श्रीकृष्णांचे  आरोग्यमार्गदर्शन

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 23 August 2019

जे काही चिंतन करायचे आहे, ज्याला ज्ञान म्हणायचे, ज्याला अनुभव म्हणायचा, जे काही समजून घ्यायचे आहे ते हेच परमतत्त्व समजून घ्यायचे आहे. आणि ते सत्य असेल तर आपण नुसतेच शरीरातील भौतिक द्रव्यांकडे, त्यातील टॉनिक्‍स, प्रोटिन्स, धातू यांच्यावर लक्ष केंद्रित केले किंवा केवळ यांच्यात झालेल्या असंतुलनाचा विचार केला तर काम होणार नाही हे सहज लक्षात येण्यासारखे आहे.

जे काही चिंतन करायचे आहे, ज्याला ज्ञान म्हणायचे, ज्याला अनुभव म्हणायचा, जे काही समजून घ्यायचे आहे ते हेच परमतत्त्व समजून घ्यायचे आहे. आणि ते सत्य असेल तर आपण नुसतेच शरीरातील भौतिक द्रव्यांकडे, त्यातील टॉनिक्‍स, प्रोटिन्स, धातू यांच्यावर लक्ष केंद्रित केले किंवा केवळ यांच्यात झालेल्या असंतुलनाचा विचार केला तर काम होणार नाही हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. याच्यावर श्रीमद्‌भगवद्‌गीतेने खूप जोर दिलेला आहे. शरीरात येणाऱ्या चैतन्याचा, शरीरात येणाऱ्या प्राणतत्त्वाचा व शरीरात असलेल्या परमेश्वरी संकल्पनेचा विचार करणेही आवश्‍यक आहे. 

श्री  विष्णूंचा अवतार श्री धन्वंतरी आणि श्रीविष्णूंचाच अवतार श्रीकृष्ण. श्री धन्वंतरी जणू आयुर्वेदाचे मूर्त स्वरूप आहेत असे म्हटले तर श्रीविष्णू आणि श्रीकृष्ण हेही आयुर्वेदाचे मूर्तिमंत अस्तित्व होत असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे जीवन सुखी करण्यासाठी, जीवन जगण्यासाठी काय करावे, कसे राहावे याचे मार्गदर्शन करत असताना सांगितलेल्या श्रीमद्‌भगवद्‌गीतेत आयुर्वेदाचा बराच उल्लेख आलेला दिसतो. 

जीवनाचे महाभारत हे पूर्वी झालेल्या कौरव-पांडव यांच्यामध्ये झालेल्या महाभारतापुरते मर्यादित नसून त्याचा पंचेंद्रियांचा खेळ आजवर चालू आहे. आणि त्याविरुद्ध कर्माचा खेळ चालू असताना त्यातून उत्पन्न झालेला अहंकार इंद्रियांवर आरूढ होण्याचा प्रयत्न करत राहतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या काळवाचक, स्थळवाचक, प्राणिवाचक, जातिवाचक बंधनात न राहता, जे ज्ञान जीवनाला सर्वतोपरी उपयोगी पडणार आहे, ते मिळविण्याचा प्रयत्न केला, पंचभौतिक देहात असलेल्या इंद्रियांच्या पंचभौतिक स्वभावातून आलेले गुण-अवगुण, इंद्रियांच्या सवयी एका बाजूला आणि कशाचाही आधार नसलेला अहंपणा दुसऱ्या बाजूला हा भेद समजून घेऊन मूळ तत्त्वाला समजून घेतले तरच जीवन सुखी होऊ शकते. म्हणूनच आयुर्वेदाचा उपचार हा केवळ भौतिक शरीरापुरता किंवा त्याला दिल्या गेलेल्या अन्न, औषध, रसायन तसेच अभ्यंग, बस्ती वगैरे उपचारांपुरता मर्यादित न राहता आत्म्याच्या एकूण संकल्पनेला समजून घेऊन केलेला उपचार असतो. म्हणूनच आयुर्वेद रोगाच्या लक्षणांवर लक्ष देत नाही, तर रोग होण्यामागचे मूळ कारण काय आहे, कुठला प्रज्ञापराध म्हणजे नैसर्गिक धर्माविरुद्ध झालेली चूक घडल्यामुळे रोग झाला आहे, ज्या परमतत्त्वावर जीवन उभे आहे, त्यात व व्यक्‍तीमध्ये फारकत का झाली हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा समत्व स्थापित करणे ही आयुर्वेदाची उपचारपद्धती असते. 

यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम्‌। 
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्‌ ।।१५-१२।।

श्रीमद्‌भगवद्‌गीतेतील १५ व्या अध्यायातील १२ व्या श्‍लाेकात भगवंत म्हणतात, जे तेज सूर्याच्या ठिकाणी राहून अखिल जगताला प्रकाशित करते, तसेच जे तेज चंद्राच्या ठिकाणी स्थित आहे, अग्नीतही स्थित आहे ते माझेच तेज आहे असे समज. येथे दिवस-रात्रीचा उल्लेख आलेला आहे, सूर्याच्या अत्यंत तेजस्वी तेजाचा व चंद्राच्या शीतल तेजाचाही उल्लेख झाला. हे तेज असे आहे की त्याचा नुसता प्रभाव दिसत नाही तर त्यातून साक्षात अग्नी प्रकट होतो. या प्रकट झालेल्या अग्नीचा ज्यात समावेश होतो, ते चैतन्य, ते परमतेज माझेच आहे, तेच परमसत्य आहे, या विश्‍वाची आदि संकल्पना आहे असे या ठिकाणी सांगितलेले आहे. यानंतर १५ व्या श्‍लोकात म्हटले आहे, 
सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च । 
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्‌ 
                ।।१५-१५।।

मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने स्थित आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान व अपोहन होतात व सर्व वेदांच्या द्वारे मीच जाणवावयास योग्य आहे. 

म्हणजे जे काही चिंतन करायचे आहे, ज्याला ज्ञान म्हणायचे, ज्याला अनुभव म्हणायचा, जे काही समजून घ्यायचे आहे ते हेच परमतत्त्व समजून घ्यायचे आहे. आणि ते सत्य असेल तर आपण नुसतेच शरीरातील भौतिक द्रव्यांकडे, त्यातील टॉनिक्‍स, प्रोटिन्स, धातू यांच्यावर लक्ष केंद्रित केले किंवा केवळ यांच्यात झालेल्या असंतुलनाचा विचार केला तर काम होणार नाही हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. व याच्यावर श्रीमद्‌भगवद्‌गीतेने खूप जोर दिलेला आहे. 

अग्नी हा चैतन्याचा प्रकट भाव आहे. जे चैतन्य, जो अग्नी शरीरात प्रकट झालेला आहे तो अग्नी वा चैतन्य शरीरातून निघून गेले की, शरीराला रोग असो व नसो, जीवन संपते. याचा विकार न करता केवळ शरीरातील भौतिकाचा, शरीराच्या केमिस्ट्रीचा विचार केला तर जीवन आरोग्यमय कसे होईल? 

शरीर तयार होण्यासाठी, शरीर टिकविण्यासाठी, शरीरामार्फत कर्म होण्यासाठी, शरीराचा भाव चालू ठेवण्यासाठी अन्नाची गरज आहे असे श्रीमद्‌भगवद्‌गीतेने सांगितले. शरीरात येणाऱ्या चैतन्याचा, शरीरात येणाऱ्या प्राणतत्त्वाचा व शरीरात असलेल्या परमेश्‍वरी संकल्पनेचा विचार करणेही आवश्‍यक आहे. 

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः । 
प्राणापानसमायुक्‍तः पचाम्यन्नं चतुर्विधम्‌ ।।१५-१४।। 

सर्व प्राण्याच्या देहात स्थित असलेले चैतन्यतत्त्व वैश्वानर अग्नीरूप होऊन प्राण व अपान यांनी युक्‍त होत्साता चारी प्रकारचे अन्न पचवतो. प्राण व अपान हे अग्नीमुळे आहेत, प्राण अपान गेले की जीवन संपून जाते. भक्ष्य (चावून खाण्याचे), भोज्य (पिण्याचे), लेह्य (चाटण्याचे) व चोष्य (चोखण्याचे) असे चार प्रकारचे अन्न असते. या चारीही प्रकारचे अन्न मी पचवतो असे भगवंत म्हणत आहेत. यासाठी मूळ व्यवस्था नीट असणे आवश्‍यक असते. यासाठी योगासने, प्राणायाम यांचा शरीराला आधार असणे आवश्‍यक असते. हा महत्त्वाचा आधार शरीराला न देता केवळ औषधे, इंजेक्‍शने किंवा व्यायाम, चालणे, उपवास यांच्यावर आरोग्य सांभाळणे शक्‍य होणार नाही. देश वृथा कृश केला तर कृशत्वाचा दोष मलाही त्रास देतो, असे परमेश्‍वर म्हणतो. 
(क्रमशः)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. balaji tambe article health guide