#FamilyDoctor अपस्मार

#FamilyDoctor अपस्मार

आयुर्वेदात रोगांचे स्वरूप समजावताना ‘वेग’ अशी एक संकल्पना सांगितलेली जाते. या ठिकाणी वेग शब्दाने ‘जलद गती’ या अर्थाबरोबर ‘रोगाचा पुन्हा पुन्हा प्रादुर्भाव’ असाही अर्थ अभिप्रेत असतो. आणि हे वातदोषामुळे होणाऱ्या रोगांच्या बाबतीत घडते. वाताचे रोग बरे व्हायला अवघड असतात यामागे सुद्धा हे एक महत्त्वाचे कारण असते. व्यवहारात याच अर्थाने आपण ‘झटका’ हा शब्द वापरतो. उदा. हृदयाचा झटका, अर्धांगवाताचा झटका वगैरे. असाच एक आयुर्वेदातील ‘वेग’ संकल्पनेशी मिळता जुळता रोग म्हणजे अपस्मार म्हणजे एपिलेप्सी किंवा फिट येणे.

मेंदूशी म्हणजेच चेतासंस्थेशी संबंधित असणारा हा रोग वेग-अवस्थेत मुख्यत्वे प्रादुर्भूत होतो. वेग अवस्था नसताना ही व्यक्‍ती सहसा सामान्य दिसू शकते. मात्र कधी कधी रोगाची व्याप्ती फारच जास्ती असेल तर, एरवी सुद्धा मेंदूची बुद्धी व स्मृती संबंधित क्षमता कमी झालेली आढळते. अपस्मार हा शब्द स्मृती शब्दावरून आलेला आहे. 

स्मृतेः अपध्वंसं अपस्मार प्रकुर्वते । म्हणजे ज्या रोगात काही काळासाठी स्मृतिनाश होतो किंवा स्मृती कमी होते त्या रोगाला अपस्मार असे म्हटले जाते. आयुर्वेदाने या रोगात मस्तिष्कातील बिघाड हे जसे मुख्य कारण सांगितले, तसेच मनातील दोष हासुद्धा तितकाच महत्त्वाचा समजला आहे. अपस्मार रोग कसा होतो यासंबंधी चरकाचार्यांनी सूत्र दिलेले आहे, 

दोषाः प्रकुपिता रजस्तमोभ्याम्‌ उपहतचेतसाम्‌ अन्तरात्मनः 
श्रेष्ठमायतनं हृदयमुपसृत्योपरि तिष्ठन्ते तथा इन्द्रियायतनानि च ।   
....चरक निघण्टु 

मनाचे दोष समजले जाणारे रज व तम जेव्हा प्रकुपित होतात तेव्हा मनाला बिघडवतात व बुद्धीचे श्रेष्ठ स्थान असणाऱ्या हृदयाला तसेच मस्तिष्काला संसर्ग करून इंद्रियांमध्ये दोष निर्माण करतात. 

थोडक्‍यात या रोगात मन, बुद्धी, इंद्रिये, हृदय, मस्तिष्क या सर्व महत्त्वाच्या तत्त्वांमध्ये, अवयवांमध्ये बिघाड होत असतो. अर्थातच यामुळे हा रोग अवघड प्रकारच्या रोगात मोडतो. 

अपस्माराला वयाचे बंधन नाही, कोणत्याही वयात याची सुरवात होऊ शकते. मात्र लहान मुले आणि ज्येष्ठ व्यक्‍तींमध्ये हा रोग होण्याची प्रमाण अधिक असलेले आढळते. अपस्माराचे स्वरूप प्रत्येक व्यक्‍तीमध्ये वेगवेगळे असते. वेगाचे स्वरूप, वेगाचा कालावधी, दोन आवेगांमधील काळ, वेग येऊन गेल्यावर रुग्णाला जाणवणारी लक्षणे यात मोठा फरक असू शकतो. आयुर्वेदात याला दोषांचा संचय कारणीभूत असतो असे सांगितलेले आहे. दोषांमधील बिघाड जितका तीव्र स्वरूपाचा आणि जास्ती असेल, तितकी वेगाची तीव्रता जास्ती असते आणि वेगांची संख्याही जास्ती असते. ज्याप्रमाणे जमिनीवर पडलेले बीज उगवून येण्यासाठी अमुक ऋतुमान येणे गरजेचे असते, तसेच रोग व्यक्‍त होण्यासाठी म्हणजेच वेग येण्यासाठी  अमुक काळ जाणे अपरिहार्य असते. या शब्दांत सुश्रुताचार्यांनी वेगाबद्दल समजावलेले आहे. 

आयुर्वेदात अपस्माराची कारणे पुढीलप्रमाणे सांगितली आहेत, इंद्रिये म्हणजे नाक, कान, डोळे वगैरे आपापले विषय ग्रहण करतात, त्या वेळी त्यांच्यामध्ये अतियोग किंवा मिथ्यायोग घडणे. उदा. डोळ्यांवर अतिताण पडणे, सातत्याने प्रखर प्रकाशात पाहणे हा डोळ्यांचा अतियोग, तर काहीतरी बीभत्स पाहणे, चित्रविचित्र गोष्टी बघणे हा डोळ्यांचा मिथ्यायोग. पाचही इंद्रियांच्या बाबतीत असा अतियोग आणि मिथ्यायोग जर वारंवार घडत राहिला तर तो अपस्माराला कारण ठरू शकतो.

विरुद्ध आहार म्हणजे संयोग झाल्यानंतर दोष तयार करतील अशी दोन किंवा अधिक द्रव्ये एकत्र करून खाण्याची सवय असणे, उदा. आंबट किंवा खारट गोष्टींमध्ये दूध मिसळून घेणे, दूध व फळे एकत्र करून खाणे वगैरे. 

