माणुसकी आणि ओज

माणुसकी आणि ओज

एखादी व्यक्‍ती कोथिंबीर, मेथी, लिंबू अशा सर्वसाधारण गोष्टी घेण्यासाठी गेली, तरी चार गड्ड्या उचलून एखादी गड्डी पसंत पडते का याचा अंदाज घेते. अमुक कोथिंबिरीच्या गड्डीत फार बारक्‍या काड्या आहेत, अमुक गड्डीत पाने मोठी आहेत, ताजी दिसते आहे, रंग छान आहे, रसरशीत दिसते आहे; अमुक लिंबात रस कमी आहे, अमुक लिंबात रस चांगला आहे, असे अंदाज केले जातात. ज्या लिंबाच्या आत भरपूर रस असतो, ते लिंबू बाहेरूनही रसरशीत दिसतेच. वस्तू रसरशीत म्हणजे रसयुक्‍त असली, तर ती वस्तू सेवन केल्यावर तिच्यापासून चांगला अन्नरस तयार होतो. ज्या वस्तूतच रस नाही त्या वस्तूचा अन्नरस कसा तयार होणार? शिवाय, वस्तूचा वास चांगला असणेही आवश्‍यक असते. कोणत्याही वस्तूच्या वासातून त्या वस्तूची शक्‍ती प्रकट होते. म्हणजे भाजीवालीच्या टोपलीतील कोथिंबिरीचा वास 

उभ्या उभ्याच आला, तर ती कोथिंबीर चांगली आहे असे समजता येते. गड्डी हातात घेऊन नाकापर्यंत आणूनही वास येत नसेल, दोन पाने खुडून चुरगाळल्यास वास येतो आहे का याचा अंदाज घ्यायची वेळ आली, तर त्या कोथिंबिरीत जवळजवळ कुठलेही वीर्य नाही हे नक्की केले जाते. त्यामुळे प्रत्येक वस्तूत वीर्य हे हवेच. एखादे झाड उभे असताना मजबूत असते; पण तेच झाड कापले तर ते आडवे होते, उभे राहू शकत नाही. ते जमिनीत खोचून ठेवल्यास (काही वेळा) मुळे फुटून पुन्हा जिवंत झाड तयार होऊ शकते. तेव्हा रस, वीर्य व जिवंतपणा यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. 

अनेक माणसे फिरताना दिसतात म्हणजे ती जिवंत आहेत हे नक्की; परंतु त्यांचा स्वाभिमान मेलेला असतो, समाजासाठी काही तरी करावे ही त्यांच्यातील ऊर्मी संपलेली असते, अन्याय सहन करू नये असे वाटण्याची ताकद संपलेली असते. अशा व्यक्‍तींमध्ये वीर्य नसते हेच खरे. साध्या भाजीपाल्याचे वीर्य आपण जोखून पाहणार असलो, तर आपल्यातील वीर्य आपण का पाहू नये? एखाद्या फुलातील सुगंध, एखाद्या भाजीची चव त्यातील वीर्यावर अवलंबून असते.

शरीरातील वीर्य खूप महत्त्वाचे असते, तेच जीवन आहे, तीच ताकद आहे, तीच ऊर्जा आहे. वीर्य दिसते वेगवेगळ्या तऱ्हेच्या ओजसामुळे. फुलाचा वास ते त्याचे ओजस आहे, चकाकी ही सोन्याचे ओजस आहे. त्वचा उत्तम असणे, डोळे पाणीदार असणे, त्यात स्वाभिमान असणे, पाठीचा कणा ताठ ठेवून ताठ मानेने उभे राहणे हे सर्व मनुष्यात असलेल्या ओजसामुळे असते. माणुसकी असणे हे माणसाचे ओजस होय. तेव्हा माणसाची माणुसकी कमी झाली की त्याचे तेजही कमी होते. तेज कमी झाले की तो आजारी पडतो. आजारी पडला की तो आडवा होतो, म्हणजे मृत्यूकडे वाटचाल सुरू होते. 

