esakal | आत्महत्या नकोच!
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide

आत्महत्या नकोच!

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

परमानंदापर्यंत म्हणजेच आनंदस्वरूप असणाऱ्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी आत्मा ही शिडी आहे. या आत्म्याचा घात करण्याचा मनुष्याला कुठलाही अधिकार नाही. आत्मघात-आत्महत्या केल्याने काहीही साधता येत नाही.

मनुष्याला जीवन जगत असताना सुख-दुःखांना सामोरे जावेच लागते. जीवन कधीच एकांगी असत नाही. आयुष्यात प्रत्येकाला दोन आधार असतात. सुख हा आनंद अनुभवण्याचा आधार आणि दुःख हे आनंदापर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार. अडचण आल्यास स्वतःचाच दोष असेल असे नाही. आलेली अडचण ही दुसऱ्याच्या दोषामुळे आली असे वाटत असेल तर त्याची शिक्षा स्वतः माणसाने का घ्यावी? आत्महत्या ही सर्वांत मोठी शिक्षाही आहे आणि ते फार मोठे धाडसही आहे. आपण ज्या फांदीवर बसलेलो आहोत ती फांदी झाडापासून कापून टाकत असताना लक्षात आले नाही तर घडतो तो अपघात. परंतु फांदी कापली जात आहे दिसत असताना फांदीवर बसून राहणे वा जाणून बुजून फांदी कापणे ही आत्महत्या. अगदीच आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती असली तरी नरवीर तानाजीसारखा शेवटपर्यंत गड लढविणे असा प्रयत्न करून पाहणे हेच कल्याणाचे. जीवनात एकूण अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कारण बऱ्याच वेळा आपले कर्म अपुरे पडते. आत्महत्येसारख्या दुर्घटना समाजात का घडतात याचे उत्तर मिळत नाही तेव्हा त्याला नशीब म्हटले जाते. परंतु नशीब घडविण्यासाठी, नशिबाशी लढा देण्यासाठी मनुष्याने कंबर कसणे आवश्यक असते.

एकूण संपूर्ण जगात वाईट परिस्थिती असते, रोगराई फैलावलेली असते, आर्थिक संकट घोंघावत असते, सामाजिक व्यवस्थेत असंतुलन होत असते त्यावेळी एका व्यक्तीपुरता विचार करून चालत नाही. अशा वेळी घडत असलेल्या प्रसंगांची सर्व जबाबदारी एका व्यक्तीने घेण्याची आवश्यकता नसते. उगाच मोठेपणा व जबाबदारी स्वीकारून अहंकारच वाढतो व मानसिक ताण-तणाव वाढतात. अहंकार सोडावा असे भारतीय शास्त्रे सुचवत असतात. याचे मुख्य कारण ताण- तणावातून मुक्ती मिळावे हे असते. जेव्हा कारण नसताना जबाबदारी घेतली जाते, मग ती चुकीची असो वा बरोबर असो, म्हणजे मी जग संपवीन किंवा मीच जग उत्पन्न केले आहे, सर्व वस्तूंचा मालक मीच आहे, मीच एकटा श्रेष्ठ आहे वगैरे भ्रामक कल्पना करून अहंकाराला खत-पाणी घातले गेल्यास शेवटी त्याचे पर्यवसान मानसिक ताणातच होते. परिस्थितीशी कसे लढावे हे बऱ्याच वेळा कळत नाही. नदीचे पात्र अरुंद असले तर उत्तम प्रकारे पोहता येत नसणारी व्यक्तीही हात-पाय मारून पलीकडच्या तीरावर पोहोचते. परंतु पलीकडचा किनारा दिसत नाही अशा अथांग सागरात पडल्यास मनुष्य मानसिक स्वास्थ्य गमावून बसतो. अशा कसोटीच्या वेळी सहन करावा लागणारा मानसिक ताण सुसह्य होण्यासाठी धैर्य असावे लागते. असे धैर्य असण्यासाठी त्याची तयारी आधीपासूनच करावी लागते.

परमानंदापर्यंत म्हणजेच आनंदस्वरूप असणाऱ्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी आत्मा ही शिडी आहे. या आत्म्याचा घात करण्याचा मनुष्याला कुठलाही अधिकार नाही. आत्मघात-आत्महत्या केल्याने काहीही साधता येत नाही. सध्या मानसिक ताण खूप वाढलेला आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आज सगळेच मानसिक ताण अनुभवत आहेत. मुलांना आपल्या मित्रांना भेटता येत नाही, बाहेर खेळता येत नाही, शाळेत जाता येत नाही अशा वेळी त्यांच्या मनात बदल होतात, ज्यामुळे ताण उत्पन्न होतो. यामुळे मुलांना वाईट सवयी लागू शकतात. असे न होण्यासाठी आधीपासूनच काळजी घेणे आवश्यक असते. मनाला, जिवाला अशा प्रकारे गुंतवून ठेवावे लागते जेणेकरून मानसिक ताण उत्पन्न होणार नाही. आज अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांना नोकरीच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचे साधन सहजासहजी मिळत नाही. ऑफिसमध्ये जाऊन चारचौघांसमवेत काम करण्यात उत्साह असतो, पण तेच ऑफिसचे काम घरून करावे म्हटले तर काम करताना उत्साह वाटत नाही. हाताने प्रत्यक्ष काम करणाऱ्या मंडळींना घरी बसून काम करता येत नाही. त्यामुळे एकूण सर्वांनाच आज ताण आहे. ताण कसा पचवावा ही आजची समस्या आहे. ही सध्या सर्वांच्याच परीक्षेची वेळ आहे. ताण कमी होण्यासाठी भौतिक साधने जेवढी उपयोगी पडतील त्याहून अधिक विश्र्वास, शांतपणा, श्रद्धा, ध्यान, योग ही साधने उपयोगी पडतील. यांच्या मदतीने मानसिक ताणाला दूर ठेवून धैर्य वाढवणे, सद्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी कुठला तरी दुसरा, वेगळा मार्ग असू शकेल याचा विचार करणे आवश्यक आहे. आजची परिस्थिती निवळल्यानंतर समोर आलेल्या वेगळ्या प्रकारच्या जगात वावरण्यासाठी तयारी करणेही आवश्यक आहे.

loading image