मलीन आहाराचे सेवन करणे. या ठिकाणी दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे दिसणारी व न दिसणारी मलिनता असा मुद्दाम उल्लेख केलेला आहे. त्यामुळे शिळे अन्न, अनैसर्गिक खते वापरून उगवलेले अन्न, अशुद्ध बीजापासून उगवलेले अन्न वगैरे सर्वच गोष्टींची मलीन आहारात समावेश होऊ शकतो. 
नैसर्गिक आवेग धारण करणे. 
अन्न सेवन करताना किंवा बनवताना स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे. 
रजस्वला अवस्थेत मैथुन करणे.
भय, राग, उद्वेग वगैरे भावनांमुळे मनाचा प्रक्षोभ होणे. 
बऱ्याचदा अपस्मारामध्ये आनुवंशिकता असते, मर्माघात म्हणजे मेंदू वगैरे महत्त्वाच्या मर्मांवर आघात झाल्यानेही अपस्माराची सुरुवात होऊ शकते. 

अपस्माराचा रुग्ण सहसा एरवी सर्व क्रिया सामान्यपणे करून शकतो, मात्र त्याची वेगावस्थेच्या काळातील स्मृती नष्ट झाल्याचे आढळते. वेग येऊन गेल्यावर सहसा रुग्ण झोपून जातो व उठल्यावर त्याला थकवा जाणवतो, क्वचित डोके दुखते किंवा उलटी होते. अपस्माराचे वेग कधीही आणि एकाएकी येत असल्याने अशा व्यक्‍तींनी यंत्रावर काम करणे, वाहन चालवणे, कोणतीही साहसी क्रिया करणे हे टाळणे श्रेयस्कर असते. 

अपस्माराचे निदान झाल्यावर जितक्‍या लवकर योग्य उपचार सुरू होतील तितका चांगला उपयोग होताना दिसतो. वेग येऊ नये म्हणून आधुनिक चिकित्सेमध्ये औषधांची योजना केली जाते. प्रत्येक व्यक्‍तीनुसार कोणते औषध, किती मात्रेत घ्यायचे हे क्रमाक्रमाने ठरवून त्याप्रमाणे नियमितपणे औषध घ्यायचा सल्ला दिला जातो, मात्र या औषधांमध्ये खंड पडून चालत नाही. आयुर्वेदात अपस्मारावर यशस्वी उपचार करता येतात. यात वैद्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली नेमके उपचार करणे सर्वांत चांगले असते. यात औषधांच्या बरोबरीने शिरोबस्ती, शिरोपिचू, नस्य या उपचारांचा उत्तम फायदा होताना दिसतो. वेगाला प्रतिबंध करणाऱ्या गोळ्या बहुतेक केसेसमध्ये क्रमाक्रमाने कमी करता येतात असा अनुभव आहे.

वेग असताना आणि वेग नसताना अशा दोन प्रकारे आयुर्वेदाच्या उपचारांची योजना केली जाते. वेग असताना तीक्ष्ण द्रव्यांचे नस्य, अंजन, धूप केला जातो; तर वेग नसताना पंचकर्माच्या मदतीने शरीरशुद्धी, यातही विरेचन व बस्तीची योजना केली जाते. मेंदूवर काम करण्यासाठी औषधांनी संस्कारित तुपाची योजना सर्वोत्तम ठरते. ब्राह्मी, जटामांसी, वेखंड, पंचगव्य वगैरे द्रव्यांनी संस्कारित संतुलन ब्रह्मलीन घृतासारखे औषधी घृत घेण्याचा उपयोग होताना दिसतो. सुवर्णभस्म, अभ्रकभस्म यांची वैद्यांच्या मार्गर्शनाखाली योजना करण्याचाही उत्तम गुण येताना दिसतो. 

मेंदू, बुद्धी, मन, इंद्रिये वगैरे महत्त्वाच्या घटकांशी संबंधित असणाऱ्या या रोगावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेणे सर्वोत्तम, बरोबरीने घरच्या घरी पुढील सोपे उपाय सहायक म्हणून करता येतील,

कर्टोली म्हणून वेल अशी असते की जिला फक्‍त फुले येतात, फळे येत नाहीत. अशा वंध्या कर्टोलीचे मूळ तुपात उगाळून, त्यात साखर मिसळून दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन-तीन थेंब प्रमाणात नस्य करता येते. 

कोहळ्याच्या रस दोन चमचे रसात ज्येष्ठमध उगाळून तयार झालेली पेस्ट रोज सकाळी एकदा घेता येते. 

ब्राह्मीच्या पानांचा रस दोन चमचे काढून त्यात मध मिसळून रोज सकाळी घेता येतो. 

शतावरीची ताजी किंवा सुकलेली मुळी दुधाबरोबर वाटावी किंवा उगाळावी. या प्रकारे रोज दहा ग्रॅम शतावरी घेण्याचा उपयोग होतो.

वेखंड सात दिवसांसाठी तुपात भिजत घालावे. नंतर यंत्राच्या मदतीने वेखंडाचे तेल काढावे. अपस्माराचा वेग आला असता वेखंडाच्या तेलाचा वास घेण्याचा उपयोग होतो. 

लहान मुलांना असणाऱ्या अपस्मारावर अक्कलकऱ्याच्या फुलांचे दोन चिमूट चूर्ण मधात मिसळून सकाळ-संध्याकाळ घेण्याचा उपयोग होतो. 

हे सर्व उपाय सुरक्षित आहेत, त्यामुळे कोणीही करून पाहायला हरकत नाही, मात्र या रोगामध्ये तज्ज्ञांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाला पर्याय नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com