

निदान पावसाळ्यात म्हणजे वातप्रकोपाच्या काळात जंक फूड, डबाबंद पेये वा खाद्यपदार्थ खाणे टाळायला हवे. बर्गर, पिझ्झा, ब्रेडसारखे पदार्थ कमीत कमी खाणे किंवा सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी पूर्णतः टाळणे श्रेयस्कर होय.
पावसाळा आला असे म्हणता म्हणता त्याचे परिणाम शरीरावर दिसू लागतात. भूकमंदावते, पचनसंस्थेत बदल झालेले आढळतात, पाय भरून येणे, जिने चढावे लागले तर दुखू लागणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. विशेषतः वयस्कर व्यक्तींमध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी ही लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसू लागतात. पावसाळा म्हणजे वातप्रकोपाचा काळ. यातच वातावरणातील गारव्याची भर पडली, आहार-आचरणात आवश्यक ते बदल केले गेले नाहीत की त्यामुळे सांधेदुखी जाणवू शकते. वाताला कमी करण्यासाठी दोन रामबाण उपाय म्हणजे स्नेहन व स्वेदन (तेल लावून नंतर शेक करणे). या दृष्टीने सांध्यांना शांती तेलासारखे आतपर्यंत जिरून वात कमी करणारे तेल लावणे आणि वरून गरम पाण्याच्या पिशवीचा किंवा रुईच्या पानांचा शेक घेणे उत्तम गुणकारी ठरते.
घराच्या आसपास निर्गुडी, एरंड, शेवगा यापैकी एखादे झाड असल्यास त्याची पाने वाफवून त्याचा शेक करण्याचाही उपयोग होतो. सांध्यावर सूज येत असली व बरोबरीने पोट नीट साफ होत नसले तर चार कप पाण्यात दोन चमचे सुंठ व दोन चमचे एरंडमुळाची भरड मिसळून त्याचा एक चतुर्थांश म्हणजे एक कप उरेपर्यंत काढा करून दिवसातून एकदा घेतला तर पोटही साफ होते आणि गुडघेदुखी, सांधेदुखीतही आराम मिळतो. बाजारामध्ये शुद्ध गुग्गुळ मिळू शकतो. गुग्गुळ हे वातावरचे आणि सांधेदुखी कमी करण्याचे एक उत्तम औषध आहे. सिंहनादगुग्गुळ, योगराजगुग्गुळ वगैरे गोळ्या तर कामाला येतातच, पण पाव चमचा शुद्ध गुग्गुळ मध-तुपाबरोबर काही दिवस घेण्याने सांधेदुखी कमी होते. संतुलनच्या वातबल या गोळ्या काही दिवस नियमित घेण्याने, बरोबरीने नियमित अभ्यंग करण्याने, सांध्यांना शांती तेल लावण्याने गुडघेदुखी, सांधेदुखीवर चांगले परिणाम दिसतात. कधी कधी सांधेदुखी फिरत्या स्वरूपाची असते म्हणजे आज डाव्या मनगटावर सूज येऊन दुखते तर उद्या उजव्या कोपरावर सूज येऊन दुखायला लागते. कधी घोटे दुखतात तर कधी हाताची बोटे दुखतात. या प्रकारच्या दुखण्यामध्ये बरोबरीने सूजही असते. या प्रकारच्या सांधेदुखीवर तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणेच चांगले असते.
तत्पूर्वी दुखणाऱ्या ठिकाणी वाळूची पोटली गरम करून शेकणे आणि गुळवेल व सुंठीचा काढा घेणे चांगले. पहिल्या बोटाइतक्या लांबीची ताजी गुळवेल आणि एक पेर आकाराची चेचून घेतलेली सुंठ यांचा चार कप पाण्यात उकळून एक कप काढा करून घेता येतो. या प्रकारच्या सांधेदुखीत आहारासह एरंडेल तेल घेणे सुद्धा उपयोग असते. एक पोळी किंवा एक भाकरीचे पीठ मळताना त्यात चमचाभर एरंडेल टाकावे. यापासून केलेली पोळी किंवा भाकरी ताजी-ताजी गरम असताना खाणे यासाठी उत्तम असते. सतत पंख्याखाली असणे, ए.सी.चा झोत सरळ अंगावर येईल अशा तऱ्हेने बसणे किंवा झोपणे हे सुद्धा वातदोषाला बिघडविण्याचे एक कारण असते. त्यामुळे पंखा, ए.सी.चा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष देणे चांगले होय.
पावसाळ्यातील गारव्यामुळे फरशी थंड झालेली असली तर पायात मोजे किंवा स्लिपर्स घालणे आवश्यक असते. पावसाळ्यामुळे कपडे भिजले, डोके ओले झाले तर ते तसेच ठेवता कोरडे कपडे घालणे, केस नीट पुसून घेणे हे सुद्धा आवश्यक असते. यानंतर आल्याचा चहा किंवा सॅन अमृतसारखा चहा घेतला तर पावसाळ्यातील गारवा बाधणार नाही. वात वाढण्यामागे कोरडे, निःसत्त्व पदार्थांचे सेवन हे सुद्धा एक मुख्य कारण असते. त्यामुळे निदान पावसाळ्यात म्हणजे वातप्रकोपाच्या काळात जंक फूड, डबाबंद पेये वा खाद्यपदार्थ खाणे टाळायला हवे. बर्गर, पिझ्झा, ब्रेडसारखे पदार्थ कमीत कमी खाणे किंवा सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी पूर्णतः टाळणे श्रेयस्कर होय. वेळेवर घरचे गरम गरम वरण-भात किंवा खिचडी, एखादी फळभाजी, भाकरी किंवा फुलका, मुगाचे कढण, आमसुलाचे सार, कुळथाचे सूप अशा गोष्टींचा आहारात समावेश करणे चांगले. बस्ती हा आयुर्वेदातील प्रसिद्ध उपचार, वातदोष कमी करण्यासाठी बस्तीसारखा प्रभावी उपाय शोधून सापडणार नाही. दशमूळ तेल किंवा एरंडमूलादी तेलाची बस्ती घेणे किंवा संतुलनची घरच्या घरी सहजपणे घेता येणारी बस्ती हे सांधेदुखीसाठी वरदानच होय. अशा प्रकारे पावसाळ्याच्या या अवघड दिवसासाठी वातसंतुलनासाठी उपाययोजना केली तर त्यामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी टाळता येईल, त्रास होत असला तर या उपायांच्या मदतीने तो बराही करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.