#FamilyDoctor हृदयासाठी प्रेम उपचार

#FamilyDoctor हृदयासाठी प्रेम उपचार

बदामाच्या आकारावर बाण काढलेले चित्र आपल्याला हृदयाची आणि प्रेमाची आठवण करून देते; पण हृदयामध्ये बाणासारखे काही टोचल्याची वेदना हृदयाला सहन होण्यासारखी नसते. छातीत दुखते म्हणजे प्रत्येक वेळी हृदयालाच काहीतरी झालेले आहे, असे मानणे आवश्‍यक नसते. हृदयाच्या ठिकाणी थोडा जडपणा वाटत असल्यास, तेथे थोडेसे दुखल्यासारखे वाटत असल्यास बाजूच्या स्नायूमध्ये, बरगडीमध्ये तणाव उत्पन्न झालेला असण्याची वा श्वास कोंडत असल्यामुळे अशा तऱ्हेचा त्रास होत असण्याची शक्‍यता असते; परंतु हृदयात सुई टोचल्याचा अनुभव येत असल्यास काळजी घेण्याची निश्‍चित आवश्‍यकता असते. हृदयात बाण दाखविल्याचे चित्र प्रेमसंबंधात  कसे आले असावे, हे कळत नाही. प्रेम म्हणजे सेवा, देणे हा अर्थ अभिप्रेत असल्यामुळे त्याचा हृदयाशी संबंध येतो.

हृदय हे शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचे स्थान असून, संपूर्ण शरीराला रक्‍त-प्राण पुरविण्याची योजना हृदयामुळेच असते. हृदयात जराही बिघाड झाला तर शरीराच्या सर्व अवयवांना रक्‍त पोचू शकत नाही व एकूणच त्रास होऊ शकतो. तसेच प्रत्यक्ष हृदयाला रक्‍तपुरवठा योग्य तसा झाला नाही तरी हृदय काम करू शकत नाही आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो, आयुष्यही संपुष्टात येऊ शकते. 

उंच डोंगराच्या ठिकाणी हृदयाची धडधड वाढते, श्वास घ्यायला त्रास होतो, छातीत दुखल्यासारखे वाटते, अस्वस्थ वाटते,  भीती वाटते; पण अशा वेळी हवेचा विरळपणा हे कारण असते. हवेचा दाब बदलल्याचा परिणाम रक्‍तप्रवाहावर होतो व त्यातून अशा तऱ्हेची लक्षणे होताना दिसतात. हवेमुळे त्रास होत आहे, असे समजून या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर मूळचा हृदयविकार असल्यास अचानक हृदय बंद पडू शकते. 

तेव्हा बाहेरच्या हवेचा दाब वाढला, कमी झाला; रक्‍तदाब वाढला, कमी झाला; रक्‍त अति पातळ झाले, घट्ट झाले; खूप मानसिक ताण आला वा एकटेपणामुळे मानसिक रिक्‍तपणा आला; तरी शेवटी हृदयावर ताण येऊन हृदयविकाराला आमंत्रण मिळू शकते. अति आनंद झाला तरी हृदय काम करणे बंद करते किंवा अति दुःख झाले तरी हृदय बंद पडू शकते. मनुष्याला थोडेसे उल्हसित वाटले, थोडेसे सुख वाटले तर रक्‍तप्रवाह सुधारतो व त्या मर्यादेत हृदय विकसित झाले आहे, असे वाटून माणसाला बरे वाटते. म्हणून प्रेमामध्ये मिळणाऱ्या सुखात हृदयाचा संबंध आहे, असे ठरविले गेले असावे.   हृदयाची काळजी प्रत्येकाने घ्यावी व आपले हृदय सांभाळावे. देण्यात, दानात, दुसऱ्याला सुख देण्यात हृदय सांभाळले जाते हे यातील गुपित आहे. स्वार्थीपणा, मी-मी, माझे-माझे व मीच मालक असे म्हणण्यात हृदय सांभाळले जात नाही, हे लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे. हृदयाला संपूर्ण शरीराचा जडपणा व शरीरात कुठेही अवरोध आवडत नाही. म्हणजेच वातवृद्धी झाल्याने रक्‍त शरीरात फिरण्यात अडथळा उत्पन्न झाला तर हृदयाला आवडत नाही. तसेच मधुमेहामुळे, रक्‍तात चरबीचे प्रमाण वाढल्यामुळे, रक्‍तात इतर दोष वाढल्यामुळे, मानसिक ताणामुळे उत्पन्न झालेल्या अवरोधामुळे रक्‍तप्रवाह थांबला तरी हृदयाला आवडत नाही. तेव्हा रक्‍त शुद्ध ठेवणे, मानसिक ताण कमी करणे, यामुळे हृदयाच्या आरोग्याला मदत मिळते. सर्व गोष्टी माझ्या मनाप्रमाणे व्हाव्यात, सर्व लाभ मला एकट्यालाच मिळावेत, संपूर्ण विश्वात मला एकट्यालाच सर्व अधिकार आहेत, दुसऱ्या कोणालाही कसलाही अधिकार नाही, अशा समजामुळे स्वार्थी भावना वाढते आणि हृदयाला खूप त्रास होतो. याच्या उलट सर्वांना देऊन आपण आनंद लुटावा, चार-चौघे आजूबाजूला असल्यानेच आनंद मिळतो, इतरांना वाटल्यामुळे आनंद मिळतो तर एकटेपणामुळे, एकलकोंडेपणामुळे हृदयाला त्रासच होतो. 

