अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 4 May 2018

आचार्यांनी हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदात सांगितलेल्या गोष्टी समजून घेतल्या, अंगीकारल्या तर त्यामुळे जीवन समृद्ध होण्यासच मदत मिळेल. आयुर्वेद हे जगण्याचे शास्त्र आहे. ते काळाच्या व देशाच्या सीमांपलीकडेही मार्गदर्शक आहे.

जीवन जगण्याचे शास्त्र असणाऱ्या आयुर्वेदात अन्न, औषध, आचरण, मानसिकता, सामाजिक व्यवहार, सद्‌वृत्त अशा अनेक विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केलेले आहे. हे मार्गदर्शन एखाद्या देशापुरते किंवा अमुक काळापुरते मर्यादित राहील असे नाही. हजारो वर्षांपूर्वी सांगितल्या असल्या, तरी आजही या गोष्टी समजून घेतल्या, अंगीकारल्या तर त्यामुळे जीवन समृद्ध होण्यासच मदत मिळेल. अग्र्यसंग्रह हे या सर्वांचे सारस्वरूप होय. अगदी थोडक्‍यात पण सर्वांत महत्त्वाची माहिती चरकाचार्यांनी आपल्या अग्र्यसंग्रह या विभागात दिलेली आहे. मागच्या वेळी आपण पथ्यकर औषधांमध्ये हिरडा सर्वश्रेष्ठ असतो हे पाहिले. आता यापुढची माहिती घेऊ या. 

एरण्डमूलं वृष्यवातहराणाम्‌ - एरंडाचे मूळ हे शुक्रवर्धन व वातदोषाचे शमन करणाऱ्या द्रव्यांमध्ये श्रेष्ठ असते. कोणत्याही प्रकारच्या वातविकारामध्ये एरंडाच्या मुळाचा काढा लागू पडतो. अंगावर सूज येत असली तरी हा काढा उपयोगी पडतो. पोटात वायू होऊन पोट दुखत असले तर एरंडमुळाचा काढा करून त्यात हिंग व काळे मीठ मिळून घेण्याचा उपयोग होतो. बरगड्या, पाठ, कंबर दुखत असली तर एरंडमुळाच्या काढ्यात यवक्षार टाकून घेण्याचा फायदा होतो. गुडघे किंवा इतर कोणत्याही सांध्यावर सूज येऊन दुखत असेल, तर एरंडमुळाचा काढा घेण्याने आणि दुखणाऱ्या भागावर एरंडाची पाने वाफवून, बांधून ठेवण्याने बरे वाटते. वातदोष वाढला की शरीरातील शक्‍ती कमी होणे स्वाभाविक असते. एरंडमूळ वातदोष तर कमी करतेच, पण शुक्रवर्धन करून शक्‍तीसुद्धा वाढवते म्हणून वातविकारावर उत्तम समजले जाते. 

पिप्पलीमूलं दीपनीयपाचनीयआनाहप्रशमनानाम्‌ - अग्निदीपन, पचन व पोटात झालेला वायू सरण्यासाठी पिंपळीमूळ सर्वोत्तम असते. पिंपळी प्रसिद्ध आहे, याचे मूळ पिंपळमूळ किंवा पिंपळीमूळ म्हणून ओळखले जाते. भूक लागत नसली, पोटात वायू धरत असला तर याचे अर्धा चमचा चूर्ण मधात मिसळून चाटण्याने बरे वाटते. सध्या बऱ्याच व्यक्‍तींना दूध पचत नाही, दूध प्यायले की पोट फुगणे, वायू होणे वगैरे त्रास होतात. यावर दुधात पिंपळमुळाचे चूर्ण मिसळून घेण्याचा उपयोग होतो. बाळंतपणानंतर पोट पूर्ववत व्हावे, गर्भाशयातील वात कमी व्हावा यासाठी सुद्धा पिंपळमूळ वापरले जाते. यासाठी जेवणानंतर ताकात पिंपळमुळाचे चूर्ण घ्यायचे असते. 

चित्रकमूलं दीपनीयपाचनीयगुदशोथार्शशूलहराणाम्‌ - चित्रकमूळ अग्निदीपन, अन्नपचन करण्यासाठी तसेच गुदाच्या ठिकाणी आलेली सूज व मूळव्याधीमुळे होणारे दुःख कमी करण्यासाठी सर्वोत्तम असते. चित्रक उष्ण गुणाची वनस्पती आहे. म्हणून चित्रकाला संस्कृतमध्ये अग्नि असे म्हणतात. अपचन, भूक न लागणे, पोट फुगणे वगैरे विकारांत दोन चिमूट चित्रकमुळाचे चूर्ण मधाबरोबर घेण्याचा उपयोग होतो. गुदभागी येणारी सूज तसेच मूळव्याधीवर याचा विशेष प्रयोग करता येतो. चित्रक मूळ उगाळून केलेल्या पेस्टचा मातीच्या मडक्‍याला आतून लेप करावा. या मडक्‍यात दूध विरजण्यास ठेवावे व सकाळी त्या दह्याचे घुसळून तयार केलेले ताक प्यावयास द्यावे. यामुळे अग्निदीपन होऊन मूळव्याध, संग्रहणी हे त्रास बरे होतात. दीपन, पचन करणारा असल्याने चित्रकमूळ यकृतरोगातही लागू पडते.

पुष्करमूलं हिक्काश्वासकासपार्श्वशूलहराणाम्‌ - उचकी, दमा, खोकला, कुशीमध्ये होणाऱ्या वेदना यावर पुष्करमूळ उत्तम लागू पडते. 

ही वनस्पती काश्‍मीर प्रदेशात होते. याचे चूर्ण मधाबरोबर घ्यायचे असते. तसेच वरून लेप करण्याने अधिक चांगला व लवकर गुण येतो. 

मुस्तं सांग्राहिकदीपनीयपाचनीयानाम्‌ - मुस्ता म्हणजेच नाररमोथा मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करण्यासाठी, अग्निदीपन व पचन होण्यासाठी श्रेष्ठ असतो. 

तिक्‍तकटुकषायं शीतं पाचनं संग्राहि श्‍लेष्मपित्तघ्नम्‌ ।
रक्‍तविकृतिज्वरातिसारतृष्णाकृमिघ्नं च ।।
...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान 

 

नाररमोथा चवीला तिखट, कडू आणि तुरट असतो, थंड गुणाचा असतो, पचनाला मदत करतो, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतो. कफ व पित्तदोषाला कमी करतो, रक्‍ताची शुद्धी करतो, ताप, जुलाब, तहान न शमणे या विकारांमध्ये हितकर असतो.

अग्निदीपन, पचन करणारी द्रव्ये साधारण उष्ण वीर्याची असतात, मात्र नागरमोथा हा अपवाद होय. एकाच वेळी पित्त कमी करणे व अग्नीचे दीपन करणे, पचनास मदत करणे अशी दोन्ही कामे तो करू शकतो. फार तहान लागत असली, कितीही पाणी प्यायले तरी समाधान होत नसले तर नागरमोथ्याचा काढा घेण्याचा उपयोग होतो. तापामध्ये नागरमोथा व पित्तपापडा यांचा एकत्रित काढा घेण्याचा उपयोग होतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना जुलाबामध्ये नागरमोथ्याची योजना करता येते. 

अग्र्यसंग्रहातील या पुढील माहिती आपण पुढच्या वेळी घेऊ या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Balaji tambe article Ayurveda