#FamilyDoctor फिट्स अनफिट

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Sunday, 18 November 2018

अपस्माराची शंका आल्यास डॉक्‍टरांना भेटून, मेंदूची तपासणी करून, आधुनिक व आयुर्वेदिक उपचार करणे आवश्‍यक असते. फिट दाबून ठेवण्यासाठी औषधयोजना झाली तर पुढे विकार बळावतो आणि झटक्‍यांची तीव्रता वाढते. हलके हलके या रोगाचे मेंदूच्या इतर रोगांमध्ये परिवर्तन होऊ शकते, स्मृतिभ्रंश होऊ शकतो. हा विकार झालेली व्यक्‍ती आत्मविश्वास हरवून बसल्याचे दिसते.  

‘‘जरा बघा हो याच्याकडे. हा असे काय करतो आहे? दात खातो आहे, थरथरतो आहे. काय झाले असावे?’’ सौंभाग्यवतीनी हाक दिल्या दिल्या वडिलांनी येऊन पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हा काही सामान्य प्रकार नव्हे. त्यांनी ताबडतोब डॉक्‍टरांना फोन केला. डॉक्‍टर आल्यावर मुलाला फिट आल्याचे लक्षात आले. या आजाराला ‘फिट’ असा शब्द का वापरला जातो हे कळत नाही. कारण हा मेंदूचा विकार माणसाला ‘अनफिट’ करतो. 

यालाच आयुर्वेदात अपस्मार म्हटले जाते. याची अनेक लक्षणे असू शकतात. हा विकार वेगवेगळ्या वयात सुरू होऊ शकतो. बऱ्याच वेळी लहानपणी मुलांमध्ये हा विकार आलेला दिसतो. लहानपणी सुरू झालेल्या फिटचे कारण अनेकदा पोटातील जंत असते असे आढळते. त्यानुसार उपचार केल्यानंतर फिट येणे बंद झाल्याचा अनुभव आहे. फिट येण्याचा प्रकार लहान मुलांच्या बाबतीत धोकादायक ठरू शकतो. कारण हा विकार असलेल्या मुलांना स्वतः काय काळजी घ्यावी हे कळू शकत नाही. मोठ्या माणसाच्या बाबतीतही फिट येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक इलाज करता येत नाही. यावर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विकाराची सुरवात झाल्यावर लगेच योग्य औषधे व उपचारांची योजना केली तर चांगले परिणाम झाल्याचे दिसते. 

रस्त्यात कोणाला तरी फिट येणे वगैरे प्रकार घडलेले दिसतात. असे झाल्यास भोवतालच्या मंडळींपैकी कोणी त्याला चप्पलेचा वास देतो, कोणी कांदा हुंगवायच्या प्रयत्न करतो वगैरे. परंतु हे झाले तात्पुरते इलाज. हा मूळ विकारावरचा इलाज आहे असे म्हणता येत नाही. पण तात्पुरता फायदा होताना आढळतो. 

या आजाराची शंका आल्यास डॉक्‍टरांना भेटून, मेंदूची तपासणी करून, आधुनिक व आयुर्वेदिक उपचार करणे  आवश्‍यक असते. फिट दाबून ठेवण्यासाठी औषधयोजना झाली तर पुढे विकार बळावतो आणि झटक्‍यांची तीव्रता वाढते. अपस्माराचे आवेग असतात. अपस्माराचा झटका आल्यावर जीभ दाताखाली येऊ शकते. तेव्हा अशा वेळी संबंधित व्यक्‍तीच्या तोंडात चमच्याचा दांडा, किल्ली असे काहीतरी देण्याची पद्धत दिसते. दाताखाली जीभ येऊ नये, यासाठी या उपायाचा फायदा असला तरी हा मूळ विकारावरचा इलाज नव्हे. मूळ रोगावर इलाज करणे आवश्‍यक असते. हलके हलके या रोगाचे मेंदूच्या इतर रोगांमध्ये परिवर्तन होऊ शकते, स्मृतिभ्रंश होऊ शकतो. हा विकार झालेली व्यक्‍ती आत्मविश्वास हरवून बसल्याचे दिसते. कारण फिट कुठल्या घटकेला व कधी येईल हे सांगता येत नाही. 

हा एक वाताचा रोग आहे. त्यामुळे या विकारात वातूळ पदार्थ खाणे टाळणे आवश्‍यक असते. आवेगाच्या विकारात एका वेळी जास्ती वातूळ पदार्थ खाल्ले गेले, उदा. तळलेली भजी, गवारीच्या शेंगाची भाजी, सिमला मिरची अशा वस्तू एकत्रित खाल्ल्या गेल्या तर फिट येण्यास अनुकूल परिस्थिती तयार होऊन फिट येऊ शकते. स्त्रियांच्या मासिकधर्मातील असंतुलनामुळे एक प्रकारचा अपस्मार दिसून येतो, अशा वेळी स्त्री-हॉर्मोन्सवर पण इलाज करणे आवश्‍यक ठरते.

अपस्मार या रोगाची संपूर्ण माहिती आपण मुखपृष्ठ कथेत घेणार आहोत. हा विकार साधासुधा न समजता हा अत्यंत अवघड विकार आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार इलाज करणे आवश्‍यक असते. या विकाराचा आवेग येण्यामागे अचानक मानसिक धक्का बसणे हेही कारण असू शकते. त्यामुळे हा विकार असलेल्या रुग्णाने मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा, ध्यान-धारणा करावी, मेंदूला उपयुक्‍त ठरणारी संस्कृतरचना, स्तोत्रे, सूक्‍त ऐकावी, गावीत; जेणेकरून मेंदूचे आरोग्य चांगले राहायला मदत मिळेल. या उपायांमुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहायला मदत होत असली तरी तज्ज्ञांकडून योग्य औषधयोजना, उपाय व्हायला हवेतच. सध्या असेही मेंदूच्या विकारांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे, अल्झायमर्ससारखे विकार वाढत आहेत. तेव्हा असे काही विकार होऊ नयेत, यासाठी प्रत्येकाने मेंदूची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. ज्याला कुणाला या विकारामुळे फिट येत असेल त्याने आपण आता अनफिट आहोत हे लक्षात घेऊन उपचारांमध्ये चालढकल करू नये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Balaji tambe article Fits Unfait