांना लागण होऊ शकते. म्हणून पूर्वी क्षयाच्या रोग्याकडे घरातील इतरांना, विशेषतः मुला-बाळांना फिरकू दिले जात नसे.          

क्षयचिकित्सेत औषधोपचाराबरोबरच पुढील गोष्टी करावयास सांगितल्या आहेत.
 अभ्यंग - धातुक्षय भरून आणण्यासाठी शतावरी, बला वगैरे शरीरपोषक वनस्पतींनी सिद्ध तेलाचा अभ्यंग करावा.
 उद्वर्तन - शरीरपोषक वनस्पतींचे चूर्ण अंगाला लावून अंघोळ करावी.
 दूध, तूप, मांसरस (नॉनव्हेज सूप), भात वगैरे पदार्थ सेवन करावेत.
 वातशामक व धातुपोषक बस्ती घ्याव्यात.
 ब्रह्मचर्य पाळावे.
 मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा.
 दान, तपस्या, सत्यवचन वगैरे गोष्टी पाळाव्यात.
 वेदात वर्णन केलेले क्षयनाशक विशिष्ट यज्ञ करावेत.

लघून्यहीनवीर्याणि स्वादूनि गन्धवन्ति च। क्षयाच्या व्यक्‍तीस एक वर्ष जुन्या धान्यापासून तयार केलेले पदार्थ खावयास द्यावेत. तसेच त्यांचे अन्न पचावयास हलके, उत्तम वीर्य असलेले, गोड, उत्तम सुवासयुक्‍त आणि शरीर व मनाला तृप्त करणारे असावे.

याखेरीज क्षयविकारात रोग्याचे वय, क्षय होण्याचे कारण, रोगाची तीव्रता, शरीरशक्‍ती वगैरे विविध गोष्टींचा विचार करून योग्य औषधे द्यावी लागतात. उदा. दशमूळ घृत, खर्जुरादी घृत, पंचमूळ घृत, बलादी क्षीर, च्यवनप्राशावलेह, तालिसादी चूर्ण वगैरे औषधांची योजना केली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Balaji tambe article article on Tuberculosis