आयुर्वेदाने ओजसाचे महत्त्व सांगितलेले आहे. शरीरातील सप्तधातूची सुरवात रसापासून होत असल्याने, रसधातू ज्या अन्नापासून तयार होतो, ते अन्न रसरशीत हवे; आणि आपण जे काही काम करतो त्यात आपल्याला रस हवा. मला एखादी गोष्ट करायला आवडते असे आपण म्हणतो, म्हणजे आपल्याला ती गोष्ट करण्यात रस असतो. असे काम करताना मन प्रसन्न असते व मनाच्या अशा प्रसन्नतेतून शरीर संतुलनात येते. आवडत नसलेले काम करताना नैराश्‍य उत्पन्न होते. एकंदर माणुसकी माणसाला मनुष्य बनवतेच; परंतु ती माणसाचे तेज, त्याचे कर्तृत्वही दाखवत असते. 

ओज प्रथम तेज वा प्रकाशाच्या रूपाने प्रकट झालेले दिसते. बऱ्याच व्यक्‍तींच्या भोवती तेजोवलय असते. बहुतेकांच्या दृष्टीला तो प्रकाश दिसला नाही, तरी काही व्यक्‍तींची दृष्टी अधिक व्यापक झालेली असल्याने त्यांना तो दिसू शकतो. मोत्याची चमक हे त्याचे भौतिक ओज होय. त्यामुळे हनुमंतरायांना सीतामाईंनी स्वतःच्या गळ्यातील मोत्याचा कंठा दिला तेव्हा त्यांनी एक एक मोती फोडून पाहायला सुरवात केली. एवढे छान मोती का फोडतो आहेस, अशी सीतामाईंनी विचारणा केल्यावर हनुमंतरायांनी उत्तर दिले, ‘मी मोत्यांत ‘राम’ आहे का ते पाहतो आहे.’ ओजाची शेवटची पायरी म्हणजे राम, जाणीव, कॉन्सशनेस. त्यामुळे मोत्यात राम म्हणजे ओज आहे की नाही हे हनुमंतराय पाहात होते. डोळे मिटून सतत चैतन्याचे ध्यान करणारे हनुमंतराय मोत्याच्या बाहेर असलेल्या चमकेवर मुळी भुलणारे नव्हतेच. मोत्याच्या आत चैतन्य आहे की नाही हे जणू ते पाहात होते. यावरूनच ‘यात राम नाही’ असा वाक्‌प्रचार मराठीत रूढ झालेला आहे.

अशा तऱ्हेने ओजाचा संबंध लक्षात घेतला तर प्रत्येकाने ओजवृद्धीसाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे ही गोष्ट ध्यानात येईल. खाणे प्रकृतीला मानवेल असे असावे, असे आयुर्वेद म्हणतो. अशा अन्नाचे पुढे ओजात रूपांतर होते, अन्यथा सेवन केलेल्या अन्नापासून रक्‍त तयार होईल, मांस वाढेल, पुढे चरबीत रूपांतर होईल, त्याचे रूपांतर ओजापर्यंत होत नाही. चरबी वाढत राहिली तर शेवटी मनुष्य उभाही राहू शकणार नाही, आडवा होण्याच्या मार्गाकडे जाऊ लागेल. ओजक्षय झाला की रोग आटोक्‍यात येत नाही, तो मोठा मोठा होत राहतो. 

तेव्हा वस्तूतील रसभाव पाहून आहार घेतला, तर तो चांगला आहार. आयुर्वेदाने अशा वस्तू सांगितल्या आहेत, ज्यांच्यात रस ओतप्रोत आहे, त्यांचे वीर्य लवकर व चांगले तयार होईल. या सगळ्यांत सर्वप्रथम येते ते दूध व दुग्धजन्य पदार्थ. आयुर्वेदाने सांगितलेली रसायने हेच काम करतात. उदा. डिंकाचे लाडू, च्यवनप्राश, आत्मप्राश. या रसायनांमुळे ओजवृद्धी व्हायला हातभार लागतो. 

योग, ध्यान, रसायन, योग्य जीवनपद्धती यांची सांगड घातल्यास व्यक्‍तीचे ओज, तेज व औरा (शरीराच्या भोवती असणारे प्रकाशाचे तेजोवलय) तयार होऊन जीवन सुखी होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com