दानधर्म म्हटला की प्रत्येकाला भीती वाटते. दान म्हणजे स्वतःच्या वाटणीचे दुसऱ्याला देऊन टाकावे असे नाही; परंतु आपल्या मिळकतीत अनेकांचा वाटा असतो, हे लक्षात घेऊन ज्याचा त्याचा वाटा ज्याला त्याला देऊन टाकला तर मानसिक ताण कमी येतो व ही गोष्ट हृदयाला हितकर असते. 

जिभेला जे आवडते ते शरीराला पचेलच असे नसते. प्रकृतीच्या विरुद्ध आहार केल्याने शरीराला त्रासच होतो. तेव्हा समतोल आहार घेणे, मुख्य म्हणजे घेतलेला आहार पचून शरीराकडून त्याचा स्वीकार होणे महत्त्वाचे असते. शरीराला प्रोटिन्स हवी असतात, व्हिटॅमिन्स हवी असतात, शरीराला याची गरज आहे, त्याची गरज आहे असे म्हणून संबंधित गोष्टी सेवन केल्या तरी त्या गोष्टी शरीराकडून स्वीकारल्या जातातच असे नाही. कुठल्याही प्रकारचे अपचन झाले तर रक्‍तात दोष उत्पन्न होतो, ज्यामुळे शरीराला त्रास होतो. 

शुद्ध, ताजे दूध गरम करून सेवन करणे हृदयाला चांगले असते (दूध पाश्‍चराईज केलेले असल्यास चालेल; पण होमोजिनाइज केलेले नसावे). असे दूध गरम करून जमा झालेल्या मलईला विशिष्ट प्रकारचे विरजण लावल्यावर दहा-बारा तासांत तयार झालेले दही घुसळून मिळालेले लोणी कढवून तयार केलेले तूप तर हृदयाचा मित्र आहे. कच्च्या दुधापासून मिळविलेले क्रीम वेगळे करून तयार केलेले लोणी-तूप तसेच वनस्पतीज तूप हृदयाला त्रासदायक असते. भारतीय परंपरेत आयुर्वेदाने सांगितलेले साजूक तूप हृदयाला खूप मानवते; पण तरीही साजूक तुपात तळलेल्या वस्तू अतिप्रमाणात खाणे हृदयाला आवडत नाहीच. 

मनुष्याचे आयुष्य शंभर वर्षे आहे असे धरले तर त्याचे हृदय २४ x ३६५ x १०० तास कार्यरत असते. मध्ये एखादा ठोका चुकला तरी एकदम प्राण गेला असे वाटते. हृदयाला व्यायामाची गरजही असते. रोज अर्धा तास चालणे, प्राणायाम, योगाभ्यास, व्यायाम यामुळे हृदयाला सतत काम करण्याची प्रेरणा मिळते. स्वतःचे हृदय उत्तम राहावे, निरोगी राहावे, असे वाटणाऱ्यांनी आपल्या वयोमानाप्रमाणे शरीरात साठलेली विषद्रव्ये, वात-पित्त-कफादी दोष आयुर्वेदात सांगितलेल्या पंचकर्म व आयुर्वेदिक उपचारांद्वारा शरीरातून काढून टाकावेत. पंचकर्म म्हणजे नुसते वमन, विरेचन, बस्ती नव्हे, तर शरीरातील पंचतत्त्वांची शुद्धी करून घ्यावी. शरीरातील आकाशतत्त्व व मन यांची शुद्धी योगाभ्यास, विश्राम, संगीत, ध्यान व स्वभावातील परिवर्तनाशिवाय होत नाही. पंचतत्त्वांच्या शुद्धिप्रक्रियेत व नित्यनियम म्हणून हे सर्व हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com